Tuesday, January 08, 2013

फिरूनी नव्याने जन्मेन मी

या जगामध्ये जन्म व मृत्यू अटळ आहेत. प्रत्येक सजीव गोष्टीचा जसा जन्म होतो तसाच प्रत्येक निर्जीव गोष्टींचाही जन्म होतो. ही जन्माची म्हणजेच निर्मितीची क्रिया किती सुंदर आहे. ती मनाला आनंद देते. आता एका फुललेल्या फुलाचेच उदाहरण घ्या ना ! गुलाबाच्या रोपटाला कळी धरते. हळूहळू तिचे पाकळीत रूपांतर होते आणि फूल जन्माला येते. किती मनमोहक दिसते हे फूल!प्रत्येक कळीची फुलण्याची तऱ्हा किती वेगळी असते. प्रत्येक कळीच्या पाकळ्या जेव्हा एकमेकांपासून अलग होतात तेव्हा प्रत्येक पाकळीचा आकार वेगळा असतो, पण काही वेळेला हे फूल उमलतानाच जोराचा पाऊस येतो व सर्व पाकळ्या गळून पडतात.




प्रत्येक प्राणीमात्राची निर्मिती अशीच वेगवेगळ्या प्रकाराने होत असते. कधी अचानक होत असते तर कधी ठरवून होते. जसे की आपण एखादे रोपटे आणून कुंडीत लावतो आणि त्याची निगा राखतो व ते बहरते. तसेच काही वेळा अचानक काही ठिकाणी पाहावे तर वेलीच्या वेली बहरलेल्या दिसतात. एखाद्या खडकातूनही काही वेळा एखादे रोप उगवलेले दिसते. रानटी फुले तर केव्हा कधी व कशा उगवतात हे आपल्याला कळतही नाही. गवतावर चालताना नीट निरखून पाहिले तर नाजूक छोटो फुले उमललेली दिसतात. त्यांचे सूक्श्मदर्शी निरिक्षण केले तर त्यांचा आकार खूप आखीव रेखीव छान असतो. प्रत्येक कलाकृतीचेही असेच आहे. एवढेच कशाला, लेखांचे, कवितांचे व पाककृतींचेही जन्मही असेच होत असतात. फिरूनी नव्याने जन्मेन मी याप्रमाणे ते होत असतात. या प्रत्येक जन्माचे आयुष्यही ठरलेले असते. लेखकाने लेख लिहिला की तो काही संकेतस्थळांवर जन्माला येतो तर कधी तो ब्लॉगवर उगवलेला दिसतो. काही लेख नावारूपाला येतात व ते वर्षानुवर्ष जगतात तर काही लेखांकडे दुर्लक्ष होते. सर्व जन्माचे जगणे मरणे सारखेच असते. चांगला लेख दुर्लक्षित होणे काय किंवा एखादे चांगले वाढणारे रोपटे अचानक कोमेजून जाणे काय सर्व सारखेच.







आता तुम्ही म्हणाल की लेख, कविता किंवा पाककृती किंवा एखादी कलाकृती जन्माला येणे याचा अर्थ ती लोकांपर्यंत पोहोचणे का? तर नाही. लेखक आपले लेख किंवा कवी आपल्या कविता आपल्या वहीत जेव्हा लिहितात तेव्हाच त्यांचा जन्म होतो. इतकेच नाही तर त्यांच्या मनातच त्या कलाकृतीचा जन्म होतो. त्याचा आनंद तो त्यांच्यापुरताच मर्यादीत असतो. आपण जसे अनेक फोटो काढतो. काही फोटो लगेच पुसून टाकतो तर काही ब्लॉगवर तर काही सर्धेसाठी पाठवतो. तर एकूणच या जन्माचे रहस्य काही वेगळेच ! नाही का? पाककृतींचे म्हणाल तर अनेक पाककृती आपण करत असतो. काही नेहमीच्या, काही कुणाकडून कळालेल्या तर काही लिहिण्यासाठी म्हणून मूद्दामहून करतो. या पाककृतींचा मला अनुभव आला आहे. काही पाककृती करायच्या म्हणून डोक्यात नुसत्या घोळत असतात. मी ठरवते की अमूक एक पाककृती करायची व लिहायची पण त्यातही अचानक दुसरीच कुठली तरी न ठरवलेली पाककृती केली जाते व ती लिहिली जाते व तिचा जन्म होतो.





या प्रत्येक कलाकृतीची जेव्हा निर्मीती होते तेव्हा त्याचा किती आनंद असतो ते पहा. एखादा लेख, कविता किंवा कलाकृती जेव्हा आपण पाहतो किंवा लेख कविता वाचतो तेव्हा त्याचा आपल्याला आनंद होतो. प्रत्येक जन्माचा आनंद होतोच असे नाही. एखादा लेख वाचनात आला की नकळत आपण आपल्या पूर्वस्मृतींना
उजाळा देतो व आपल्याला खूप आनंद होतो. एखादी माहीत नसलेली पाककृती जेव्हा आपण करून पाहतो तेव्हा त्या पाककृतीचा जन्म आपल्या घरी होतो. ती चवीला चांगली झाली की आपल्याला आनंद होतो व बेचव झाली की आनंद होत नाही. कविता व लेख याचेही असेच आहे.  स्फुरलेली कविता किंवा लेख नावाजला जातो.






आपल्याला आवडत असलेली गाणी ऐकणे, पुस्तक वाचणे किंवा एखादा चित्रपट बघणे. आपण आपल्या आवडीचे काहीही केले की होणारा जो आनंद असतो त्या आनंदाचाही एक नवीन जन्म होतो असेच मी म्हणेन ! जसे सजीव गोष्टींचे आहे तसेच निर्जीव गोष्टींचेही आहे. निर्जीव वस्तू वापरून आपण त्या बाहेर टाकतो. या बाहेर टाकलेल्या वस्तू कोणीतरी उचलून घेऊन जातो व त्या घरात त्याचा वापर सूरू व्हायला लागतो. तेव्हा त्या घरात जुन्या गोष्टींचा नव्याने जन्म होतो. काही वेळा काही गोष्टी आपण बाहेर न फेकता तश्याच ठेवतो, कधीतरी त्या उपयोगी पडतील म्हणून तशाच ठेवतो. कालांतराने त्या वस्तूंचा आपल्याला उपयोग होतो. तेव्हा त्या नव्यानेच आपल्याला आनंद देऊन जातात. त्या गोष्टींकडे आपली पाहण्याची दृष्टी बदलते. तिची वेगळी निर्मीती होते. या निर्मीतीचा आनंद काही वेगळाच असतो.






हे सर्व जग असेच बनलेले आहे. जन्म मरण, परत मरणातून नवीन जन्म, आणि आनंद. हे चक्र असेच चालू राहणार आहे. आपल्या हातात फक्त आनंद घेणे आहे. तो भरपूर घ्यायचा आणि दुसऱ्यांना द्यायचा. या आनंदाची निर्मीती आपल्याच हातात आहे आणि ती शेवटपर्यंत करत रहायची.


हा लेखनप्रकार कोणता आहे ते मला माहीती नाही. जसे सुचले तर खरडले आहे.




No comments: