Tuesday, November 13, 2012

खेड्यामधले घर कौलारू !

क्लेम्सनमधल्या कॉलेज ऍव्हेन्युच्या स्टुडिओ अपार्टमेंटमध्ये संध्याकाळच्या सुमारास आम्ही राहायला आलो. स्टुडिओ अपार्टमेंट म्हणजे सर्व सुखसोयीने सज्ज असलेली फक्त एकच खोली! त्या खोलीमध्ये आमच्या मोठाल्या बॅगा व काही सामान ठेवले आणि तिथेच असलेल्या एका खुर्चीवर बसल्या बसल्या संसाराला लागणारे सर्व सामान एकाच खोलीत कसे काय लावायचे याचा विचार डोक्यात चालू झाला.



दुसऱ्या दिवशी सकाळी उठले आणि त्या खोलीत चौफेर नजर फिरवली. सुरुवाततर करू म्हणजे आपोआप सुचेल असा विचार करत कामाला लागले. सर्वात प्रथम नव्या कोऱ्या गादीवर नवी कोरी चादर अंथरली व बेडरूम तयार केली. उशांना अभ्रे घातले. या चादर व अभ्र्यांचे उद्घाटन या स्टुडिओमध्ये होणार होते तर! या नव्या कोऱ्या गादीचा योगही आमच्याकडेच होता. क्लेम्सनमध्ये पहिल्यांदा आलो तेव्हा एका भारतीय कुटुंबाकडे आठ दिवस राहिलो होतो. त्या मैत्रिणीचे घर मोठे होते. त्या जागेत आधीचा राहणारा कुणीतरी ही आकाशी रंगाची गादी अशीच सोडून गेला होता. ती मैत्रीण म्हणाली, "ही गादी आम्ही वापरत नाही तर तुम्ही घेऊन जा. चांगली आहे. तुम्हाला नवीन घरात उपयोगी पडेल. " गादी नवीकोरी दिसत होती म्हणून घेऊन आलो. त्याचप्रमाणे या स्टुडिओमध्ये एक खुर्ची अशीच कोणीतरी सोडून गेले होते. विद्यापीठात फर्निचर असेच फिरत असते. एक तर कोणी विकत घेत नाही, घेतले तर मित्रमैत्रिणींना फर्निचर देऊन जातात. ते बरोबर घेऊन जाण्यासाठीचा खर्च इथे जास्त असतो. तेव्हा बसायला खुर्ची आणि झोपण्यासाठी गादी तयार झाली.




आमच्याकडे पहिलावाहिला खरेदी केलेला जो टेलिव्हिजन होता तो ठेवण्याकरता स्टूलवजा काहीतरी घ्यायला हवे होते. काय घ्यावे आणि कोणत्या दुकानात जावे ते ठरवून तिसऱ्या दिवशी दुकानात जायला बाहेर पडले. त्या दिवशी अगदी मनासारखी खरेदी झाली. एक छोटा लाकडी टीपॉय घेतला आणि प्लॅस्टिकचे तीन ड्रॉअर असलेला कपाटवजा स्टँड घेतला. टीपॉयवर एक अभ्रा अंथरला आणि त्यावर आमचा १३ इंची टिल्लू टीव्ही ठेवला. त्या टीपॉयच्या खाली एक कप्पा होता, तिथे आमचा व्हिसीआर ठेवला व त्यावरती सिनेमांच्या कॅसेटी ठेवल्या. टीव्हीच्या आजूबाजूला रिकामी असलेली जागा ग्रंथालयातून आणलेल्या पुस्तकांसाठी निश्चितकेली. टीव्ही विराजमान झाल्यावर त्या खोलीला थोडे रूप आले. त्या खोलीत जी खुर्ची होती तिचे पाय अर्धगोलाकार होते त्यामुळे ही खुर्ची खूपच आरामदायी होती. ज्याला झोपून टीव्ही बघायचा आहे तो गादीवर आडवा व्हायचा व ज्याला बसून टीव्ही बघायचा आहे तो खुर्चीवर बसायचा आणि हो, मला टीव्ही नसलेल्या स्वयंपाकघरातूनही बघता यायचा बरं का! पोळी भाजी करताना मागे वळून मी टीव्ही वर काय चालू आहे ते पाहत असे. "वन बीएचके इन वन रूम" साकार होत होते. भारतामध्ये काही जणांचे एका खोलीतले संसार पाहिले होते आणि ते नीटनेटके होते. आमची एका खोलीत संसार करण्याची ही पहिलीच वेळ होती. नवीन अनुभव होता. प्लॅस्टिकचा कपाटासारखा दिसणारा स्टँड आवडला म्हणून आणला पण याचे काय करायचे, काय ठेवायचे यामध्ये, काही सुचत नव्हते आणि एकदा अशीच गादीवर आडवी पडलेली असताना एकदम सुचले. चटदिशी उठले आणि जे सुचले होते ते लगेच करूनही टाकले. त्या प्लॅस्टिकच्या छोट्या कपाटात पहिल्या कप्यात मी महत्त्वाची बिले ठेवण्याकरता जागा केली. दुसऱ्यात नेलकटर, स्टेप्लर, कात्री, पट्टी, पत्रावर चिकटवण्याचे स्टँप असे सर्व काही ठेवले. सर्वात खालच्या कप्यात भारतातून आणलेल्या जुन्या हिंदी गाण्यांच्या कॅसेट ठेवल्या. सर्वात वरती भारतातून आणलेले छोटे घड्याळ ठेवले आणि शिवाय फोनही ठेवला. या छोट्या कपाटाची जागा मी टीपॉयच्या बाजूला केली व त्याच्या बाजूला आमचा बेड. सकाळी उठताना घड्याळात किती वाजले हे सहज दिसायचे. त्या स्टँडचा रंग निळा होता. त्याचे मी मनातल्या मनात खूप कौतुक केले. ध्यानीमनी नसताना आवडले आणि घेतले, आणि त्याचा इतका छान उपयोग होत आहे ते पाहून खूप आनंद झाला.





या जागेत मला सर्वात जे काही आवडले असेल ते म्हणजे या खोलीचे दार आणि या दाराला लागूनच असलेले दुसरे जाळीचे दार! या जाळीच्या दाराला एक मोठा आडवा हूक होता तो मुख्य दरवाज्याच्या डाव्या बाजूला छोट्या गोल हुकामध्ये अडकवला की मुख्य दार सताड उघडे ठेवले तरी चालायचे. जागेत हवा यायला हेच दार होते. बाकी सर्व बाजूंनी खोली बंद होती. मी अनेकदा हवा खेळती राहण्यासाठी हे दार उघडे ठेवायचे व जाळीच्या दारातून समोर असलेली हिरवळ बघायचे. याच जाळीच्या दारातून रपारप पडणाऱ्या पावसाकडे बघायला मला खूप छान वाटायचे. या घराच्या दरवाज्याला लागूनच एक ओसरी होती. पाऊस पडताना ओसरीच्या बाहेर पावसाच्या पागोळ्या पडायच्या. ओसरीवर उभे राहिले की अगदी कोकणातले वातावरण तयार व्हायचे. सर्व बाजूंनी हिरवीगार झाडी, ओसरी, मुसळधार पाऊस, पाऊस पडत असताना छतावरचे पाणी ओघळून बनलेल्या असंख्य पागोळ्यांकडे बघत बसावेसे वाटायचे. काही वेळेला पावसाचा अधिक आनंद लुटण्यासाठी आले घातलेल्या गरम चहाचा कप हातात असायचा. मन आपोआप गाणे गुणगुणायचे - खेड्यामधले घर कौलारू, घर कौलारू! या खोलीच्या एका भिंतीला एक भली मोठी खिडकी होती. पूर्ण काच असलेल्या खिडकीला जाळ्या होत्या व काचेची सरकती दारे होती. या सरकत्या दारातून हवा येण्यासाठी मी खिडकी काही वेळा अर्धी उघडी ठेवायचे. या खिडकीला पडदे मी घरीच शिवले. दुकानातून नाजूक फुले असलेले कापड आणले व सुई-दोऱ्याने टिपा घालून छान पडदे शिवले. दुपारचे जेवण झाले की गादीवर बसून मी काही वेळा काहीतरी लिहीत बसले की मधूनच नजर खिडकीबाहेरच्या उंच व काटकुळ्या झाडांकडे जायची. लिहायचा कंटाळा आला की पडदे लावून अंधार करून थोडा वेळ आडवी व्हायचे. थोडी डुलकी लागायची. झोपताना जाळीचे दार लावून मुख्य दार थोडे किलकिले करून ठेवायचे. बाहेरून कोणी आले की दरवाज्यावरची बेल वाजवायचे. जेव्हा उठून दार उघडायला जायचे तेव्हा मैत्रीण आलेली असायची व हळू आवाजात विचारायची "सो रहे थे क्या? ". काही वेळेला मैत्रिणीला बोलावून घ्यायचे व आम्ही दोघी पडदे लावून अंधार करायचो. बाहेरचा प्रकाश अंधुक होऊन घरात पसरायचा व व्हिसीआरवर एखादा हिंदी चित्रपट बघायचो. जणू काही थिएटर मध्ये चित्रपट बघत आहोत असेच भासायचे. तो बघून झाला की आम्ही दोघी मिळून चहा प्यायचो. ती बरेच वेळा काहीतरी खायला आणायची.




या चौकोनी घराला स्वयंपाकघर असे नव्हतेच. एका भिंतीला लागून एक ओटा, त्यातच इलेक्ट्रिकच्या शेगड्या, आणि भांडी धुण्याकरता एक भले मोठे सिंक होते. इलेक्ट्रिक शेगडीच्या खाली ओव्हन, ज्यामध्ये मी भांडी एकात एक घालून ठेवली होती. ओट्याला लागून जे ड्रॉवर होते तिथे भांडी, वाट्या, झारे, कालथे, सुऱ्या ठेवल्या. त्या ओट्याशेजारी फ्रीज आणि त्याला लागूनच बंद एक छोटी खोली ज्यामध्ये बाथ-टब वगैरे होते. स्वयंपाकघराच्या वरच्या दोन फळकुटांवर काही डबे, बरण्या व जास्तीचे तेल साखर ठेवली. चहा साखरेचे डबे ओट्यावरच ठेवले. भांडी घासायला जे सिंक होते त्यात भांडी जमा झाली रे झाली की लगेच घासून पुसून ठेवायला लागायची. ओट्यावरच जुनी चादर घालून घासून विसळलेली भांडी उपडी घालायचे. उपडी घातल्याने भांडी लगेचच कोरडी व्हायची व ती परत जागेवर ठेवायला लागायची. पसारा घालण्यासाठी अजिबात वाव नव्हता. घराच्या चार भिंतींच्या कडेने एकेक खोली तयार झाली. सुरवातीच्या भिंतीला प्रवेशाचे दार आणि खिडकी. समोरच स्वयंपाकघर. आता उरलेल्या समोरासमोरच्या दोन भिंतींमध्ये एकाला तर लागूनच गादी होती आणि उरलेल्या भिंतीला जे अनेकविध खोलगट कप्पे होते त्यात बाकीचा संसार मावायचा होता.




हे कप्पे तीन भागांमध्ये बसवले होते. डाव्याउजव्या बाजूचे जे भाग होते त्यांना दारे होती, म्हणजे आत जे काही ठेवले असेल ते दिसायचे नाही. उजव्या बाजूला जो भाग होता तो तर चक्क कपाटासारखाच होता, त्यामुळे त्यात सर्वच्या सर्व कपडे राहणारच होते. तिथे हँगर ठेवायला एक दांडा होता. त्यावर नेहमी वापरातले कपडे हँगरला लटकवले. आणि त्या खाली जी रिकामी जागा होती तिथे आमची भली मोठी बॅग ठेवली. ज्याप्रमाणे ऋतू बदलतील त्यानुसार योग्य ते कपडे बाहेर काढून हँगरला लटकवायचे व बाकीचे अनावश्यक कपडे बॅगेत ठेवायचे. बाजूला असणाऱ्या जागेत जास्तीची पांघरुणे, रग व चादरी ठेवल्या. सर्वात वरच्या कप्प्यात टिशू पेपर, पेपर टॉवेल असे ठेवले. खाली एका कडेला व्हॅक्युम क्लीनर ठेवला.




डाव्या बाजूच्या भागात जे कप्पे होते त्यात उरलेल्या दोन बॅगा ठेवून सर्वात खालचा कप्पा बूट, चपला ठेवण्यासाठी केला. मधला एक कप्पा रिकामा होता तोही पुढे उपयोगात आला. संसाराला लागणाऱ्या सर्व गोष्टी एकेक करत मांडत गेले आणि माझी मीच थक्क झाले. एवढे सर्व सामान लागून सुद्धा मधली चौकोनी जागा घरातल्या घरात फेऱ्या मारायला रिकामी होती. त्या भिंतीत आता उरला होता तो मधला भाग! हा भाग स्वयंपाकघरात रांधा-वाढा यासाठी लागणाऱ्या किराणामालासाठी लागणार होता. खूप नाही तरी दोन तीन महिने पुरेल इतके सामान आणायला झाले होते. आमच्यासारखीच दोन तीन भारतीय कुटुंबे या स्टुडिओ अपार्टमेंट संकुलामध्ये राहत होती. आम्ही तिघी मैत्रिणी एकमेकींकडे जायचो तेव्हा एकमेकींच्या खोल्यांचे कौतुक करायचो. प्रत्येकीची मांडणी वेगवेगळी. त्यातल्या त्यात खोलीची केलेली सजावटही छान होती. त्यातल्या एका मैत्रिणीने मला विचारले की "आपण दोघी मिळून ऑनलाईन भारतीय किराणामाल आणायचा का? ". लगेच किराणामालाची एक यादी बनवली. ऑनलाईन किराणा मागवल्याने आमचा फायदा झाला. एक म्हणजे सामान घरपोच आले आणि दुसरे म्हणजे ज्या खोक्यातून सामान आले ती खूप उपयुक्त ठरली. उरलेला मधला कप्पा जो रिकामा होता त्यात सर्व कसे बसवायचे याचा विचार सुरू झाला. स्टुडिओ अपार्टमेंटमधला हा नवीन अनुभव खूप छान वाटत होता. असे वाटत होते की आपण जितकी जागा वापरू तितकी ती आपल्याला कमीच पडते!



किराणामालाच्या खोक्यांमध्ये प्लॅस्टिकच्या बॅगेत पूर्ण सामान आले. त्यातले रोजच्या रोज वापरात काय काय सामान लागते याची एक यादी बनवली व परत दुकानामध्ये डबे बरण्या खरेदीसाठी गेले. प्लॅस्टिकच्या बरण्या पारदर्शक व दिसायलाही छान दिसतात त्याच खरेदी केल्या. खोलगट, उभट, चौकोनी असे वेगवेगळे बरण्यांचे आकार घेतले व त्यात सामान भरले. तांदूळ, डाळ, पोहे, रवा, साबुदाणा, दाणे एकेकात भरले व ओळीने त्या कप्यात लावले. वेगवेगळ्या प्रकारच्या मसाल्यांकरता उभट आकाराच्या बरण्या छान व सुबक दिसत होत्या. खोक्यांमधली जी प्लॅस्टिकची बॅग उघडायचे ती उभी करून ठेवायचे म्हणजे त्यातले काही सांडायचे नाही. रबर बॅंडने पिशव्याही बंद करून घ्यायचे. सर्वात वरचा कप्पा होता त्यात मिक्सर, बल्ब, इस्त्री असे ठेवले व बाथरूम मध्ये धुणे धुण्याची व भांडी घासण्याची साबणे, एअर फ्रेशनर असे ठेवले. शिवाय तिथे लाँड्री बॅगही ठेवली. स्टुडिओमध्ये वॉशर ड्रायर नसल्याने धुणे बाहेर असलेल्या लाँड्रोमॅटमधून धुऊन आणायला लागायचे.





आतापर्यंत सर्व सामानाची व्यवस्था लावली ती मनाजोगती लावली गेली होती. सर्व काही जिथल्या तिथे वेळच्या वेळी ठेवायला लागत होते. पसारा घालण्याकरता वावच नव्हता. भांडी रोजच्या रोज दोन वेळेला घासायलाच लागायची. भांडी विसळून उपडी करून लगेचच्या लगेच जागेवरही ठेवायला लागायची. सकाळची पोळी भाजी झाली की मी घराबाहेर येऊन बसायचे. हे घर जंगलात होते. सर्व बाजूने हिरवीगार झाडीच झाडी होती. या झाडांचे बरेच ओंडके घराच्या बाहेरच्या बाजूला होते. त्यातल्या एका ओंडक्यावर सकाळच्या गार हवेत बसले की छान वाटायचे. समोरचा रस्ता दिसायचा. विद्यापीठात जाणारे विद्यार्थी, काही चालत तर काही बसला उभे राहिलेले दिसायचे. हिरव्यागार झाडीतून जांभळ्या व नारिंगी रंगांची 'कॅट' बस दिसायची. असा सर्व निसर्गरम्य देखावा पाहताना असे वाटायचे की या ओंडक्यावरून उठूच नये. या घराच्या भोवती जी उंच उंच झाडे होती त्यामुळे कायम सावली असायची. पानगळीमध्ये पूर्ण अपार्टमेंटच्या सभोवताली रंगीबेरंगी पानांचा मोठा ढिगारा साठायचा. त्यावरून कोणी चालत आले की सळसळ असा आवाज यायचा. हिवाळ्यामध्ये सकाळच्या कोवळ्या उन्हात ओंडक्यावर बसले की कोवळ्या उन्हाची तिरीप पर्णहीन झाडांतून यायची.





आमच्या शेजारी एक अमेरिकी विद्यार्थी राहायचा. फावल्या वेळात तो 'कॅट' बस चालवायचा. आमचे बसने नेहमी येणे जाणे असल्याने ओळखीचा झाला होता. घरी असला की तो ओसरीवर एक खुर्ची टाकून बसलेला असायचा. एकदा मी त्याच्या घरी सहज म्हणून भजी द्यायला गेले आणि सांगितले ही खाऊन बघ तुला कदाचित आवडतील. त्याच्या घरात मी प्रथमच जात होते. तो क्वचितच घरी असायचा. त्याच्या घरी गेले आणि बघतच राहिले. तो एकटा राहत होता तरी त्याच्या घरी सर्व सामान होते आणि तेही एकाच खोलीत. त्याच्याकडे सोफा होता, शिवाय टेबल, खुर्ची, पलंग, डायनिंग टेबल व त्याच्या चार खुर्च्या होत्या. मोठा टीव्ही व त्याखाली एक छोटे कपाटही होते. सर्व सामान असूनही टापटीप ठेवलेली ही खोली मला खूपच आवडली. आतापर्यंत आमच्याकडे असलेले थोडे सामान एका खोलीत कसे काय बसवायचे या चिंतेत होते आणि इथे तर सर्व सामान होते. आता मला आमच्या खोलीत सर्व काही असावे असे वाटू लागले. आमच्याकडे असलेल्या आरामदायी खुर्चीत बसून मी विचार करायला लागले. सोफा, टेबलखुर्च्या, जेवणाचे टेबल, पलंग, कुठे बसेल व कसे बसेल, विकत आणावे की नकोच अशी विचारचक्रे सुरू झाली. बसल्या बसल्या सर्व फर्निचर असलेले कल्पनाचित्र रंगवू लागले. परत वाटायचे नकोच काही, आहे ते सर्व काही व्यवस्थित आणि छान लागले आहे. एकाच खोलीत राहायचे आणि ते सुद्धा दोन वर्षाकरताच म्हणून आम्हाला जास्तीचे सामान घ्यायला नको असे वाटत होते. खूपच गिचमीड होईल म्हणून साधा डेस्कटॉपही घेण्याच्या विचारात नव्हतो. पण म्हणतात ना, निर्जीव वस्तूचेही ऋणानुबंध असतात! काही दिवसांनी आमच्या शेजारी राहणारा तो अमेरिकी राहते घर सोडून निघून चालला होता. त्याने आम्हाला सांगितले की तुम्हाला जे सामान हवे आहे ते घेऊन जा. त्यातले माझे जे काही आहे ते मी थोडेफार घेऊन जाणार आहे. बाकीचे सामान मित्रांनी दिले होते आणि तेही आता इथे राहत नाहीत. माझ्यात परत उत्साह संचारला व थोडाफार तरी बदल आपण आपल्या जागेत करूच म्हणून त्याच्याकडचे टेबल, व चार फोल्डिंगच्या खुर्च्या असलेले फोल्डिंग डायनिंग टेबल आणले. त्याच्याकडचे सामान आमच्याकडे हालविल्याने त्याचा भारही कमी झाला.







त्या अमेरिकन विद्यार्थ्याकडून सामान आणल्यावर परत सामानाची पुनर्रचना केली. ओट्याच्या बाजूला जेवणाचे टेबल ठेवले व पलंगाच्या दुसऱ्या बाजूला खिडकीशेजारी लाकडी टेबल ठेवले. टेबल आल्याने संगणक खरेदी करायचा ठरवला व खरेदी केला. पहिलावहिला डेस्कटॉप घरी आला. तारांची जुळवाजुळव झाली व संगणक सुरू झाला. आमचा संगणक यायला आणि मनोगत संकेतस्थळाची ओळख व्हायला एकच गाठ पडली. चार फोल्डिंग खुर्च्यांपैकी दोन खुर्च्या भिंतीमधला जो रिकामा कप्पा होता त्यात अगदी सहजपणे मावून गेल्या. दोन खुर्च्यांपैकी एक ह्या टेबलासमोर ठेवली व एक जेवणाच्या टेबलाशेजारी ठेवली. जेवणाच्या टेबलावर आमचा पहिलावहिला खरेदी केलेला रेडिओ कम टेपरेकॉर्डर पण दिमाखात बसला. संगणकावर म्युझिक इंडियावर हवी तितकी आणि हवी तशी गाणी ऐकणे सुरू झाले. झालेला स्वयंपाक डायनिंग टेबलावर झाकून ठेवून तिथेच ताट वाढून खुर्चीवर बसून जेवायला मजा यायला लागली. या चार फोल्डिंग खुर्च्या व दुसरी आरामदायी खुर्ची असल्याने मित्रमंडळींना गप्पा मारण्यासाठी बोलावू लागलो. अनेक जेवणावळी होऊ लागल्या. याच घरात होळीच्या दिवशी केलेला पुरणपोळीचा बेत गाजला. त्या दिवशी आम्ही दहा जण जेवायला बसलो होतो.





आणि एके दिवशी हे राहते घर सोडून जायची वेळ आली. साधारण दोन वर्षे या घरात आम्ही राहिलो. सामानाची बांधाबांध झाली. आमचे नसलेले फर्निचर मित्रमंडळींना देऊ केले. एकेक करत सर्व सामान हालले. निघण्याच्या दिवशी एका मैत्रिणीने आमच्या घरात शेवटची कॉफी केली. कॉफी घेताना रिकाम्या घराकडे बघवत नव्हते. डेस्कटॉप, टीव्ही व काही सामान कारमध्ये घातले आणि निघालो नव्या शहराकडे! कारमध्ये बसणार तितक्यात मी परत एकदा घराला पाहून घेते म्हणून शेवटचे डोळे भरून घराला पाहिले. एकेक करत सर्व आठवत होते आणि टचकन डोळ्यात पाणी आले. घराची किल्ली मैत्रिणीला दिली आणि सांगितले की अपार्टमेंटच्या ऑफीसमध्ये नेऊन दे. तिला टाटा केले. नव्या शहराच्या वाटेवर या घरात घडलेल्या गोष्टींची सारखी आठवण येत राहिली.





अजूनही जेव्हा जेव्हा मला त्या घराची आठवण होते तेव्हा तेव्हा नकळत मी गुणगुणायला लागते "खेड्यामधले घर कौलारू, घर कौलारू!! " या घरामध्ये आम्हाला का यायला लागले ते पुढील दुव्यावर वाचा.ते तीन महिने!

हा माझा लेख मनोगत दिवाळी अंक २०१२ मध्ये प्रकाशित झाला आहे.

 

6 comments:

Yashwant Palkar said...

khup awadala lekh .....
aamhalahi kahi diwasanantar as sar karayach ahe pharak evadhach aahe ki sar kahi ready aahe pan gruhmantryanchi uneev aave
aamachya gruhmantri aalya ki aamachya gharala pan ghar pan yeil. :)

Panchtarankit said...

आपण लावलेले घर आपणच विस्कटून
जेव्हा दुसरीकडे स्थलांतरीत होतो तेव्हा चुना मातीचे रिकामे घर पाहून मन दाटून येते.
लंडन , अबुधाबी , कलोन , फ्रांक फ्रुट अशी भटकंती केल्यामुळे तुमच्या भावना समजू शकतो.

Vidya Bhutkar said...

Hi Rohini,
Really nice post. No dramatic words or emotions,expressions. But it explains everything so well. I liked it very much. I remembered our days in first apartment in Chicago. It wasnt studio, but the experience was the same.

rohinivinayak said...

Ninad, vidya,, thank so much for your compliments ! chhan vatle,, tumche hi thodephar asech anubhav aahet he vachun khup chhan vatle, thanks to all...

Anonymous said...

Hi Rohini, osari varchya pavsache ani ala ghatlelya chahache varnan tasech kholit padade band karun duparcha prakash andhuk zalela ani bell wajli he sarva agadi tantotant mala hi athavate kadhi na kadhi kelyasarkhe ani awadte suddha . baki kai mhantes baryach divasat phone nahi kelas
-pallavi

rohinivinayak said...

hii pallavi, thanks for comment ! mi majet, tula ekada karin phone, tu busy astes na tyamule vatate ki karava ki karu naye,, tu free aslis ki tuhi karat jaa phone mala, khup door gelis na :(..aso.