Monday, April 08, 2013

८ एप्रिल २०१३

वसंत ऋतूचे आगमन होत आहे हे अगदी आज प्रखरतेने जाणवले. पर्णहीन झाडांना थोडी थोडी का होइना पालवी फूटत आहे. आज मी बरेच वेळा गॅलरीत जाऊन बघत होते. बाल्कनीचे दार आणि मुख्य दार उघडे ठेवले की हवा खेळती राहते. बाल्कनीतून बाहेर नजर टाकली तर इवली इवली पाने झाडांवर उठून दिसत होती. काहीना पूर्णपणे मोहोर आला होता.






सकाळी उठवत नव्हते आज कारण कि काल रात्री आपलीमराठीवर अवंतिकाचे एपिसोड बघत बसले होते. आज आईला फोन लावला तर त्या दोघांचेही रूटीन थोडे इकडेतिकडे झाले होते. दुपारी वामकुक्षीच्या वेळेला एक जण आले आणि गप्पा मारत बसले. हल्ली ठरवले आहे संध्याकाळचे बाहेर पडायचे. जास्त नाही तरी तळ्यावर पूर्ण एक चक्कर आणि मग तिथून थोडे पुढे गेले की अजून एक तळे आहे तिथे थोड्यावेळ थांबून घरी परतायचे. आता तर थोडा दिवसही वाढीस लागला आहे त्यामुळे रोज थोडे का होईना बाहेर पडून चालणे होईल. चालून आल्यावर जो काही उत्साह येतो ना तो काही वेगळाच असतो. आज तर इतके काही छान वाटत होते की घरी येऊच नये. गार हवा अंगावर घ्यावीशी वाटत होती. हिरवळीवर स्प्रिंगची खूप इवली फुले उमलली होती. किती गोड दिसतात ना ही फुले ! बिचाऱ्यांकडे कोणाचे लक्षच जात नाही. मी मात्र या फुलांचे खूप लाड करते इतकी मला ही फुले आवडतात. किती छोटी असतात ही फुले, त्यांचे खाली बसून फोटो काढणे अवघड असते. आज दुसऱ्या तळ्यावर एक बदक पाण्याच्या कडेकडेने चालत अधुनमधून पाणी पीत होते.



मला सर्व ऋतुमध्ये स्प्रिंग खूप आवडतो. उत्साहवर्धक हवा असते. खूप गरम नाही आणि थंडी ओसरत असते. आम्ही अमेरिकेला आलो ते या सीझनमध्येच. आठवत आहे अजूनही किती फ्रेश वाटले होते तेव्हा ! स्वच्छ सुंदर हवा आणि सगळीकडे स्वच्छता. तसे तर मी भारतात असताना रोजच्या रोज चालायचे. माझ्या तर रोज २ ते ३ चकरा व्हायच्या. तिथली मजा वेगळी आणि इथली मजा वेगळी. तळ्यावर आणि इतरत्र अपार्टमेंटच्या परिसरात बदकांना ब्रेड घालायचा नाही हा फतवा जेव्हा आमच्या अपार्टमेंटच्या मॅनेजर बाईंनी काढला होता तेव्हा थोडे वाईट वाटले होते. कारण की बदकांना ब्रेड खाण्याची सवय झाली होती. पण आता वाटते की चांगलेच झाले. स्वच्छ नितळ तळे बघायला खूप छान वाटते. तुरळक थोडीफार बदके असतात तळ्यावर. तळ्याभोवती फिरताना तर वाटत होते किती बदके होती आणि ती या तळ्यावर किती बागडायची. कमीतकमी १०० छोट्या पिल्लांनी तळ्याच्या आजुबाजूच्या परिसरात जन्म घेतला असेल.


केवळ हवा छान होती म्हणून आजचा दिवस छान गेला नाहीतर वेगळे असे काहीच घडले नाही.

No comments: