Wednesday, May 20, 2015

पूर्वेपासून पश्चिमेकडे ...(4)


सकाळी उठलो, पटापट आवरले आणि हॉटेलच्या लॉबीमध्ये आलो. आज सॅन फ्रॅन्सिस्को शहर दाखवणार होते. त्यामुळे आज तसा निवांतपणा होता. २५ डिसेंबरची सुट्टी होती. बरोबर थोडेफार तोंडात टाकायला खायला घेतले होते म्हणजे  २/४ बेसन लाडू, कचोरी व केक पण तरीही केळी आणली असती तर फार बरे झाले असते, निदान पोट तरी भरले असते असे वाटून गेले. आजचा दिवस उपासाचा होता हे आम्हाला कुठे माहीत होते? सबंध दिवस भूकेने व्याकुळ झालो होतो. सकाळी सकाळी उठल्या उठल्या पर्वतीसारखा चढ चढला. थंडी होती पण तरीही मी पंजाबी सूट घातला होता. पर्वतीसारख्या चढावर नाही म्हणायला मद्रासी रंगाची बोगनवेल दिसली म्हणून बरे वाटत होते. चढ आणि उतरताना उतारच उतार त्यामुळे पाऊलांना ब्रेक लावायला लागत होते.  लोंबार्ड स्ट्रीट हा असाच उंचावर चालत जाण्यासारखा आहे. तिथे कोणी कोणी स्किलफुल ड्राईव्ह पण करताना दिसत होते. नंतर तिथून फाईन आर्ट पाहिले व अजून एक दोन ठिकाणे पाहून गोल्डन ब्रीजला आलो. फोटोतच हा ब्रीज जास्त छान दिसतो. त्यावर चालून आलो. पण इतकी मजा आली नाही. एक तर वेळही कमी होता आणि काही काही गोष्टी प्रत्यक्षात जास्त चांगल्या नसतात तर काही गोष्टी प्रत्यक्षात चांगल्या नसूनही फोटोत छान येतात. ब्रीजचे फोटो काढले. वारे आणि थंडी होती त्यामुळे डोके दुखायला लागले आणि त्यात भर म्हणजे उपासाची !






एके ठिकाणी बोट राईड होती. तिथे खूप गर्दी होती. ही बोट राईड समुद्रातून होती. या राईडमधून परत येताना गोल्डन गेटच्या खालून जातो. एक तर थंडी, त्यात उन पडले होते. ते तीव्र तीव्र वाटत होते. एके ठिकाणी आम्हाला सगळ्यांना सोडले आणि  जेवण झाल्यावर साधारण दोन तासाने बोट राईड करता अमूक ठिकाणी येऊन थांबा असे सांगितले. त्या गाईडने सांगितले की होटेल आहे तिथे नूडल्स चांगले मिळतात. आम्ही शाकाहारी त्यामुळे आम्ही तेच खाणार होतो पण ते होटेल नेमके बंद होते. मग जॅक्स फास्ट फूड मध्ये काही मिळते का ते बघत होतो. भूक जोरदार लागली होती. अजून हॉटेलची शोधाशोध करत फिरणात बळ नव्हते. तिथे असलेली गर्दी , तीव्र उन आणि लागलेली भूक यामुळे अंगात त्राण नसल्यासारखेच वाटते होते. तिथे फ्रेंच फ्राईस, बर्गर पण एक विनंती करून मिळाला. म्हणजे व्हेज बर्गर. ती द्यायला तयारच न्हवती पण दिला. आणि बनाना आणि स्ट्रॉबेरी स्मुदी घेतली. तात्पुरते का होईना पोट भरले. बोट राईड छान होती. त्या राईडमध्ये कोक घेतला. हे होईपर्यंत ५ वाजले. मग परत काही ठिकाणी फिरलो. एक चर्च बघितले. सिटी हॉल बघितला, पब्लिक लायब्ररी बघितली. आणि चायना टाऊन मध्ये आलो. एकूणच इथले सर्व रस्ते उंचसखल होते. बसमधून समोरचा खाली उतारासारखा रस्ता चांगला दिसत होता. भूक लागली पण इथे या चायना टाऊन मध्ये काही नीट मिळेल असे वाटत नव्हते. शेवटी एका हॉटेल्मध्ये आलो तिथे आम्हाला गाईइने सांगितले की तुम्हाला इथे व्हेज फ्राईड राईस नक्की मिळेल. त्यामुळे तो राईस आणि एक कुठली तरी मिक्स भाजी घेतली. ते हॉटेल इतके चांगले नव्हते. पण काहीका होईना थोडे तरी पोट भरायला शाकाहारी अन्न मिळाले हे ही नसे थोडके. भात भाजी खाल्यावर पोट भरले. रात्री हॉटेल मध्ये आल्यावर निवांत पडायचे असे काही नव्हते.


एकूणच या शहराचे दर्शन छान झाले.  बाहेर पडले म्हणजे थोडाफार त्रास सहन करावा लागतोच हे तर गृहीतच असते.  आतापर्यंत आमची ट्रीप खरच खूप छान झाली. उद्या आमच्या ट्रीपचा शेवटचा भाग होता. उद्या योसेमिटीत जाऊन मग येतानाचा आम्हाला लॉस अँजलिस विमानतळावर सोडणार होते जिथून आमची ट्रीप सुरू झाली होती. 







मी बॅगा भरायला सुरवात केली. म्हणजे वापरलेले कपडे एका बॅगेत, नको असलेल्या गोष्टी एका बॅगेत, तर काही गोष्टी प्रवासात लागणाऱ्या एका बॅगेत ठेवत होते. सगळी जय्यत तयारी करून ठेवली म्हणजे उठल्यावर आवरले की बाहेर पडायचे आणि आता आम्ही योसेमिटीचे दर्शन झाल्या झाल्या थेट विमानात बसणार होतो घरी येण्यासाठी. लवकर निघायचे होते त्यामुळे झोप नाहीच पण निदान पाठीला आराम मिळावा म्हणून पाठ टेकली. सकाळी उठून नेहमीप्रमाणेच आवरले आणि होटेलच्या लॉबीत येऊन थांबलो. आम्ही दोघेही योसेमिटी बघण्याकरता खूपच उत्सुक होतो! आम्हाला योसेमिटी खूपच आवडून गेला पण यावेळी फक्त दर्शनच घेतले. पण पुढच्या ट्रीप मध्ये योसेमिटी २ दिवसाची ट्रीप नक्कीच करणार इतका आम्हाला आवडला. उंच उंच झाडे, धबधबा, सर्व काही छान आणि निसर्गरम्य ! पुढील आणि या सहलीचा अखेरचा भाग घेऊन लवकरच येईन.


No comments: