Friday, January 19, 2024

१९ जानेवारी २०२४

 

२०२४ वर्षातल्या रोजनिशीतले हे पहिले पान. जरा काहीतरी वेगळे घडले तर त्या दिवसाचे मी लिहिते. २०११ सालापासून मी रोजनिशी लिहीत आहे. वर्षातून काही थोडी पाने लिहिली जातात. नंतर वाचताना मजा येते आणि हासूही येते की अरे या दिवशी मी अमुक तमुक केले होते तर ! एक प्रकारचा विरंगुळा. तर आजचा दिवस खास असा नाही गेला पण तरीही थोडे वेगळे केले. एक तर हिमवृष्टी झाली. पूर्वीचे स्नो डे मी जास्त छान साजरे करायचे आणि बरेच काही केले जायचे. बाहेर थोडावेळ का होईना फिरून येतेच मी.


काल रात्रभर मला झोप नाही. पहाटे ४ ला लागली ते थेट १० ला उठले. विनायक ऑफीसला जाताना सांगून गेला तेही मी ऐकले नाही. खूप गाढ झोप लागली होती. झोप न लागण्याचे कारण असे काहीच नसते. मला झोपेचा प्रोब्लेम अजिबात नाहीये. पण काही वेळा लागता लागत नाही. झोप लागली नाही तर मध्यरात्री उठून मी काहीतरी खात असते. तर काल पहाटे ३ वाजता चुरमुऱ्यांचा चिवडा खाल्ला. सकाळी उठल्यावर मला मळमळायला लागले. त्यातून बाहेर सूर्यदर्शन नाही. प्रचंड थंडी आणि हिमवृष्टी मुळे सगळीकडे पांढरे शुभ्र झालेले ! बर्फाकडे पाहून डोळे दीपतात.


खरे तर रात्री पोळी न खाता भाजी उरेल म्हणून त्याबरोबर भात खाल्ला होता. कालच्या अडीच पोळ्या शिल्लक होत्या. त्या पोळीचे मी गूळ तूप घालून लाडू बनवले. तेच आजचे जेवण. १० लाडू बनले. आज मला बरेच बरेच दिवसांनी सामोसे करायची हुक्की आली. ते खाताना मन प्रसन्न झाले. दुपारचा चहा झाला. स्नोच्या विडिओ क्लिप्स रेकॉर्ड केल्या. खरा तर आज इरादा होता १ मैल चालायचा पण चालले नाही. नुसती थंडी आणि स्नो असला तरी चालते पण बर्फासारखे गार बोचरे वारे सहन होत नाही. तरी सुद्धा आज विशेष वारे नव्हते पण मनाला आवर घातला. सामोसेची तयारी केली होती. त्याचे सामोसे बनवले. आता रात्री कालची चवळीची ऊसळ आहेच. फक्त भात टाकायचा. सामोसे आज आणि उद्यालाही थोडे होतील. मी अमेझॉनवर काही ऑर्डर केले आहे ते उद्या आणि परवा येईल. त्याची खूपच उत्सुकता आहे. Rohini Gore






 


No comments: