Saturday, September 20, 2008

अमेरिकेत पाऊल पडल्यावर...छोट्या बंगल्यातला आतील भागप्राध्यापकांचा बंगलाया छोट्या बंगल्यात आमची राहण्याची तात्पुरती सोय झाली होती.बंगल्यासमोरी तळे जिथे मी उभी राहून लाटांकडे बघत रहायचे.
अमेरिकेतल्या डॅलस विमानतळावर विनायकचे प्राध्यापक ऍलन आम्हाला न्यायला आले होते. हस्तांदोलन करून अवाढव्य बॅगांसकट आम्ही त्यांच्या कारमध्ये बसलो. प्राध्यापक खूपच बोलके होते. त्यांच्या व विनायकच्या गप्पा सुरू होत्या. मी मात्र मागच्या सीटवर बसून "कुठून आलो या परक्या देशामध्ये!! " असा अवस्थेत होते. कार डेंटन शहरकडे धावत होती.


त्यांच्या घरी आल्यावर त्यांची चिनी बायको नॅन्सी हिने सहतमुखाने आमचे स्वागत केले. त्यांच्या बंगल्याशेजारीच एक छोटा बंगला आहे तिथे आमची राहण्याची व्यवस्था झाली. नॅन्सीने आम्हाला कुठे काय ठेवले आहे हे सांगितले आणि थोडी विश्रांती घेऊन जेवायला या असे सांगितले.


दुसऱ्या दिवशी प्राध्यापकांबरोबर विनायक सकाळी ८ लाच न्याहरी करून विद्यापीठात गेला. आता फक्त मी व नॅन्सी. नॅन्सी खूप बोलकी होती त्यामुळे मला खूपच बरे वाटले. त्यांच्या शेजारचा बंगला थोडे दिवस का होईना आमचा होता! तिने मला फ्रीजमध्ये काय काय आहे हे सांगितले आणि ते संपले की मला सांगा म्हणजे मी तुम्हाला ते आणून देईन. फ्रीजमध्ये nonfat milk, no sugar added ice cream, apple juice , orange juice होते आणि शिवाय बाहेर ओट्यावर चहा, साखर, कॉफी हे पण होते.


आम्हाला आमचे अपार्टमेंट मिळेपर्यंत आमचा दिनक्रम ठरलेला होता. सकाळी ८ ला न्याहरी व रात्री ऍलन व विनायक आले की ८ ला जेवण. मला तसा एकटेपणा आला नाही, पण दिवसभर करणार काय? कारण की स्वयंपाक नाही, धुणेभांडी नाहीत, दूरदर्शनवर बघावे तर तिच्याकडे ठराविकच चॅनल्स होते. काही मासिके होती वाचायला. भूक तर सारखी लागलेलीच असायची कारण न्याहरीला कोक, ज्युस, ब्रेड आणि जेवायला उकडलेले कणीस, बिनाचवीचे उकडलेले नूडल्स इतकेच.


दुपारी नॅन्सीला भूकच लागायची नाही, शेवटी भुकेने हैराण होऊन मीच तिला तिच्या बंगल्यात विचारायला जायचे की आपण जेवायचे का? हळूहळू मी नॅन्सीशी बोलू लागले. तिला सांगितले की तुझा बंगला खूप छान आहे मला आवडला, मी तुझ्या बागेला पाणी घालते, मला बागकाम करायला खूप आवडते असे म्हणल्यावर ती खूप खुश झाली आणि खूप गप्पाही मारू लागली. तिने मला विचारले की तुझे घर कुठे आहे, तुला इथे बोअर होते का?, तुझे आई वडील कुठे असतात, अशा एक ना अनेक गप्पा!! रोज कुठे ना कुठे मला बाहेर घेऊन जायची. शिवाय आमच्या अपार्टमेंटच्या शोधात पण आम्ही बाहेर पडायचो.


नॅन्सी जरी गपिष्ट होती आणि मला तिने कधी एकटी पडू दिले नाही तरी काही वेळा ती तिच्या वैयक्तिक कामाकरता बाहेर पडायची तेव्हा तर मला खूप एकटेपणा जाणवायचा. त्यावेळेला मी घरात रहायचे नाही. त्यांच्या घरासमोर एक भलेमोठे तळे होते, त्या तळ्याच्या काठावर मी उभी रहायचे. लाटांकडे बघायचे. त्या लाटांकडे बघता बघता मला भारतातल्या सर्वांची इतकी काही आठवण यायची की गदगदून रडू फुटायचे. लाटांना डोळ्यात साठवत रहायचे. शून्यात नजर लावून त्या लाटांकडे बघायचे , जणू काही मी त्या लाटांशी बोलायचे. त्या तळ्याला मी अजूनही विसरणे शक्य नाही.


भारतातून अमेरिकेत येण्या आधी धावपळ, गडबड यामुळे प्रचंड दमणूक झाली होती आणि इथे आल्यावर एकदम शांतता, स्वच्छ हवा व भरपूर वेळ!! ऐसपैस पलंगावर पडून ढाराढूर झोपावेसे वाटत होते पण झोप काही केल्या येत नव्हती. एक तर त्या बंगल्याच्या दारावर बेल नसल्यामुळे नॅन्सी आली आणि तिने दारावर 'टकटक' केले तर ते आपल्याला ऐकू येईल का? या भीतीने झोप यायची नाही आणि डोळे मिटले की मुंबईतली गर्दी आणि आईबाबांचे चेहरे दिसायचे. इतक्या मोठ्या बंगल्यात अजिबात करमायचे नाही. एकदा तळ्यावर चक्कर, एकदा बागेत झाडांना पाणी घालणे, एकदा नॅन्सी काय करते हे बघायला तिच्या दारावर टकटक. हे सर्व करून घरी परत आले की माझा मलाच खूप राग यायचा. कितीही काही केले तरी वेळ पटापट का जात नाहीये आणि एकदम मला आठवण झाली " की अरे आपण कॅमेरा आणला आहे की!! " मग मात्र वेळ कसा घालवायचा हा प्रश्न मिटला. मग काय नुसते खटाखट फोटो काढत राहिले. फूल दिसले, काढ फोटो! पान दिसले काढ फोटो!आम्ही ज्या छोट्या बंगल्यात राहत होतो तिथे फोन दिसत होता, पण विचारायचे कसे ना की आम्हाला घरी बोलायचे आहे म्हणून. ईमेलने खुशाली कळवली होती पण प्रत्यक्ष बोलणे वेगळेच असते ना! दिवस खूपच संथ गतीने जात होते. त्या रिकामटेकड्या वेळामध्ये मी सासू सासरे व आईबाबा यांना सविस्तर पत्रे लिहिली. नुसती पत्रेच लिहिली नाहीत तर त्या पत्राची पारायणे केली. कल्पना केली, आपल्या आईच्या दारात माझे पत्र पडेल. मग आई ते उचलून बाबांना म्हणेल, बर का हो! आपल्या रोह्याचे पत्र आले आहे. मग बाबा म्हणतील, हो का! काय म्हणतेय?! मग दोघे मिळून माझे पत्र वाचतील व त्यांच्या चेहऱ्यावरचे उमटलेले भाव मला इतक्या हजारो मैल दूर राहून पण पोहोचतील. नॅन्सीला सांगितले की मला पत्र पोस्ट करायची आहेत. ती म्हणाली की ती चीनमध्ये राहणाऱ्या तिच्या आईवडिलांना पत्र लिहीते. तिला तिच्या मातृभाषेत पत्र लिहायला आवडतात. मनात म्हणाले की ही अगदी माझ्यासारखीच दिसते. मला पण मराठीतून पत्र लिहायला खूपच आवडते!


संध्याकाळी ८ ला ऍलन व विनायक घरी आले की लगेचच जेवण! जेवणाच्या वेळेस मात्र आमच्या चोघांच्या गप्पा खूप रंगायच्या. त्यातून ऍलन यांच्याकडे Indian Post-Doc असल्याने त्याला बऱ्यापैकी भारतीय खाद्यपदार्थांची माहिती होती आणि चक्क त्याला डोसा प्रिय होता. मला विचारले तुला डोसा येतो का? मी आनंदाने हो येतो की!! लगेच नॅन्सीने मला विचारले की डोसा कसा करायचा ते सांग, त्यासाठी काय काय लागते वगैरे. तिच्याकडे चक्क तांदुळ व काही डाळी होत्या, काही भारतीय मसाले पण होते! तिला रेसिपी सांगितली. डोश्याची लांबलचक रेसिपी तिला आवडलेली नसावी, तिचा चेहराच सांगत होता. डाळ तांदुळ भिजले, पण ते १०-१२ तासानंतर वाटले गेले नाहीत. दुसऱ्या दिवशी सकाळी वाटले गेले. तात्पुरते त्यातले पाणी काढून फ्रीजमध्ये ठेवले. डाळ तांदुळ वाटून १०-१२ तासांनी ते फसफसले पण! मग म्हणाली की उद्या करायचे का डोसे? परत पीठाची रवानगी फ्रीजमध्ये! शेवटी एकदाचे तिसऱ्या दिवशी ते डोसे झाले. खरे तर तांदुळाची धिरडीच लागत होती, कारण ज्या प्रमाणात उडीद डाळ पाहिजे त्याप्रमाणात ती नव्हती. ऍलन यांनी मात्र आवडीने डोसे खाल्ले. उकडून बटाट्याची भाजी पण केली होती. त्यांनी ती भाजी डोश्यामध्ये घातली. त्याचा सँडविच सारखा चौकोनी आकार केला व आपण सँडविच कसे खातो त्याप्रमाने त्यांनी डोसे खाल्ले. नॅन्सीला मात्र डोसे आवडले नाहीत.५-६ दिवसांनी आमचे अपार्टमेंट फिक्स झाले. एक दिवस त्या दोघांनी आम्हाला भारतीय उपहारगृहात जेवण दिले. काही जरूरीच्या गोष्टी घेण्यासाठी आम्ही काही दुकानातून हिंडलो. एक दिवस त्या दोघांनी आम्हाला परत सर्व सामानासकट पोहोचते केले. अच्छा बाय बाय टाटा करत त्यांनी आमचा निरोप घेतला. साधारण आठवडाभर आम्ही त्यांच्याकडे होतो. अमेरिकेतला हा अनुभव खूपच वेगळा होता आणि संस्मरणीय ठरला!!

7 comments:

Sanjeev Kulkarni said...

अरे वा! अमेरिकेत आणि चक्क आल्याआल्या डोसे?
परदेशात असे एकटेपण जाणवणे आणि तळ्याच्या काठी लाटा पहात बसणे हे पटून गेले. हजारो मैल लांब असलेल्या जिवलगांची आठवण होऊन भरुन आले....
लेख सोपा आणि मनापासून लिहिलेला आहे. आवडला.

rohinivinayak said...

Thank you so much sanjop rao!!

manasi said...

Rohini, aga tuza lekh wachoon mala maaze suruwatiche diwas aathawle,aata mala ek warsha hot aale ithe yewoon.Mala ajoonahi radoo yete,gharchya aathawanine,jeev kasa nusa howoon jato.Mala tuzya description madhali tu spashta dolyan samor disat hotis.Khoop suder lihites .....asheech lihit raha.
-Manasi.

rohinivinayak said...

Hi Manasi, tuza abhipray vachun khupch chhan vatle!! Thank you so much!!

Photographer Pappu!!! said...

छान लिहिलाय. तुमची उरलेली पोस्ट्स ही लवकरच वाचेन :)

rohinivinayak said...

Thanks photographer pappu ! bakichi post jaroor vacha n kase vatle tehi sanga. thanks for comment!

माऊ said...

खुप छान लिहीले आहेस ग रोहिणी,मस्त एकदम.