Wednesday, January 08, 2014

अनामिका ... (९)


मैत्रिणीच्या मावसबहिणीचे लग्न थाटामाटात पार पडते. संध्याकाळच्या रिसेप्शन पार्टीला सगळेजण तयार होतात. संजली पण एक छान साडी नेसून तयार होते. तिच्या हातात मोबाईल असतोच. अमितचा फोन येणार असतो. उशीराने विमानाचे उड्डाण असल्याने विमानतळावर गेल्यावर तो संजलीला फोन करणार अस्तो. अमितचा फोन कधी येईल या विचारात ती असते. तितक्यात फोन वाजतो. लगबगीने संजली नवऱ्या मुलीच्या खोलीत शिरते. "बोल अमित" अमित तिला सांगतो मी आता विमानतळावर जायला निघतोय तिथे पोहोचलो की साधारण तासा दोन तासाने तुला फोन करीन म्हणजे ११ वाजता. तू झोपणार नाहीस ना ! संजली म्हणते नाहीरे , मला तुझ्याशी खूप बोलायचे आहे. आम्हाला सुद्धा घरी पोहोचतेपर्यंत उशीर होईलच. पण आता तुला नाही का बोलता येणार? कारण की आता इथे माझ्या आजुबाजूला कोणीच नाहीये. नंतर घरी गेल्यावर मात्र माझ्या मैत्रिणी असतील. पण तरी बघते मी कसे काय मॅनेज करता येईल ते !




रात्री उशीरापर्यंत मंडळी घरी परततात. सर्वजण खूप दमलेले असतात. घरात पसारा असतो. संजली व तिच्या मैत्रिणी खोलीत येतात कुणालाही बोलायची ताकद नसते. उद्या सकाळी पुण्याला परत जायला लवकर निघायचे असते. संजलीला झोप येत असूनही तिला जागेच रहायचे असते कारण की अमितचा फोन येणार असतो. संजली मात्र या सगळ्या गर्दीत मला अमितशी कसे काय बोलता येणार आहे कोण जाणे, अशा विचारात असते. कार्यालयात अमितचा फोन आला तेव्हाच का नाही बोलला आपल्याशी? काय करावे आता? अशा विचारातच ती आडवी होते. हातात मोबाईल असतोच. दारावरची बेल वाजते. कोणीतरी निरोप घेऊन आलेले असते की वरच्या मजल्यावरच्या पाहुण्यांमध्ये एका आजींना त्यांच्यासोबत झोपायची गरज आहे. त्यांना जरा बरे वाटत नाही तर कुणी तयार आहे का? संजली लगेचच होकार देते. दुसऱ्या मजल्यावर त्या आजीबाई एकट्याच एका रूममध्ये झोपलेल्या असतात. त्या म्हणतात माझा सून एका नातेवाईकांकडे गेली आहे ती उद्या येईल. आणि मला थोडे बरे वाटत नाही म्हणून तुम्हाला बोलावले. संजली त्या आजींना सांगते काही काळजी करू नका. मी आज तुमच्या सोबतीला आहे. काही लागले तर सांगा. फक्त मला एक फोन येणार आहे तर चालेल ना? आजी म्हणतात अगं हो, न चालायला काय झाले? मी तर आता औषध घेऊन लगेच झोपेन. कदाचित मला झोप लागेल. आज सबंध दिवस लग्नात दगदग झाली इतकेच. त्यामुळे थोडे ताप आल्यासारखे वाटत आहे.










त्यांच्या समोर असलेल्या कॉटवर संजली आडवी होते. रिंगटोन खूप कमी करते. संजलीला काही केल्या झोप येत नसते. केव्हा करणार हा फोन? असे म्हणत पाणी प्यायला उठते आणि आजींना झोप लागली आहे का नाही ते बघते. तर त्या शांत झोपलेल्या असतात. परत येऊन कॉटवर पडते. तिला खरे तर खूप झोप येत असते पण झोपता तर येत नसते अशी अगदी वाईट अवस्था होऊन जाते. अमितच्या फोनची वाट बघून बघून तिला कंटाळा येतो तेवढ्यात फोन वाजतो. तो अनिलचा असतो. तो विचारतो काय गं उद्या निघताय तुम्ही सर्व? मला उद्या एक महत्त्वाची मिटिंग आहे त्यामुळे मी दिवसभर नाहीये आणि आईला पण जरा बरे वाटत नाही. तर लवकर निघून या. म्हणजे तुला पण घरी आल्यावर जरा विश्रांती मिळेल. संजली जांभया देत देत अनिलला उत्तरे देत असते. आणि म्हणते चल बाय. मी झोपते आता. उद्या लवकर निघायचे आहे असे म्हणून फोन बंद करते. आणि लगेचच अमितचा फोन येतो. अमितचा फोन आल्यावर मात्र तिची झोप उडते आणि उत्साहात बोलायला लागते. त्याला ऐकू जाईल अशा आवाजात पण थोडे हळू बोलत राहते. त्याचे बोलणे थांबूच नये असे तिला वाटत असते. मागच्या काही आठवणी निघतात. अमित तिच्या आईवडिलांची पण चौकशी करतो. बऱ्याच वेळ गप्पा मारल्यावर अमित म्हणतो चल आता मी फोन ठेवतो. विमानात बसायला सुरवात झाली आहे. मी तुला पोहोचल्यावर फोन करेन पण वाट पाहू नकोस. नंतर कधीतरी वेळ मिळेल तसा तुला फोन करीन आणि हो पुढच्या वर्षी आल्यावर अनिलला नक्की भेटेन मी. अगं तो माझा चांगला मित्र आहे पण पूर्वी काही घटना घडल्या आणि मी त्या घरात येईनासा झालो, ते का हे मी तुला सांगितलेच आहे, त्यामुळे त्याचे माझ्याशी बोलणे झालेच नाही.










