"तेरे मेरे सपने" एक जुना हिंदी चित्रपट. यातील गाणी मला खूपच प्रिय आहेत, इतकी की या गाण्यांचे व माझे एक अतूट नाते आहे न संपणारे!!!
तेरे मेरे सपने बद्दल लिहायचे असे मनात आले आणि काय लिहायचे याबद्दलची वाक्ये मनात घोळू लागली. शीर्षक काय द्यायचे? तेरे मेरे सपने असेच द्यायचे का? नको हे खूप साधे झाले. मग काय द्यावे .. "तुझी माझी स्वप्नं" हे शीर्षक छानच आहे. विचार करता करता गाणे गुणगुणायला लागले. जैसे राधाने माला जपी श्यामकी मैने ओढी चुनरीयाँ तेरे नामकी.... येस्स्स!! "मैने ओढी चुनरीयाँ तेरे नामकी... हे अगदी परफेक्ट! फिल्मी स्टाईल.
आमच्या घरी आईबाबांना गाण्याची आवड असल्याने रेडियो सतत ऑन असायचा. मला कळायला लागले तेव्हापासून तेरे मेरे सपने मधली गाणी मला आठवतात. रेडियोवर बरेचदा लागायची. मला काही चित्रपटांमधली गाणी कितीही वेळा ऐकली तरी त्याचा कंटाळा येत नाही त्यापैकी ही तेरे मेरे सपनेतली. जशी आराधना, अभिमान, काश्मीर की कली यातील सर्व गाणी सुद्धा मला खूप आवडतात.
आईच्या शेजारी आजी रहायची. तिला तीन मुले व तीन मुली. त्यातील मोठ्या मुलाचे लग्न झाले त्याला आम्ही "काका" म्हणायचो. त्याचे लग्न झाल्यावर त्याच्या बायकोला आम्ही दोघी बहिणींनी काकू अशी कधीच हाक मारली नाही. तिला आम्ही "मामी" म्हणायचो. ती खूप छान होती. अशी ही जगवेगळी काकामामी ची जोडी. ही मामी मला सारखी तेरे मेरे सपने मधली गाणी म्हणायला सांगायची. अर्थात त्यावेळी त्या गाण्यांचा अर्थ, याचा गीतकार कोण, संगीतकार कोण याबद्दल खूप काही जाणून घ्यावेसे वाटले नाही.
लग्न झाल्यावर काही दिवसांनी मोठा स्पीकरवाला डेक घेतला व हळूहळू मी माझ्या आवडीच्या कॅसेट जमवायला सुरवात केली. त्यात पहिली कोणती कॅसेट असेल तर ती तेरे मेरे सपनेची. डेकवर यातील गाणी मनसोक्त ऐकली. त्यानंतर नोकरीतल्या धावपळीमुळे निवांतपणे गाणी ऐकणे राहून गेले.
इथे अमेरिकेत येताना सर्व गाण्यांच्या कॅसेटमध्ये तेरे मेरे सपने आठवणीने घेतली. बाकी कोणतीही गाणी नसली तरी चालतील पण तेरे मेरे सपने पाहिजेच पाहिजे!! इथल्या टु-इन-वन वर कॅसेटवरची गाणी ऐकते. इथेही कॅसेटची गाणी ऐकणे मागे पडले होते पण एकदा असाच अचानक खूप चांगला मूड आला होता. पीसी, टीव्ही बंद केला. कॅसेटमधली काही गाणी ऐकली. नंतर माझी खूप प्रिय असलेली गाणी ऐकली एका पाठोपाठ एक. पहिले ए मैने कसम ली... जैसे राधाने माला जपी.. जीवन की बगीयाँ महकेगी.... ही गाणी मला एका नव्या विश्वात घेऊन गेली. ही गाणी आता मी नेहमी नेहमी ऐकत नाही कारण व्याप खूप वाढलेले आहेत. पण जेव्हा माझा खूप खास मूड असेल, बाहेर पाऊस पडत असेल तेव्हा मात्र मी तेरे मेरे सपने ऐकते. ऐकते म्हणण्यापेक्षा छान रितीने ती अनुभवते. आणि हो या सर्व गाण्यांमध्येही माझे सर्वात प्रिय गाणे "जैसे राधाने माला जपी श्यामकी मैने ओढी चुनरीयाँ तेरे नामकी!!!
आता तुम्ही म्हणाल की यातील गाणी तुला का आवडतात? त्यातील संगीत, गीत, की अजून कोणते असे खास कारण आहे? त्यावर मी एवढेच सांगीन की या गाण्यांचे व माझे असे एक अतूट नाते आहे कधीही न संपणारे!!!!
No comments:
Post a Comment