फेबु मेमरीमध्ये काही वेळा अचानक काहीतरी छान समोर येते. मी असेच काहीतरी लिहिले होते पण ते माझ्यापुरतेच. शेअर केले नव्हते.
जगात खूप सुंदर सुंदर गोष्टी आहेत की त्या पाहिल्या की आनंद होतो. प्रत्येकाच्या जीवनात अशा काही खास गोष्टी असतातच की ज्या आठवल्या की तुमचे हृदय काही क्षणांकरता हेंदकाळते. हा अनुभव खरच खूप छान असतो. रोमांचकारी अनुभव. फळाफूलात असतो, गाण्यात असतो तर काही क्षण पूर्वाश्रमीचे असतात आणि अचानक आलेले असतात. ध्यानीमनी नसताना काही गोष्टी अश्या काही अचानकपणे घडून येतात की त्या आठवल्या की तुमच्या अंगावरून कोणीतर मोरपीस फिरवत आहे असे वाटते. प्रेमाला उपमा नसतेच कधी कारण कि ते देवाघरचे लेणे असते. असे लेणे की ते तुमच्या हृदयात कायमचे दडून बसते. रोज आठवत नाही तर मधूनच आठवते कधीकधी. त्याला वेळकाळ नसते. अखंड कामात बुडालेले असताना आठवते. निवांत क्षणी आठवते. गर्दीतून जात असताना आठवते . त्यात एखाद्या बाळाचा गोंडस चेहरा आठवतो तर एखाद्या फुलाचीही आठवण येते.
मला सर्व प्रकारची फुले आवडतात पण त्यात सुद्धा मला विशिष्ट रंगांची फुले जास्त आवडतात. ते रंग खूप मनमोहक असतात. तास न तास त्या फुलाकडेबघत बसावेसे वाटते. त्याला लाभलेल्या रंगामुळे ती फुले खूप लोभस वाटतात. मन प्रसन्न करून टाकतात. गुलाबा मध्ये मला पिवळा गुलाब खूपच आवडतो. कण्हेरी मधला गुलाबी रंग काय वर्णावा, इतका छान असतो. अबोलीचा रंग काही न्याराच ना ! आणि किती तो नाजुकपणा ! सदाफुली तर तिच्या लव्हेंडर रंगामुळे शोभून तर दिसतेच पण तिच्या त्या पाकळ्या ! जास्वंदाला तर प्रत्येक रंग खुलून दिसतो.शेवंतीचा पिवळा रंग हारापेक्षा माळलेल्या वेणीतच शोभून दिसतो. शेवंतीची जागा विणलेल्या वेणीतच हवी. जाई जुईचा रंग पांढरा पण जाईचे टपोरेपण मला जास्त आवडते. जाईच्या कळ्या तर बघत बसाव्यात इतक्या गोड ! सूर्योदय सूर्यास्त दोन्हीही छान पण मला सूर्योदय बघायला जास्त आवडतो. सूर्यास्ताच्या आधीचे रंग जास्त विलोभनीय वाटतात. पाणी सगळीकडेच वाहते पण पाण्याचे ओहोळ खडका खडकातून वाहताना किती छान दिसतात. पाण्याचे पांढरे शुभ्र धबधबे पाहण्यात मजा तर असतेच पण डोंगरावरचे छोटे छोटे धबधबेही तितकेच आकर्षक असतात.
ढग आकाशात निर्माण होतो आणि बघता बघता नाहीसाही होतो. वेगवेगळ्या आकाराचे ढग म्हणजे अगदी बारीक बारी गोलापासून ते पर्वता सारख्या दिसणाऱ्या प्रतिमेसारखे, येत जात असतात. त्यात घुसणारे रंग तर अप्रतिम. या रंगांमुळेच ढगांना शोभा येते. हे रंग अगदी जादू करावी असे निर्माण होतात. पिवळा, केशरी, गुलाबी, निळा , राखाडी आणि या रंगांच्याही वेगवेगळ्या छटा. हे रंग नीट पाहिले तर अगदी सेकंद सेकंदाला बदलत राहतात. हे ढगांचे साम्राज्य कुठून येते आणि कसे परत गायब होऊन जाते याची खरच खूप कमाल वाटते. पाऊस मला खूप जोरात पडलेला आवडतो. त्याच्या सरी दिसल्या पाहिजेत.झाडांमध्ये मला डेरेदार झाडे जास्त आवडतात. ज्या झाडाच्या फांद्या पूर्णपणे झुकल्या आहेत आणि त्या फांद्यांखाली सावली निर्माण झाली आहे अशी झाडे आवडतात, की त्या सावलीत बसावे, बसताना झाडाच्या खोडाचा पाठ टेकण्याकरता आधार घ्यावा. बसून वर बघावे. झाडांच्या फांद्यांचे निरिक्षण करावे. समुद्र, तळे, नदी , त्यातले वेगवेगळे पाणी, कधी संध तर कधी उधाण आल्यासारखे वाहणारे. संथ पाण्यातले तरंग बघायला मला खूप आवडते. समुद्राच्या खवळलेल्या लाटा आणि त्या परतीच्या लाटांपेक्षा मला ओली वाळू जास्त आवडते. जी वाळू त्या लाटेनेच ओली झालेली आहे अशी वाळू. ज्यावरून चालतानाची मजा काही वेगळीच. या वाळूवरून चालताना एकीकडे लाटाही पाहता येतात आणि एकीकडे कोरडी वाळूही पाहता येते. तास न तास चालावे अशा या वाळूतून. मागे बघूच नये असे वाटते. Rohini Gore
No comments:
Post a Comment