Monday, December 18, 2023

Happy Birthday to you :)

 आज मला सिक्स्टी पूर्ण झाली. निरोगी आयुष्याची एका वर्षाची भर पडली. का कोण जाणे पण वाढदिवसाचा दिवस मला खूपच आवडतो. मला आठवतयं ऑर्कुट वर २००७ साली मला १०० शुभेच्छा आल्या होत्या आणि मी खूप भारावून गेले होते. आता ते भारावले पण उरले नाही, पण तरीही मला शुभेच्छा आल्या की खूप आनंद होतो. दुसऱ्यांना वाढदिवस शुभेच्छा द्यायलाही मला खूपच आवडते. प्रत्येकाची शुभेच्छा देण्याची पद्धत वेगळी असते, नाही का? कुणी नुसते हॅपी बर्थडे लिहिते तर कुणी फुलांचा गुच्छ पाठवते, तर कुणी फेसबूक अवतार धारण करून शुभेच्छा देते. या वर्षी मला फेसबुक अवतारातल्या शुभेच्छा खूप आल्या. त्यातले अवतार पाहून खूप खूप हासू आले.



या वाढदिवसाच्या माझ्या काही कडुगोड आठवणी आहेत. माझा साखरपुडा झाला ६ डिसेंबरला १९८७ साली आणि फेब्रुवारीतले लग्न यामध्ये २ महिन्यांचा कालावधी होता. या दोन महिन्यात मी व विनु शनिवार-रविवार कडे खूप फिरलो. फिरण्यापेक्षा सिनेमेला जायचो. आयायटी-पवई वरून विनु शुक्रवारी संध्याकाळी पुण्यात त्याच्या घरी यायचा. शनिवार-रविवार आईच्या घरी आल्यावर वर्तमानपत्रात कोणते सिनेमे लागले आहेत ते बघून त्या सिनेमाला आम्ही जायचो. १८ डिसेंबरला मला सुखद धक्का बसला. त्याने चक्क मला साडी आणि गजरा आणला होता. ही साडी घेण्यासाठी विनु आणि आयायटीतले त्याचे ४ मित्र घाटकोपरच्या एका दुकानात गेले होते. त्या मित्रांनीच विनुला सुचवले होते की तू रोहिणीला वाढदिवसाची साडी घ्यायला पाहिजेस. रंग कोणता आवडतो तिला? मित्रांनी विचारले. आंबा कलरच्या साडीला मरून काठ होते आणि हे दोन्ही रंग माझ्या आवडीचे होते ! या वाढदिवसाच्या आनंदात भर म्हणजे रंजनाने आम्हाला सिनेमाच्या तिकिटाचे पैसे दिले आणि म्हणाली माझ्याकडून तुम्हाला गिफ्ट. त्यावेळेला १० रूपये तिने आम्हाला तिच्या स्वकमाईचे दिले होते. मी म्हणाले की अगं तू पण चल की आमच्याबरोबर ! तर म्हणाली मी कशाला कबाब मे हड्डी !


लग्ना आधी मी एके ठिकाणी नोकरी करत होते. Arya Consultants (1984) या कंपनीची दोन ऑफीसेस होती, एक कर्वे रोडवर व एक पर्वती पायथ्याशी. पर्वती पायथ्याच्या ऑफीसमध्ये आम्ही तिघी काम करायचो. जोशी सर आम्हाला कामे वाटून द्यायचे व मार्केटिंग साठी ते नेहमी फिरतीवर असायचे. एके वर्षी ऑफीस मध्ये रिनोवेटींगचे काम सुरू झाले. आम्हाला पण जास्तीचे काम नव्हते. त्यांची कंपनी नवीनच स्थापन झाली होती. आम्ही काम करणाऱ्या पण नवीनच होतो. मला या आधीच्या नोकरीचा एक वर्षाचा अनुभव होता. एकदा त्यांनी आमचा पगार कापला आणि म्हणाले की कंपनीचे काम नीट होत नाहीये. मी लगेचच नोकरी सोडली. ९०० रूपये पगार होता. त्यातले ४०० रूपये कापले. जोशी सरांचा मला फोन आला. त्यावेळेला फोन घराघरातून आले नव्हते. मी त्यांना सांगितले आमचे सर्वांचे पगार कापले हे मला अजिबात पटलेले नाहीये त्यामुळे मी नोकरी सोडली आहे. नंतर परत एकदा फोन आला. हे फोन आमचे फॅमिली डॉक्टर आहेत त्यांच्याकडेच आले होते. मी दुसऱ्यांना पण हेच कारण सांगितले आणि म्हणाले मला इंडस्ट्रीमधले नियम माहिती नाहीत. पण पगार कशाकरता कापला? काम नीट होत नाहीये याला आम्ही जबाबदार नाही. वाळू सिमेंटची पोती पडली आहेत. खाटखुट सुरू आहे. फायलींची जागा बदललेली आहे. नीट काहीच सापडत नाहीये. या सर्व गोंधळात जसे होईल तसे आम्ही कामे करत आहोत. नंतर त्याने प्युनच्या हाती (त्याचे नाव सुधाकर) उरलेले ४०० रूपये व वाढदिवसाचे एक शुभेच्छापत्र पाठवले आणि त्याच्या तर्फे विचारले की कामावर येणार का? मग मी पण निरोप पाठवला की मी कामावर रूजू होईन. माझ्यामुळे इतर दोघींनाही कापलेला पगार मिळाला. अशी एक वेगळी आठवण वाढदिवसाची !


लग्ना आधी २ वाढदिवस असे झाले की समोर बासुंदी पुरीचे ताट आहे पण मला लगेच जेवता आले नाही. पानावरून उठले आणी बाहेर जावे लागले. एकात आनंद झाला आणि दुसऱ्यात मनस्ताप. ध्यानीमनी काहीही नसताना अचानक काहीतरी घडले ! अर्थात नंतर मी जेवले पण असा हा अडथळा आला आणि मजा गेली.


२००१ सालातली अमेरिकेतली आठवण आहे. माझी व माधवीची (तेलुगू) मैत्री झाली होती. ती आणि मी खूप बोलायचो फोनवर. शिवाय एकमेकींकडे जायचो. रेडिओवर हिंदी गाणि ऐकायचो. तिचे लग्न नवीन होते. तिला स्वैपाक करायचा खूप कंटाळा यायचा. सतत याहू मेसेंजर वर असायची. त्यावेळेला मी रेडीफमेल मध्ये माझे खाते उघडले होते. मला आईबाबांची, स ईची आणि रंजनाची खूप आठवण येत होती. अंधेरीत असताना मी रंजनाला आणि स ईला वाढदिवसाचे फोन करायचे. त्याही करायच्या. मी फोन करताना हॅपी बर्थ डे टु यु या गाण्याने सुरवात करायचे. एके दिवशी माधवी म्हणाली की तिच्याकडे कणीक खूप शिल्लक आहे आणि ती तिला संपवायची आहे. ती कणिक म्हणजे दिव्यच होती. त्यात मैदाच जास्त होता. मी पण तीच कणिक वापरत होते. तर म्हणाली की काय करता येईल? मी म्हणाले पुऱ्या कर, पोळ्या कर, सामोसे कर. आमचे नुकतेच बोलणे झाले होते की काय आवडते काय नाही ते. तर म्हणाली तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी सामोसे करू. मला बटाटेवडे आणि सामोसे खूपच प्रिय आहेत. मी पण उत्साहाने लगेचच हो म्हणाले. माझ्या वाढदिवसाच्या दिवशी तिच्या घरी मीच सर्व सामोसे केले. त्या दोघांनी व आम्ही दोघांनी चविचवीने सामोसे खाल्ले. मी लायब्ररीत माझी मेल चेक करायला जायचे. तिच्याकडे डेस्कटॉप होता. मी तिच्याकडे मेल चेक केली आणि मला सुखद धक्का बसला. आईबाबा, रंजनाने मिळून मला ईमेल मधून वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवल्या होत्या. असा माझा आगळावेगळा वाढदिवस साजरा झाला.


माझी आई प्रत्येकाच्या आवडीनुसार एक गोड व एक तिखट करते. माझ्या वाढदिवसाच्या दिवशी बासुंदी आणि सामोसे करते माझ्या आवडीचे. मी इथे अमेरिकेत आल्यावर सुद्धा माझ्या आवडीची बासुंदी आणि सामोसे बरेच वर्ष करत होते आणि विनुच्या वाढदिवसाच्या दिवशी बटाटा भजी आणि गोडाचा शिरा.
डोंबिवलीत रहात असताना आम्ही तीन वेळा बाहेर जेवायला जायचो. माझ्या व विनुच्या वाढदिवसाच्या दिवशी, व तिसरे म्हणजे आमच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी. आम्ही दोघे एकमेकांना कधीच गिफ्टा घेत नाही.


२०२१ साली माझा वाढदिवस भारतीय वेळेनुसार साजरा झाला. म्हणजे झाले असे की मी KOHL'S मध्ये काम करत होते. त्या दिवशी माझी ड्युटी ८ ते २ होती. विनु त्याच्या कंपनीच्या ख्रिसमस पार्टीत गेला होता. त्यामुळे मला आणायला त्याला उशीर होणार होता. मी घरी जाऊन जेवणार होते. त्याचा फोन आला मला थोडा उशीर होईल. मी म्हणाले हरकत नाही. मी तोपर्यंत स्टोअरमध्येच टाईमपास करते. मी नेहमी एका डब्यात थोडी बिस्किटे, सुकामेवा आणि वेफर्स खायला ठेवते. नेमके त्यादिवशी आणले नव्हते. मला प्रचंड भूक लागली होती. बाहेर आले आणि शेजारच्या विला पिझ्झा मध्ये डोकावले. तिथे मला एक स्लाईस पिझ्झाचा मिळून गेला. सोबत डाएट कोक होताच. मी पहिल्यांदाच तिथे गेले होते. पिझ्झा स्लाईस खूपच छान होता. ब्रोकोलीचे टॉपिंग मस्त लागत होते. विनुचे उशीराने येणे माझ्या पथ्यावरच पडले होते. मी आरामात पिझ्झा खाल्ला. विनुला मेसेज केला की मी पिझ्झा खात आहे. तुला उशीर झाला तरी चालेल, सावकाश ये. सहज फोन मध्ये पाहिले तर १७ तारीख. पण भारतात मध्यरात्र झाली होती आणि १८ तारीख सुरू झालेली होती. माझा मलाच खूप आनंद झाला आणि मनात म्हणले की झाले माझे बर्थडे सेलिब्रेशन !


२०२२ डिसेंबर महिन्यात मी भारतभेटीसाठी गेले होते. १८ डिसेंबरचा वाढदिवसचा दिवस खूपच छान गेला आणि लक्षात राहिला. आईकडे सकाळी मावशी चहा व कण्हेरी करायला येतात. त्यांना सांगितले की पोहे करा. त्यांनी खूप चविष्ट पोहे केले होते ते भरपूर खाऊन मी मोहिनीच्या घरी गेले. आधीपासूनच १८ डिसेंबर ही तारीख सर्वानुमते ठरली होती. पण मी कुणाला बोलले नाही की माझा वाढदिवस आहे. मोहिनी अंताक्षरीतले पुण्यातले सर्व सदस्य व मी मोहिनीच्या घरी जमलो होतो. तिने आमच्या गाण्यांची मैफील वेगवेगळ्या थिमा ठरवून छान आयोजित केली होती. तिच्या घरी माझ्या आवडीचे इडली सांबार खाल्ले. साधारण १० ते ११ च्या सुमारास जमलो आणि मी २ ते ३ च्या दरम्यान घरी आले. घरीआल्यावर आई म्हणाली की आण तुला काही आणायचे असेल तर. इथे बासुंदी छान मिळते. दुधी हलवा पण छान मिळतो. मला बाहेर जायचा खूपच कंटाळा आला होता. तिला म्हणाले अगं तु आमचे कित्येक वाढदिवस खूप छान साजरे केले आहेस ! मी तृप्त झाले आहे. आता मला काही नको.


माझी चुलत नणंद वर्षा हिला मी एकदा पुर्वीच विचारले होते की तु तुझा वाढदिवस कस काय साजरा करतेस? तर तीने सांगितले की ती ३ गोष्टी आवर्जून करते. एक म्हणजे नवीन ड्रेस घेते, दुसरे म्हणजे बाहेर जेवायला जाते आणि तिसरे म्हणजे सिनेमा पहाते. मला ही कल्पना खूपच आवडली. तिची आई म्हणजे माझ्या चुलत सासुबाई. त्यानी सांगितले की त्यांच्या घरात ज्याचा वाढदिवस असेल त्याने फक्त पूजा करायची. बाकी कोणत्याही कामाला हात लावायचा नाही. शिवाय त्याला ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर हातत आणून द्यायचे. अगदी सकाळचा चहा पण !
आम्ही दोघे एकमेकांच्या वाढदिवसाच्या दिवशी सकाळचा चहा आयता देतो आणि मुख्य म्हणजे ज्याचा वाढदिवस असेल त्याने भांडी घासायची नाहीत. माझ्या स्वप्नातला वाढदिवस असा आहे की सर्व खोलीभर फुगे लावायचे. साडी नेसायची, नटायचे, मोठा चॉकलेट केक आणायचा. त्यावर डेकोरेशन आणि मेणबत्या लावायच्या. सर्वांना केक, बटाटा वेफर्स, सॅंडविच खायला द्यायचे. सोबत आईस्क्रीम आणि शीतपेय. स्वप्नातला वाढदिवस स्वप्नातच राहू देत. असा वाढदिवस साजरा करायचा उत्साह राहिलेला नाहीये.

आज मी दरवर्षीप्रमाणे शुभेच्छा वाचत राहिले. मला शुभेच्छापत्रे खूप आवडतात. २०११ सालापासूनची फेबुवर आलेल्या आठवणीतली सर्व शुभेच्छा पत्रे मी डाऊनलोड केली आणि ती या लेखात घातली आहेत. आज मी सकाळी छोटे इंद्रधनु पाहिले. कालपासून खूप पा ऊस पडतोय. रविवारी रात्री तर अगदी रपारप पडत होता. आज संध्याकाळी आवडीचे साबुदाणे वडे मनसोक्त खाणार आहे. गोड म्हणून श्रीखंड आणले एकेक चमचा खायला. ते पुरते १५-२० दिवस. वाढदिवस म्हणून काजुकतली आणायचा खूप मोह झाला होता पण तो मोह मी टाळला. एक तर त्या पटापट संपतात आणि आमची तु किती आणि मी किती वड्या खाल्या यावरून भांडणे होतात !


B for Birthday !
2019..............
भारतात जेव्हा १८ तारीख उजाडली तेव्हापासून माझा वाढदिवस सुरू झाला. त्यामुळे अमेरिकेतल्या १७ च्या रात्री जेवण श्रीखंड पोळी, १८ तारीख जेव्हा इथे उजाडली तेव्हा फेबुवरच्या शुभेच्छा वाचून आनंद झाला. दुपारच्या जेवणाला फोडणीची पोळी केली. त्यात हिरवी मिरची, कडीपत्ता, कोथिंबीर, कांदा दाणे असे सर्व असल्याने आणि आवडीची फोपो अगदी क्वचित होत असल्याने खूप बरे वाटले. संध्याकाळी चहाबरोबर कोथिंबीरीची भजी केली. ही भजी पण क्वचितच होतात. तर असा होता एकंदरीत आजचा दिवस. दुसरे म्हणजे फेबू मेमरी वाचल्यानेही छान वाटले. केकशिवाय काही शुभेच्छा पत्रेही मेमरीमध्ये होती. Thank you All for your Birthday wishes ! 🙂
FB Memory - 2018 .............
Thank you All for your Birthday Wishes ! 🙂 😃
FB Memory - 2016 ..........
भारतात १८ डिसेंबर उजाडला तेव्हाच माझा वाढदिवस साजरा झाला. १८ ची सकाळ म्हणजे अमेरिकेतल्या रात्रीच्या जेवणाची वेळ. कांदे बटाट्याचा रस्सा, पोळ्या आणि माझ्या आवडीची शेवयाची खीर केली होती. 🙂 झोपायच्या आधी फेसबुकावर चक्कर मारली तर शुभेच्छा यायला सुरवात झाली होती. आणि ...... शुभेच्छा येतच राहिल्या त्या अमेरिकेतल्या १८ च्या अखेरपर्यंत. तुमच्या सर्वांच्या छान छान शुभेच्छांमुळे मला खूप आनंद झालेला आहे आणि त्या आनंदामध्ये मी डुंबत आहे. 😃 अनेक अनेक धन्यवाद मित्रमैत्रिणींनो, आणि नातेवाईकांनो. You All 🙂
FB Memory - 2017 ......Thank you Everyone for your lovely birthday wishes ! 🙂
FB Memory - 2015 ..........
Priय Mitra मैत्रिणींनो,, Tuम्हां sarvanच्या
shubheच्छा खूप Aavadaल्या ! छाN गेला 18 डिसेंबर ! Aनेक धन्यvaad ! 🙂 😉 😃
FB Memory - 2014 ............
आज माझा हॅपीवाला जन्मदिवस खूप छान गेला 🙂 किती सुंदर सुंदर शुभेच्छा होत्या तुम्हां सर्वांच्या ! आहा ! दुपारचे जेवण मेक्सिकन उपहारगृहात, संध्याकाळी चहा बरोबर खायला पातळ पोह्यांचा चिवडा केला, आणि रात्रीच्या जेवणाला भाजणीची थालिपीठे. दिवसभर विविधभारतीवरची हिंदी गाणी ऐकली. अजून काय हवे? दिवसभर शुभेच्छांना लाईक करून करून दमले मी 🙂 झोपते आता. बाऽऽऽऽय 🙂 😃 😉 Thanks everyone for good wishes on my b'day ! U All
FB Memory - 2013 ......
तुम्हां सर्वांच्या वाढदिवस शुभेच्छा खूप खूप आवडल्या ! अनेक धन्यवाद !
FB Memory - 2012 .........
आपणा सर्वांच्या वाढदिवस शुभेच्छांबद्दल अनेक धन्यवाद !! मस्त गेला आजचा दिवस ! :)))
FB Memory - 2010 .........Rohini Gore
 
 











































No comments:

Post a Comment