Friday, February 17, 2017

भारतभेट २०१६

यावर्षीची भारतभेट अगदी मोजून होती. दोघांच्याही नोकऱ्या नवीन असल्याने जास्त रजा मिळाली नाही. शिवाय नोकरीबदलामुळे जुलैचे काढलेले तिकीट रद्द केले होते आणि त्यामुळे रद्द केल्याचे पैसे तर कापलेले होतेच आणि त्यात भर म्हणजे आधी बुक केलेल्या एअरलाईन वापरून दुसरे तिकीट काढायचे होते. मी आधी नोकरी करत नसल्याने आरामात बॅग भरता यायची. आता नोकरी मुळे ज्यावेळी कामावर जायचे नसेल त्यादिवशी शॉपिंग आणि बॅगा भरणे असे चालले होते. थंडी तर इतकी होती की कामे पटापट उरकताच यायची नाहीत. भारतात पोहोचलो आणि जेटलॅग जातो न जातो तोच परतीच्या प्रवासाची तयारी सुरू झाली. आईबाबांना डोळे भरून पाहून घेतले.  आईने थालिपीठाची भाजणी आधीच करून ठेवली होती त्यामुळे वेळ वाचला. देवीचे दर्शन घेण्याचे ठरवले होते.

पुण्यातल्या जोगेश्वरीचे दर्शन खूप छान झाले. ओटीचे सामान बघताना छान वाटत होते. दर्शना नंतर बांगड्या भरल्या. मग हळूहळू चालत आम्ही दोघी म्हणजे आई आणि मी शॉर्टकटने तुळशी बागेत शिरलो. यावेळेला तुळशीबाग बरीच हिंडले. गाऊन घेण्यानिमित्ताने फिरलोच. शिवाय मला काही कानातले घ्यायचे होते. मी जिथे काम करत तिथल्या मैत्रिणींकरता मी कानातले घेतले. इथे आल्यावर त्यांना दिले तर सगळ्याजणी खूपच खूष झाल्या ! तुळशीबागेत फिरून मग बाहेरच मसाला डोसा खाल्ला. काही कामानिमित्ताने एफसी रोडला गेलो आणि न ठरवताच वैशालीला भेट दिली. अर्थात वैशालीवर मी काही प्रेमबिम करत नाही. पुर्वी पण क्वचित गेली आहे. १५ दिवस म्हणजे तसे जेमतेम ८ ते १० दिवसच आईकडे राहणे झाले. पण तरीही त्यातल्या त्यात आईने मला बरेच प्रकार खाऊ घातले.


शेवयाची खीर, साबुदाणा खिचडी,  चकोल्या, होळीनिमित्ताने पुरणपोळीही झाली.  बरेच वर्षानंतर होळी पहायला मिळाली. विमानात ३ सिनेमे पाहिले. पिकू एकदम फालतू आहे. बाजीराव मस्तानी बरा वाटला. बजरंग भाईजान छान आहे.रंजनाकडे बटाटेवडे फ्रुटसॅलड असे जेवण छानच होते. चव आली. अर्चनाने माझ्यासाठी भारतात आल्या आल्या मला वडापाव, शेवबटाटापुरी खायला घातली. शिवाय घरी बोलावून छान बेत केला होता. भाकरी वांग्याची भाजी, आणि स्वीट डिश म्हणून जिलेबी आणि मठ्ठा,



माझ्या चुलत जावेने चविष्ट मिसळ केली होती. विनायक व त्याची चुलत बहिण वर्षा शेगावला जाऊन आले. नाही म्हणता म्हणता कमी वेळात बऱ्याच गोष्टी झाल्या म्हणायच्या.

मुंबई विमानतळ खूपच चकाचक झाला आहे. असे वाटले की आपण दुसऱ्या कोणत्या तर देशात आलोनाही ना? आजपर्यंत इतके विमानतळ बघितले पण आताचा हा चकाचक झालेला मुंबईचा विमानतळ तर जगात १ नंबर लागेल. आई कडे मी एकदा सौम्य खिचडी केली होती. ती आवडली सगळ्यांना.

No comments: