Friday, June 18, 2010

सरीवर सरी

पाऊस! झिमझिमणारा, वादळवारे यांच्या सोबत येणारा, शिंतोडे उडवणारा, मुसळधार कोसळणारा, कसाही आवडतो मला. पाऊस हा शब्द पण मला खूप आवडतो!




पूर्वी पुण्याला पडणारा वळवाचा पाऊस आठवतोय मला. उन्हाची तलखी होत असतानाच दूरून कुठून तरी पावसाचे आगमन होणार हे जाणवायला लागायचे. रखरखीत ऊन गायब होऊन अंधारायचे. मातीचा सुगंध यायचा. आभाळात एकमेकांना बोलावल्यासारखे ढग जमा व्हायचे. काळे निळे ढग! उजेडाचा पूर्ण अंधार व्हायचा. गार वारे सुरू व्हायचे. एखादीच लख्खकन वीज चमकायची. अंधारात आम्ही दोघी बहिणी पायरीवर बसून राहायचो. शिंतोडे पडायला सुरवात व्हायची पण काही वेळा पाऊस रुसून निघून जायचा. असेच वातावरण काही वेळ राहायचे. पण काही वेळा मात्र अगदी आमच्या मनासारखे!




काळेकुट्ट ढग जमा होऊन टपटप थेंब पडायला सुरवात व्हायची. थेंबांनी अंगण भरून जायचे. क्षणार्धात विजांचा लखलखाट व ढगांचा गडगडाट यांचा धिंगाणा आणि पाऊस. पावसाच्या धारा जोरदार कोसळायच्या. पायरीवर उभे राहून आम्ही दोघी बहिणी हे दृश्य पाहण्यात खूप मग्न होऊन जायचो. पावसाच्या सरींचे पागोळीत रुपांतर व्हायचे. अशा पावसात ओलेचिंब भिजल्यावर खूप बरे वाटायचे! काही वेळाने सारे कसे शांत शांत! लाइट गेलेले असायचे. पावसाचे काळे ढग गेल्याने संध्याकाळचा थोडा उजेड असायचा. पंचाने ओले केस खसाखसा पुसून पावसाने भिजलेले कपडे सोडून जेव्हा कोरडे कपडे घालायचो तेव्हा खूप उबदार वाटायचे. अंगणात उंचसखल भागात पावसाचे पाणी साठलेले असायचे त्यात कागदी होड्या करून सोडायचो. पाऊस पडून गेल्यानंतरचा गारवा खायला घराबाहेर एक फेरफटका मारायचो. आमच्या मैत्रिणीही बाहेर आलेल्या असायच्या.





थोड्यावेळाने घरी परतले तरीही लाइट आलेले नसायचे. घरी आल्यावर आईपाशी भुणभूण. आई कंटाळा आलाय. लाइट आल्याशिवाय काहीच करता येत नाही, काहीतरी खायला कर ना! भजी कर भजी! आई म्हणायची कांदा चिरून द्या मग घालते भजी. मग मेणबत्तीची शोधाशोध. एक मेणबत्ती कांदा चिरणाऱ्यांसाठी. एक बाहेरच्या खोलीत कोणी आले तर कळायला, एक डायनिंगवर व एक गॅसच्या शेगडीच्या जवळ उंच डब्यावर भजी नीट तळली जात आहेत का नाही ते पाहण्यासाठी. कांदा चिरून एक घाणा तळून खायला सुरवात करतो न करतो तोच फाटकाची कडी वाजायची आणि बाबांच्या मित्राची मोठ्याने हाक यायची. अरे कुणी आहे का घरात? अरे ये रे ये साठे, इति बाबा. लगेच मागून साठेकाकूंचा आवाज काय चालू आहे? भज्यांचा वास छान येतोय! काय गं भिजलात का पावसात दोघीजणी.




वळवाचे दोन तीन वेळा दर्शन झाले की चाहूल लागते ती रोहिणी नक्षत्राची. रोहिणीच्या पाठोपाठ येतो तो मृग. मृग नेमेची येतो पावसाळ्याप्रमाणे बरोबर ७ जूनला हजेरी लावतो. याची हजेरी सहसा चुकत नाही. मग नंतर थोडे दिवसांकरता दडी मारून बसेल पण ७ जूनला सृष्टीची दारं ठोठावून जाणार. आतापर्यंत उन्हाने आळसटलेली मृगामुळे ताजीतवानी होतात. उन्हाच्या प्रखरतेनंतर पावसाचा शिडकावा सुखावून जातो. जूनमध्ये तर शाळकरी मुलांची चंगळच असते. पाटी पुस्तकांची नवी खरेदी. पुस्तके वह्यांना कागदी आवरण घालून त्यावर एक प्लॅस्टिकचे आवरणही असायचे पुस्तके भिजू नयेत म्हणून. रेनकोटची छत्र्यांची खरेदी. आम्हा दोघी बहिणींना रेनकोट खूप आवडायचे. रेनकोटची एक वेगळी टोपीही असायची. छोट्या फुलांचे किंवा नक्षीवाले रेनकोट. दप्तराबरोबर रेनकोट करता वेगळी पिशवी घ्यावी लागायची. बाजारात वेगवेगळ्या रंगांच्या छत्र्या आल्यावर रेनकोट मागे पडले. दुहेरी तिहेरी दुमडीच्या घड्यांच्या छत्र्या. पिवळ्या, निळ्या, रंगीबेरंगी, बारीक नक्षीकाम केलेल्या, चट्यापट्यांच्या अनेकविध छत्र्या बघून ही घेऊ ती घेऊ असे होऊन जायचे. या छत्र्या म्हणजे तशा टिचक्या आकाराच्याच. थोडे वारे आले तरी पूर्णपणे उलट्या होणाऱ्या. काही छत्र्या खटका दाबला की लगेच उघडायच्या. मग तोच सारखा नाद लागला होता छत्री उघडण्याचा. बाबांची छत्री मात्र वर्षानुवर्षे एकच. आम्ही त्याला तंबू छत्री म्हणायचो. उघडली की त्यात चार पाच जणं मावतील इतकी मोठी!



पावसाळ्यात छत्रीप्रमाणे प्लॅस्टिक किंवा रबरी चपलांची खरेदीही असायची. एकदा पाऊस सुरू झाला की जिकडे तिकडे चिखलाचे पाय. आमच्या अंगणात पाण्याने भरलेली बादली व त्यात एक तांब्या ठेवलेला असायचा. बाहेरून आले की चपलेवर पाणी ओतून पायावर पाणी घालून पायांच्या बोटांमध्ये लागलेला चिखल साफ करून पोटरीवरही कुठे चिखल उडाला असेल तर तोही साफ करून मग घरात शिरायचे. रस्त्याने चालताना बोलता बोलता अचानक कुठे चिखलात पाय पडला तर मग आम्ही पावसाने साठलेले पाणी कुठे दिसतंय का रस्त्यावर ते बघायचो म्हणजे त्या पाण्यात पाय बुचकळला की स्वच्छ. शाळेतून जातायेता काहीजणींच्या स्कर्टवर चिखलांचे ठिपके दिसायचे.




आषाढात तर पावसाची सततधार असते. सूर्यदर्शन नसते. एखादी पावसाची जोराची सर आली की त्यानंतर बेडकांचे एका सूरलयीत डराव डराव! कधी पोट बिघडले की आईचा ओव्याचा अर्क तयार असायचा. पनवेलवरून घरगुती ओव्याचा अर्क आणायची आई दरवर्षी. पोटात जरा कुठे खुट्ट झाले की पी ओव्याचा अर्क! बाबा मंडईतून आठवणीने गवती चहा आणायचे. रात्री झोपायच्या आधी गवती चहाचा काढा करून प्यायला की सर्दीपडसे दूर पळे! सकाळी उठल्यावर आलं सुंठ घालून गरम गरम चहा घेतला की तरतरी येई. शाळा कॉलेजातून आले की ओवा घालून कांद्याची भजीही ठरलेली असायची. तापाची कसर असली की त्यानिमित्ताने शाळा बुडवून दिवसभर पडून राहायचे. मध्येच उठून शाल पांघरून पायरीवर उभे राहायचे पावसाला बघत. पावसाळ्यात खरी मजा वाफाळत्या भातावर चिंचगुळाची आमटी आणि सोबत ताजे कैरीचे लोणचे. पोळीबरोबर मोरंबा व गुळांबा. त्यावर साजूक तूप. आम्हा दोघी बहिणींचा गुळांबा जास्त आवडीचा होता.



आषाढात आषाढी एकादशीचा सोहळा काय वर्णावा! रेडिओवर भक्तिगीते लागायची. यादिवशी खरा आनंद असायचा तर तो फराळाचा. साग्रसंगीत उपवासाचा फराळ. वऱ्याचे तांदूळ, दाण्याची आमटी, त्यावर साजूक तूप, उकडून बटाट्याची तुपातली भाजी, नारळाची चटणी, लाल भोपळ्याचे भरीत, खमंग काकडी, दुधातले गोड रताळे खिरीसारखे, दाण्याचा लाडू, मधल्यावेळी खायला गरम गरम बटाट्याचा कीस, राजगिऱ्याच्या वड्या, खजूर, रात्री गरम गरम साबुदाण्याची खिचडी. उकडलेल्या भुईमुगाच्या शेंगा. उन्हाळ्यात वाळवलेला उकडलेल्या बटाट्याचा कीस तळून त्याचा चिवडा. भुईमुगाच्या शेंगांना भरपूर माती लागलेली असायची. त्या पाण्यात भिजत घालून दोन तीन वेळा तरी पाणी बदलावे लागे तेव्हा कुठे त्या स्वच्छ होत.




श्रावणमासी हर्ष मानसी हरवळ दाटे चोहीकडे. श्रावणाचा उत्साह तर काय विचारूच नका. स्वच्छ ऊन, नंतर पावसाची सर, नंतर इंद्रधनुष्य. घरात सणासुदीची तयारी. दर श्रावणी सोमवारी आमच्या घरी संध्याकाळी ६ ला जेवण तयार असायचे. वडे घारगे यांचा नैवेद्य. आंबेमोहोर तांदुळाचा गरम भात, त्यावर हळद हिंग घालून दाट वरण, त्यावर साजूक तूप, श्रावणघेवड्याची कोशिंबीर, उकडून बटाट्याची भाजी, अळूची भाजी, नारळाची चटणी असा बेत असायचा. श्रावण सुरू झाला की मंगळागौरी, हरतालिका, गौरीगणपती यांच्या पूजेसाठी फुलं व पत्री लागत असत. आमच्या घरी बाग असल्याने भरपूर फुले व पत्री असायची. त्याकरता एकेकीचे नंबर लागायचे. सर्व बायका पुरणावरणाचे नैवेद्य करायला, पूजेच्या तयारीत, त्याकरता लागणारे साहित्य कापूर, वाती, अष्टगंध, पंचामृत आहे का नाही ते पाहून त्याची तयारी, मंगळागौरीसाठी वशेळ्या मिळवण्याच्या तयारीत, श्रावणातले हळदी कुंकू यामध्ये पूर्ण मग्न होऊन जायच्या.



आतापर्यंत पावसाने सर्व सृष्टी भिजलेली, हिरवीगार झालेली असायची. सगळीकडे सणासुदीचे प्रसन्न वातावरण, सर्वांच्या चेहऱ्यावर समाधान. पावसाने त्याचे काम चोख बजावलेले असायचे. पूर्वी पाऊस पण चार महिने व्यवस्थित पडायचा. नारळीपौर्णिमेनंतर गौरीगणपतीचे थाटामाटात स्वागत व्हायचे आणि आता पाऊसही हळूहळू ओसरायला लागायचा. पाऊसही म्हणत असेल आता माझी निघण्याची वेळ झाली, परत यायचंय ना पुढच्या वर्षी!

