Friday, October 14, 2022

बदल, तुलना आणि बरच काही ..... (3)

 

आमच्या दोघांच्या आयुष्यात मोठा बदल खूप पूर्वीच झालेला आहे. विनायक नोकरी निमित्ताने मुंबईत आला आणि मी लग्न होउन मुंबईत आले. हवामानाचा मोठा बदल झाला. मुंबईत येणारा सततचा घाम मला अजिबात आवडत नाही. अर्थात मुंबईत कोणतेही तीव्र हवामान नाही. थंडी नाही. मला पुण्यातल्या थंडीचा खूप त्रास व्हायचा तो मुंबईत आल्यावर बंद झाला. विनायक आधी नोकरीसाठी बोरिवली वरून मुलुंडला यायचा. म्हणजे दोन टोके. नंतर डोंबिवली वरून अंधेरीला नोकरीसाठी जात असे. ही पण दोन टोके. चढण्या उतरण्यासाठी डोंबिवली हे स्टेशन म्हणजे रोज युद्धासारखे सज्ज व्हायचे. नंतर ते सवयीचे होऊन जाते असे म्हणले तरी ती सवय होत नाही. विनायक डोंबिवली वरून ७.१२ ची लोकल पकडायचा आणि यायला त्याला रात्रीचे ८ ते ९ वाजायचे. म्हणजे डोंबिवलीचे घर हे फक्त जेवण आणि झोपण्यापुरतेच होते त्याच्याकरता. गर्दीतून आल्या आल्या मोज्यांसकट सर्व कपडे धुवायला टाकायला लागायचे आणि रोज आल्यानंतर अंघोळ करायलाच लागायची. कारण गर्दीतून येताना घाम, धूर , धूळ. शनिवारी अर्धा दिवस काम असले तरी ४ तास प्रवासात जायचेच. नोकरीवर जाण्यासाठी रोज ४ तास प्रवास. अशी १० वर्षे. 
 
 
मी मुंबईत नोकरी करण्याच्या फंदात पडले नाही कारण रोजच्या रोज धक्का बुक्की मला सहन झाली नसती पण गरज असती तर नोकरी करावीच लागली असती. मी डोंबिवलीत ४ वर्षे नोकरी केली. त्यामुळे घरातले स्वयंपाक पाणी सांभाळून गावातल्या गावात नोकरी ठीक होती. अत्यंत गरज होती पैशाची म्हणूनच ही नोकरी मी केली. मी दादर, ठाणे, बोरिवलीला ट्रेन ने गेलेली आहे काही कामानिमित्ताने पण जेव्हा गर्दी नसेल तेव्हा. डोंबिवलीवरून दादरला जायचे असेल तर दुपार नंतर जावे. गर्दी लागत नाही आणि दादर वरून डोंबिवलीला यायचे असेल तर सकाळी ८ नंतर यायचे. ऑफीसची गर्दी टाळून जायचे. उलट्या दिशेने गर्दी केव्हा असते कोणत्या स्टेशनला असते त्याप्रमाणे. आधी मला पत्ताच लागायचा नाही ईस्ट कोणते, वेस्ट कोणते, रेल्वे फलाटावर येते तेव्हा जी घोषणा होते ती पण डोक्यावरून जायची. विनायकने मला सर्व सांगितले. जेव्हा विनायक आणि मी रेल्वेने प्रवास करायचो तेव्हा मी लेडीज डब्या मध्ये शिरायचे. फर्स्ट क्लासचा डबा कुठे येतो, लेडीज डबा कुठे येतो हे माहीत झाले होते. तिकिट काढताना पण खूप मोठ्या रांगा असायच्या. तेव्हा दोघांनी वेगवेगळ्या रांगेत उभे रहायचे आणि ज्याचा नंबर आधी लागेल त्याने तिकिटे काढायची. कोणत्या फलाटावर कोणती गाडी येणार त्या पाट्यांकडे लक्श ठेवायचे असते. 
 
 
मुंबईत नोकरी करणाऱ्या बायकांचे मला खूप कौतुक वाटते. रोजच्या रोज गर्दीतून येताना घरी आल्यावर पण स्वयंपाक, आला गेला, सणवार करणे हे जिकीरीचे आहे. त्यातून खुद्द मुंबईत राहाणाऱ्या बायकांना शाळा कॉलेज करताना ट्रेन ने येण्याची सवय असते पण ज्या बायका लग्न होऊन मुंबईत येतात त्या बायका हा बदल आत्मसात करतात त्यांचे विशेष कौतुक वाटते. लोकल मध्ये जाताना स्टेशन ज्याप्रमाणे येते त्याप्रमाणे बायका एका पाठोपाठ उतरण्यासाठी उभ्या राहतात म्हणजे पटकन उतरणे सोपे होते. चोथी सीट बसायला देतात. लोकल मध्ये हळदी कुंकू, डोहाळेजेवण असे कार्यक्रमही करतात. इतकी प्रचंड धावपळ, गडबड करून थकतात पण चेहरे आनंदी असतात. घाम येत असला तरी फुल मेक अप मध्ये असतात. टापटीप राहतात. पावसाळ्यात तर लोकल ट्रेन ने प्रवास करणाऱ्यांचे खूपच हाल होतात. रूळांवर पाणी साठते त्यामुळे लोकल बंद पडतात. आणि कामावर गेल्यावर लोकल बंद पडल्या तर जास्तच हाल. विनायक एक दोन वेळा अंधेरी ते घाटकोपर कमरे इतक्या पाण्यातून चालत आला होता. पूर्वी मोबाईल फोन कुठे होते? आमच्याकडे लॅंडलाईन फोन पण नव्हता. मी बाहेर पिसीओ मध्ये जाऊन फोन करायचे. मुंबईचे लोक एकमेकांना सामावून घेतात. मदत करतात. इथे अमेरिकेत पब्लिक ट्रान्सपोर्टची बोंबाबोंब आहे. फक्त काही ठिकाणी लोकल्स आहेत. पुण्यातही हीच कथा. त्यामुळे नोकरीला जाताना वाहन असणे अत्यावश्यक आहे. क्लेम्सन आणी विल्मिंग्टन इथे मी बसने बरीच हिंडली आहे ती केवळ वेळ जाण्याकरता आणि घरात बसून बसून बोअर होते म्हणून. न्यु जर्सीला रहाणारी लोकं न्युयॉर्कला ट्रेन ने नोकरी वर जातात. जस्ट लाईक डोंबिवली व्हिटी.
 
 
पूर्वी आम्हाला एकजण भेटले होते तेव्हा ते म्हणाले की न्यु जर्सी म्हणजे दुसरी डोंबिवली. त्यांचे आडनाव शेवडे. ते पण डोंबिवलीचे होते. ते असे का म्हणतात ते इथे आल्यावर कळाले. आम्ही अजूनही इथल्या लोकल ट्रेनचा अनुभव घेतला नाहीये. बघू कधी जमते ते.Rohini Gore
क्रमश : ...

No comments: