Thursday, March 28, 2024

सुंदर माझं घर ..... (१)

आमचे लग्न १९८८ साली झाले आणि नव्यानेच सुरू झालेल्या वैवाहीक जीवनाची सुरवात झाली. विनुची पिएचडी अजून थोडी बाकी होती. तो ऑरगॅनिक केमिस्ट्री मध्ये संशोधन करत होता. शिष्यवृत्ती १२०० फक्त. आमचे घर जरी डोंबिवलीला होते तरी आम्ही २ वर्षे वसतिगृहात राहिलो याचे कारण संशोधनात लॅब मध्ये विनू दिवसरात्र काम करायचा. असे काम डोंबिवलीला राहून करणे शक्य नव्हते. डोंबिवलीच्या घराकरता विनुच्या वडिलांनी महाराष्ट्र बॅंकेतून लोन काढले होते आणि त्याचा ९०० रूपये हफ्ता विनु न चुकता दर महिन्याला पाठवत होता. तो मनी ऑर्डर करायचा. डोंबिवलीला जागा घेतली होती याचे कारण विनु आधी एका बहुराष्ट्रीय औषधी कंपनीत मुलुंडला नोकरी करत होता. डोंबिवलीची जागा घेण्या आधी तो त्याच्या काकाकडे बोरिवलीला रहायचा. बोरिवलीवरून मुलुंडला कामासाठी ये-जा करायचा. २ वर्षात त्याने नोकरी सोडली आणि पिएचडी साठी आयायटी (IIT) पवईत वसतिगृह ९ मध्ये रहायला गेला होता. विनुने डोंबिवलीची जागा पेईंग गेस्टना रहायला दिली होती. हफ्ता भरण्यासाठी मदत होत होती. त्यामुळे नोकरी सोडल्यावर शिष्यवृत्तीतले ६०० आणि पेइंग गेस्ट कडून मिळालेले ३०० रूपये असे ९०० रूपये हफ्ता पाठवण्याला सुरवात केली. अर्थात आमचे लग्न झाले तेव्हा फक्त पेइंग गेस्टचे कडून मिळणारे रूपये आम्ही दादांना पाठवत होतो. आमचा संसार १२०० रुपयांमध्ये सुरू झाला. 

 
 
लग्न झालेल्या जोडप्यांना आयायटीने वसतिगृहात रहायला जागा दिली. वसतिगृह ११ हे मुलींचे होते. तिथे बऱ्याच खोल्या रिकाम्या होत्या. प्रत्येकी २ खोल्या लग्न झालेल्या जोडप्यांना दिल्या होत्या. आमच्या खोल्यांचे नंबर होते ६९, ७० आणि या खोल्या तिसऱ्या मजल्यावर होत्या. त्यावेळेला लिफ्ट नव्हत्या. विनुचे डिपार्टमेंट पण तिसऱ्या मजल्यावर होते. लिफ्ट नाही. डिपार्टमेंटला जाण्यायेण्यासाठी विनुकडे एक सायकल होती. आयायटी - पवईचे आवार खूपच मोठे आहे. आवारात अर्थातच काहीही मिळत नव्हते. भाजीपाला आणि किराणा आणण्यासाठी आम्हाला जाऊन येऊन २ मैल चालायला लागायचे. धुणे भांडी मी घरीच करत होते. शिवाय दोन्ही खोल्यांचा केर काढून फरशी पण पुसून घेत होते.प्रत्येक खोलीत एक टेबल, एक खुर्ची, एक कॉट, व एक लोखंडी कपाट होते. आम्ही जेव्हा या दोन खोल्यांचा ताबा घेतला तेव्हा एका खोलीचे बेडरूम बनवले व एका खोलीचे स्वैपाकघर. बेडरूम मध्ये दुसऱ्या खोलीतली एक कॉट आणली व त्या खोलीतल्या कॉटला जोडून ठेवली. अश्याने आमचा मोठा बेड तयार झाला. विनायककडे त्याच्या बॅचलर जीवनातली एक गादी होती. ती कॉटवर घातली व शेजारी एकावर एक अशा सतरंज्या, बेडशीटा घालून त्या गादीच्या लेव्हलला आणल्या. विनु म्हणाला मला सतरंजीवर झोपायची सवय आहे, तू गादीवर झोपत जा. त्या खोलीतल्या लोखंडी कपाटात आम्ही आमचे सर्व कपडे ठेवले. पावडरीचा डबा, कुंकू, कंगवे ठेवले. तिथल्या टेबलावर काही पुस्तके ठेवली. टेबलावर घड्याळ ठेवले किती वाजले आहेत ते बघण्यासाठी. मी रोज रात्री पहाटे ६ चा गजर लावायचे. गजर बंद करून आम्ही परत झोपायचो. ७ वाजता उठून चहा ब्रेकफास्ट अंघोळ करून विनु ८ ते ९ च्या दरम्यान लॅब मध्ये जायचा. 
 
 
रुखवतात आम्ही दोघी बहिणींनी मिळून केलेला नाडी वर्क पडदा बेडरूमच्या दरवाज्याला लावला. या पडद्याचे खूप कौतुक झाले. जो तो विचारी कसा केला हा पडदा! नाडीवर्कचा जो पडदा होता त्यावर पाने फुले छापली होती आणि फुलाची प्रत्येक पाकळी पांढऱ्या शुभ्र नाडीने भरली होती. पांढऱ्या शुभ्र पाकळ्या मरून रंगाच्या पडद्यावर खूपच उठून दिसत होत्या. प्रत्यक्ष पाकळ्या चिकटवल्या आहेत की काय असे वाटे. या खोलीत विनयने पेंट केलेला गणपती लावला होता. रात्री जेव्हा झोपायला या खोलीत यायचो तेव्हा आठवणीने पाण्याने भरलेले तांब्या भांडे आणायला लागायचे, कारण की झोपताना दुसऱ्या खोलीला कुलूप लावायला लागायचे. ही कुलुपे पण निराळीच होती. कुलूप लावताना किल्ली लागायची नाही. फक्त उघडायला लागायची. दोन्ही खोल्यांना एकेक खिडकी होती त्यामुळे घरात वारा आणि प्रकाश दोन्ही छान येत होते. रात्री झोपताना ट्रॉंझिस्टर वर छायागीत, बेलाके फूल ऐकूनच झोपायचो. झोपताना हा ट्रान्झिस्टर आम्ही कॉटच्या जवळच असलेल्या कोनाड्यात ठेवायचो. दुपारचे व रात्रीचे जेवण करताना पण सोबत आम्हाला दोघांना ट्रान्झिस्टर लागायचा. खिडकीतून बाहेर बघितले की सगळीकडे हिरवेगार दिसायचे. पावसाळ्यात खूप अंधारून यायचे. सकाळी उठून अशा अंधारलेल्या वातावरणात दिवा लावायला लागायचा. एकीकडे चहाचे आधण गॅसवर ठेवायचे व खिडकीतून पावसाला बघत रहायचे. आले घालून केलेला चहा मग आम्ही दोघे प्यायचो. 
 
 
स्वयंपाकाच्या खोलीतल्या कपाटामध्ये सर्व पीठाचे डबे व इतर पोहे, साबुदाणे वगैरे ठेवले. टेबलावर गॅस ठेवला. त्यावरच एकीकडे पोलपाटावर मी पोळ्या करत असे. कुणी आले तर बसायला खुर्ची होतीच. दोन्ही खोल्यांना भिंतीतले कोनाडे होते. ते मला खूपच आवडायचे. जमिनीलगतचा एक आणि त्यावर एक असे प्रत्येक खोलीत ६ कोनाडे होते. बेडरूमच्या कोनाड्यांमध्ये आम्ही आमच्या दोघांच्या बॅगा ठेवल्या. एकात पांघरूणे - बेडशीटा, एकात ट्रान्झिस्टर ठेवला. स्वैपाकघरातल्या कोनाड्यात एकाचे देवघर बनवले. एकात भाजीपाल्यासाठी ३ जाळी असलेल्या टोपल्या एकावर एक ठेवल्या. एकात कांदे बटाटे, एकात फळभाजी, एका छोट्या टोपलीत, मिरच्या, कोथिंबीर, आलं असे होते. कोथिंबीर मी ओल्या फडक्यात ठेवायचे. ज्या टेबलावर गॅस होता त्या टेबलाच्या शेजारी मी पिण्याचे पाणी व स्वैपाकाला लागणारे पाणी स्टीलच्या बादलीत आणि कळशीत ठेवायचे. हे पाणी मी रोजच्या रोज बदलायचे. एका कोनाड्यात मी एका टबात खरकटी भांडी ठेवायचे. एक कोनाडा स्टोव्ह, रॉकेलचा डबा याकरता होता. त्यावेळेला फ्रीज नव्हते कोणाकडेच ! फक्त एकीकडे होता. लोणी दही याकरता मी एका ताटलीत पाणी घालून त्यात ते लोण्या-दह्याचे सट ठेवायचे. मिक्सरही नव्हता. मी आईकडून एक दगडी रगडा आणला होता. आईकडे दगडी रगडे विकायला एक बाई यायची. पुण्यावरून हा दगडी रगडा आणला होता. त्यात मिरची कोथिंबीरीचे वाटण व थोडी चटणी होईल इतका छोटा होता. त्यावर चटणी वगैरे करताना खाली आवाज जाऊ नये म्हणून मी एक तरट घालायचे. तरटाची चौकोनी घडी त्यावर टॉवेल पागोट्यासारखा गुंडाळून, त्यावर हा रगडा ठेवायचे !. 
 
 
सुरवातीला आम्ही एका गवळ्याकडून दूध घ्यायचो. ते खूपच पातळ होते. त्यावर साय अगदीच थोडी धरायची. पण त्या सायीचे दही-लोणी-तूप ताजे ताजे बनवायचे. दूध पातळ असल्याने जास्त साय येत नव्हती तरी मी रोज थोड्या सायीचे विरजण लावून रोज सायीचे ताजे ताक करायचे व रोज थोडे थोडे लोणी काढायचे. पूजा करताना काही वेळा मी लोणी साखरेचा नैवेद्य दाखवायचे. ४ दिवसाचे लोणी अगदी थोडेच साठायचे. रोजच्या रोज लोणी पाण्याने धुवून मी ते सटात ठेवायचे व तो सट एका ताटलीत गार पाणी घालून त्यात ठेवायचे व ४ दिवसांनी लोणी कढवून तूप करायचे.विनुने त्याच्या बॅचलर जीवनातली एक गादी, एक कपड्यांनी भरलेली बॅग, ट्रान्झिस्टर व हॉटप्लेट वसतिगृह ९ वरून आणलेलीच होती. हॉट्प्लेट बघितल्यावर मला इतका आनंद झाला आणि ठरवले की आपण सर्व स्वैपाक यावरच बनवायचा. कूकर लावला. एक तास झाली तरी कूकरला वाफ धरेना. हॉटप्लेटच्या तीव्र आचेमुळे पहिली पोळी करपली. प्लग काढून दुसरी पोळी करून घ्यावी तर ती खूपच कडक बनली. या माझ्या सर्व करामतींमध्ये मोठा आवाज झाला तो फ्युज उडाल्याचा होता. गॅसला नंबर लावला होता पण तो यायला महिनाभर तरी लागेल असे कळाले तेव्हा विनु म्हणाला की मी आधी बाहेर जाऊन स्टोव्ह विकत घेऊन येतो. स्टोव्ह आणण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. 
 

 
आईकडे स्टोव्हमध्ये रॉकेल कसे भरतात, स्टोव्हला पिना कशा करतात ते पाहिले होते पण प्रत्यक्ष अनुभव नव्हता. स्टोव्हच्या एकूणच खूप भानगडी असतात. रॉकेलचा डबा, रॉकेल स्टोव्हमध्ये भरण्याकरता एक काचेची बाटली, रॉकेल ओतताना वापरायचे नरसाळे, पिनांचे व काडेपेटीचे बंडल, स्टोव्हमध्ये रॉकेल भरताना ते जर बाहेर आले तर पुसायला लागणारी फडकी! नुसता व्याप नि ताप! सुरवातीला त्रास झाला व खूप चिडचिड झाली पण नंतर हे सर्व सवयीने जमायला लागले. एकदा स्टोव्ह पेटवला की त्यावर स्वयंपाक कसा उरकायचा तेही कळाले. आधी कूकर लावायचा, तो होईपर्यंत भाजी चिरून घ्यायची. कूकर झाला की भाजी करायची. भाजी परतता परतता कणीक भिजवायची, भाजी झाली की पोळ्या, पोळ्या झाल्या की वरण फोडणीला टाकायचे. ते झाले की सर्वात शेवटी दुध तापवून घ्यायचे कारण की दुध नासले की दूध बाहेरून आणायला परत दीड दोन मैल पायपीट! स्टोव्हवर क्रमाक्रमाने करण्याच्या स्वयंपाकामध्ये जर का काही उलटेसुलटे झाले तर एका भांड्यात नुसते पाणी घालून ते तापवत ठेवायचे कारण एकदा का स्टोव्ह बंद झाला तर परत तो कोण पेटवणार? वाजणारा स्टोव्ह बंद झाल्यावर कसे शांत शांत वाटायचे. नंतर १५ दिवसांनी गॅस शेगडी आणि सिलिंडर आला तेव्हा खूपच हायसे वाटले.
 

 
विनुने लॅब मधून ३ वेगवेगळ्या आकाराचे काचेचे प्लास्क आणले होते दुध गरम करण्यासाठी हॉटप्लेटवर त्याच्या बॅचलर जीवनात. लग्न झाल्यानंतर मी सकाळी हॉटप्लेटवर दूध गरम करायचे ते मोठ्या काचेच्या फ्लास्कमध्ये. नंतर दोन छोट्या फ्लास्कमध्ये मी दोघांकरता दूध घ्यायचे. त्यात इंस्टंट ब्रु कॉफी घालायचे. एकीकडे विब्सचा ब्रेड भाजून त्याला अमुल बटर लावायचे. कॉफी, ब्रेड असा छान ब्रेकफास्ट झाला की विनु लॅब मध्ये जायचा. त्यावेळी आम्ही १०-१२ जोडपी होतो, त्यात चार महाराष्ट्रीयन. या जोडप्यांमध्ये काहींच्या बायका पी. एचडी करणाऱ्या होत्या व त्यांचे नवरे बाहेर कंपनीत कामाला जायचे. तर १-२ जोडपी दोघेही पी.एचडी करणारी होती, तर काहींचे नवरे पिएचडी करत होते आणि आम्ही बायका घरकाम करायचो. काही रसायनशास्त्र व भौतिक शास्त्रामध्ये संशोधन करणारे होते, तर काही अर्थशास्त्र व गणिता मध्ये.


आम्ही सर्व बायका घरीच धुणे भांडी करायचो. तिथे एक भारती नावाची मुलगी सर्वांना विचारायची. भांडी घासायला कुणी हवे आहे का? भांड्यांचे ७० रुपये होते पण १-२ जणींनीच तिला कामावर ठेवले होते. बाथरूम टॉयलेट व बेसिन बाहेरच कॉमन होते. त्या वसतिगृहात २ ठिकाणी ३-४ बाथरूम होत्या. एकीकडे बायकांची व दुसरीकडे पुरुषांची झाली. हसतखेळत धुणेभांडी व्हायची. सकाळी ९ वाजता आपापल्या नवऱ्यांना त्यांच्या कामावर पाठवून दिले की आमचेच राज्य. वसतिगृहाच्या सर्व खोल्या समोरासमोर होत्या, त्यामुळे आम्ही सगळ्याजणी पॅसेजमध्ये जमा व्हायचो. एकीकडे गप्पा, गाणी ऐकणे व धुणे भांडी व आमच्या अंघोळी करता नंबर लावायचो. ए तुझी भांडी झाली की मी शिरते हं बाथरूममध्ये. एकीची भांडी, तर दुसरीचे धुणे तर तिसरीची अंघोळ, असे सर्व २ तास चालायचे. मग मात्र स्वयंपाकघरात शिरायलाच लागायचे कारण की १ वाजता सर्वांचे 'हे' जेवायला घरी यायचे. भांडी घासायला ओणवे बसायला लागायचे. धुणे पण आधी धुणे भिजवणे, नंतर ब्रशने कपडे घासणे, धोपटणे, २ ते ३ वेळा वेगवेगळे पाणी घेऊन आघळणे आणि मग पिळणे. भांडी घासताना खरकटी भांडी आधी टबा बाहेर काढायचे. टबही घासून स्वच्छ विसळून घ्यायचे. नंतर एका बादलीत पाणी घेऊन घासलेली भांडी कमरेत वाकून विसळायचे व टबात टाकायचे. अंघोळीच्या पाण्याकरता आम्हाला एक नळ स्पेशल गरम पाण्याचा होता. त्यामुळे गरम पाणी अंघोळीला आयते मिळायचे. विनू रोज गार पाण्याने अंघोळ करायचा. 
 

 
आईकडे धुणे भांडी करायची कधीच सवय नव्हती. स्वैपाक पण मोजकाच येत होता कारण लग्ना आधी आम्ही दोघी बहिणी नोकरी करायचो तेव्हा आईच आम्हाला डबा भरून देत होती. धुणेभांड्याची सवय नसल्याने चादरी व विनायकचे शर्ट पॅन्ट धुवून हात दुखायला लागायचे. धुणे वाळत घालण्यासाठी खोलीत ज्या तारा बांधल्या होत्या त्या खूपच उंच होत्या. खुर्चीवर उभे राहून मी काठीने धुणे वाळत घालायचे. वर पाहून मान दुखायला लागायची. धुणे धुतल्यावर पिळताना माझ्या हातून कपडे नीट पिळले जायचे नाहीत, बरेच पाणी रहायचे. म्हणून मग विनायक मला सर्व कपडे नीट पिळून द्यायचा. वर पाहून एका रेषेत काठीने कपडे वाळत घालताना मान दुखायची. विनु मला म्हणाला की चादरी धुवायला अवघड आहेत त्यामुळे त्या फक्त भिजत घालून ठेव. चादरी मी धुवत जाईन.
काही दिवसांनी आमच्या घोळक्यामध्ये एका छोट्या मुलाची भर पडली. मीनाक्षीला एक "सुंदर" नावाचा गोंडस मुलगा झाला. तो त्याच्या आईकडे कधीच नसायचा. त्याला घेण्यासाठी आमचे नंबर लागायचे. तो पूर्ण पॅसेजमध्ये या टोकापासून त्या टोकापर्यंत रांगायचा. मीनाक्षीला तिचे काम करायचे असेल तर मला विचारायची "सुंदर को देखेगी क्या? " . मी लगेचच होकार द्यायचे. . मला त्यानिमित्ताने सुंदरशी खेळायला मिळायचे. मीनाक्षीने मला सांगून ठेवले होते की तुझी पुजा झाली की मला बोलवत जा. मग ती व सुंदर येऊन नमस्कार करून जायचे. सुंदरला सांगायची "भगवान को प्रणाम करो" की लगेच सुंदर त्याचे छोटे हात जोडायचा व "जयजय" म्हणायचा. एकदा सुंदरच्या हातात मी हापूसचा आंबा सोलून दिला. तो त्याने त्याच्या इवल्याश्या हातात धरला आणि आंबा खात होता. खाताना त्याच्या तोंडावर हातावर व झबल्यावरही आंब्याचे तुषार उडले होते. आंबा खाण्यात तो अगदी मग्न होऊन गेला होता. 
 

 
हा सुंदर रांगत रांगत प्रत्येकीच्या घरी जायचा. रांगताना मध्येच बसायचा. आमच्या घोळक्यामध्ये कुणी जात असेल तिच्या मागोमाग जायचा, मग ती उचलून परत त्याच्या आईकडे द्यायची. मी भांडी घासून आले आणि जर का सुंदर आमच्या घरात असेल तर धुतलेली सर्व भांडी टबाच्या बाहेर आलीच म्हणून समजा! सुंदर एकेक करत सर्व भांडी टबाच्या बाहेर काढायचा. वाट्या, कालथे, झारे तर त्याला खूप प्रिय. फरशीवर दणादणा आपटायचा वाट्या! त्याचा अजिबात राग यायचा नाही. आम्ही हसलो की त्याला अजुनच चेव चढायचा. एकदा तर सगळी भांडी बाहेर आणि हा टबात जाऊन बसला! एकदा मी पूजा करताना आला. मग मी त्याच्या कपाळावर गंध लावले, नैवेद्याचे लोणी साखर खायला दिले. एकदम खुश झाला ! मी त्याला बाप्पाला "जयजय" करायला शिकवले. आईने मला पुजेसाठी देव्हारा दिला होता, शिवाय तेल व तूप वाती. त्यावेळी फुलपुडी पण चांगली येत असे. लाल, पांढरी, पिवळी फुले, दुर्वांची जुडी, तुळस, बेल असे सर्व काही. त्यामुळे पूजाही साग्रसंगीत व्हायची. तेला-तुपाचे २ दिवे आणि उदबत्ती पण लावायचे. पूजेत लग्नात आईने दिलेले २ देव होते. देवी आणि बाळकृष्ण. शिवाय देवात मी १ रूपयाचे नाणेही ठेवले होते. 
  
आमचे बिऱ्हाड वेगळे स्थापन होणार आहे म्हणून विनुच्या ५ आत्यांनी व २ काकांनी व २ मावश्यांनी सर्वच्या सर्व संसाराला लागणाऱ्या स्टीलच्या भांड्यांचा, डब्यांचा कूकर व मिसळणाच्या डब्यासकटअहेर दिला होता. आम्ही फक्त विळी, पोलपाट लाटणे, कढई, सोलाणं, लिंबू पिळायचे यंत्र घेतले. सर्वच्या सर्व भांडी पोत्यात भरून वसतिगृहात घेऊन आलो होतो. - Copy Right (Rohini Gore )

 


No comments: