Wednesday, July 17, 2013

पत्तेकुटूयाका!


पत्ते खेळायचे का? ,,, हो पण काय खेळायचे?,,, हेच नेहमीचे पाच तीन दोन,, खूप वेळा खेळून झाले आहे, त्यापेक्षा नाटेकाटे खेळूया का? तिघात नाटेकाटे,, काय वेड लागलाय का,, त्याला कशी दहा बारा माणसे हवीत म्हणजे खेळ कसा रंगात येतो. खरे आहे चल मग पाच तीन दोनच खेळू. भिडू वाढले की मग बाकीचे खेळ खेळू,,


तू पीस रे, माझ्यावर पाच,, म्हणजे माझ्यावर दोन का? होरे, दळण दळल्यासारखे वेढे घेतले तर तुझ्यावरच दोन येतील. पण दळणासारखेच का? हो तसा नियमच आहे ना? बरे बरे,, नीट पीस रे, नाहीतर देशील कुठलीतरी फालतू पाने, पत्ते हातात घेतल्यावर जेव्हा नुसते स्मितहास्य होते तेव्हा नक्कीच चांगले पत्ते आलेले असतात, पण चेहऱ्यावर तसे दाखवायचे नसते. चेहरा निर्विकार ठेवायचा, म्हणजे पाच हात काय सहजच होतील,, त्यातून बाकीच्यांचे पण ओढूच इतकी छान पाने आली आहेत. पाच तीन दोन मध्ये खानदानी पाने आली की ती पाहूनच जिंकण्याचा आनंद चेहऱ्यावर दिसत असतो.  जेव्हा दुसऱ्याचे हात ओढले जातात तेव्हा  कसे आनंदाचे कारंजे फूटत असतात. पण तरीही आपले हात कोणी दुसऱ्याने ओढले की ते नेहमी उधारीवर ठेवून आपले स्मितहास्य कायम ठेवायचे. म्हणजे कसे की तुला हात देईन माझे झाले की असे आश्वासन द्यायचे आणि कायम उधारीत रहायचे.


काय रे काय चालू आहे,,,, नेहमीचेच भिडू आहात काय पाच तीन दोन वाले, चला पत्ते पिसा आम्ही आलोय आता,,. ओह म्हणजे आपण चक्क सात जण झालो की,;; हो पण यातल्या या दोघी तर लिंबू टिंबूच आहेत,, सच्चेपणाने खेळणाऱ्या, काय खेळायचे बोला, बदाम सात खेळायचा? पण दोन कॅट हवेत तरच मजा येते, ए नको खूपच वेळ लागतो, बरे, चला खेळूया बदाम सात ! बदाम सातला पाने हातात आली की दुसऱ्याची पाने अडकवणारा मुरलेला खेळाडू असतो.  हातात खानदानी पाने आली म्हणजे की कानी कुंडले मोती हार तर आणि तरच त्याच्याकडे सत्ती असेल तर ती पटकन निघते नाहीतर हुकम्याच्या एक्यासारखी शेवटपर्यंत राखली जाते.


सत्या पटापट लागल्या की समजावे हातात खानदानी पाने असल्याशिवाय सत्ती लावायला इतके मोठे मन कुणाकणे असते?  नाहीतर सत्या पटपट लावायला वेड बिड लागलयं काय? ज्यांच्याकडे नुसती शबनम अडकवलेली पाने येतात असे भिडू छक्की अडकवण्यातही धन्यता मानतात,,,.  अरे छक्या कसल्या आडवताय रे !,,,, एकही पास न देता भिडू जेव्हा खेळतो तेव्हा त्याच्या हातात असे काही तरी खास लागलेले असते की पुढचे पान कोणते लावायचे ते त्याने खेळी खेळल्यावर लगेचच ठरलेले असते. नशिब जोरदार असते एकेकाचे. पण काही जण खानदानी पाने  आली तरी डगमगत नाहीत, शांत असतात, मोका आला रे आला की अशी पाने सरासर लावून मोकळी होतात, अर्थात काहीवेळा मात्र त्यांच्यावर पस्तावण्याखेरीज काहीही हाताला लागत नाही.आयला पत्ते कुटायचा काय योग आहे रे आज !!, कधी नव्हे ती मंडळी उगवलीत बघ,,, अगं तू किती दिवसांनी गं कुठे आहेस? ,,अगं मला वेळ मिळत  नव्हता गं, आत्ता मात्र जाम मजा येणारे,,,, ही टाळकी कधी आली?,,, आज सकाळपासूनच आहेत, सुट्या लागल्या ना, मग दुसरा उद्योग काय यांना पत्ते कुटण्याशिवाय,,. चला आता सगळ्यांनी जेवायला, आणि मग सगळेच बसू खेळायला. होहो आता आपण नाटेकाटेच खेळायचे हं, म्हणजे काय रे? अग म्हणजे नॉट ऍट होम !,,, ओह मस्तच की आम्हाला आवडतो हा खेळ, खूपच धम्म्मल येते ना?


मंडळी झाली आता गर्क खेळण्यामध्ये, पाच ते आठ तासांची निश्चिंती. या खेळात अधेमध्ये गप्पाही ठोकता येतात, काहींना तर जागे करावे लागते, खेळा आता,,, अरे होका, मला वाटले संपला खेळ. ,,पत्ते पिसा रे कोणीतरी. पाने वाटली की,,, खेळ रे,,. होहो खेळतो, कोणते बरे मागावे पान?,, ए तू मला ना,, इसपिकची पणजी देतोस का?,,, कांदे बटाटे पाहिजेत का? तूच मला किलवरची राणी दे. ,,घेघे, मला नकोच होती नाहीतरी. आणि काय पायजेल आपल्याला. बदाम एक्का पण देवून टाक बरे. घेघे, अजून काय? आता काही मागितलेस तर कांदेबटाटे मिळतील बरं का? मागितलेली पाने नसली की कांदे बटाटे तय्यार !,,, झाल्या का जोड्या ? हो झाल्या बहुतेक कारण की हातात एकाच्याही पान दिसत नाहीये. जोड्या लपलेल्या असतात आणि त्या मागितल्या की कळते कुठे असतात ते ! उशीत, शर्टाच्या खिशात, सतरंजी खाली, मांडीखाली,,,. काही जण असे वावरत असतात की सुटलो बुवा एकदाचे पण खरे सुटलेले नसतात. एक जोडी असते त्यांच्याकडे आणि ती जोडी पटकन जमलेली असते,,,. काहीजण उगाचच गंभीर, काय रे सुटलास का?,, असे विचारले तर नुसत्याच माना डोलावतील. खरे तर त्यांच्याकडे एकही जोडी नसते आणि चुकून कोणीतरी मागितली तर नाटेकाटे देवून बाकीच्यांच्या जमवलेल्या जोड्या लंपास करायला मोकळे  असतात. बारीक नजर ठेवून असताते हे,, कोणी कुणाकडे काय काय मागितले आहे. त्याबाबतीत स्मरणशक्ती जोरात असते यांची.


असाच परत एकदा पत्ते खेळण्याचा योग जुळून येतो तेव्हा चॅलेंज खेळण्याचा मूड लागून जातो. खेळताना काही जण अट्टल खोटारडे बोलणारे असतात,, नाहीतरी चॅलेज हा खेळ खरच एखादा चॅलेज उचलण्यासारखा आहे.  लोक मनाला येईल त्याप्रमाणे और एक, और दो, और पांच करत ३०, ४० राण्या जमवतात, त्यातली नेमकी सर्वात शेवटची खरी असते आणि उचलेंज म्हणायला म्हणायला एकच गाठ पडते आणि सर्व खोट्या राण्या पदरात येऊन पडतात. पण या पदरात आलेल्या राण्या एकेक करत परत  छक्या पंज्या बनून दुसरीकडे जातात. त्यात काही घाबरट लोक नेहमी पास देतात, तसे तर उंचलेंज म्हणायला आणि पाने खोटी निघायलाही एक गाठ पडते तेव्हा खोटारडे पाने उचलून खेळायला सज्ज असतातच. काही जण खोटे खेळा नाहीतर खरे त्यांचे काम ज्याला त्याला चॅलेंज देण्याचेच असते. हे लोक म्हणजे निव्वळ डोकेदुखी. खेळण्यातली मजाच घालवून टाकतात. और एक, और एक चा रिदमच तोडतात जणू !


३०४ मध्ये तर काही जणांना काळे बिल्ले जमा करण्याचाच छंद असतो. हातात पाने आली रे आली की ३०४ बोलून मोकळे होतात. नशीब जोरावर असेल तर चार पानात त्यांचे ३०४ होऊन जातात. हा खेळ मला जाम आवडतो. छब्बूत एक पानी छब्बू देण्यातच खरी मजा असते. इसपिकचा एक्का इकडून तिकडे नुसता फिरत असतो. छब्बू मध्येही पि एच डी करणारे लोक आहेत. म्हणजेच गाढव बनणारे. आम्ही अशा गाढवांना डिग्र्या बहाल करतो. छब्बू देताना बाकीचे एक्के सोडून इसपिकचा एक्का सोडवण्याची घाई झालेली असते.वख्खई आठवते का? त्यावेळची मजा काही औरच होती. लॅडीज हा प्रकार एके काळी खूपच प्रसिद्ध होता. पत्यांमध्ये सात-आठ, भिकार सावकार, लॅडीज, तीनशे चार, छब्बू, जपानी छब्बू, मेंढी कोट, चॅलेज, बदाम सात, पाच तीन दोन, नॉट ऍट होम, रम्मी, असे हे सर्व बैठे खेळ किती जणांना एकत्र घेऊन यायचे. किती छान वेळ जायचा. आणि खरच पत्ते हे अगदी कुटायचेच असतात, त्यातच खरी मजा असते, रात्रंदिवस कुटणे, गप्पा टप्पा करणे, अधेमध्ये चहा घेणे, सणावारी एकत्र पत्ते कुटताना तर जाम मजा येते ना? पण आता कोण खेळते पत्ते? पुढच्या भारतभेटीत मुद्दामहून पत्यांचा खेळ रंगवायचाच. येस्स्स, जमवायचेच, गेले ते दिन गेले नाही,, परत आणायचे अशा दिवसांना, मनात आणले तर जमणे कठीण नाही.2 comments:

KattaOnline Marathi Blog said...

Got real feel of playing cards just by reading this post!

rohinivinayak said...

thank you !