आज आमच्या घरी जय-आशा आले होते. आशाने लिहिले होते की ती माझ्याकडे जून ९-१० कडे येइल म्हणून. तिची दोन्ही मुले अमेरिकेत आहेत. तिचा मेसेज मला आला तेव्हा आम्ही वीकेंड ची ग्रोसरी करत होतो. तिला लिहिले की मी घरी गेल्यावर तुला फोन करते. घरी आले सामान लावले आणि तिला फोन केला आणि म्हणाले की माझा विश्वासच बसत नाही की तु माझ्या घरी येणार आहेस. मेसेजेस चे टिंग टोंग वाजत राहिले आणि तिला सांगितले की तू उद्या आमच्या घरी जेवायलाच ये. तिची एक घट्ट मैत्रिण माझ्या घराच्या २-३ चौक ओलांडल्यावर रहात होती.
तिला सांगितले की लवकरच या म्हणजे गप्पा टप्पा जास्त होतील. रविवारी संध्याकाळ घरातली विकेंडची साफसफाई करण्यात गेली. थोडासा स्वयंपाक रात्रीच करून ठेवला. मराठमोळे जेवण केले. ती आल्यावर आम्हाला दोघींनाही खूपच आनंद झाला होता. थोड्यावेळाने चहा केला. गप्पांमध्ये अनेक आठवणींना उजाळा मिळाला. अर्थातच आयायटी वसतिगृहातल्या आठवणी निघाल्या. जय गोदरेज मध्ये नोकरी करत होता. मी व भैरवी गृहिणी होतो. आशा, स्वरदा, किर्लोस्कर, आणि सोनार पिएचडि करत होते. १९८८ चा हा काळ होता. आमच्या चौघांचा हा मराठमोळा ग्रुप होता. तुलसी मध्ये रहात असताना आशा तिच्या बाल्कनीतून मला आवाज द्यायची, रोहिणी महाभारत सुरू झाले गं ! आम्ही दोघे तिच्या घरी महाभारत पहायला जायचो आणि येताना चहा-पोहे खाऊनच यायचो आम्ही दोघे आयायटी सोडून जेव्हा डोंबिवलीला जायला निघालो तेव्हा तिच्या घरी जेवलो. संध्याकाळी आमचा टेंपो आला नाही म्हणून तिच्या घरी इडली, सांबार चटणी खाल्ली. दुसऱ्या दिवशी पण टेंपोचा पत्ता नाही ! शेवटी आयायटीच्या बाहेर जा ऊन विनायकने एकाला विचारले की आम्हाला डोंबिवलीला जायचे आहे. व्यवस्था होईल का? त्याला ठरवूनच विनायक आला आणि परत आम्ही आशाकडे जेवलो. तिने वांग्याचे भरीत आणि भाकरी केली होती जेवायला. सामानाची बांधाबांध तर झालीच होती. आम्हाला टाटा करायला आशा आणि भैरवी आली आणी आम्ही रडलो. स्वरदा डिपार्टमेंटला गेली होती. माझ्या हातची पुरणपोळी आणि भाकरी, भैरवीच्या हातची गव्हाची खीर, स्वरदाच्या हातची पोळी, बटाट्याची भाजी आणि श्रीखंड, एक ना अनेक आठवणी. आठवणींना काही अंतच नाही. एकमेकांकडे जायचो, गप्पा मारायचो, जेवणे करायचो. या सर्व मौल्यवान आठवणी आहेत की ज्या कधीच विसरू शकत नाही. भारतभेटी मध्ये मी-विनू आशाकडे २००४ आणि २००८ ला गेलो होतो. २०१० मध्ये स्वरदा कडे गेलो होतो.
आशा आमच्या डोंबिवलीच्या घरी आली होती दिवसभर ते मला अजिबातच आठवत नव्हते. वारणा-महानंदा-गोकूळ दुधाच्या आठवणी निघाल्या. आठवणींबरोबर आरोग्य आणि राजकारणाच्या चर्चाही झाल्या. डायनिंगवर निवांतपणे जेवलो. बटाटा भजी आणि गोड म्हणून गोडाचा शिरा केला होता. नंतर परत गप्पांचे सत्र सुरू झाले. परत एकदा चहा झाला आणि सर्वात महत्वाचे फोटो सेशनला सुरवात झाली. त्यांच्या कॅमेरात-आमच्या कॅमेरात, सेल्फि-टेल्फी सर्व सोपस्कार पार पडले. सेल्फी कसा काढायचा हे आशा-जय ने सांगितले. आपण आपल्याकडे बघायचे नाही तर कॅमेरा कडे बघायचे ते कळाले. हाहाहा. निघताना मी तिला माझी दोन पुस्तके दिली. त्यांना खाली सोडायला गेलो तेव्हा तिथेही फोटो काढले. फोटो काढायचो आणि बघायचो. एकात अंधार, तर एकात डोळे मिटलेले. सर्व फोटो तपासून झाले. परत परत काढले. चष्मा घालून- काढून फोटोही झाले. पोट दिसतयं का? दुसरा फोटो काढा. शेवटी कारमध्ये बसल्यावरही मी एक फोटो काढला आणि त्यांना टाटा-बाय-बाय केले.
No comments:
Post a Comment