Friday, November 03, 2023

भुंगा

 

मनस्विनी आपले रहाते घर सोडून निघते. निघताना ती तिचा मोबाईल फरशीवर आपटते. ती तो इतका जोरात आपटते की काही सेकंदातच त्याचे तुकडे सर्वत्र विखुरले जातात. मनात म्हणते, एक ओझे कमी झाले. घराबाहेर पडल्यावर ती तिचा लॅपटॉप कचरापेटीत भिरकाऊन देते व स्वत:शीच हासते. रिक्शाला हात करून ती बॅगेसकट रिक्शात बसते आणि तिच्या जुन्या फ़्लॅट मध्ये येते. तिथे फक्त आणि फक्त जरूरीच्या मोजक्याच वस्तू असतात. त्या दिवशी तिला खूप शांत झोप लागते. सकाळी उठून आवरून एक छानशी साडी नेसून बाहेर पडते आणि थेट ग्रंथालयात जाते. शांतपणे कोणते पुस्तक वाचायचे हे तिने आधीच ठरवून ठेवलेले असते. दिवसभर वाचत रहाते. दुसऱ्या दिवशी भाजी मार्केट मध्ये तिला एक मैत्रिण भेटते. दोघी एकमेकींची विचारपूस करतात. मनस्विनी म्हणते चल ना आपण उसाचा रस पिऊ. मैत्रिण म्हणते अग नको मला लवकर घरी जायचे आहे. मग ती एकटीच रस पिते आणि ताजीतवानी होते.
 
घरी येते तेव्हा तिला खूप हलके हलके वाटत असते. रिंगटोन नसतोच कधीच. फक्त नोटिफिकेशचे टिंग टिंग वाजत नसते. फेबुवर काय आले आणि कोण कुणाला काय म्हणाले हे पण दिसत नसते. मग ती मनसोक्त रेडिओवरची गाणी ऐकत झोपी जाते. तिसऱ्या दिवशी जेव्हा ती बाहेर पडते तेव्हा तिला एक मित्र भेटतो. तो विचारतो अग तु आहेस कुठे? मनस्विनी म्हणते काय झाले? मी इथेच तर आहे. मित्र म्हणतो अग तुला किती फोन केले? फेबुवर मेसेज पाठवले. आता मात्र मनस्विनी खूप चिडते. अरे काय रे? तुला माझे घर माहिती नाही का? थेट घरी यायला काय होते? माझ्या घराच्या जवळ तर रहातोस. मला फेबुवर यायचे नाहीये, यायचे नाहीये, हे कृत्रीम आयुष्य नकोय मला. कळले का? हे नि ते असे बरळत असतानाच अमर म्हणतो, अगं काय बडबडतेस? जागी हो. मी निघतोय ऑफीसला. सदा न कदा हातात फोन. मग स्वप्नही अशीच पडतात. चल उठ लवकर. मनस्वी कशीबशी उठते. एक आळस देते. दात घासते. चहा पिते. फोनवरचे सर्व फालतू फॉरवर्डस डिलिट करते. लॅपटॉप ऑन करते आणि तिच्या कृत्रीम दिवसाची सुरवात करते. सध्या मात्र तिला रिळे फार आवडायला लागली आहेत ! Rohini Gore

No comments: