Thursday, February 21, 2019

ट्रींग ट्रींग .... ( भाग २)

लँडलाईनचा जमाना गेला आणि मोबाईलचा जमाना आला. मोबाईलच्या जमान्यात आम्ही कधीच नव्हतो. २००१ साली आम्ही जेव्हा अमेरिकेत आलो तेव्हा विद्यापीठाच्या लायब्ररीतून "आम्ही सुखरूप पोहोचलो" अशी एक मेल पाठवली होती. अपार्टमेंट मध्ये राहाणाऱ्या शेजारील एका भारतीय कुटुंबाने आम्हाला फोन कार्ड बद्दल सांगितले होते. ९९ सेंटस या नुकत्याच सुरू झालेल्या बांगलादेशी दुकानातून एक कार्ड विकत घेतले होते. हे कार्ड डेबिट/क्रेडिट कार्डासारखे दिसायला होते. त्यावरचा नंबर दिसण्यासाठी तो आधी खोडावा लागायचा. मग ऍक्सेस नंबर दिसायचा आणि मग तो फिरवून अजून काही डिजिटचा नंबर फिरवला की कॉल लागायचा. पण ही कार्डे अजिबात टिकली नाहीत. आम्ही पोहोचलो हे सांगण्याकरता हे कार्ड घेतले होते. त्यावर आवाज तर नीट ऐकू येत नव्हताच. पण मिनिटेही मोजकीच होती.



भारतात फोन करण्यासाठी आम्हाला आधी अमेरिकेतला लँडलाईन फोन घ्यावा लागला. व्हराईजन या टेलीफोन कंपनीत आम्ही आमचे नाव नोंदवले व फोन सुरू झाला. त्या फोनवरून इथे अमेरिकेत आल्या आल्या २ ते ४ दिवसांनी मी रंजनाला कॉल केला होता.मी अगदीच मोजकी २-ते ३ वाक्ये बोलली असेन. म्हणजे 1 की २ मिनिटेच. पटकन फोन खाली ठेवला, बील येण्याच्या भीतीने. बील आले १० डॉलर्स !



नंतर आमच्या मित्रपरिवारातून आम्हाला काही साईटी कळाल्या. त्यावरून आम्ही दर महिन्याला ४० डॉलर्सची ऑनलाईन कार्डे विकत घ्यायचो. एक सासरी एक माहेरी एक बहिणीकरता. १० डॉलर्स मध्ये २० मिनिटे मिळायची.. या २० मिनिटात बोलणे जास्त व्हायचेच नाही. एका आठवड्याला एक 10 डॉलरचे कार्ड वापरायचो.
फोन लावण्यासाठी आधी १० आकडी ऍक्सेस नंबर फिरवायला लागायचा. मग नंतर १० आकडी पीन नंबर फिरवायला लागायचा. मग नंतर १५ आकडी ( इंटरनॅशनल कोड, भारताचा कोड, शहराचा कोड, आणि मुख्य टेलीफोन ८ आकडी लँडलाईन फोन ) नंबर फिरवायला लागायचे. हे सर्व मिळून ३५ डिजिटचे फोन नंबर फिरवल्यानंतर फोन लागायचा. त्यात ऐकू यायचे. पण कधी कधी फोन मध्येच तुटायचा. मग परत सर्व डिजिटचे नंबर फिरवण्यासाठी फोन वरची मग बटने दाबायला लागायची. त्यात मग तुमची काही मिनिटे बोललेली/वापरलेली कट करून उरलेली मिनिटे शिल्लक रहायची. बोलणे जास्तीचे व्हायचेच नाही. तब्येतीची चोकशीच जास्त केली जायची. आणि बोलताना आईला/रंजनाला/सासूबाईंना सांगायला लागायचे की आता मिनिटे संपत आली आहेत. फोन आपोआप कट होईल. यामध्ये नंतर ही ऑन लाईन विकत घेतलेली कार्डे थोडी स्वस्त झाली.





यात रिलायन्सची कार्डे जास्त चांगली होती. नंतर नंतर ५ डॉलर्सला ३० मिनिटे, आणि नंतर ६० मिनिटे दिली जायची. या फोनकार्डाबरोबर आम्हाला कस्टमर सर्विसचा नंबरही दिला जायचा. आम्ही मोबाईल फोन कधीच घेतला नाही. का ते पुढील लेखात...नंतर मोबाईल घेतला त्याचे नाव ट्रॅक फोन. अगदी छोटुसा फोन होता हा.. मी जेव्हा पब्लिक लायब्ररीत Voluntary work करायला जायला लागले तेव्हा हा मोबाईल घेतला. आणि त्याचा वापर अगदी जरूरीपुरताच.


क्रमश : ....

No comments: