Friday, February 17, 2023

F2 Saket - Dombivli (4)

घरी बसून कंटाळा आलाच होता. काहीतरी घरबसल्या शिकता येईल का असे मनात होते. विनायकचा नोकरी व जा-ये करण्यात १२ ते १५ तास जात होते. घरी फक्त तो जेवणाकरता आणि झोपण्याकरता येत होता. एकच रविवार मिळत होता. एकदा सहज मी भाजी आणायला गेले आणि फडके रोडवर मला सी.एस. चे ऑफीस दिसले. तिथे जाऊन चौकशी केली तर मला कळाले की सी.एस चे रजिस्ट्रेशन मुंबई नरिमन पॉइंटच्या ऑफीस मध्ये होईल. विनुला घरी आल्यावार सांगितले.  विनू म्हणाला एम कॉम पेक्षा हाच कोर्स कर. माझी शिक्षणाची गॅप १० वर्षाची होती. आणि सीएसचा कोर्स टफ होता  हे माहीत होते. पण तरीही मी तो करायचा ठरवला. ट्रेनने जाऊन येऊन नोकरी करणे मला आणि विनुला पण पसंत नव्हते. कोणताही निर्णय आम्ही दोघे शक्य/अश्यकतेच्या गोष्टींचा विचार करूनच करत होतो.

 

मुंबईच्या ऑफीसमध्ये सीएस चे रजिस्ट्रेशन केले रूपये १५०० मध्ये.  तिथे आम्हाला माहिती सांगितली की तुमचे स्टडी मटेरिअल पोस्टाने घरी येईल. त्याप्रमाणे ४-५ पुस्तकाचे जाड जाड ठोकळे आमच्या घरी आले आणि सोबत प्रश्नपत्रीका. मी वाणिज्य शाखेची पदवीधर असल्याने विषय खूप वेगळे नव्हते. कॉस्टिंग हा विषय माझा नव्हता. तो यामध्ये होता.  शिक्षणाची गॅप होती आणि विषयही सोपे नव्हते. विनु म्हणाला की  मी तुला मदत करीन. म्हणजे प्रश्नाला अनुसरून मुद्देसूद उत्तर आहे का ते वाचून तुला सांगेन. माझा घरबसल्या अभ्यास सुरू झाला. सकाळी विनु ऑफीसला गेल्यावर मी अभ्यासाला बसायचे. त्या आधी केर, अंघोळ, पूजा उरकून घ्यायचे. जेवण झाल्यावर थोडी विश्रांती घेऊन परत थोडावेळ बसायचे. संध्याकाळचा वेळ स्वयंपाकात जायचा. टीव्ही  नव्हताच. प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांची उत्तरे पुस्तकात बघूनच लिहायची होती. प्रश्न - उत्तरे मी फूलस्केप कागदावर लिहीली.

सर्व विषयाची प्रश्न उत्तरे लिहून मी परत पोस्टाने ती पाठवली व मला कंप्लिशन सर्टीफिकेट मिळाले. हे मिळाल्यावर मुख्य परिक्षा देता येते. मी एक परिक्षा दिली. पण यश आले नाही. ही परिक्षा खूप टफ असते. एका फटक्यात यश अगदी क्वचित लोकांना येते की जे खूपच टॉप लेव्हलचे हुशार असतात. परिक्षा मुलुंडच्या एका कॉलेज मध्ये होती. डोंबिवली मध्ये सीएसचे ऑफीस होते तिथे दर रविवारी ग्रुप चर्चा होत असे. पण तिथे जायला धाडस होत नव्हते. आत्मविश्वास वाटत नव्हता. शिक्षणाची १० वर्षाची गॅप असल्याने तिथे गेल्यावर तिथे येणारे  विद्दार्थी आपल्याला हासतील का अशी भिती वाटत होती.  त्या ऑफीसमध्ये कळाले की ठाण्याला सीएस चा क्लास असतो. तो संध्याकाळी ६ ते ८ असतो. तिथे मी एक दोन वेळा गेलेही होते. जाण्यायेण्यासाठी ट्रेनला गर्दी नसायची. पण नंतर जाणे सोडून दिले याचे कारण 2 तास जाण्यायेण्यात जात होते. त्यापेक्षा तो वेळ घरी बसूनच अभ्यास करणे जास्त योग्य ठरेल असे वाटले. क्लासला जाण्या आधी दुपारीच रात्रीचा स्वयंपाक करून ठेवायचा हे मनाला पटत नव्हते. कारण दुपारचे जेवण विनु कंपनीच्या कॅंटीन मध्ये घेत होता. रात्रीचे घरचे जेवण ताजे आणि गरम असावे असे वाटले. दुसऱ्यांदा परिक्षा द्यायची म्हणल्यावर अजूनही बरीच तयारी करून परिक्षा देणार होते. जशी नोकरी माझ्या काही वैयक्तिक कारणांमुळे सोडली,  तसेच माझ्या काही वैयक्तिक कारणांमुळे दुसऱ्यांदा परिक्षेला बसले नाही. कारण अभ्यासाला वेळ मिळत नव्हता.

काही दिवसांनी सीडॅकचे मोठेच्या मोठे बॅनर पहाण्यात आले. ती जाहिरात होती ऍडव्हान्स डिप्लोमा इन कंप्युटर प्रोग्रामिंग. हा कोर्स एक वर्षाचा होता आणि डोंबिवलीत होता. फी १५००० होती.  हा कोर्स मी व आमच्याकडे शिकायला येणाऱ्या अर्चनाने केला. वेळ होती दुपारी ११ ते १. आम्ही दोघी छत्र्या घेऊन क्लासला येत होतो. डोंबिवलीची खासियत म्हणजे कधीही पॉवर जाणार अशी होती. डोंबिवलीत तर दर शुक्रवारी सकाळी ८ ते संध्याकाळी ५ पॉवर जायची. तेव्हा तर उकडून जीव जायचा. तिथे १-२ मुली शिकवायला होत्या. त्यातली दीपाली उत्तम शिक्षक होती.  सगळे हजर असल्याशिवाय ती शिकवायची नाही. पॉवर नसली तर काय सुट्टीच मिळायची. डेव्हलपर २००० या विषयाला शिक्षकच मिळत नव्हता. नंतर जो शिक्षक आला तो पोरगेला होता. मी क्लासला जाताना आदल्या दिवशी पोळी/भात उरला असेल तर तो फोडणीचा करून, त्यावर चहा घेऊन जात असे. इंदुबाई आली कामाला तर तिलाही माझ्याबरोबर खायला बसवायचे. काही वेळा समोरच असलेल्या विनोद स्नॅक बार मधून वडा पाव आणायला सांगायचे इंदुबाईला. क्लासवरून आल्यावर सैलाब मालिका पहायचे.  

 

कंप्युटर म्हणजे काय हे माहीती होते कारण पुण्यात मी ज्या कंपनीत नोकरी करायचे तिथल्या मालकांनी १२ लाख खर्च करून ६ टर्मिनल, मोठे सीपीयुचे धूड, २ पीसी अशी मोठीच्या मोठी सिस्टिम घेतली होती. तिथे पीसी साठी  फ्लॉपी होत्या. त्यात आम्ही काही पत्रे सेव्ह करून ठेवायचो. पिसीला ४ ड्राइव्ह होते. तिथे मी इलेक्ट्रोनिक टाईप राईटर पण शिकले होते. त्यावर टाईप करताना खूपच छान वाटायचे. त्या टाईपराईटर वर एक पट्टीसारखा दिसणारा आडवा स्क्रीन होता. त्यात टाईप केलेले दिसायचे. आणि प्रिंट कमांड दिली की कागदावर प्रिंट व्हायचे. त्यावर डावीकडून उजवीकडे व परत उजवीकडून डावीकडे प्रिंट व्हायचे. मी तर या टाईपराईटरच्या प्रेमातच पडले होते. ६ टर्मिनलचे स्क्रीन हिरवे होते व पीसी चा स्क्रीन निळा होता.  या सर्व सिस्टीम साठी कूलींग लावायला लागायचे. ते इतके प्रचंड असायचे की आम्ही सर्व स्वेटर घालून कामाला बसायचो. प्रत्येकाच्या टेबलावर इंटरकॉम होते. त्या कंपनीचे मालक  कंस्लटंट असल्याने त्यांनी  एका क्लायंटचे त्यांच्या प्रोडक्टसाठी मार्केटिंग केले होते आणि म्हणूनच मार्केटिंग खूपच वाढल्याने क्लायंटसाठी प्रायव्हेट लिमिटेड व लिमिटेड कंपन्या स्थापन करून दिल्या होत्या आणि कंप्युटर सिस्टिम विकत घेतली होती. त्यासाठी त्यांनी सिस्टिम ऍनालाईझर, प्रोग्रामर अशा पोस्टही वाढवल्या होत्या. ब्रांच ऑफिसेस मुं ब ई , हैद्राबाद, मद्रास, सिंगापूर अशी होती. नंतर काही कारणाने कंपनी बंद पडली. या कंपनीत माझी बहीण रंजनाही होती.


दीपालीने सी लॅंग्वेज आमच्या सगळ्यांकडून खूप घोटून घेतली होती.  विषय विंडोज, सी, सी++, फॉक्सप्रो, डेव्हलपर २००० याप्रमाणे होते. फॉक्सप्रो मध्ये आम्ही तिघींनी मिळून एक प्रोजेक्ट केला. विषय होता स्टुडंन्ट एनरोलमेंट. हा कोर्स संपण्याच्या आधी आम्ही डोंबिवली सोडली. विनुला बढती मिळाली आणि आम्ही अंधेरीला रहायला गेलो. हिंदुस्तान लिव्हर कंपनीच्या मागे कंपनीचे फ्लॅट होते. तिथे आम्हाला रहायला जागा दिली. फ्लॅट खूपच मोठे म्हणजे १२०० ते १५०० स्वेअर फूटाचे होते. क्लासचे उरलेले काही दिवस मी अंधेरी वरून डोंबिवलीला ये-जा करून केले. मी अंधेरी ते घाटकोपर बसने जायचे. नंतर घाटकोपर ते डोंबिवली ट्रेनने प्रवास करायचे. परत डोंबिवली-घाटकोपर-अंधेरी. एक चांगले होते की ट्रेन मध्ये मला ऑफीसची गर्दी लागायची नाही. सकाळी दुधात कॉर्नफ्लेक्स घालून ते खाऊन निघायचे.  बरोबर काहीतरी छोट्या डब्यात खायला घ्यायचे. कारण यायला मला  दुपारचे २ वाजायचे. ९ ला निघायचे. जाताना बसला गर्दी असायची.

प्रोजेक्ट करायला मात्र मी सुषमा नेर्लेकर कडे ४ दिवस राहिले होते. नंतर लेखी परिक्षेसाठी मी अंधेरीवरून दादरला आले होते. परिक्षा झाल्यावर घरी आले तेव्हा खूप हायसे वाटले. हा कोर्स पूर्ण झाला याचे समाधान वाटले. नंतर विचार केला होता की एक कंप्युटर घेऊन जे शिकलोय त्याचा सराव करायचा. मला सी लॅंगवेज मध्ये गोडी वाटु लागली होती. दीपाली मला म्हणाली होती की मी तुम्हाला कोणती पुस्तके घ्यायाची यादी देईन व तुम्ही सराव करा. काही अडले तर मी सांगेन तुम्हाला. 

 

आमचा डोंबिवलीच्या जागेत अर्चनाचे १० वी ते बीएससी पर्यंत पूर्ण  शिक्षण झाले. याचे पुरेपूर समाधान आम्हाला दोघांनाही आहे. तिने पण काका सांगतील तसा अभ्यास केला. त्यामुळे तिचे आम्हाला दोघांनाही कौतुक आहे. ही जागा शिक्षणासाठीच होती बहुतेक अर्चनाच्या आणि माझ्याही ! अर्चना अजूनही आमच्या दोघांचा रिस्पेक्ट करते. ती आमच्या घरातली एक मेंबरच आहे आणि सर्व जहागिरदार फॅमिली आमचे कुटुंब मित्र होऊन गेली.

  

क्रमश : ...

No comments:

Post a Comment