पूर्वप्रकाशन - Marathi culture and festivals Digital Diwali ank 2024
सणासुदीचे दिवस
सणासुदीचे दिवस आले की माझे मन अजूनही माहेरच्या अंगणात जाते. अंगणात होणारा भोंडला आठवतो. तसेच दिवाळीत सडा घालून ठिपक्यांच्या रांगोळ्या आठवतात. आम्हा दोघी बहिणींच्या एकत्र झालेल्या मंगळागौरीचे रंगलेले खेळ आठवतात. दिवाळीच्या दिवसात रोज नवी रांगोळी असे. ठिपके सरळ सुबक आले पाहिजेत याकडे आम्हा दोघी बहिणींचे लक्ष असे. रांगोळीत रंग भरण्याकरता कोणत्या रंगांची रंगसंगती चांगली दिसेल याची चर्चा व्हायची. आमच्या घरापासून चतुश्रुंगीचे देऊळ जवळ होते. नवरात्रात तिथे जत्रा भरायची. जत्रेतली मजा तर असायचीच पण खास आठवण आहे ती दसऱ्याची ! पहाटे ४ ला उठून आईच्या व आमच्या मैत्रिणी असे सर्व मिळून चतुश्रुंगीचे दर्शन घ्यायचो. हवा स्वच्छ आणि सुंदर असायची. नवरात्रातली गर्दी ओसरलेली असायची. त्यामुळे देवीचे दर्शन खूप छान होत असे. तिथून आम्ही सर्वजणी जोगेश्वरीच्या दर्शनाला जायचो. तिथे काचेवर वर्ख असलेल्या बांगड्या भरल्या जात. दसऱ्याची अजून एक आठवण आहे ती माझ्या पहिल्या नोकरीची. मी एका कंपनीत रुजू झाले होते. तिथे वेगवेगळी डिपार्टमेंट होती. मी माझ्या डिपार्टमेंट मध्ये रांगोळी काढली. आम्ही सर्व एकमेकांकडे जाऊन भेटत होतो. सर्वांनी डिपार्टमेंट मधे असलेल्या टाईपराईटची पूजा केली होती. तसेच टेलिफोन बोर्ड, स्टेपलर्स, लेजर्स यांचीही पूजा केली होती. प्रसादाला पेढे आणि ओल्या नारळाच्या फोडी होत्या. काहींनी चिवडा वेफर्स बर्फी असेही आणले होते. आम्ही सर्व बायकांनी भरजरी साड्या नेसल्या होत्या. मी लाल रंगाची जरीवर्कची साडी नेसले होते.हरतालिका पूजन आईच्या मैत्रिणी व आम्ही सर्व मुली एकत्रच आमच्या घरी करायचो. रात्र जागवायचो. उपासाचे पदार्थ कोणी व काय करायचे ते ठरायचे. हरतालिकेची पूजा करून आम्ही सर्वजणी एकत्रच फराळ करायचो.नागपंचमीला आई आमच्या तळहातावर मेंदी फासायची. फासलेल्या मेंदीच्या मुठी करुन त्या आई एका फडक्याने बांधायची. सकाळी आमचे हात मेंदीने रंगायचे. मेंदी धुताना आई आमच्या तळहातावर थोड तेल घालायची. लालचुटुक रंगाने रंगलेले हात अजूनही आठवतात. दोन्ही पावलांच्या कडेने व बोटांवर आम्ही दोघी बहिणी मेंदी फासून ती वाळेपर्यंत पायऱ्यांवर बसून रहायचो. पावलावरची मेंदी रंगली की धुवायचो. नंतर नेलपेंटने नखे रंगवायचो. त्यादिवशी आम्ही आईने शिवलेले नवे फ्रॉक घालायचो. आई आमच्याकरता तुळशीबागेतून कानातले गळ्यातले आणायची खास नागपंचमीसाठी. नागपंचमीला गारूडी येत. एका टोपल्यात नाग असे. हे गारूडी घरोघरी जात असत. सर्वजणी नागोबाची पूजा करायचे. त्याला दूध प्यायला द्यायचे. दिवाळीचा फराळ आई मुबलक प्रमाणात करायची. त्यावेळेला दिवाळीचा फराळ ताटात घालून सर्वत्र दिला जाई. शेजारपाजारच्या घरातून फराळाची ताटे आली की त्यातला वेगळ्या चवीचा फराळ खायला खूप मौज वाटे !
मी पुण्यात रहात असताना आणि लग्नानंतर मुंबईत आले तेव्हा या सर्व सणांचा माहोल मी अनुभवला आहे. गणपती उत्सवात खाऊवाले पाटणकर यांचे माझ्या बाबांना पत्र यायचे की पेणवरून गणपतीच्या सुबक मूर्ती आल्या आहेत तेव्हा कोणती मूर्ती घ्यायची ते ठरवायला दुकानात या. आम्ही दोघी बहीणी बाबांबरोबर जायचो गणपतीची मूर्ती ठरवायला. गणपतीच्या मूर्तीचे पितांबर आणि शेला कोणत्या रंगाचा आहे ते पाहून आमच्या घरी येणारा गणपती निश्चित व्हायचा. बाबा आम्हा दोघी बहिणींकरता त्याच दुकानातून श्रीखंडाच्या, नारिंगी चंद्रकोरीच्या गोळ्या घ्यायचे. आणि गुलाबी रंगाची काजूकतली घ्यायचे. सर्व मूर्ती रेखिव आणि सुबक असायच्या. माझ्या माहेरी जाईचा वेल होता. जाई आम्हाला अगणित फुले द्यायची. गणपतीच्या मूर्तीला जाईचा हार, हारामध्ये मधोमध लालचुटुक जास्वंदीचे फूल असायचे. हरतालिकेच्या पूजेलाही घरातल्या बागेतली सर्व फुले आणि पत्री असत. दिवाळीत चांदणीचाच आकाशकंदील आम्हा सर्वांना पसंत असे. लग्न झाल्यावर आम्ही दोघे जरी डोंबिवलीत रहायचो तरी दरवर्षी पुण्याला सासरी गणपती करता जायचो. आम्हा गोरे कुटुंबाचे गणपती एकत्र व्हायचे. पुण्यात रहाणारे विनायकचे काका काकू बहीण भाऊ सर्व आमच्या घरी जमत. डोंबिवलीच्या फ्लॅटच्या दाराच्या समोर जिन्यालगतच्या चौकोनात मी रांगोळी काढून त्यात रंग भरायचे. त्या आधी गेरूने फरशी रंगवायचे. दारावरच्या एका हुकात आकाशकंदील लावला की त्याचा प्रकाश रांगोळीवर पडायचा. खूप छान वाटायचे. अंधेरीमध्ये कंपनीच्या क्वार्टर्स मध्ये रहायला गेलो तेव्हा तिथे रहाणाऱ्या सर्व जणांची एक दिवस एकत्र दिवाळी साजरी असायची. आम्ही तिथे २ वर्षेच राहिलो. दिवाळीत होणाऱ्या पॉटलक मध्ये मी एके वर्षी एकाच आकाराच्या ७० ते ८० पुऱ्या करून नेल्या होत्या. हा आकार मी पोळीवर वाटी ठेवून एका पोळीत ३ पुऱ्या अशा केल्या होत्या. त्यामुळे सर्व पुऱ्या एकसारख्या दिसत होत्या. दुसऱ्या वर्षी ७० ते ८० बटाटेवडे करून नेले होते. दिवाळी आली की पुण्यात आणि नंतर मुंबईत रस्त्यावर ठिकठिकाणी निरनिराळे आकाशकंदील झळकत असत. त्याशिवाय रांगोळ्या, पणत्या, विविध रंग असत. दुकानात साडी खरेदी करता गर्दीही असायची. ज्या घरी जावे त्या घरातली रांगोळी, कंदील पहाताना भान हारपून जायचे. गणपती, द्सरा, दिवाळी या सर्व सणांमध्ये किती विविधता आहे ! पुण्यात गणपती उत्सवात खास मजा असते ती दहाव्या दिवशी गणपती विसर्जनाच्या सामुहीक मिरवणूकीची. आमचे घर थोडे लांब होते म्हणून आम्ही गावात रहाणाऱ्या मामांकडे मिरवणूकीच्या आदल्या दिवशीच हजर राहायचो. मिरवणूकीत अल्का टॉकीज जवळ उभे रहायचो. मानाचे पहिले पाच गणपतींचे दर्शन घ्यायचो. ढोल-ताशे, लेझिम यांचा भला मोठा ताफा गणपतीच्या मूर्तीच्या समोर असायचा. गुलाल उधळून मानाच्या गणपतींचे स्वागत व्हायचे. लायटिंगचे गणपती मिरवणूकीत मध्यरात्री येत असत. पहाटेच्या अंधारात श्रीमंत दगडूशेठ हालवाई व मंडईतल्या गणपतीचे आगमन होई. त्यावेळी खूप शिस्त होती. साखळी पद्धतीने सर्व जण हातात हात घालून उभी असायची. मधोमध ढोल-ताशे. त्यांचा आवाज आसमंतात भरून जायचा. हृदयावर ढोल ताशांचे ठोके पडायचे तेव्हा गहिवरून यायचे.
जेव्हा आम्ही दोघे अमेरिकेत २००१ साली आलो तेव्हा सुरवातीला विनायकच्या संशोधना निमित्त ज्या दोन शहरात राहिलो तिथे भारतातल्या इतर राज्यात रहाणारे मित्रमंडळ जमा झाले होते. त्यामुळे मराठमोळ्या सणांची मला तीव्रतेने आठवण यायची. त्या शहरात एक मराठी ओळखीचा झाला तेव्हा मला खूप आनंद झाला. त्याला दसऱ्याला घरी जेवायला बोलावले. तसेच एकदा कोजागिरीला ओली भेळ आणि आटीव दूध केले होते. एकदा होळीला पुरणपोळीचा बेत करून सर्व अमराठी मित्रमंडळींना बोलावले होते. प्रत्येकाच्या पुरणपोळीवर मी घरी बनवलेले साजूक तूप वाढत होते. नंतर विनायकला नोकरी लागल्यावर विल्मिंग्टन शहरात आलो तिथे तर भारतीय मंडळी अजिबातच दिसायची नाही. सणांच्या दिवसांचा माहोल नाही. त्यामुळे कोणत्या दिवशी कोणता सण आहे हे पण कळायला मार्ग नाही. मग ठरवले आपण आपल्या घरातच सणासुदीचे वातावरण निर्माण करायचे. पूर्वी अमेरिकेतून भारतात फोन करायलाही खूप पैसे पडत. सुरवातीला कॉलिंग कार्डावरून फोन करणे खूप महाग होते. जेव्हा व्होनेज कंपनीचा फोन घेतला तेव्हापासून भारतात अगणित फोन करणे सुरू झाले. फोनवरून आईला रेसिपी विचारता येत. आईला फोनवरून सणांच्या तारखा विचारून घ्यायचे. एका भारतभेटीत मी तुळशीबागेतून पंचधातूचा गणपती आणला. कालनिर्णयही घेतले. नंतर त्या कालनिर्णयाचे मी एक वेगळे कॅलेंडर बनवले. तारखांच्या पुढे जे वार होते त्यावर एक कागद चिकटवला व त्यावर नंतरच्या वर्षीचे येणारे वार लिहिले आणि आईला विचारून त्या त्या वर्षीचे सणही तारखेच्या चौकोनात लिहिले. एका भारतभेटीत रांगोळी आणि रंग हौशीने आणले. ठिपके काढताना हात खूपच दुखून आला. ही हौस मी कागदावर पेनाने ठिपक्यांची रांगोळी काढून व त्यात स्केच पेनने वेगवेगळे रंग भरून भागवली.
भारतीय किराणामालाचे दुकान खूप दूर होते ! दिवाळीत फराळाला लागणारे साहित्यही मी आठवणीने यादी करून आणत होते. वाण सामानात गोटा खोबरे आणि पिठीसाखर आणायचे. त्यामुळे मला कोरड्या खोबऱ्याचे सारण करंजीत घालण्यासाठी करता येत असे. शिवाय मला गणपतीसाठी कोरडे खोबरे किसून त्यात पिठीसाखर घालून खिरापत करता यायची. इथे चकल्यांची भाजणी मिळत नसल्याने माझ्या एका मैत्रिणीने मला एक रेसिपी सांगितली. त्यानुसार मला कणिक आणि तांदुळाचे पीठ एकत्र करून चकल्याही करता आल्या !२००५ साली माझ्या पाककृती लेखनाची सुरवात मनोगत या मराठी संकेतस्थळावर झाली. त्यानंतर मी माझ्या "उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म" या रेसिपी ब्लॉगवर पाककृती लिहायला लागले. सोबत फोटोही अपलोड करायचे. मी रोज काही बनवायचे त्या सर्व पदार्थांची कृती मोजमापासकट लिहायचे. नंतर लक्षात आले की सर्व सणवाराचे पदार्थही लिहिले पाहिजेत. त्याप्रमाणे ठरवले की सण आला की त्या त्या गोड व तिखट पदार्थ्यांच्या कृती लिहायच्या व लेबले लावायची जसे की दिवाळी, गणपती इत्यादी. त्यात आंबे डाळ, पन्हे, वडे, घारगे, आणि इतरही पक्वनांच्या जसे की मोदक, बासुंदी, गुलाबजाम लिहीत गेले. विनायकचे ऑफीस घरापासून खूप जवळ होते. त्यामुळे तो रोज दुपारी घरी जेवायला यायचा. कालनिर्णय मध्ये ज्या वारी सण असेल तेव्हा मी सकाळी उठून स्वयंपाक करायचे. नैवेद्याकरता ताट सजवायचे. ताटातल्या डाव्या उजव्या बाजूचे सर्व पदार्थ करायचे. ओल्या नारळाची चटणी, कोशिंबीर, बटाटे उकडून त्याची भाजी, भजी, पुऱ्या, ज्या सणांना ठराविक गोड पदार्थ असतात ते पण करत होते. जसे की बासुंदी, पुरणपोळी, मोदक, गूळपोळी इत्यादी. एके वर्षी नैवेद्याच्या ताटात डाव्या बाजूला घरी केलेली कुरडई होती. मला विशेष आनंद झाला होता. मी एके वर्षीच्या उन्हाळ्यात बाल्कनीत येणाऱ्या उन्हात वाळत टाकायला एकेका वाटीचे पापड, कुरडई, फेण्या असे केले होते. नैवेद्याचे ताट सजवून त्याचा नैवेद्य दाखवून त्याचा फोटो काढला की विनायकला तेच ताट जेवणासाठी द्यायचे व मी पण माझे ताट वाढून जेवायचे. विल्मिंग्टनच्या घराचा ओटा सी आकाराचा होता. ओटाभर पसारा असायचा. स्वयंपाक करता करता भाज्या आणि फळांचे एका डीश मध्ये सजावट करायचे. गणपतीची छोट्या मूर्ती भोवती साजेशी आरासही करायचे. फुलांचा गुच्छ आणून त्यातली फुले देवाला वाहिली की उरलेल्या फुलांच्या पाकळ्यांचीही एका डीश मध्ये सजावट करत होते. ओटा आवरून, भांडी घासून ती डिश वॉशरला लावली की कॉटवर थोडी आडवी व्हायचे. सण साजरा केल्याचा आनंद व्हायचा. फेसबुकवर वर जे ग्रुप जॉईन केले होते तिथे काही पाककृतींची विचारणा झाली की मी लगेचच माझ्या ब्लॉगवरील कृतीची लिंक द्यायचे.
२००७ साली गुढीपाडव्याला मी घरी बनवलेल्या चक्याचे श्रीखंड केले होते ! घरी सर्व सण साजरे करताना मन मात्र भारतातल्या आठवणीत असायचे. विनायकचे ऑफीस जवळ असल्याने तो घरी जेवायला यायचा त्यामुळे जास्त छान वाटायचे. माझ्या हातून पाककृती लेखनही झाले. मी जेव्हा डिजिटल फोटोग्राफीला सुरवात केली तेव्हा पहिला फोटो गोडाचा शिऱ्याचा काढला होता.! तर असे हे सणासुदीचे दिवस आपल्या सर्वांनाच आनंद देतात ! या लेखनकार्यात सणवारांच्या विशेष पाककृती जमा झाल्या. आपले सण साजरे करताना आनंद देवून जातात. कितीतरी पदार्थ भारतात रहात असताना केले नव्हते ते इथे अमेरिकेत केले याचे माझे मलाच आश्चर्य वाटत आहे. या लेखाच्या निमित्ताने मी सर्व वाचक व लेखकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देते. ही दीपावली आपणा सर्वांना आनंदाची, भरभराटीची व उत्साहाची जावो !
Rohinigore