Saturday, June 05, 2010

पाऊस

पाऊस! झिमझिमणारा, वादळवारे यांच्या सोबत येणारा, शिंतोडे उडवणारा, मुसळधार कोसळणारा, कसाही आवडतो मला. पाऊस हा शब्द पण मला खूप आवडतो!



पूर्वी पुण्याला पडणारा वळवाचा पाऊस आठवतोय मला. उन्हाची तलखी होत असतानाच दुरून कुठून तरी पावसाचे आगमन होणार हे जाणवायला लागायचे. रखरखीत ऊन गायब होऊन अंधारायचे. मातीचा सु‌गंध यायचा. आभाळात एकमेकांना बोलावल्यासारखे ढग जमा व्हायचे. काळे निळे ढग! उजेडाचा पूर्ण अंधार व्हायचा. गार वारे सूरू व्हायचे. एखादीच लख्खकन वीज चमकायची. अंधारात आम्ही दोघी बहिणी पायरीवर बसून राहायचो. शिंतोडे पडायला सुरवात व्हायची पण काही वेळा पाऊस रुसून निघून जायचा. असेच वातावरण काही वेळ रहायचे. पण काही वेळा मात्र अगदी आमच्या मनासारखे!



काळेकुट्ट ढग जमा होऊन टपटप थेंब पडायला सुरवात व्हायची. थेंबांनी अंगण भरून जायचे. क्षणार्धात विजांचा लखलखाट व ढगांचा गडगडाट यांचा धिंगाणा आणि पाऊस. पावसाच्या धारा जोरदार कोसळायच्या. पायरीवर उभे राहून आम्ही दोघी बहिणी हे दृश्य पाहण्यात खूप मग्न होऊन जायचो. पावसाच्या सरींचे पागोळीत रुपांतर व्हायचे. अशा पावसात नखशिखांत भिजल्यावर खूप बरे वाटायचे! काही वेळाने सारे कसे शांत शांत! लाईट गेलेले असायचे. पावसाचे काळे ढग गेल्याने संध्याकाळचा थोडा उजेड असायचा. पंचाने ओले केस खसाखसा पुसून ओले कपडे सोडून जेव्हा कोरडे कपडे घालायचो तेव्हा खूप उबदार वाटायचे. अंगणात उंचसखल भागात पावसाचे पाणी साठलेले असायचे त्यात कागदी होड्या करून सोडायचो. पाऊस पडून गेल्यानंतरचा गारवा खायला घराबाहेर एक फेरफटका मारायचो. आमच्या मैत्रिणीही बाहेर आलेल्या असायच्या.



थोड्यावेळाने घरी परतले तरीही लाईट आलेले नसायचे. घरी आल्यावर आईपाशी भुणभुण. आई कंटाळा आलाय. लाईट आल्याशिवाय काहीच करता येत नाही, काहीतरी खायला कर ना! भजी कर भजी! आई म्हणायची कांदा चिरून द्या मग घालते भजी. मग मेणबत्तीची शोधाशोध. एक मेणबत्ती कांदा चिरणाऱ्यांसाठी. एक बाहेरच्या खोलीत कोणी आले तर कळायला, एक डायनिंगवर व एक गॅसवर भजी नीट तळली जात आहेत का नाही ते पाहण्यासाठी. कांदा चिरून एक घाणा तळून खायला सुरवात करतो न करतो तोच फाटकाची कडी वाजायची आणि बाबांच्या मित्राची मोठ्याने हाक यायची. अरे कुणी आहे का घरात? अरे ये रे ये साठे, इति बाबा. लगेच मागून साठेवहिनींचा आवाज काय चालू आहे, भज्यांचा वास छान येतोय! काय गं भिजलात का पावसात दोघीजणी.

1 comment:

आनंद पत्रे said...

मजा होती त्याकाळी. आता हुंदडता येत नसलं तरी पावसाची अशीच वाट पाहत आहे.