Saturday, March 31, 2012
गॅटलीनबर्ग
या लाँऽऽऽऽग वीकेंडचे काय करायचे?? तर घरी न बसता बोंबलत बाहेर भटकायचे! भारतात असताना असे मोठाले वीकेंड आले होते का कधी? आणि आले असले तर काय केले होते? अजिबातच आठवत नाहीये. इथे मात्र मोठाल्या सुट्टीत घरी बसणे ही एक भली मोठी शिक्षा आहे. कुठे जायचे? इथे की तिथे? नॉर्थ कॅरोलायना राज्यातिओल सर्व ठिकाणे पालथी घातली असल्याने उरले होते फक्त गॅटलीनबर्ग तेही माझ्या मुळेच. मला डोंगर दऱ्यातून प्रवास करताना भीती वाटते पण आता पर्याय उरला नव्हता. गुगलींग करताना ब्रायसन शहरात एक आगगाडीचे आकर्षण आहे ते म्हणजे डोंगर दऱ्यातून ही आगगाडी नागमोडी वळणे घेत जाते ती नानथाळा नदीपाशी विश्रांती घेऊन परत शहरात परत येते. गुगल शोध घेता घेता ब्रायसन शहरापासून गॅटलिनबर्ग तासाभराच्या अंतरावर आहे ते कळाले त्यामुळे विनायक म्हणाला इतके जवळ जात आहोत तर गॅटलीनबर्गही पाहू. माझे लगेच नकाशा बघणे, रस्ते कसे आहेत हे बघणे सुरू झाले. खरे तर रस्ता खतरनाक होता. नॉर्थ कॅरोलायना ब्रायसन शहरातून निघून मधल्या सर्व डोंगर दऱ्यांना छेद देणारा रस्ता ओलांडून टेनिसी राज्याच्या सीमारेषा ओलांडल्यावर गॅटलीनबर्ग मध्ये प्रवेश करणारा होता. मी तयार झाले कारण की रस्ता जरी खतरनाक असला तरी दिवसाउजेडी जाऊन पोहोचणार होतो आणि अवधी तासाभराचाच होता. तरीही माझ्या मनात भीती होतीच.
हॉटेल बुकींग, थोडे खाण्याचे पदार्थ व एक वेळची पोळी भाजी आणि बाकीचीही जय्यत तयारी घेऊन thanks giving च्या दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजता निघालो. या वेळी पोळी भाजी मध्ये वाटेत न खाता ती हॉटेलमध्ये खाण्याचे ठरवले. मधल्या वाटेत जेवणाच्या वेळी मेक्सीकन फूड किंवा पिझ्झा खाऊ असे ठरवले होते. महामार्ग ४० वेस्ट ग्रीन्सबोरोपर्यंतचा माहीती असला तरी पुढचा रस्ता नव्यानेच पाहणार होतो. ऍशव्हीलच्याही पुढे ७४ वेस्ट चा फाटा घेऊन त्यावरून ब्रायसन शहरात पोहोचणार होतो. ग्रीन्सबोरोनंतरचा रस्ता मात्र चांगलाच चढावरचा आणि डोंगराळ भागातला आहे. तीक्ष्ण नागमोडी रस्तेही नवीनच होते. ७४ वेस्ट रस्ताही तसा वळणावळणाचाच होता. वेस्टच्या दिशेने जात असल्याने सूर्य अगदी डोळ्यासमोर येत होता. अगदी टपून बसल्यासारखा सारखा सारखा येत होता ते चांगलेच जाणवत होते. त्याच्या प्रखरतेमुळे पुढच्या रस्त्याचे वळणही नीट कळत नव्हते. आठ तासाच्या प्रवासात खूपच दमायला झाले होते. डोंगराळ भागाची सवय नसल्याने डोकेही भणभणायला लागले होते. जशी संध्याकाळ जवळ येत चालली तसा सूर्याचा त्रास कमी झाला आणि हॉटेलमध्ये पोहोचता पोहोचता रात्रीचा अंधार झाला.
हॉटेलमध्ये बॅगा टाकल्या. हातपाय तोंड धुतले आणि बाहेरच्या विभागात काही पेय आहे का ते बघायला आलो. तर तिथे चक्क चहा मिळाला. चहा प्यायल्यावर चढलेले डोकेही थोडे उतरले. थंडी खूप होती तरीही बाहेर चालत चक्कर मारायचे ठरवले व बाहेर पडलो. चालायला फूटपाथ होते. आजुबाजूला उंच उंच डोंगर दिसत होते. हॉटेल डोंगरावर होते त्यामुळे फुटपाथवरून खाली चालत जायला उतारच उतार होता. हवा थंड असली तरी कोरडी होती. अशी हवा आम्हाला दोघांनाही खूप आवडते. कदाचित आमच्या दोघांचे जन्म व शिक्षण पुण्यातच झाले असल्याने कोरडी हवा आम्हाला मानवत असावी. चातताना खूप छान वाटत होते. एका चौकापाशी आल्यावर परत हॉटेलच्या रस्त्याकडे जायला मागे वळालो. आता चढणच चढण पण तरीही छान वाटत होते. मोकळी हवा शरीरात जात होती त्यामुळे उत्साह आला होता. हॉटेलमध्ये आल्यावर परत एकदा चहा घेतला. खरे तर गरम गरम इडली सांबार खावेसे वाटत होते पण ही इडली खाण्याची भूक सकाळी करून घेतलेल्या पोळी भाजीवरच भागवली. इथे कुठचे इडली न डोसे! झोपताना उद्याच्या जेवणाची उपहारगृहे नेटवर बघितली.
सकाळी उठल्यावर गरम गरम शॉवरखाली अंग शेकल्यावर परत बरे वाटले. झोप नीट लागत नाहीच पण गादीवर ८ तास अंग टेकल्याने पाठीलाही आराम मिळतो. आम्हाला इथल्या हॉटेलमध्ये मिळणारा नाश्ता अजिबातच आवडत नाही तरीही काहीतरी पोटात ढकलायचे म्हणूनच केवळ खातो. मला तर गोड अजिबात आवडत नाही त्यामुळे कमी खाल्ले जाते आणि नंतर भूकही लवकर लागते. उकडलेली अंडी व त्यावर मिरपूड व मीठ लावून खाल्ली त्यामुळे पोटाला थोडा आधार मिळाला. आगगाडीचा प्रवास जाऊन येऊन ४-५ तासाचा होता. ११ ला निघालो ते संध्याकाळी ५ ते ६ दरम्यान परत ब्रायसन शहरात आलो. गाडी डकाव डकावच चालली होती. तशीच ती जाणार होती त्यामुळेच तर आम्हाला आजुबाजूचा निसर्ग पाहता आला. आगगाडीत काहीही खायचे पदार्थ आणू नका असा नियम होता म्हणून काही फळे घेणार होतो तीही घेतली नाहीत. प्रवास छान झाला पण भुकेची पूर्णपणे वाट लागली! आगगाडीतले खाण्यापिण्याचे पदार्थ लवकर संपले. अर्थात ते आमच्या उपयोगाचे नव्हतेच पण जे काही थोडेफार होते तेही संपले होते. नानथाळा नदीपाशी तासभर गाडी थांबते तिथेही सर्व उपहारगृहे मोठ्ठी सुट्टी असल्याने बंद होती. भुकेनी खूप हैराण झालो होतो. नाही म्हणायला प्रवास चांगला झाला होता. नानथाळा नावाची नदी स्वच्छ, नितळ होती आणि उथळही होती. ती खूपच आवडून गेली. आगगाडीतून आजुबाजुला दिसणारी तळी आणि रस्ते छान दिसत होते. झाडे मात्र काटक्यांनीच भरली होती. काही तुरळक ठिकाणी हिरवीगार झाडे दिसत होती. त्या डोंगरामध्ये असणारी घरेही छान दिसत होती. सकाळी ९ वाजता जे काही थोडेफार खाल्ले होते त्यानंतर ८ ते ९ तासाने पिझ्झा खाण्यासाठी परत कारमध्ये बसलो. पिझ्झा हट जवळच होती. आदल्या दिवशीच खाण्याची ठिकाणे बघून ठेवल्याने पंचाईत झाली नाही.
पिझ्झा खाऊन थोडा बरोबरही घेतला आणि टेनिसीमधल्या गॅटलीनबर्गकडे जायला कार वळवली. अंधार पडत चालला होता आणि त्यातून दऱ्याडोंगरामधला रस्ता होता. जिपिएसनेही साथ देण्याचे नाकारले. गुगल मॅप होता त्यावरून रस्ता पार करत होतो. नॅशनल पार्कचा रस्ता असल्याने रस्ता खूपच छान होता. काळा कुळकुळीत आणि गुळगुळीतही! तुरळक का होईना वर्दळ दिसत होती म्हणूनच माझा जीव भांड्यात पडला. रस्त्यावरून जाताना थोडावेळ बाजूने नदी जात होती. त्याचा मंद खळखळाट ऐकू येत होता त्यामुळे सोबत असल्यासारखे वाटत होते. पुढे वळणावळणाचे रस्ते सुरू झाले. खूप अंधूक अंधूक का होईना पण दिसत होते आणि जाण्याचा अवधीही एक तासाचाच होता. मोठमोठाली झाडे, मोठाले कडे, कपाऱ्या अंधूक प्रकाशातही दिसत होते. खूप उंच उंच जात आहोते हे जाणवत होते आणि एके ठिआणी खूप ठप्प अंधार झाला आणि दोन वेगळे रस्त दिसले. एक डावीकडे व एक उजवीकडे, नक्की कुठे जायचे? उजवीकडे गेलो तर तिथे उंचावरून दरीतला देखावा बघण्याचा पॉईंट होता. बापरे! खूपच उंच आलो आहोत आपण! जवळ जवळ ६००० फूट उंच. पण इथे तर दोन चार गाड्या थांबलेल्या दिसतात. नक्की कुठे जायचे? असे म्हणत परत मुख्य रस्त्याला लागलो पण डावीकडे की उजवीकडे? असा विचार कर्तो न करतो तितक्यात गॅटलीनबर्ग उजवीकडे आहे असा बाण दिसला आणि उजवीकडे वळालो. आता मात्र खरी कसरत होती. अरुंद रस्ते आणि इथे वळणे तर काटकोनात होती. लगच्यालगेच होती. पुढे जातो न जातो तोच दुसरे काटकोनातले वळण. एका बाजूला उंच कडा दिसत होता. दुसरीकडे नक्कीच खोल दरी असणार. काळा कुट्ट अंधार! आणि पूर्णपणे उतार! मोठ्ठी सुट्टी असल्याने तुरळक का होईना वाहने दिसत होती म्हणजे अगदी नशिबानेच साथ दिल्यासारखी वाटत होती. एक सुद्धा वाहन दिसले नसते तर मात्र मला जामच भीती वाटली असती. आता फक्त पुढच्या रस्त्यावर नजर खिळवून पटापट रस्ता पार करणे हेच एक ध्येय होते. केव्हा येणार आता गॅटलीनबर्ग! वळणे तर अजून संपतच नाहीत! असे मनातल्या मनात पुतपुटत होते. थोड्यावेळाने खूप लांब थोडे दिवे लुकलुकताना दिसले तेव्हा जरा धीर आला आणि लगेचच एक पाटीही दिसली. ती पाटी म्हणजे वेलकम टु गॅटलीनबर्ग. रस्ता तासभराचा असला तरी ३-४ तासाचा प्रवास केल्यासार्खा शीण आला होता. हॉटेल सापडायलाही वेळ लागला पण तरीही डोळे सुखावत होते. आजुबाजूच्या फूटपाथवर माणसांचे लोंढेच्या लोंढे चालताना दिसत होते. एकापाठोपाठ एक कार असा भरगच्च ट्रॅफीक होता. सगळीकडे दुकानामधली रोषणाई झगमगत होती.
शेवटी एकदाचे हॉटेल सापडले. रूममध्ये सामान ठेवले. इथेही चहा होता. चहा प्यायला आणि गादीवर थोडेसे अंग टेकले. दिवसभराच्या उलट्या सुलट्या प्रवासाने खूपच दमायला झाले होते. पिझ्झा खाल्याने विशेष भूक नव्हती. गरम पाण्याने हातपाय तोंड धुतले आणि बाहेर पडून चालायला सुरवात केली. जेव्हा गॅटलीनबर्ग मध्ये शिरलो होतो तेव्हाच एक मेक्सीकन उपहारगृह बघितले होते. त्याचे नाव नेटवर टाकून शोध घेतला तर ते हॉटेलपासून लांब होते. विचार केला आता चालायला आणि फिरायलाच बाहेर पडलो आहोत तर येता येता सहज सापडले आणि दिसले तर जेवूनच येऊ. फिरत फिरत फुटपाथवरच्या गर्दीत शिरलो आणि खूपच तजेतवाने वाटले. रात्रभर त्या गर्दीतून चालतच बसावेसे वाटत होते. सर्व दुकाने उघडी होती. सगळीकडे झगमगाट होता. लहान मुले, म्हातारी कोतारी माणसे, तरूण तरूणी सर्व जण जणू काही आपल्याच बापाचा रस्ता आहे अशी चालत होती. बिनधास्त रस्ता क्रॉस करत होती. वाहने मात्र गर्दीला घाबरून हळुहळू धावत होती. फूटपाथवर बसायला अंतराअंतरावर बाकडीही होती. पुण्यातल्या लक्ष्मी रोडवरून फिरल्यासारखेच वाटत होते. एखाद्या दुकानात जावे, तिथे काय काय आहे ते बघावे आणि परत बाहेर पडावे असे करता करता ३ ते ४ तास चाललो. पाय दुखायला लागले. प्रचंड भूक लाग्ली. जातानाच मेक्सीकन उपहारगृह बघून ठेवले होते. परत येताना मेक्सीकन जेवण जेवलो व तिथून हॉटेलवर परतणार होतो पण परत मुख्य रस्त्याला मोर्चा वळवला व आयस्क्रीमच्या दुकानात शिरलो. फुटपाथवरच्या बाकड्यावर बसून आयस्क्रीम खाल्ल्ले. आता मात्र जास्त थंडी वाजायला लागली आणि थोडे गार वारेही वाहायला लागले. दुसऱ्या दिवशी लगेच परतीचा प्रवास होता म्हणून लगेच हॉटलेवर परतलो. येताना १२ वाजून गेले होते. गर्दी पाहून खूप उत्साह संचारला होता. खूप चालण्याने ताजेतवाने वाटत होते. पाय मात्र प्रचंद दुखत होते. दुसऱ्या दिवशी रोप वे पाहून निघणार होतो पण पार्किंगला जागा मिळणे अशक्य होते याची खात्री आदल्या दिवशीच्या गर्दीनेच दिली होती म्हणून सकाळचा हॉटेल मधला नाश्ता खाऊन १० च्या सुमारास परतीची वाट धरली. परतीचा प्रवासही निसर्गरम्य होता. झाडांच्या मात्र सगळीकडे काटक्याच दिसत होत्या. येताना पुढच्या फॉल सीझनमध्ये गॅटलीनबर्ग मध्ये येण्याचा विचार पक्का केला. वळणावळणाचे रस्ते सुरू झाले तरी कंटाळा आला नाही. मध्ये वाटेत जेवाणाला परत गरम गरम तिखट तिखट पिझ्झा खाल्याने पुढच्या प्रवासाला उत्साह आला आणि संध्याकाळच्या सुमारास घरी पोहोचलो. लाँऽऽऽऽग वीकेंड सार्थकी लागला होता तर!
हे आहे नोव्हेंबर २०११ मधले उशीराने लिहिलेले प्रवासवर्णन.
Subscribe to:
Post Comments (Atom)
2 comments:
Tumchya pravasache varnan vachun chaan vatle. Amhi pan tithe gelo hoto 2010 madhye anhi khup enjoy kele hote. Amhi ek cottage book keli hote, amchya barobar 2 couples ajun hote. Maala athavtay amhi pan eka mexican restaurant madhye gelo hoto, ekdum authentic hota te. Hotel madhye breakfast complimentary asun karach boring astat anhi almost saaglach goad asta - waffles, muffins, apple/orange juice, cereals...kantala yeto!Ekameva goad naslela padartha mhanjey ukadlela anda te pan ekdum gaar! tyanche biscuit-gravy-sausage tar apan khau shakat nahi tya mulay kharach kaay khaicha hyacha prashna padto!
- Priti
are vaa mastach,, tu pan geli hotis ka? tithe ajun 4-5 divas rahayla pahije tar national park vagere pahata yeil,, cottage pan mast asel na,, aani tithe kitchen chi pan soy aste na ga,,mexican res. ekdam authentic hote,, mast maja aali hoti aamhi gelo hoto tenvha,, thanks priti..
Post a Comment