Tuesday, January 16, 2024

अघटित ....... (4) शेवटचा भाग

 

खाली लिहिलेली कथा ही पूर्णपणे काल्पनिक आहे. मला ही कथा आपोआप सुचली आहे विल्मिंग्टन मध्ये रहात होते तेव्हा २०१५ साली. आता ही कथा मी पूर्ण करणार आहे.

अघटित ....... (3) शेवटचा भाग
पेशंटचे नाव गाव काहीच माहिती नसल्याने मानसीचे नाव रुही ठेवतात. डॉक्टर तिला तपासायला आल्यावर विचारतात कशी आहे रुही? नर्स म्हणते अजून काहीही हालचाल नाही. फक्त श्वास चालू आहे. हेच तर खूप महत्वाचे आहे रिटा! हळूहळू ती पूर्णपणे शुद्धीत येईल. मला माझे मन सांगते आहे. काही दिवसानंतर रुहीमध्ये थोडे थोडे बदल व्हायला लागतात. काही वेळा ती डोळे उघडते. इकडे तिकडे बघत राहते. रिटा ही त्या हॉस्पिटल मधली एक भारतीय तरूणी असते. तिनेच रुही असे नामकरण केलेले असते. आता रुही थोडे थोडे पेय घ्यायला सुरवात करते. तिच्या डोळ्यात मात्र कोणतेही भाव नसतात. रिटा तिच्याशी बोलत रहाते पण त्याचा काहीही उपयोग होत नाही. रिटा त्या दिवशी रात्रपाळीवर असते. तिला मध्यरात्री थोडी डुलकी लागते. तिला खूप मोठा किंचाळण्याचा आवाज येतो आणि ती उठते आणि रुही जवळ जाते. तिथले कर्मचारी गोळा होतात. थोड्याच वेळात डॉक्टर येतात आणि तिला झोपेचे इंजेक्शन देतात. रुही गाढ झोपी जाते. डॉक्टर म्हणतात ती जोरात ओरडली ही चांगली गोष्ट झाली. तिला आता थोडे थोडे आठवायला लागेल. रिटा, आता तू फक्त रुहीचीच काळजी घ्यायची आहे. या पेशंटला बरे करण्याचे काम आता मी तुझ्यावर सोपवत आहे. त्याबदल्यात हॉस्पिटल तुला योग्य तो मोबदला देईलच. रिटा म्हणते मला जास्तीचा मोबदला नको डॉक्टर. रूही पुर्ण बरी झाली की मला खूप बरे वाटणार आहे. रूही शुद्धीत आली की तिला कसे बोलते करायचे हे रिटाला माहीत आहे. 
 
 
मानसीच्या खिशात तिला एक कीचेन मिळते. शिवाय एक कार्ड. ते बहुधा हॉटेलचे असावे असा तिचा अंदाज आहे. मुख्य म्हणजे तिच्या गळ्यातले नाजूक मंगळसूत्र रुहीला बोलते करायला नक्कीच मदत करेल असा रिटाचा विश्वास आहे. एके दिवशी रुही झोपेतून जागी होते तेव्हा तिला रिटा दिसते. तिच्याकडे पाहून ती स्मितहास्य करते. रिटा म्हणते कशी आहेस तू रूही? तुझे नामकरण मी रूही केले आहे. मला तुझे नाव माहिती नाही. ते तू सांगणार आहेस. मी मानसी. रुही उत्तर देते. पण मी तुला रुहीच म्हणणार बरं का? काय पाहिजे तुला चहा, कॉफी, ब्रेड की ज्युस आणि कुकीज? "चहा दे" रिटा तिला चहा आणि कुकीज देते. तिच्या जेवणामध्ये तिला सलाड, ब्रेड, ज्युस, फळे असे देत असतात. रिटा तिच्याशी रोज काही ना काही बोलत रहाते. प्रश्नाला उत्तर इतकेच रूहीचे बोलणे असते. डॉक्टर येतात आणि विचारतात कशा आहात रूही मॅडम? तुमचे खरे नाव मानसी आहे ते कळाले आम्हाला आज. रूही स्मितहास्य करते. हळूहळू मानसीच्या तब्येतीत सुधारणा दिसते पण तिला काय आठवत आहे काय आठवत नाही याचा काहीच पत्ता लागत नाही. रिटा डॉक्टरांना सांगते आज मी तिला तिच्या खिशात मिळालेल्या वस्तू दाखवणार आणि मंगळसूत्र दाखवले की हिला नकीच सर्व आठवेल अशी माझी खात्री आहे. 
 
 
तो दिवस उजाडतो. गप्पा मारता मारता रिटा मानसीला कीचेन, कार्ड दाखवते. आम्हाला तुझ्या खिशात हे मिळाले. कीचेन आणि कार्ड बघितल्यावर तिचा चेहरा बदलतो. तिला काहीतरी आठवत आहे आणि तिला त्याचा त्रास होत आहे ते रिटाला कळते. रूही तू आठवण्याचा प्रयत्न कर. तुला नक्की आठवेल. कीचेन मध्ये अडकवलेला गणपती पाहून ती ढसढसा रडायला लागते. रिटा म्हणते आज तुला झोपेचे इंजेक्शन देते पण हे शेवटचे हं. तुझी तब्येत आता सुधारत आहे. रिटा हिंदीतून बोलत असते त्यामुळे मानसीला कळते ही भारतीय आहे. आपण इथे कसे आलो, का आलो, मला काय झाले आहे हे ती आठवायचा प्रयत्न करत असते. तिला काही काही आठवत असते पण त्या गोष्टींचा तिला क्रम लावता येत नाही. तिला आठवून रडूही फुटत असते. 
 
 
आणि एके दिवशी टिव्हीवर बातम्या चालू असतात. एक वादळ आलेले असते आणि त्यात समुद्र, त्याच्या लाटा, पाऊस असे दाखवत असताना ती जोरात ओरडते. अमित, अमित तू कुठे आहेस? रिटा म्हणते काय झाले. हा अमित कोण? ती उत्तरते माझा नवरा. ती लगेचच तिचे छोटे मंगळसूत्र काढून तिला दाखवते आणि तिला आता लख्ख सगळे आठवायला लागते आणि ती ओक्साबोक्शी रडायला लागते. रिटा तिला जवळ घेते. मानसी तू घाबरू नकोस. मी तुला हवी ती सर्व मदत करणार आहे. हळूहळू मला सर्व जे आठवेल ते सांग. रिटा तिला सर्व सांगते आणि तिला म्हणते आता मी काय करू? कुठे जाऊ? हे कोणते शहर आहे? माझ्या डोक्यात काय चालू आहे ते माझे मलाच कळत नाहीये. अमित कुठाय? मी कशी वाचले? तितक्यात डॉक्टर येतात. मानसीला तपासतात. तिला सांगतात काळजी करू नकोस. आम्ही तुला सर्व प्रकारची मदत करणार आहोत. आता व्यवस्थित दोन वेळा जेवायचे. औषध घ्यायची. टॉनिक घ्यायचे आणि ठणठणीत बरे व्हायचे आहे. नंतर जी जेवून झोपते. रिटा म्हणते मी इथेच आहे तुझ्याजवळ. काही लागले तर मला सांग. त्या दिवशी रात्री ती तिचे मंगळसूत्र घालून झोपते. बराच वेळ तिला झोप येत नाही. अमितचा चेहरा सतत समोर येत असतो. तिला तो भयानक प्रसंगही आठवत असतो. 
 
 
मानसीला रिटाचा खूप आधार वाटतो. ती पूर्णपणे शुद्धीत येते. रिटाला ती तिच्या घरचा सविस्तर पत्ता सांगते. शिवाय अमितचा फोन नंबरही देते. डॉक्टर येऊन मानसीला तपासून जातात. तुमची तब्येत चांगली आहे. सर्व काही व्यवस्थित आहे. तुमच्या शरीरावर आणि मनावर झालेल्या जखमा कालांतराने पूर्णपणे बऱ्या होतील असे आश्वासनही डॉक्टर देतात. रिटा अमितला फोन करते. फोन आंन्सरिंग मशीनवर जातो. तिथे ती सविस्तर निरोप ठेवते. काही वेळातच अमितचा फोन येतो आणि त्याचे आधी रिटाशी व नंतर मानसीशी बोलणे होते. अमित म्हणतो मी उद्या सकाळी लवकरच तुला घ्यायला येतो. तु ज्या हॉस्पिटल मध्ये आहेस ते आपल्या घराच्या २ तासांच्या ड्राईव्ह वर आहे. हॉस्पिटलमधून निघण्याचा दिवस उजाडतो. रिटा तिचे सर्व काही आवरून देते. शिवाय तिला नवीन ड्रेसही घेऊन देते. अमित येतो. डॉक्टरांचे व रिटाचे तो खूप आभार मानतो. हॉस्पिटलचे बिलही भरतो. आणि ते दोघेही कारमध्ये बसतात. रिटा मानसीला एक भेटवस्तू देते आणि म्हणते घरी गेलीस की भेटवस्तू पाहा. तुला नक्कीच आवडेल. डॉक्टरांकडून अमितला रिटा बद्दल कळते. रिटाने आपल्या बायकोची खूप काळजी घेतली होती त्यामुळे अमित रिटाला एका पाकिटातून पैसे घालून देतो आणि म्हणतो याला नाही म्हणू नका. तुमच्यामुळे मानसी मला मिळाली आहे. अमित मानसी कारमध्ये बसतात आणि घरी आल्यावर मानसी ढसाढसा रडायला लागते. अमित म्हणतो खूप रडून घे आणि मोकळी हो.
 
 
त्या दिवशी मी जागा झालो आणि तू माझ्या शेजारी नव्हतीस. सगळीकडे शोधले तुला. वेड्यासारखा सर्वांना विचारत राहिलो. होटेल सोडण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. ९११ ला फोन करणार होतो पण वाटले नको. नसते लचांड मागे लागेल. मी घरी आल्यावर माझी काय अवस्था झाली होती ते मला शब्दात नाही सांगता येणार. मित्रांना सल्ला विचारला. मी तुझी रितसर मिसिंग कंप्लेंट नोंदवली. २ ते ३ वेळा आपण उतरलो होतो त्या होटेल मध्ये आलो. त्यांना तुझा फोटो दिला आणि इथल्या सर्व होटेलमध्ये तो द्या आणि माझी बायको कुठे दिसली तर सांगा असेही सांगितले. होटेलचा मॅनेजर म्हणाला मी शक्य तितके प्रयत्न करीन. मी माझ्या ऑफीसच्या कामात स्वत:ला झोकून दिले होते. घरी मी फक्त झोपायला यायचो. तुझ्या व माझ्या आईवडिलांना कळवले तेव्हा त्यांना खूप मोठा धक्का बसला आहे. ते सर्व इथे यायला निघाले होते. 
 
मानसी म्हणते माझे नशिब खूप बलवत्तर म्हणून मी वाचले आणि खरे सांगू का? मला देवाने वाचवले आहे. माझ्या पॅंटच्या खिशात आपल्या घराची माझ्याजवळ असलेली दुसरी चावी होती. यात गणपतीचा फोटो मी चावीत अडकवून ठेवला होता. तुला आठवत आहे का? आपल्याला दोघांनाही गणपतीची छोटी फ्रेम आवडली होती ते ! मला रिटाने सांगितले की समुद्राला भरती होती म्हणून मी वाचले. लाटांनी मला जसे आत खेचले होते तसेच मला बाहेरही फेकले होते. मी वाळूत निपचित पडले होते. बेशुद्ध होते. समुद्रकिनारी रहात असलेल्या एका जोडप्याने मला घरी नेले. नंतर एका दवाखान्यात नेले. तिथून मला मी आत्ता असलेल्या चांगल्या हॉस्पिटल मध्ये दाखल केले. त्या जोडप्याचे मी कसे आभार मानु? अमित म्हणतो आपण त्यांचा शोध घेऊ आणि त्यांच्या घरी नक्की जाऊ. आता तू शांतपणे झोप. दोघेही कितीतरी वेळ बोलत बसतात.. त्या रात्री दोघांनाही निवांत झोप लागते. सकाळी मानसी उठते आणि आलं घालून चहा करते. घरात खूपच पसारा पडलेला असतो. एकेक करत ती सर्व गोष्टी जागेवर लावायला घेते. अमितही ऑफीसला जाण्यासाठी निघतो. अघटित घडते त्याला २ महिने उलटून गेलेले असतात.
समाप्त..... Copyright @ Rohini Gore

No comments: