Friday, June 02, 2023

मी आणि माझी नोकरी... (2) Prav Electrospark Pvt. Ltd.

 पुणे-सातारा रस्त्यावर प्राव्ह कंपनीचे एक दुसरे सेल्स ऑफीस होते. तिथे फायलिंग क्लार्कची एक जागा होती. माझी मैत्रिण ज्योत्सना माझ्याबरोबर कॉलेजमध्ये शिकत होती. तिला या व्हेकन्सी बद्दल सांगितले आणि तिने तिथे अर्ज केल्यावर तिलाही नोकरी लागली. ज्योत्सना आणि कल्पना सहस्त्रबुद्धे या दोघी नेहमी बरोबर असायच्या. कल्पनाचे घर आर्यभुषणला होते. तिच्याकडे मी आणि ज्योत्सना अधुन मधून जायचो माझी नोकरी सुरू होण्या आधी. माझे ६ महिन्याचे प्रोबेशन संपले पण मी त्या कंपनीत कायम झाले नाही. माझे प्रोबेशन परत ३ महिन्यांनी वाढल्याचे पत्र मला मिळाले. हे असे का झाले माहीत नाही.
आणि मला कुणाला विचारावे असे सुद्धा वाटले नाही. टेलिफोन ऑपरेटर रोहिणी साऊथ इंडियन होती, उंच आणि सावळी. ती नाकात चमकी घालायची. तिच्या जागी फडके नावाची मुलगी आली. फोन वरून तिच्या खूप ओळखी झाल्या होत्या. ती म्हणाली की तू राजीनामा दे. मी तुला एका ओळख झालेल्या माणसाकडे घेऊन जाते. तो लोकांना नोकऱ्या देतो. माझे मनच उडाले होते प्राव्ह कंपनीवरचे. तसे तर दमणूक पण खूप व्हायची. कामही खूप होते. कदाचित मी कॉलेज मध्ये काही वेळा जायचे ट्युटोरिअल असल्यामुळे. तसे तर मी सांगूनच जात होते. कधी मला बरे नसायचे म्हणून एखाद दिवस कामावर दांडी होत होती. प्रोबेशन वाढवण्याचे नक्की काय कारण होते ते कळाले नाही. मी थोडे दिवस गेले आणि नंतर गेलेच नाही.

फडके म्हणाली की माझ्याबरोबर चल. तिने तिच्या घराचा पत्ता दिला. ती शनवारात राहात होती एका वाड्यात. मी तिच्याकडे गेले. तिने चहा पोहे केले होते माझ्यासाठी. तिथून आम्ही भांडारकर रस्त्यावरच्या एका बंगल्यात गेलो. तिथे प्रदीप दळवी नावाचे गृहस्थ रहात होते. त्यांना पाहून मला धक्काच बसला. ते कॉटवर पालथे झोपले होते आणि त्यांना पाय नव्हते. त्यांचा भयानक रित्या अपघात झाला होता. गोरेपान आणि तब्येतीने पण चांगले होते. त्यांचा चेहरा हसतमुख होता. त्यांच्यासमोर गादीवरच एक फोन होता. पूर्वीचा काळा फोन. त्यावरून त्याने एक -दोन जणांना फोन केले. त्यांनी माझी माहिती विचारली. ते म्हणाले एक नाहीतर दुसरी नोकरी. काळजी करू नकोस. त्यांनी विचारले तू काय घेणार चहा की कॉफी? त्यांच्या आईला त्यांनी बोलावले आणि म्हणाले ही बघ रोहिणी. हिला मी एक चांगली नोकरी मिळवून देणार आहे. मला म्हणाले माझे दिवसभर हेच काम चालू असते. लोकांना नोकरी मिळवून देणे. नंतर मी व फड्के आम्ही दोघींनी चहा घेतला. त्यांच्या आईने सांगितले. बघ ना, हा माझा एकुलता एक मुलगा. चांगल्या कंपनीत नोकरी होती पण या अपघातानंतर सर्व संपले. तिथे एक मुलगी होती. त्यांच्या आईने आम्हाला तिची ओळख करून दिली. ती मुलगी त्या गृहस्थांशी लग्न करणार होती. नंतर ती निघाली. त्यांची आई म्हणाली की बघ ना हा इतका मोठा बंगला माझ्यानंतर कोण सांभाळणार? या मुलीला आम्ही सर्व परिस्थिती सांगितली आणि ती लग्नाला तयार झाली.

प्रदीप दळवी यांनी मला जोशी यांचा फोन दिला. Arya Consultants कंपनीत जा आणि भेट. ही त्यांचीच कंपनी आहे असे सांगितले. कर्वे रस्त्यावर आर्याचे एक ऑफीस होते आणि पर्वती पायथ्याशी त्यांचे दुसरे ऑफीस होते. मी कर्वे रस्त्यावरच्या ऑफीसमध्ये गेले. हे ऑफीस मला खूप आवडले. तिथे ज्योत्सनावझे बाई होत्या. घाऱ्या गोऱ्या ! जोशी यांनी मला एका इंग्रजी मासिकातला एक परिच्छेद टंकायला सांगितला. मी तो टंकला आणि दाखवला. ते म्हणाले तुमचे टायपिंग चांगले आहे. एकही चूक नाहीये. तुम्ही कामावर रूजू होऊ शकता. फक्त एकच आहे की माझा व्यवसाय नवीनच आहे त्यामुळे मला ६०० रूपये पगार तुम्हाला देता येणार नाही. मी ४०० रूपये देऊ शकतो. माझा प्राव्ह मधला पगार ६०० होता. त्यांनी सांगितले की कामात प्रगती दिसली की ४०० वरून तुमचा पगार वाढेल. मी म्हणाले की मी विचार करून कळवते. त्याप्रमाणे मी कळवले की मला पगार मंजूर आहे.

जेव्हा मला टायपिंग करायला सांगितले तेव्हा मी स्पिड मध्ये टाईप केले नाही. आम्हाला क्लास मध्ये शिकवले होते की टाईप करताना जर चुका झाल्या तर तुमच्या स्पीड ला काहीही अर्थ नाही. जेव्हा परिक्षा होते तेव्हा मिनिटे-स्पीड-चुका या सर्वाचा विचार केला जातो. मी फडके हिचे खूप आभार मानले. नंतर काही दिवसांनी कळाले की प्रदीप दळवी गेले. प्राव्ह नंतर माझी आर्या कंन्स्लटंट मध्ये नोकरी सुरू झाली पर्वती पायथाच्या ऑफीसमध्ये. नंतर एक दिवस मला प्राव्ह इलेक्ट्रोस्पार्क प्रा. ली. चा १००० रूपयांचा चेक मिळाला. मला खूप आनंद झाला. तो बोनस होता. मी कामावर नसले तरी त्या वर्षाचा बोनस मला मिळाला होता Rohinigore
क्रमश : ...

No comments:

Post a Comment