Sunday, March 08, 2015

८ मार्च २०१५

 
आजची रोजनिशी लिहायची म्हणजे ३ दिवसांची मिळून लिहायला पाहिजे. कारण की मला उत्साहाचे उधाण काहीवेळा येते. आजचा दिवस तर खूपच वेगळा गेला याचे कारण की आज आम्ही आजचा सूर्योदय आणि सूर्यास्त दोन्ही पाहिले. झडझडून खूप चाललो. रोजनिशी लिहायला खरे तर अजिबात त्राण नाहीये पण ती लिहल्याशिवाय माझा उत्साहाची पूर्तता होणार नाही म्हणून लिहित आहे.




हल्ली इतर चमचमीत खाणे किंवा सण सुद्धा अगदी होतोच असे नाही. वेळ मिळाला , उत्साह असला, तरच असे काही केले जाते. पुर्वी मी दर १५ दिवसांनी इडली सांबार करायचे. बाकी इतर रगडा पॅटीस , भेळ , समोसे सुद्धा केले जात. पण आता होत नाही आणि वेळही नाही. काही कारणास्तव मी खूप बिझी झाली आहे. तर शुक्रवार पासून उत्साहाला उधाण आले होते. शुक्रवारी संध्याकाळी खायला बरेच महिन्यानंतर ओली भेळ केली होती. चविष्ट भेळ खाऊन समाधान झाले. होळीची पुरणपोळी शनिवारी केली. सणाचे ताट सजवले व पुरण्पोळी पण चविने खाल्ली. त्यामुळे शनिवारही छान गेला. मुख्य म्हणजे दोन दिवस हवा खूपच छान आहे. हवा छान असली की चला, बाहेर पडा आणि पाहिजे तितके हिंडून घ्या असे होते. नाहीतर थंडीने चालणे बंदच होऊन जाते. चालणे बंद की कोणत्याही कामाला उत्साहच येत नाही.




आज सकाळचा सूर्योदय पहायचा असे काल रात्रीच ठरवले होते. जाग आली आणि समुद्रकिनारी जाऊन पोहोचलो. सूर्योदय पाहताना इतके काही छान वाटते ना की ते शब्दात नाही सांगता येणार. प्रत्येक वेळी सूर्योदयाचा अनुभव वेगळा असतो. आज सूर्याची किरणे फोटोत खूपच छान आली आहेत. घरी आलो. चहा घेतला. आज कलर करायला पण मुहूर्त मिळाला. बाहेर जेवायला गेलो. संध्याकाळी नदीवर जाण्याचे ठरवले. नदीवर पण बरेच महिन्यांनी गेलो आणि अगदी या टोकापासून ते त्या टोकापर्यंत चालायचे ठरवले. स्वच्छ सुंदर हवा होती. सूर्यास्त पाहिला आणि घरी आलो. २ दिवसात बरेच चालणे झाले.



एकूणच काय ३ दिवस लागोपाट बरेच काही ना काही झाले. वीकेंड हवेमुळे आणि अंगात शिरलेल्या उत्साहामुळे सार्थकी लागला असे म्हणता येईल. हा उत्साह का आला बरे ? ते फक्त माझे मलाच माहीत आहे !



आजच्या सूर्योदयाची आणि सूर्यास्ताची किरणे छान आली आहेत. दुसर म्हणजे आज आमच्या सावल्याचे फोटोही छान मिळाले. ली रंगरला मी सुर्योदयाचा फोटो पाठवीन. बघू तो केव्हा दाखवतो ते ! आजचा दिवसाचा सूर्योदय आणि सूर्यास्त दोन्ही पाहण्याचा योग आला आणि म्हणूनच तर आजचा दिवस वेगळा आणि लक्षात राहील असा गेला. आमच्या गावी सूर्योदय समुद्रकिनारी होतो आणि सूर्यास्त नदीवर होतो.

No comments: