विनु थिसिस लिहित होता त्या दरम्यान आमच्या घरात भाड्याने रहाणारे वाजपेयी यांनी आमच्याशी संपर्क ठेवला होता. त्यांचे मित्र जहागिरदार यांची मुलगी अर्चना १०वीत होती. त्यांनी विनुला विचारले की अर्चनाला ९वी मध्ये थोडे कमी मार्क पडले आहेत आणि १०वीचे महत्त्वाचे वर्ष आहे तर तुम्ही तिला शिकवाल का? फी पण ते देतील. विनु म्हणाला मी फी घेणार नाही. कधीच नाही. विद्या ही नेहमी दान करावी. आणि माझेही असेच मत होते. १९९१ साली अर्चना आमच्या घरी शनिवार रविवार शिकायला येऊ लागली. रविवारी मला सुट्टी असल्याने सकाळी मी पोहे-उपमे बनवायचे. रविवारी शेवयाची खीर करायचेच. विनुला नोकरी लागल्याने वारणा/गोकुळचे १ लिटर दूध घेऊ लागलो. कामावरून मी थेट बाजारात जायचे आणि भरपूर भाज्या घेऊन यायचे. १ लिटर दुधात मी दही-ताक-लोणी-तूप करायला लागले. नंतर अर्चनाची बहीण अपर्णा आणि नीता गणित शिकण्यासाठी रविवारी येत होत्या. अजून एक सोनी नावाची मुलगी यायची. वाजपेयी यांच्या मित्राची मुलगी. मी सगळ्यांसाठीच नाश्ता बनवायचे. नीताची आई म्हणाली की अरे अभ्यासाबरोबर नाश्ताही मिळतो असा क्लास कुठे पाहिला नाही. जेव्हा अर्चना दहावी झाली तेव्हा कोणती साईड घ्यायची यावर विनुने सुचवले की हिला सायन्सला घाला. पुढे स्कोप आहे. तिला जे विषय अवघड वाटतील ते मी शिकवेन. विनुने अर्चनाला ११ ते बिएससी पर्यंत शिकविले. अर्चना आमच्या घरी रोज शिकायला येऊ लागली आणि शिकता शिकता ती आमच्या घराची एक सदस्यच होऊन गेली. मी जेव्हा नोकरी सोडली तेव्हा मी घरीच असायचे. नंतर मी काही ना काही शिकत राहिले.
अर्चना संध्याकाळी ७ ला येत असे आणि ती येण्याची मी आतुरतेने वाट बघायचे. संध्याकाळी मी नेहमीच काही ना काही खायला करते. ती आली की आम्ही दोघी मिळून पोहे खायचो. विनायक म्हणाला की मी जरी ८ ला आलो तरी तू ७ लाच येत जा आणि अभ्यासाला सुरवात कर. विनायकने अर्चनाला सर्व विषय शिकवले. काही विषयांचा अभ्यास ती तिचा तीच करायची. फक्त अडलेले विचारायची. अर्चना आल्या आल्या विचारायची काकू आज काय केलयं खायला. मी म्हणायचे ओळख बरे ! कधी पोहे, तर कधी उपमा तर कधी बटाटेवडे ! विनु कामावरून आल्यावर साधारण दीड ते दोन तास अभ्यास झाला की आमच्याबरोबर तू पण जेवायला बस असे मी अर्चनाला सांगायचे. ती म्हणायची रोज रोज नको हो काकू. तिला आणायला तिचे वडील यायचे तर कधी आम्ही तिला घरी सोडायचो.
जेव्हा आमच्या घरी टेलिविजन आला तेव्हा क्रिकेट मॅच असेल तर अभ्यासाच्या ब्रेक मधून स्कोअर बघितला जायचा. मी मालिका कधीच बघितल्या नाही. पण सिनेमे खूप पाहिले. गणपतीत आम्ही अर्चनाकडे जायचो. सुट्टीचा दिवस असेल तर विनु असायचा. पण मी नेहमी असायचे. दुपारी जेवण झाल्यावर मी व अर्चना झोपायचो. उठल्यावर ती आईला म्हणायची आई पैसे दे ना. मी व काकू पाणीपुरी खातो आणि मग काकू घरी जातील. त्या म्हणायच्या अर्चना आणि तिची काकू एकसारख्या आहात. पोहे आणि पाणीपुरी प्रिय आहे दोघींना. एकदा तर पाणीपुरीच्या पुऱ्या विकत आणल्या अर्चनाने आणि जहागिरदार फॅमिली आणि आम्ही दोघे मनसोक्त पाणीपुरी खाल्ली. जहागिरदार वहिनी, पारखी वहिनी, अपर्णा, अर्चना, विनायक आम्ही सगळ्यांनी मिळून बरेच सिनेमे पाहिले टिळक आणि रामचंद्र थिएटर मध्ये. अकेले हम अकेले तुम, बेटा, हम आपके है कौन, बाँबे, माहेरची साडी, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, टायटॅनिक, रोझा, खलनायक, साहिबा, साजन, राजा
शनिवारी रात्री व रविवारी दुपारी अर्चना आमच्याबरोबर जेवायला असायची. आम्हाला पण छान वाटायचे. नंतर ती आग्रह करून करून रविवारी संध्याकाळी नक्की या काकू आमच्याकडे जेवायला असे सांगायची. आम्ही रविवारी रात्री जेवणाबरोबर तिथे टिव्ही पहायचो. त्यात एक गाण्यांचा कार्यक्रम होता "सुपरहीट मुकाबला" हा कार्यक्रम बिनाका गीतमाला टाईप होता. त्यात कसे गाण्यांचे नंबर लागायचे तसेच या कार्यक्रमात होते. म्हणजे ये गाना दुसरे पैदान पर है.. किंवा चोथे पैदान पर है याप्रमाणे. दर आठवड्याला गाण्यांचे नंबर बदलायचे. या गाण्यात अम्मा देख तेरा मुंडा बिगडा जाए, किंवा सात समुंदर पार मै तेरे पिछे पिछे आ गयी ही गाणी लक्षात राहिली आहेत. त्यावेळेला सोनु निगमचे TVS सारेगम खूपच फेमस झाले होते.
क्रमश :....
4 comments:
तुमचा लेख अगदी मनापासून वाचला कारण कि १९९१ ले मी पण दहावीत होतो. सिनेमा - गाण्यांची नावे ऐकून परत त्या काळात फिरून आल्यासारखे वाटले. तुम्ही अगदी आपल्या जीवनावर ब्लॉग ऐवजी आत्मकथा जरी लिहिली मी ती नक्की वाचेन - अगदी विकत घेऊन 😃
परत एकदा मनापासून धन्यवाद.
अनेक धन्यवाद महेश !!! त्या काळी थिएटर मध्ये जाऊन सिनेमा पहाणे हे खूप अप्रुप होते.
नेहमीप्रमाणेच खूप छान रोहिणीताई!
Thank you so much !!
Post a Comment