परत एकदा आजींकडे बघते तर त्या शांत झोपलेल्या असतात. मनात म्हणते बरे झाले त्या झोपल्यात त्यामुळे मला अमितशी छान बोलता आले. तिला बराच वेळ झोप येत नाही. पहाटे पहाटे तिला थोडी झोप लागते.   सकाळी तिच्या मैत्रिणी तयार होऊन तिच्या खोलीची बेल वाजवतात तेव्हा संजली दचकून जागी होते. दार उघडताच ' अगं संजली तुला किती फोन केले. तु तुझा फोन बंद करून का ठेवलास? चल आवर लवकर तुझे. आपल्याला निघायचे आहे. संजली भराभर आवरून तयार होते. लग्नघरी सर्वांचा निरोप घेऊन संजली व तिच्या मैत्रिणी पुण्याला जायला निघतात. वाटेत संजली थोडी थोडी डुलकी घेत असते. तिला खूप दमल्यासारखे झालेले असते. ती तिच्या घरी येते तेव्हा आत्याबाई घरात असतात. अनिल मिटिंगला आणि मुलगा शाळेत गेलेला असतो. आत्याबाई विचारतात कसे झाले लग्न? खूप मजा केलीत का तुम्ही मैत्रिणींनी? स्वयंपाक तयार आहे. आपण दोघी जेवू. "हो आत्याबाई. खूप मजा आली लग्न छानच झाले. प्लिज आत्याबाई. तुम्ही बसा जेवायला. मी वाढते तुमहला. मला अजिबात भूक नाहीये. मध्ये वाटेत खाणे झाले आहे. मी वर जाते. आत्याबाईना जेवायला वाढून संजली वरच्य मजल्यावरच्या तिच्या खोलीत निघून जाते.











प्रवासाचा शीण जाण्याकरता ती डोक्यावरून अंघोळ करते. ओले केस टॉवेलमध्ये गुंडाळते व त्याचा अंबाडा घालते. एक कॉटनची हलकी साडी नेसून झोपते. झोपताना ती आठवणीने दार लावते. तिला आता कोणीही तिच्या खोलीत यायला नको असते. रात्रभर झालेले जागरण व दगदग यामुळे तिला गाढ झोप लागते. झोपेतून उठते तर अनिल आलेला असतो. तिल म्हणतो अगं किती गाढ झोपली होतीस. खूप दगदग झाली का?






नाहीरे, खूप मजा आली. थोडी कालच्या जागरणाने आणि लवकर उठून लगेचच प्रवासाला निघाल्याने थोडे दमायला झाले आहे इतकेच. ती खाली जाते आणि स्वयंपाकाचे बघते. थोड्यावेळाने सर्वजण जेवायला बसतात. जेवताना तिने व तिच्या मैत्रिणींनी कसे शॉपिंग केले, काय काय मजा केली, लग्न कसे थाटामाटात झाले. याचे सविस्तर वर्णन सांगते. अनिलला ते ऐकून बरे वाटते पण एकीकडे त्याच्या मनात प्रश्नचिन्हही उभे राहते की संजली यापूर्वी उत्साहात असायची पण
इतकी उत्साही कधी नाही पाहिली. काय कारण असावे बरे??

क्रमशः ...

4 comments:

Anonymous said...

Please continew

rohinivinayak said...

Thanks for your comment !
sadhya mi jara busy aahe, pan lavkarach pudhil bhag lihinyahca nakii prayatna karin :) thanks !

Snehalkumar said...

Waiting for next Anamika (10)

rohinivinayak said...

Thanks for your comment Snehalkumar!!! lavkarat lavkar lihinyacha prayatna karin, sadhya thodi busy aahe, pan tumhi khup utsuk aahat he pahun atishay aanand jhala !