Tuesday, September 11, 2012

रेल्वे


प्लॅटफार्म क्रमांक चार पर आनेवाली लोकल १२ डिब्बोंकी तेज लोकल है, यह लोकल, ठाणे घाटकोपर दादर यही स्टेशनोंपरही रुकेगी.... रेल्वे स्थानकांवर अशा होणाऱ्या घोषणा मला खूप आवडतात. सुरवातीला या घोषणा मी जेव्हा ऐकायचे तेव्हा मला अजिबात कोणताही पत्ता लागायचा नाही. कोणती लोकल, कोणता प्लॅटफार्म....






तिकीटे काढून विनायक अतिजलद वेगाने चालायचा, म्हणायचा चल लवकर... अरे हो ना, काय झाले? आपली गाडी आली का? झपाझप पावले टाकून धावत धावत जाऊन फलाटावर यायचो. काही सेकंदात धाड धाड धाड करत लोकल फलाटावर यायची. मी कधी डब्यात चढायचे व स्टेशन आले की कधी उतरायचे हि मला कळायचेही नाही. ईस्ट कुठे, वेस्ट कुठे, काहीही पत्ता लागायचा नाही. हळूहळू सवय होत गेली. माझा आणि लोकलचा संबंध जरूरीपुरताच आला. एकटी गेले तरी ऑफीसची गर्दी ओसरल्यावर जायचे व यायचे.

मला रेल्वे खूप आवडते ! फलाटावर उभे राहणे, गाटीत चढणे, चढल्यावर स्टेशनवर सोडायला आलेल्या माणसांना टाटा करून गाडी जेव्हा सुटते तेव्हा वाटते आपण अधांतरीच कुठेतरी चाललो आहोत. रेल्वेतली खिडकीतली जागा, त्यातून बाहेर बघणे, वळणे घेताना गाडी नागमोडी आकारात वळली की कशी मागून पुढून दिसते ती बघायलाही मला खूप आवडते. लग्नानंतर आम्ही दोघे जेव्हा पुण्याला जायचो तेव्हा कधीही रिझर्वेशन करून गेलो नाही. मुंबईहून पुण्याला जाताना प्रवास तीन ते चार तासांचा त्यामुळे तिकीट काढायचे आणि रेल्वेत बसायचे. कोल्हापूर किंवा सिंहगड एक्सप्रेसने जायचो. रेल्वेत चढल्यावर सोबत घेतलेल्या बॅगवर मी दोन्हीकडे पाय सोडून बसायचे. गाडीतल्या गर्दीतून वाट काढत चहावाले, चिकीवाले, कोल्डड्रींकवाले फिरायचे. कधी कधी दरवाज्यातच पाय सोडून बसायचो.







रेल्वेमधून दारात उभे राहून बाहेरची हवा खायला खूप छान वाटते. रेल्वे जाताना जो रिदम तायर होतो तो ऐकण्यासाठी गाडीत खिडकीची जागा हवी. खिडकीत बसावे, डोळे मिटावे व रिदम ऐकावा. नाहीतर दारात उभे राहून गाडीबरोबरच शेजारचे धावते रूळ पाहत रिदम ऐकावा. विरुद्ध दिशेनी गाडी गेली तरी ती बघत त्या गाडीचा व आपण उभे असलेल्या गाडीचा मिळून जो रिदम तयार होतो तो पण छान असतो. ही रेल्वे मात्र अधून मधून थांबली की खूप कंटाळा येतो. कोणत्याही वाहनाला कसा सतत वेग हवा म्हणजे मग त्याची मजा लूटता येते. गाडी कशी एका फलाटावरून दुसऱ्या फलाटापर्यंत पटापट गेली पाहिजे. याकरता मला फास्ट लोकल खूप आवडते. जेव्हा मला लोकलमधून प्रवास करण्याची सवय झाली तेव्हा मी शक्यतोवर फास्ट गाडीनेच जायचे. फास्ट लोकलची गाडी कोणत्या फ्लाटावर आहे याकडे माझे लक्ष असायचे. तिकीट काढताना फास्ट गाडीची घोषणा झाली तर घड्याळात बघून तिकिट घेऊन भराभर जिने चढायला, उतरायला, फलाटावरून एकीकडे गाडी येत आहे व भराभर पळून लेडीज डब्यापर्यंत धापा टाकत टाक्त जाऊन जय्यत तयारीने मला गाडीत शिरायला खूप आवडायचे, अर्थात बिना गर्दीच्या वेळी !







रेल्वेत खिडकी जवळ जागा मिळाली की आपोआप बाहेर बघितले जाते. बाहेर बघता बघता एखादा घरगुती विचार सुरू होतो आणि आपण आपल्याच मनाशी बोलू लागतो किंवा बाहेरच्या गार वाऱ्याने हलकीशी एक डुलकी लागून जाते. या डुलकीतून जेव्हा आपण जागे होतो तेव्हा एखादे स्टेशन आलेले असते आणि माणसांचा गोंगाट ऐकू येतो. चहावाले, कोल्ड्रींकवाले वडे समोसे घेऊन लोक गाडीतून वाट काढत फिरत असतात. एखादी नातेवाईक बाई कोणी खिडकीत बसलेल्या बाईला सांगत असते नीट सांभाळून जा गं, तर आपल्या शेजारचे बसलेले उठून गेलेले असतात. त्या जागी दुसरे प्रवासी येऊन बसलेले असतात.











खूप पूर्वी जेव्हा आम्ही रेल्वेनी प्रवास करायचो. त्यात एखादवेळेला लग्नकार्यासाठी सर्व नातेवाईक एकत्र जायचो. त्यात आम्ही आतेमामे भावंडे खूप मजा करायचो. तेव्हा कर्जतच्या बटाट्यावड्याविषयी आम्हाला खूप कौतूक होते. खूप पूर्वी गाडी कर्जतला उभी राहिली की खिडकीजवळ वडे विक्रीला कधी येत नसत. कर्जतच्या मधोमध एका कांबाशेजारी गाडी येण्याच्या सुमारास गरम गरम वडे विक्रीकरता तयार असत. खूप मोठ्या अल्युमिनियमच्या ताटात हे वडे आले रे आले की लगेच त्याचा फडशा उडत असे. आमचे मामेअभाऊ आम्हाला प्रत्येकजणीला विचारायचे तुम्ही किती खाणार वडे. कोणी २ कोणी ३ असे करत करत २५ ते ३० वडे एका पानामध्ये गुंडाललेले यायचे. गाडीतली इतरही माणसे खाली उतरून वडे घेण्याकरता सज्ज असायची. त्या पूर्वीच्या वड्याला खूप चव होती. नंतरही अनेकवेळा प्रवास करूनही मला कर्जत स्टेशन आले की बटाटेवडा घ्यावासा वाटायचाच !







जशी मला सर्व वाहनांमध्ये रिक्षा आवडते तसेच मला सर्व प्रवासामध्ये रेल्वेने प्रवास करायला खूप आवडतो. इतकेच नाही तर चित्रपटांमध्ये असणारे रेल्वे सीनही बघायला मला जास्त आवडतात. आठवून पाहा बरे हे सीन. शोलेमधली जयवीरूची गुंडांसोबतची फायटींग, पाकीझामध्ये चुकून लेडीज कपार्टमेंटमध्ये आलेला राजकुमार, डीडीएजजे मध्ये शाहरूखने गाडी सुरू होताच काजोलला दिलेला हात, चितचोरमध्ये झरिना वहाब अमोल पालेकरला शोधण्यासाठी येते आणि तो गाडीत तर बसला नाही ना म्हणून गाडीबरोबरच धावते, आराधनामध्ये एकीकडे रेल्वे आणि एकीकडे जीप किती छान दिसते !




तर असा हा रेल्वेचा प्रवास तुम्हाला आवडतो का?


8 comments:

श्रिया (मोनिका रेगे) said...

रोहिणी ताई तुमचे लेखन आवडते..हलकेफुलके आणि मनाला भिडणारे. सहज लिहिता आणि थेट अगदी वाचकाच्या मनातले ..
ट्रेनचा प्रवास हा विषय अद्भुत आहे...मला नेहमीच हा आवडलेला प्रवास. मग तो रात्रीचा असो व दिवसाचा...खूपच सुंदर विषय निवडलात!
लेख छान झाला आहे.लोकल चा प्रवास आणि लांबचा ट्रेन प्रवास दोन्हीचा अनुभव घेतलेले बरेच असतील मुंबईकर...:)
लोकलची गर्दी पहिल्यांदा अनुभवली तेव्हां कसा काय हा अवघड प्रवास लोक रोज कात असतील! असा विचार मनात आलेला...पण मग जेव्हां मला सवय झाली तेव्हां लक्षात आले...मुंबई म्हंटली कि लोकल आलीच...:)

rohinivinayak said...

मोनिका, अभिप्रायाबद्दल अनेक धन्यवाद ! खरे आहे तुझे म्हणणे मुंबई लोकलशिवाय अधुरी आहे.. रोजच्या रोज लाखो करोडो लोक नोकरीकरता लटकत जातात लोकल मधून,, त्यांचे कौतुक वाटते मला,, त्यातून महिला वर्गाचे जास्त कौतुक वाटते,, रोज एवढा प्रवास करून घरी आल्यावर त्यांना चूल चुकलेली नाही..

Shyam said...

रोहिणी ताई मला आपला हा लोकल चा प्रवास खूप आवडला ...
मुंबई त जो राहिला आहे त्या प्रत्येकाने ह्याचा सुखद अन क्लेशदायक असा कडू गोड अनुभव घेतला आहे
लोकल ट्रेन म्हणजे मुंबई करांच्या धमन्या च आहेत ....life line आहे...आता तर जीवघेणी गर्दी झालीये
तरी सुध्धा लोकल ने प्रवास नाही केला तर चुकल्या सारखे च वाटते ....! मी अन माझा मित्र श्रीकांत
दररोज डोंबिवली ते व्ही टी [ आत्ताचे सी एस टी ] हा प्रवास कित्येक वर्षे आजू बाजूला कोण आहेत ते
काय म्हणतील ह्याचा विचार न करता हिंदी सिने संगीत अन ते duet गात गात पुरा करायचो .......
गेले ते दिन .....!
कधी तुम्ही लिहिलेले वाचायला मिळते ह्याची वाट बघत असतो !
असेच छान छान लिहित जा !

rohinivinayak said...

तुमचा अभिप्राय खूपच आवडला !

Anonymous said...

Rohini Tai, Apratim lihilay ha lekh! :) Hazaaro athvaaninchi jaanu kahi ek railgadich tayyar jhaali...maan gaccha bharle sundar athvaanini anhi nakalatach dole bharun ale.

Me baryach blogs var khup sundar likhaan vachle ahe pan tumcha likhaanachi he khaasiyat ahe ki tumhi tumchya athvaani ashya sundar padhatine maandata ki vachnaryanchya swatahchya athvaani ubharun yetat. Amhi visun gelo asto baryach goshti, tumhi tya athvan karun deta. Ayushaatlya chotya chotya goshtin madhle mothe mothe ananda amhaala disat nastil tar tyachi drushti deta :) hyasathi tumhaala maanapasun khup khup dhanyavaad. Asech sundar lihit raha...

- Priti

rohinivinayak said...

Thanks a lottt priti :)

Nisha said...

chan aahe lekh tai :) Tumche lekhan vachaychi nehamich echha asate. Ajun kahi IIT chya aathwani lihinar hotat tyachi vat pahat aahe + tumchya maherchya aathwani pan chan asatat !!

rohinivinayak said...

Nisha,,, abhipray vachun khup chhan vatle,,, iit,, maherchi aathavan aani manat bharun rahilele ase sarvach lihayche aahe,, ekek karun nakki lihin,,, tuze abhipray mala nehmi utsah detat,, thanks,,

sarvanchech abhipray utsah denare aani protsahan denare astat tyamule khup aanand hoto aani ajunahi lihavese vatate,, thanks so much to all of you!