आमची कार महामार्ग ४० वरून खूप जोरात धावत होती. डीसीवरून निघालो होतो.
महामार्ग ९५ हा आम्हाला खूप आवडतो. या रस्त्यावर खूप शिस्तीत वाहतूक चालते.
निघायला उशीर झाला होता. थंडीचे दिवस होते त्यामुळे ५ ला निघतानाच अंधार
झाला होता. एकापाठोपाठ एक अश्या कार टेकलेल्या होत्या. तरीही कुठेही वाहतुक मुरंबा झाला नाही. सर्वजण ठरवून दिलेल्या वेगानेच जात होते. आमच्या प्रवासाला ५ तास उलटून गेले होते आणि केव्हा एकदा घरी पोहोचत आहोत असे होऊन गेले होते. विल्मिंग्टनला येण्यासाठी महामार्ग ४० घ्यावा लागतो
आणि त्यावर लागणारी मोठी शहरे ओलांडली की विल्मिंग्टनला जाण्यासाठीचा हा रस्ता एकदम ओसाड होतो. वाहतूक खूपच तुरळक होते. विल्मिंग्टन -( नॉर्थ कॅरोलायना
) शहरात हा महामार्ग संपतो. तसा तर हा महामार्ग ईस्ट आणि वेस्ट कोस्टला जोडणारा प्रचंड
मोठा आहे. नॉर्थ कॅरोलायना मधून सुरूहोतो ते कॅलिफोर्नियात संपतो.
विल्मिंग्टन शहर जिथे आम्ही पूर्वी राहत होतो तिथे समुद्रकिनारे आहेत पण
ते इतके काही फेमस नाहीयेत त्यामुळे या शहरी कोणीही येत नाही.
तर
रस्त्यावर तुरळक वाहतूक होती. डाव्या बाजूच्या लेनवरून आमची कार जात होती.
एकीकडे आमच्या गप्पा चालू होत्या. तेव्हड्यात मला वीज चमकल्यासारखे वाटले.
मी म्हणाले पण विनायकला की वीज चमकली. पाऊस येणार की काय? पण वातावरण तर तसे दिसत नाहीये. हे मी म्हणायला आणि विनायकने अतिमंद वेग करत करत कार रस्त्याच्या डाव्या बाजूला घ्यायला एकच गाठ पडली. विनायक म्हणाला " वीज चमकत नाहीये. मागे बघ. पोलीस आहेत" मि पण मागे वळून पाहिले तर पोलीसची गाडी आमचा पाठलाग करत होती. माझ्या पोटात खूप मोठ्ठा गोळा आला. मी म्हणाले काय झाले? आपले काय चुकले? माझ्या डोळ्यासमोर तर मी व वि कारागृहात आहोत असे चित्र तरळले. :D विनायक म्हणाला मला पण माहीती नाहीये काय झाले ते. आणि आता तू पोलिसांच्या समोर बडबड करू नकोस. गप्प रहा. :D तसा तर विनायकचा चेहराही पडला होता. आम्हाला पोलीसांनी पकडले असे आमच्या आयुष्यात पहिल्यांदाच घडत होते. विनायकने
कार बाजूला घेउन थांबवली व कारच्या बाहेर आला. मी पण बाहेर येऊका? अश्या प्रश्नार्थक नजरेने सीट बेल्ट काढत होते. पोलीस म्हणाले "नको" तू जागेवरच बस. कारचे दार लावले. पोलीस आणि विनायक काहीतरी बोलत होते. माझ्या चेहऱ्यावर "काय बोलतायत एवढे? काहीही झालेले नसूदे" असे भाव चेहऱ्यावर होते.
१ ते २ मिनिटांनी विनायक कार मध्ये येऊन बसला. पोलिसांशी विनायकने
हस्तादोंलन केलेले दिसले. आणि माझा जीव भांड्यात पडला.
पोसीस लगेचच निघून गेले आणि मी लगेचच विनायकला विचारले "काय रे झाले होते? " विनायक म्हणाला अग काही नाही गं. आपल्या कारचा वेग खूपच वाढला होता. १०० एमपिएचच्या वर गेला होता. पोलिसांनी विचारले की इतक्या वेगात का जात होतात? तर विनायकने त्यांना सांगितले की आम्ही डीसीवरून निघालो आहोत. खूप दमलो आहोत आणि कधी एकदा घरी जाऊन पोहोचतोय असे आम्हाला झाले आहे. आणि रस्ताही रिकामा आहे. त्यावर पोलीस म्हणाला "तुमचा जीव तुम्हाला प्यारा आहे ना? " मग लक्षात ठेवा. ठरवून दिलेली वेगमर्यादा
पाळत जा. इथे ड्रग घेऊन जाणारे आणि दारू पिऊन चालवणारे बरेच जण असतात. तुमच्या कारचा वेग वाढला आणि अचानक एखादी कार तुमच्या मागे येऊन तुमच्याशी स्पर्धा करायला लागली तर तुम्ही तुमच्या वेगाचा ताबा नीट करू शकणार नाही. नीट लक्षात ठेवा. आमचे नशीब आम्हाला सक्त ताकीदच मिळाली. तिकीट दिले नाही. पोलीसांचे म्हणणे खरे होते. बोलताबोलता कारचा वेग इतका वाढला होता ते आमच्या लक्षातच आले नाही.
महामार्गावर जास्तीची लिमिट ७० असते. तुम्ही फार फार तर ८० ने जाऊ शकता. पण १०० च्या
वर वेग गेला? बापरे ! लक्षात ठेवायला पाहिजे. विनायक उत्तम कारचालक आहे. १७ वर्षात फक्त २ छोटे अपघात झाले आहेत. पण त्यावरून बरीच माहीती कळाली. पहिल्या अपघाताचा अनुभव दुसऱ्या अपघाताच्या कामी आला. अपघाताचा अनुभव कसा, कुठे, कधी आणि त्यासाठी काय काय
करावे लागते आणि समजते ते पुढील लेखात बघू. :)