Sunday, October 02, 2011

२ ऑक्टोबर २०११

काल आणि आज अचानक खूपच थंडी पडली होती. फॉल सीझन खरे तर कमी थंडीचा आहे, तरीही म्हणावी तशी थंडी अजूनही पडत नाही. गेले दोन दिवस अचानक थंडीची लाट आली आणि हीटर लावावा लागला. थंडीमुळे सकाळी उशीरानेच जाग आली. हल्ली रोज सकाळी मी तळ्यावर चक्कर मारते याचे कारण अजून दोन बदकीणी अंड्यांवर बसायला लागल्या आहेत. त्यांच्या इथे काय हालचाल आहे हे पाहण्याकरता जाते सकाळी, नाहीतर संध्याकाळची चक्कर असतेच. त्या बदकीणींजवळ गेले की लगेचच त्या 'आ' करतात. त्यांना भूक लागलेली असते. त्यांना थोडा ब्रेड खायला देते. आज गवतावर एक पिवळे फूल छान उमलले होते त्याचा फोटो घेतला. सर्व बदके थंडीने खूपच गारठलेली दिसत होती. झाडाखाली पेंगत होती. आज कुणीही ब्रेड खायला आली नाहीत.









खरे तर कालचा आणि आजचा दिवस थंडीमुळे तर वेगळा गेलाच, शिवाय थोडेफार वेगळेपणाही होताच. काल नेहमीप्रमाणेच मेक्सिकन होटेल मध्ये जेवायला गेलो आणि लगेच घरी आलो. थंडीमुळे ग्रोसरी नंतर करू म्हणून लगेच घरी आलो. दुपारी ४ वाजता आमच्या एका कुटुंब मित्राला जर्मनीमध्ये फोन लावला. पहिल्यांदाच फोन लावला. त्यांचे आडनाव काळे. फोन उचलल्यावर बोलायला सुरवात केली नमस्कार मी काळे बोलतोय.. मी पण लगेच बोलले, नमस्कार मी गोरे बोलत्ये.. सुरवात मजेशीर झाली. २ तास गप्पा मारल्या त्या दोघांनी व आम्ही दोघांनी मिळून, आणि वाटले या आधी फोन लावायला का सुचले नाही? लिंगो टेलिफोन कंपनीच्या फोनमध्ये काही देशांना कॉल करता येतो. नंतर ६ ला जे झोपलो ते रात्री १० ला जाग आली. जेवायला म्हणून २ थालीपिठे लावली, ती खाऊन परत झोपलो ते आज सकाळी १० लाच उठलो, इतकी थंडी होती २ दिवस.








ग्रोसरी करायची राहिली होती पण थंडी असली तरी आज नदीवर जाउच असे ठरवले, व नंतर ग्रोसरी करून घरी आलो. आज नदीवर थंडीमुळे शुकशुकाट होता. उन्हाळ्यात नदीवर बरीच जण असतात त्यामुळे मजा येते. आज नेहमीप्रमाणेच सूर्यास्त छान होता. हल्ली मी कॅमेरा नेत नाही कारण बरेच सूर्यास्त घेतले आहेत, पण तरीही थोडी हळहळ वाटतेच. कॅमेरा नसताना छान छान गोष्टी घडतात हे तर आता अगदी चांगलेच समजून चुकले आहे. आज संध्याकाळी आकाश निरभ्र होते. एक म्हणजे एकही ढग नव्हता. नदीवर पोहोचलो तेव्हा आज पाणी एकदम स्तब्ध झाल्यासारखे वाटत होते. नदीवर निरभ्र आकाशाचे प्रतिबिंब खूप छान दिसत होते. नदीवर चालायला सुरवात केली. थंडी चांगलीच जाणवत होती. चालवत नव्हते तरी थोडे थोडे करत नेहमीची चक्कर पूर्ण केली. आज बरेच दिवसांनी आयस्क्रीम खाल्ले. थंडीमध्ये आयस्क्रीम जास्तच छान लागते. नदीमधून जेव्हा एखादी बोट जाते तेव्हा ज्या लाटा निर्माण होतात त्या तर आज खूपच सुरेख दिसत होत्या. एक बोट जाण्याने नदीवरील पाणी खूप जोरात हेंदकाळते. लाटांवर लाटा निर्माण होऊन त्या पुढे पुढे येतात आणि अगदी जवळ येतात. खूपच छान वाटत होते आज. संध्याकाळच्या सूर्यास्तानंतरही क्षितिजावर गुलाल उधळ्याप्रमाणे वाटत होते. विनायक व माझे बोलेणेही झाले की पहाटेचे वातावरण वाटत आहे. तसे तर संध्याकाळ आणि पहाट यांमध्ये बरेच साम्य असते.






विनायकला म्हणाले कॅमेरा आणला नाही हे जाणवत आहे, हळहळही वाटत आहे पण परवासारखी हळहळ वाटत नाही. परवा आमच्या इथे रात्री साधारण ९ च्या सुमारास आमच्या घरावरून एक विमान गेले. आमच्या घरापासून विमानतळ १० मिनिटांच्या कार ड्राव्हवर आहे त्यामुळे विमानांची उड्डाण होत असते. आमच्या घरावरून बरीच विमाने येत जात असतात त्यामुळे मोठा आवाजही ऐकू येतो विमानांचा, पण परवाचा आवाज लक्ष वेधणारा होता. विमान इतके काही जवळून गेले की पटकन बाहेर पहायला आले की विमान किती जवळून जात आहे ते, पण ते मला दिसलेच नाही. मी स्तब्ध होते काही मिनिटे. इतका तो प्रचंड आवाज होता. मला हळहळ याची वाटत आहे की मी तो आवाज रेकॉर्ड का नाही केला? हा आवाज रेकॉर्ड का नाही केला याची हळहळ मी विनायकला बोलून दाखवली. तेव्हा विनायक म्हणाला तू म्हणजे ना,,, ते विमान आपल्या घराच्या छपरावर पडले असते तरी तू म्हणाली असतीस,,, थांब थांब एक मिनिट, मी मरायच्या आधी मला फोटो काढू दे! असे म्हणाल्यावर मी जोरात हसले, आणि म्हणाले हे मात्र अगदी खरे आहे. हल्ली आजकाल मला असे काही वेगळे घडले की लगेचच कॅमेरात साठवून ठेवावेसे वाटते. त्या विमानचालकाचा नक्की काहीतरी अंदाज चुकला असणार उड्डाण करताना इतक्या जवळून गेले. तो आवाज अजूनही आठवत आहे.

2 comments:

Nisha said...

hehehe sahiye :)

rohinivinayak said...

Thanks Nisha!!