फेबुवरच्या छंद नावाच्या ग्रूपवर थीम होती गृहव्यवस्थापन. मी लिहिणार नव्हते कारण मी बरीच घरे बदलली. विचार केला की भारतातल्या आणि अमेरिकेतल्या २ घरात मी सलग १० वर्ष राहिली आहे. अमेरिकेतल्या घराबद्दल लिहिले तर ते चित्र डोळ्यासमोर येणार नाही म्हणून भारतातल्या घराबद्दल लिहिले आणि माझा मलाच खूप आनंद झाला. अजून एक लक्षात आले की बाकी बरेच फोटो काढले पण कोणत्याही घराचे फोटो काढले नाहीत. कोणत्या तरी निमित्ताने काही ना काही लक्षात येते. मन भूतकाळात गेले आणि लेख लिहिला गेला. इथे शेअर करत आहे. ही थीमवजा स्पर्धा होती. साधारण ६० ते ७० लेख आले असावेत. त्यात पहिल्या ४ क्रमांकाना ऑनलाईन सर्टीफिकेट आणि काही रोख रक्कम भेट म्हणून होती.
- गृहव्यवस्थापन - मी लिहिलेला लेख -
गृह व्यवस्थापनात सर्वात महत्वाचे काय असेल तर ते स्वैपाकघर. ते नेहमीच स्वच्छ ठेवायला लागते. भारतात असताना माझ्याकडे स्टीलचे आणि हिंडालियमचे डबे होते. मी दर २ ते ३ महिन्यांनी सर्व डबे घासायचे. ओटा कडप्प्याचा होता आणि त्या खाली कडप्प्याचे कप्पे होते. हे कप्पे मी ओल्या फडक्याने पुसून घ्यायचे. डबे धुतल्यावर ते उपडे करून ठेवले की लगेच वाळतात आणि त्यात जे काही असेल ते परत लगेच भरता येते. पूर्वी कपडे वाळत घालायच्या काठ्या असायच्या त्याला झाडू बांधायचे आणि भितींवरली आणि छतावरची जळमटे साफ करायचे. झाडू हा बुटका असतो त्यामुळे तो काठीला बांधला की छ्तावरची सर्व जळमटे निघतात. कुंचा भिंतीवर फिरवून मग कानाकोपऱ्यातून केर काढायचे. पूर्ण घराची साफसफाई मी वर्षातून एकदा दिवाळीपूर्वी करायचे. पूर्वी फ्लॅटमध्ये हॉल आणि बेडरूमला पाणी जाण्याकरता थोडी जागा असायची. फरशी पण कढत पाण्यात धुणे धुण्यासाठी जो डिटर्जंट असतो तो घालून त्याचा फेस व्हायचा आणि तो फरशीवर घालून ब्रशने फरशी घासायचे. सगळे साबणाचे पाणी खराट्याने ढकलून बाहेर घालवायचे. पंख्यावरची जळमटे कुंच्याने साफ करून नंतर विनायक उंच असल्याने तो स्टुलावर उभा रहायचा आणि ओल्या फडक्याने पंख्याची पाती साफ करायचा. रोज रात्री झोपताना ओटा घासून पुसून लक्ख करायचे.
कामवाली बाई जरी कामाला होती तरी मी रोज सर्व फर्निचर ओल्या फडक्याने पुसून काढायचे. शिवाय सकाळी उठल्यावर किंवा रात्री झोपताना केर काढायचे. दर महिन्याला सर्व चादरी, अभ्रे, पांघरूणे धुवून वाळवून ठेवायचे. जेव्हा धुणे-भांडी करायला बाई यायची तेव्हा आणि मी घरी धुणे-भांडी करायचे तेव्हाही मी सर्व ताटे विसळून टबात ठेवायचे. कढई, आणि इतर भांडी सुद्धा थोडी घासणीने हात फिरवून विसळून ठेवायचे. टबात ठेवल्यावर सुद्धा त्यात मी थोडे पाणी घालायचे. असे केल्याने भांडी घासायलाही किळस वाटत नाही. शिवाय जास्त स्वच्छ निघतात. कप बशा, पाणी प्यायची भांडी मी घासून विसळून ठेवायचे. धुणे धुताना सुद्धा ते आधी एका बादलीत गरम पाण्यात त्यात धुण्याची पावडर टाकून भिजवून ठेवायचे. जेव्हा वॉशिंग मशीन घेतले तेव्हा पण मी आधी धुण्याचे कपडे गरम पाण्यात भिजवायचे व नंतर १ तासाने ते मशीनमध्ये धुण्याकरता टाकायचे. माठातले पिण्याचे पाणी आणि पिंपातले स्वैपाकासाठी लागणारे पाणी रोजच्या रोज भरून ठेवायचे. आधीचे पाणी काढून पिंप घासून मग ताजे पाणी भरायचे. डोंबिवलीत आल्या आल्या मला काविळ झाली. त्यामुळे पिण्याचे पाणी तापवण्याचे काम वाढले. मोठ्या पातेल्यात पिण्याचे पाणी उकळवून ठेवायचे. ते पूर्ण गार झाले की प्लॅस्टीकच्या बाटलीतून भरून ते फ्रीज मध्ये ठेवायचे किंवा माठात भरून ठेवायचे. नंतर पाणी भरून ठेवायला फिल्टर घेतला. तोही महिन्यातून एकदा साफ करायला लागायचा. केराचा डबा असतो त्यात तळाला जुन्या वर्तमानपत्राची जाड घडी करून मग त्यात कचरा टाकायचे. शिवाय कचऱ्याचा डबा दर २-३ दिवसांनी घासून उपडा करून वाळवायला ठेवायचे.
भाजी खरेदी साठी मी मंडईत जायचे. तिथे भाज्या स्वस्त आणि ताज्या मिळायच्या. घरी आले की मिरच्यांची देठं काढून ती एका जाळी असलेल्या प्लॅस्टीकच्या डब्यात ठेवायचे. कोथिंबीर निवडून ती पण दुसऱ्या प्लॅस्टीकच्या डब्यात ठेवायचे. आठवडाभर मिरच्या कोथिंबीर ताज्या रहातात. १ नारळ खरवडून तो स्टीलच्या डब्यात भरून तो फ्रीजर मध्ये ठेवायचे. उन्हाळ्यात लिंबाचे सरबत करून तेही फ्रीज मध्ये ठेवायचे. लिंबाचा रस, त्यात तिपटीने साखर घालायची व काचेच्या बरणीत भरताना तळाशी मीठ घालायचे. खूप दिवस टिकते. विनायक डोंबिवलीवरून अंधेरीला कामाला जायचा तेव्हा उन्हाळ्यात कामावरून आल्यावर रोज एक ग्लास लिंबाचे सरबत प्यायचा. कोणी पाहुणे आले तरी हे सरबत उपयोगी पडायचे. त्यात बर्फाचे तुकडे फ्रीजर मध्ये तयार असायचे. त्याकरता मी ४-५ प्लॅस्टीकचे ट्रे आणले होते की ज्यामध्ये पाणी घालून ते फ्रीजर मध्ये ठेवले की बर्फाचे छोटे तुकडे तयार होतात. या ट्रेमध्ये छोटे चौकोनी आकार होते. विनायक कामावरून आल्यावर थेट बाथरूम मध्ये अंघोळीला जायचा. रोजच्या रोज शर्ट, पॅंट, रूमाल, पायमोजे नवीन असायचे.
पहिले दूध तापले की ते गार झाल्यावर फ्रीज मध्ये ठेवायचे. दुपारी चहा करताना दूध बाहेर काढले की त्यावर जमा होणारी जाड साय एका पातेल्यात काढायचे. अशी ४ दिवसांची साय जमा झाली की त्याचे ताक करायचे. लोणी भरपूर यायचे. हे लोणी मी रोजच्या रोज पाण्याने धुवून फ्रीजमध्ये ठेवायचे. असे लोणी बरेच जमा झाले की त्याचे तूप बनवायचे. घरच्या घरीच दुधाचे सर्व प्रकार व्हायचे. सायीचे दही, अदमुर दही, ताक, लोणी आणि तूप. मी कधीच बाहेरून दही, लोणी तूप विकत आणले नाहीये. आळीपाळीने कोरड्या चटण्या करायचे. लसणाची, दाण्याची, कारळाची इत्यादी. आलं किसून एका डबीत ठेवले आणि ते फ्रीज मध्ये ठेवले की चहात घालायला त्यातूनच आलं घालायचे. आलं, लसूण, मिरचीची पेस्ट करून ठेवायचे. किराणा सामानाची यादी दर महिन्याला एका कागदावर लिहून मग दुकानात जायचे. त्यात सण येतील त्याप्रमाणे काही जास्तीचे सामान आणायचे. दुकानात जाऊन गहू, तांदुळाची क्वालिटी आणि किंमत पाहून त्याप्रमाणे ठरवायचे. तांदूळ पण दर महिन्यात वेगळा आणायचे. सोना मसूरी, आंबेमोहोर, सुरतीकोलम इत्यादी.
दळणा मध्ये गहू पीठाबरोबर, हरबरा डाळ, ज्वारी-बाजरी, तांदुळ, अंबोळीचे पीठ आणि थालिपीठाची भाजणी करायचे. वर्षाचे लाल तिखट, हळद आणि गोडा मसाला केला की प्रत्येक वेळी सामानात हळद, तिखट आणायला लागत नाही. त्याकरता मी सुक्या लाल मिरच्या व हळकुंड आणून ती उन्हात ठेवून मग दळून आणायचे. हळद तिखट दळायच्या गिरण्याही वेगळ्या असायच्या. सीझनप्रमाणे फळेही आणायचे. हिवाळ्यात लिंबे स्वस्त मिळतात तेव्हाच लिंबाचे सरबत करून ठेवायचे. उन्हाळ्यात कैरीचे खार असलेले नेहमीचे लोणचे, गोड लोणचे व पन्हे करायचे. कैऱ्या उकडून त्याचा गर काढून दुप्पट साखर घालून काचेच्या बरणीत हा पन्ह्याचा गर ठेवला की आलेल्या पाहुण्यांना पन्हे देता येते. शिवाय कोकमचे सरबत पण असेच साखर मीठ घालून तयार ठेवता येते. गुळांबा आणि मुरांबा करून तो काचेच्या बरणीत ठेवायचे. पावसाळ्यात मी सुंठ, गुळ, तूप एकत्र करून त्याच्या अगदी छोट्या गोळ्या करून ठेवायचे. चहाच्या आधी ही गोळी खायची व नंतर चहा प्यायचा.घरात काही गोष्टी मी कायमस्वरूपी ठेवते. यात थर्मामीटर, क्रोसीनच्या गोळ्या, अमृतांजन, व्हिक्स, बर्नॉल, आयोडेक्स, कफ सिरप. कापसाच्या तेलाच्या व तुपाच्या वाती करून ठेवायचे. बाहेर जेवायला वर्षातून आम्ही फक्त ३ वेळा जायचो. आमच्या दोघांचे वाढदिवस व लग्नाचा वाढदिवस. बाहेर हॉटेलमध्ये क्वचित जायचो. पदार्थ जितके घरी करता येतील तितके मी केलेले आहेत. यातून पैशाची बचतही होतेच होते. शिवाय तब्येतीही चांगल्या रहातात.
लग्नानंतर मी काही वर्ष नोकरी केली. आम्ही दोघेही नोकरी करायचो. विनायक ७.१२ ची फास्ट लोकल पकडायचा. माझी नोकरी डोंबिवलीतच होती. मी नंतर निघायचे. सकाळी घाई गडबड होऊ नये म्हणून विनायकचा शर्ट-पॅंट, रूमाल, पायमोजे, घड्याळ, टॉवेल, रेल्वेचा पास, पैसे, आतले कपडे, तसेच माझेही आतले कपडे, पंजाबी ड्रेस, रूमाल, घड्याळ, कानातले, एके ठिकाणी काढून ठेवायचे. आदल्या दिवशी माझ्या ड्रेसला व विनायकच्या ड्रेसलाही इस्त्री करून ठेवायचे.
पूर्वी गीझर नव्हते त्यामुळे अंघोळीचे पाणी गॅसवर तापवायला लागायचे. सकाळी उठल्यावर एका शेगडीवर एकीकडे चहा आणि दुसऱ्या शेगडीवर मोठ्या पातेल्यात अंघोळीकरता पाणी तापवत ठेवायचे. विनायक बाहेर पडला की मी माझे अंघोळीचे पाणी तापत ठेवून एकीकडे माझ्यापुरत्या डब्यात नेण्यासाठी दोन पोळ्या आणि भाजी करायचे. विनायक डबा न्यायचा नाही. तो कंपनीतल्या कॅंटीन मध्ये जेवायचा. पोळी भाजी झाली की अंघोळीचे पाणी तापलेले असायचे त्याने अंघोळ करून मग पूजा करायचे. पिण्याकरता दूध तापवून घ्यायचे. विनायक पण दूध पिऊन जायचा. दुधात घालायला मी काजू-बदाम-पिस्ते याची पूड करून ठेवायचे. नंतर कपडे भिजत घालून, व्यायाम करून, कामावर निघायच्या वेळी वेणीफणी करून ड्रेस घालून, सर्व काही बंद आहे ना याची खात्री करून कुलूप लावून निघायचे. मी रोज रिक्शाने कामावर जायचे. डोंबिवली एम आय डी सी मध्ये कंपनी होती. आमच्या घराजवळच्या बस स्टॉप जवळ बस कधीच थांबायची नाही.
घरखर्चाला लागणारी ठराविक रक्कमच आम्ही बॅंकेतून काढायचो. त्यात मी थोडे पैसे बाजूला ठेवायचे आणि त्याचा उपयोगही व्हायचा. आम्हाला दोघांना शनिवारी हाफ डे होता. त्यामुळे फक्त एक रविवार मिळायचा. माझी नोकरी गावातच असल्याने मला घर आणि नोकरी सांभाळता येत होते. नंतर काही वर्षांनी मी नोकरी सोडली.डोंबिवलीत आलो तेव्हा विनायकची स्कॉलरशिप संपली होती त्यामुळे आम्हाला आयायटी- पवईचे वसतिगृह सोडायला लागले. डोंबिवलीत आमचा फ़्लॅट आहे. घरात काहीही नव्हते. विनायकचा थिसीस लिहायचा बाकी होता. तेव्हा आमची खरी कसोटी लागली. मी रोज देवाजवळ प्रार्थना करायचे की मला नोकरी लागू दे आणि देवाने तथास्थू म्हणले आणि मला नोकरी लागली. ही नोकरी कायमस्वरूपी नव्हती. रोज ५० रूपये मला मिळत होते. महिन्याचे १५०० रूपये. यातच सर्व भागवले. किराणामाल, वर्तमानपत्र, धुणे-भांड्यांना बाई लावली तिचे पैसे, दूध, भाजीपाला यातच निम्याच्या वर खर्च व्हायचे. उरलेले पैसे आम्ही दिवस किती आणि पैसे किती हे मोजूनच खर्च करायचो. तेव्हा मी मंडईत कधीच गेले नाही. बजेट ठरवले. कोपऱ्यावर एक भाजीवाला बसायचा. तिथून ५ रूपये पाव किलोच भाजी आणायचे. दुपारी पोळी भाजी. दूध अर्धा लिटरच घ्यायचे. सकाळचा दुपारचा चहा आणि सकाळी आम्ही दोघांनी नाश्त्याला दूध प्यायले की दूध संपायचे. रात्री फक्त मुगाच्या डाळीची खिचडी खायचो. त्याकरता फक्त आधा पाव किलो दही आण्याचो त्याचे मी ताक बनवायचे भरपूर पाणी घालून. तेच पुरवायचो. नंतर विनायकला अंधेरीत हिंदुस्थान लिव्हर मध्ये नोकरी लागली. पण तो १ ते दीड वर्षाचा काळ आम्हाला खूप काही शिकवून गेला. घरी फोन, टिव्ही, फ्रीज, कपाट काहीही नव्हते. डबे आणि पातेली कपबशा ठेवायला एक मोठी मांडणी होती. कपडेही बिग शॉपर बॅगेत ठेवायचो. माझा तुटपुंजा पगार तांदुळाच्या डब्यात ठेवायचो. विनायकला थिसीस लिहायला टेबल खुर्चीही नव्हती. त्याने सतरंजीवर बसून थिसीस लिहिला.
फक्त धुणे-भांडी करायला बाई लावली होती. विनायक रोजच्या रोज केर काढायचा व पूजा करायचा. आठवड्यातून एकदा फरशी पुसून घ्यायचा. मी त्याला नको नको म्हणत असतानाही तो ही कामे आपणहून करायचा. तो म्हणायचा की थिसीस लिहिता लिहिता मला पण मध्ये ब्रेक घ्यावासा वाटतो तेव्हा ही कामे होऊन जातात. रोजच्या रोज व्यायाम आम्ही दोघेही करतो. कोणताही आजार झाला की तो लवकरात लवकर बरा होण्यासाठी व्यायामाचा उपयोग होतो. बायकांना घरच्या घरी रोजच्या रोज होणारा व्यायाम म्हणजे सूर्यनमस्कार. आम्ही दोघे सूर्यनमस्कार, जोर बैठका घालतो. शिवाय योगाही करतो. शिवाय रोजच्या रोज रात्रीचे जेवण झाल्यावर आम्ही एक चालत चालत चक्कर मारायचो.जेव्हा अमेरिकेत आलो तेव्हा गृहव्यवस्थापन बदलले. किराणामाल,-दूध,प्यायचे पाणी, भाजीपाला हा दर आठवड्याचा आणावा लागतो. कोव्हीड मुळे आता सर्व घरपोच येते. पण इथे घरपोच सेवा नाहीये. इथे घाऊक मालाची दुकाने आहेत. त्याचे वार्षिक ५० डॉलर्स भरुन सदस्यत्व घ्यावे लागते. या दुकानातून आम्ही साखर, तेल, मीठ, धुण्याचे व भांडी घासायचे डिटर्जंट, पेपर टॉवेल, टिश्यु पेपर, कचरा भरायच्या पिशव्या, दाढी करण्यासाठी लावायचा फोम, जंतुनाशक ओली फडकी, भाजके दाणे, सुकामेवा, प्रोटीन पावडर, टुथपेस्ट, पिण्याचे पाणी, या आणि अशा सर्व प्रकारच्या रोजच्या रोज वापरातल्या गोष्टी आम्ही आणतो. भाजी फळांमध्ये मी पालक, संत्री, केळी, काकडी, टोमॅटो, कांदे घेते. बाकीच्या खरेदी आम्ही अमेरिकन आणि इंडियन दुकानातून आणतो. जिथे जे जे चांगले मिळेल ते ते सर्व काही ! इथे सर्व किराणामाल जसा लागेल तसा आणतो. भाजीपाला-किराणामालाची मी दर आठवड्याला वेगळी यादी करते. आठवणीने काय काय आणायला झाले आहे ते पाहून त्याची यादी बनवते. याचे कारण एक जरी गोष्ट राहिली की परत कारने जावे लागते. पटकन चालत जाऊन भाजी आणू असे इथे होत नाही. इथे दुकाने खूप लांब असतात. विशेष करून थंडीच्या दिवसात हवामान पाहूनच बाहेर पडावे लागते. बर्फ पडणार असेल तर आठवणीने सर्व काही घरात आहे ना ते पहावे लागते.
इथेही मी काही वर्ष नोकरी केली. तेव्हापासून मी रात्रीचे जेवण व दुसऱ्या दिवशीचे डब्यातले जेवण असे एकदाच करते. रात्री भांडी तर इथे घासायलाच लागतात. इथे डिश वॉशर आहेत पण न घासता भांडी त्यात ठेवली तर ती नीट निघत नाहीत. मी भांडी घासते आणि नळाखाली पटापट विसळल्यासारखी करते आणि मग ती डिश वॉशर मध्ये टाकते. डिश वॉशरचा वेगळा डिटर्जंट मिळतो. अशाने भांडी खूप छान घासली जातात. शिवाय वाळूनही निघतात. रोजच्या रोज ओटा ओल्या फडक्याने पुसायचा. रोजच्या रोज ओला कचरा कचरा कुंडीत टाकायचा. कोरड्या कचऱ्याच्या पिशव्या भरल्या की त्याही टाकायच्या. कोरडा कचराही इथे भरपूर साठतो. पाणी पिण्याच्या बाटल्या, दुधाचे, ज्युस चे कॅन्स, इथे जे काही मिळते ते सर्व प्लॅस्टीकच्या डब्यातून. ते संपले की त्या प्लॅस्टीकच्य बाटल्या, डबे असे सर्व काही असते. इथे पोस्टाच्या पेटीत बरीच पत्रे साठतात की ज्यामध्ये जाहीराती असतात. असा अनावश्यक कचराही बराच साठतो. रोजच्या रोज किचनच्या फरशीचा केर काढतो आणि पुसुनही घेतो. तसेच बाथरूम कमोड मधल्याही फरशा पुसून घेतो. केर-फरशी पुसणे, कार्पेट असेल तर व्ह्य्क्युमिंग करतो, दर महिन्यात सर्व लाकडी सामान पुसून घेतो. इथे भारतीय दुकानात काही स्टीलच्या वस्तू असतात पण त्या खूप महाग असतात. इथे मी स्टीलचे डबे कधीच आणले नाहीत. सर्व काही प्लॅस्टीकच्या बरण्यांमध्ये ठेवते. फक्त कूकर, इडली पात्र आणि काही स्टीलच्या चायना डिश जेवणासाठी आणल्या. इथे गिरणी नाही त्यामुळे दळणाची कामे नाहीत. दूध वेगळे तापवायचे काम नाही. आधी मी विरजण लावून दही घरीच बनवायचे. तूपही इथे मिळणाऱ्या मीठविरहीत बटरचे घरीच करायचे. आता दही, तूप विकत आणते.
अमेरिकेत हवामानाप्रमाणे कपड्यांचेही व्यवस्थापन करावे लागते. हिवाळ्यात, हातमोजे, पायमोजे, उबदार जाकिटे, फूल टी शर्ट, जीन्स टोप्या बाहेर काढून ठेवायच्या. हिवाळा संपला की सर्व उबदार कपडे धुवून वाळवून बॅगेमध्ये ठेवायचे. उन्हाळा आला की हाफ टी शर्ट, घोळदार पॅंटी, उन्हाळ्याच्या टोप्या असे बाहेर काढायचे. थंडीत कफ सिरप, आयब्रुफेनच्या गोळ्या, फ्ल्युचे च्या लसी टोचून घ्याव्या लागतात. तसेच वसंत ऋतूमध्ये पोलन ऍलर्जी होते. श्वास घेताना त्रास होतो त्याच्या गोळ्याही आणून ठेवाव्या लागतात. अमेरिकेत एका शहरात गेल्यावर आम्हाला घर मिळायला खूप वेळ लागला. एका स्टुडिओ अपार्टमेंट मध्ये आम्हाला नाईलाजाने जावे लागले. स्टुडिओ अपार्टमेंट म्हणजे एकच खोली. त्या खोलीत डिश वॉशर नव्हते. धुणे धुवायचे दुकानही लांब होते. सर्व काही एकाच खोलीत! हा एक गृहस्थापनाचा वेगळाच अनुभव आला. अर्थात तो कसा होता त्याचा वेगळा लेख होईल. लग्न झाल्यावर सुरवातीला वसतिगृहात राहिलो. तिथले व्यवस्थापन पण वेगळे होते. मी नंतर कधीतरी "सुंदर माझे घर" ही लेखमाला लिहिणार आहे. लेखात एकूणच घराचे व्यवस्थापन थोडक्यात लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. मी १०-१२ घरे बदलली. घराचे वर्णन व आठवणी असे एकत्रित लेखन मी लेखमालेत करणार आहे.
- रोहिणी गोरे
No comments:
Post a Comment