Wednesday, May 25, 2016

Ingles Market Inc, Hendersonville, North Carolina (2)वीसशे पंधरा सालच्या धनत्रयोदशीच्या दिवशी माझी नोकरी सुरू झाली. नोकरीच्या पहिल्या दिवशी जेमिने माझ्या अमेरिकन पासपोर्ट, सोशल सिक्युरिटी आणि स्टेट आयडी या कागदपत्रांच्या झेरॉक्स घेतल्या. काही कागदपत्रांवर माझ्या सह्या घेतल्या. ऑनलाईन काही माहिती भरली आणि माझी नोकरी सुरू झाली. पंचिंगसाठी तिने मला एक नंबर दिला आणि सांगितले हा तुझा यूजर आयडी, पासवर्ड तुला हवा तो घे. शिवाय तिने हेही सांगितले की जेवणाची अर्ध्या तासाची सुट्टी घेशील तेव्हा पण जेवायला जाताना व जेवण झाल्यावर तुला पंचिंग करावे लागेल. कामावर आल्यावर व जातानाही पंच कर असेही सांगितले. नंतर तिने मला एक टी शर्ट दिला व एक टोपी घालायला दिली. एक ऍप्रनही दिला. टी शर्ट मध्ये तुला कोणता रंग पाहिजे तेही विचारले.  टी शर्ट मध्ये ४ रंग आहेत.   विजार आपली आपण घ्यायची.  एक टी शर्ट इंगल्सतर्फे मिळतो आणि बाकीचे आपण विकत घ्यायचे.  मी टी शर्ट घातला. तोही विजारीमध्ये आत खोचला. विजारीवर पट्टा बांधला. ऍप्रन घालता. केसांचा बुचडा बांधला आणि कामाला सज्ज झाले. बांगड्या, अंगठ्या, घड्याळे काहीही घालायचे नाही. शिवाय लोंबते कानातलेही घालायचे नाहीत असे मला जेमिने सांगितले.


तिने माझी ओळख कार्मेन नावाच्या एका स्पॅनिश बाईशी करून दिली. आम्ही दोघींनी हस्तांदोलन केले.  एकमेकींकडे बघून हसलो आणि आमची कामाला सुरवात झाली.  ४-५ दिवसानंतर मला माझ्या नावाचा एक बिल्लाही मिळाला. टी शर्टाला हा बिल्ला अडकवायचा असतो. प्रशिक्षण असे वेगळे काहीच नाही ! थेट कामाला सुरवात आणि काम करता करता मला सर्व गोष्टी समजल्या आणि मी प्रत्येक कामात तरबेज झाले. कार्मेनने मला सर्व काही व्यवस्थित सांगितले. कार्मेन ही प्रामाणिक आणि मेहनती आहे. डेली विभाग हा खूप मोठा विभाग आहे. त्यात आम्ही दोघी म्हणजे मी आणि कार्मेन आहोत. शिवाय विकी नावाची एक बाई आहे. ही बाई अमेरिकन आहे. आम्ही तिघी उत्पादन विभागात आहोत. आमच्या पुढे सुशी बार, हॉट बार आणि सब बार या विभागातली लोकं काम करतात. आणि आमच्या मागच्या बाजूला सलाड बार आहे. त्याच्या शेजारी कुकिंग विभाग आहे. इंगल्स हे एक ग्रोसरी स्टोअर तर आहेच पण शिवाय या स्टोअरच्या आत फ्रेश फूड मार्केट आणि स्टार बक्स आहे. कॅफे कॉर्नर आहे. तिथे सर्व जण बसून जेवतात. गप्पा मारतात. वायफाय फुकट असल्याने बरेच लोक लॅपटॉपवर आपापली कामे करताना बसलेली दिसतात.आमच्या उत्पादन विभागाचे स्वरूप तसे बऱ्यापैकी मोठे आहे. आमचा ओटा अल्युमिनियमचा आहे ज्यावर आम्ही सतत काही ना काही बनवत असतो. ओट्याच्या खाली लागूनच छोटी छोटी शीतकपाटे आहेत. फ्रीजर हा स्टोअर्सच्या मागच्या बाजूला आहे. शिवाय मागच्या बाजूला दोन कचऱ्यापेट्या आहेत. एक आहे ती रिकामी झालेली खोकी तिथे टाकायची. दुसरी कचरापेटी नाशिवंत माल फेकण्यासाठी आहे. शिवाय डेली विभागात कामे करताना कचरा फेकण्यासाठी आमच्या बाजूला ड्रमसारख्या दिसणाऱ्या छोट्या कचरापेट्याही तिकडेच रिकाम्या केल्या जातात.  स्टोअर्सच्या मागच्या बाजूला जो फ्रीजर आहे तो फ्रीजर म्हणजे एक मोठी
खोलीच आहे . इथे भल्या मोठ्या बॉक्सेस भरलेल्या असतात ज्यामध्ये बऱ्याच गोष्टी असतात.  ब्रेड, व्हनिला चॉकलेट पूडींगचे डबे, पिझ्झा बेस, बऱ्याच प्रकारचे मांस वगैरे. डेली विभागाला लागूनच एक कोल्ड रूम आहे जिथे आम्ही केलेले पदार्थ छोट्या प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये भरून, लेबलिंग करून ठेवतो.  हे प्लस्टीकचे पारदर्शक डबे काही छोटे तर काही मोठे असतात. त्याचे आकारही वेगवेगळे असतात. काही पदार्थ बनवण्यासाठी जो कच्चा माल लागतो तो आम्ही इंगल्समध्ये असलेल्या फ्रेश फूड दुकानातून आणतो. जो काही माल आणला असेल त्याची नोंद ठेवायला लागते. काही पदार्थांसाठीचा जो माल आहे तो आम्ही इंगल्स दुकानातूनच घेतो त्याची नोंद ठेवायला लागत नाही. उदाहरण द्यायचे झाले तर सलाड बनवण्यासाठी लेट्युस, काकड्या, सिमला मिरची, छोटे टोमॅटो आम्ही फ्रेश फूड मधून आणतो.

आम्ही बरेच पदार्थ बनवतो आणि ते पदार्थ बनवण्यासाठी आमच्या बऱ्याच चकरा होतात. कच्चा माल आणण्यासाठी फ्रिजर मध्ये जावे लागते. तिथून आले की पदार्थ बनवला जातो. बनवलेला पदार्थ ठेवण्यासाठी शेजारीच असलेल्या कोल्ड रूम मध्ये जावे लागते. शोकेस सारख्या दिसणाऱ्या स्टँड मध्ये पदार्थांचे डबे
 ठेवायला  लागतात.  त्यासाठीही चकरा होतात. अर्ध्या तासाच्या जेवणाच्या सुट्टीत आपला डबा आणि फोन घेण्यासाठी एका खोलीत जावे लागते. तिथून पंचिंग करण्यासाठी चालत जावे लागते.  हे पंचिंगचे ठिकाण स्टोअर रूममध्येच आहे पण जरा लांब आहे. तिथून पंचिंग केले की परत कॅफे कॉर्नर मध्ये येऊन जेवायचे. जेवण झाले की परत चालत पंचिंग करायला जायचे. तिथून परत चालत डबा आणि फोन ठेवण्यासाठी यायचे. चूळ भरण्याकरता आणि डोळ्यावर पाण्याचा हबका मारण्याकरता रेस्ट रूम मध्ये जायचे. तिथून परत आपल्या जागी येऊन कामाला सुरवात करायची.एकूणच काय काम करताना अनेक चकरा होतात. काम हे उभे राहूनच करायचे. आपण घरी सुद्धा ओट्याशी उभे राहूनच काम करतो ना ! अगदी तसेच. अर्थात इथे प्रत्यक्षात कुकिंग करायचे नसते. त्याकरता दुसरा विभाग आहे. आमचा स्टोव्ह, ओवन, याच्याशी अजिबात संबंध येत नाही. हातापायांची सतत हालचाल होते. पदार्थ बनवताना हाताची हालचाल. पदार्थ बनवण्यासाठी लागणारे सर्व घटक आणताना चकरा होतात म्हणजे पायांची हालचाल. पदार्थ रॅक मध्ये ठेवण्यासाठी हात वर केले जातात. रॅकच्या मध्यभागी किंवा रॅकच्या खालच्या कप्यात बनवलेल्या पदार्थांचे डबे ठेवण्यासाठी खाली वाकले जाते. ओंडवे बसणे होते. आणि हो, पदार्थ बनवताना डोकेही शाबूत ठेवावे लागते बरं का !


नाहीतर प्रिंट झालेले लेबल दुसऱ्या पदार्थ्याच्या डब्याला तर चिकटवलेले नाही ना ! किंवा पदार्थ बनवताना दुसरेच कोणते तरी मांस घातले नाही ना ! असे गोंधळ झालेले आहेत आणि नजर चुकीने होऊ शकतात. उत्पादन विभागात बऱ्याच प्रकारचे मांसाचे सँडविचेस आम्ही बनवतो. शिवाय बऱ्याच प्रकारची सलाड बनवतो. पिझ्झे बनवतो. मी पक्की शाकाहारी असल्याने मला कोणत्या प्रकारचे मांस आहे ते ओळखता येत नाही. रंगावरून ते मी लक्षात ठेवले आहे. आयुष्यात कधीही कोणतेही मांस खाल्ले नाही आणि खाणारही नाही. काम करताना मात्र सगळीकडे मांस बघताना डोके सुन्न होऊन जाते. नोकरीचा हा एक भाग असल्याने दुसरा पर्याय नाही.


अर्ध्या तासाच्या जेवणाच्या सुट्टीत जेव्हा बसतो तेव्हा खूपच हायसे वाटते. आम्हाला अजून १० मिनिटांची विश्रांती आहे पण ती घ्यायला वेळ तर मिळाला पाहिजे ना ! माझ्या नोकरीचा वेळ सकाळी  ८ ते ४ आहे आठवड्यातून ४ दिवस आहे.  काहींचा ६ ते २, ७ ते ३, ९ ते ५ आहे तर रात्रपाळी साठी  दुपारचे २ ते रात्री १० अस आहे.  एखादवेळेस आमचे काम लवकर संपले तर मॅनेजरला सांगून घरी जाता येते किंवा तिथेच थांबून दुसऱ्या विभागाला मदर करायची असते.या नोकरीमुळे माझे वजन कमी झाले. मी चपळ आहेच पण अजून त्यात बरीच भर पडली. या प्रकारची नोकरी मी पहिल्यांदा करत आहे. एक वेगळ्या प्रकारचा अनुभव मिळत आहे. माझ्या कामाचे स्वरूप नक्की काय आहे आणि ते कसे केले जाते याची सविस्तर माहिती पुढील भागात !


क्रमश : ------

2 comments:

Anonymous said...

are wa congrates Rohini Tai. Khup chan vatala tumchya navya nokari baddal vachun !!! ajun pan tumche workplace experiances share kara... Keep writing :))))

Nisha

rohinivinayak said...

Nisha,,, Tuza abhipray vachun mala khup utsah aala aahe,, khup divsani bhetat aahot na aapan,, !!

thanks for comment,,,