3 comments:

mau said...

खुपच मस्त लिहिले आहेस...कुठतरी दुरवर ह्या आठवणी अजुनही मनात खोलवर असतात न..लपुन...

Manaswini said...

खरंच, खूप छान वर्णन केले आहेस रोहिणीताई..
माझेही लहानपण असेच गेले आहे. सगळे वाचून लहानपणीच्या आठवणी अगदी जशाच्या तशा झर्रकन डोळ्यांसमोरून गेल्या.. खरा सांगू, हे लिहिताना बाहेर स्वच्छ उन पडले आहे, तरीसुद्धा मी पुन्हा लहान होऊन अगदी जणू छानसा फुलाफुलांचा छोटा फ्रॉक घालून जणू काही बाहेरच्या पाऊस भरल्या काळ्या निळ्या आभाळाकडे पाहते आहे, असेच दिसले. कांदे भजी खाणार तोच, दारावर कोणी ओळखीचे आले कि आम्ही नाक मुरडत असू. आई रागवायची. कांदे भज्यात आम्हाला आमच्या व्यतिरिक्त कोणाची वाटणी नको असे. एक एक आठवणी राहून राहून आठवत आहेत, जसे लिहिते आहे तसे.. शाळेच्या स्कर्टवर तर नेहमीच चिखलाचे डाग असत. मागच्या अंगणात पावसाचेच पाणी भरलेली एक बादली असे. तीत मग्गा असे. शाळेतून घरी आले कि समोरच्या दारामागून जाण्याऱ्या बोळीतून मागच्या दाराने जावे लागे. त्या पावसाच्या थंड पाण्याने हात पाय, पोटऱ्या, चेहरा धुवायचा. ते थंड पाणी अगदी नकोसे होऊन जाई. स्वच्छ झाले कि आई आत बाथरूम मध्ये गरम पाणी आणून द्यायची. गरम कोमट पाणी पायावर खूप ओतत असू. खूप ऊबदार वाटायचे. आई घरी आल्यावर दुध बोर्नव्हिटा, गरम उपमा खाऊ घालायची. मग छान छान वाटायचं. कडाडून वीजा कोसळत. मग लाईट जाई. घरात आजी आजोबा आम्ही बहिणी आणि आई असायचो. आजी आजोबा म्हातारे होते. म्हणून लाईट गेले कि मेणबत्तीसाठी एकच धावपळ उडे. आई देवाजवळ दिवा लावायची त्या तेवढ्या वेळात एकीने मेणबत्त्या शोधायच्या, एकीने पाऊस घरात येऊ नये म्हणून दारं-खिडक्या लावायच्या, आणि एकीने एक एक मेणबत्ती घरात सावकाश नेऊन ठेवायची. मग सगळीकडे मेणबत्तीचा प्रकाश झाला कि आई संध्याकाळच्या जेवणाची तयारी करे. आजी आईला सोबत म्हणून पाटावर बसायची. आम्ही बाबांची वाट पाहत समोरच्या खोलीत निमुटपणे पाऊस बघत बसायचो.
बघ न, तुझ्या वर्णनामुळे आयुष्यातला विस्मरणात गेलेला चक्क एक टप्पा मला अगदी जसाच्या तसा आठवतोय.. काही क्षण आपण काळाच्या ओघात विसरून जातो नाही. तुझे हे लिखाण म्हणजे खरोखरच वळवाचा पाऊस आहे. माझ्या मनातल्या अनेक उत्तमोत्तम आठवणींना ह्यामुळे उजाळा मिळाला. आणि त्यायोगे माझ्या मनात प्रसन्नता दाटली, हे मात्र विशेष !!

-सौ. अवनी

rohinivinayak said...

uma,, kharech ga,, aathvani manat kayam japlelya astat, tya aadthvlya ki man tajetavane hote,

avani,, tuzya aathvani khup khup aavadalya! ithe share kelyabaddal anek dhanyawad!