मी जेव्हा नोकरी सोडली तेव्हा मला घरी बसून खूपच कंटाळा यायला लागला. सबंध दिवस काय करणार? साकेत मधल्या बायका सर्व नोकरी करणाऱ्या होत्या. पारखी वहिनी पण शाळेत नोकरी करायच्या. त्यांची सकाळची शाळा असायची. सर्वच्या सर्व नोकरी करणारे होते. कुणाशी बोलणार? सर्वजण व्यग्र. साकेत मध्ये सर्वात आधी विनु कामावर जायला बाहेर पडायचा. पावसाळ्यात नेहमीच रूळावर पाणी साठून ट्रेन ची वाहतूक ठप्प व्हायची. ट्रेन ठप्प झाल्या आहेत ते साकेत मध्ये विनायक कडून कळायचे त्यामुळे नंतर बाकीचे बाहेर पडायचे नाहीत. आही रहायला आलो तेव्हा पारखी वहिनींनी माझ्याशी ओळख करून घेतली. विनायकला सर्व जण ओळखत होते. पारखी वहिनींनी मला विचारले होते की तुला कामवाली बाई पाहिजे का? माझ्याकडे आहे तिला विचारू का. तेव्हा तर सुरवातीला मीच घरी धुणे भांडी करायचे. मला नोकरी लागल्यावर भांडी घासायला ठेवली. नोकरी सोडल्यावर मी परत घरीच धुणे भांडी करत होते. एकदा पारखी वहिनी माझ्याकडे आल्या आणि म्हणाल्या की स्वच्छ घासतेस तू भांडी पण अशी परकरावर उपडी करून का ठेवलीस. मी सांगितले की हा परकर जुना आहे. कोणत्याही कॉटनच्या कापडावर भांडी उपडी करून ठेवली की ती पटकन वाळतात आणि मग जागेवर लावताही येतात. मग त्यांनी विचारले की तू धुणे कशी धुतेस? नेहमीसारखेच मी म्हणाले. हो पण अगं प्रत्येकाची वेगळी पद्धत असते ना म्हणून विचारले. मग मी सांगितले की आधी मी गरम पाण्यात कपडे तासभर तरी भिजवते व नंतर धुते. बरेच वेळा आघळते म्हणजे मग त्यातले साबणाचे पाणी पूर्णपणे गेले की मग परत वेगळे पाणी घेऊन पिळते.
पारखी वहिनी यायच्या अधुन मधून माझ्याशी गप्पा मारायला किंवा दारातच उभे राहून आम्ही गप्पा मारायचो. सुरवातीला इंदुबाई इमारतीच्या जिन्याचा केर काढायची व ती सर्वांचा केरही टाकायची. आमच्या केराच्या बादल्या आम्ही बाहेर ठेवायचो. एकदा इंदुबाईंनी विचारले की मला कामाची गरज आहे, तुमच्याकडे काही काम असेल तर मला द्या. मग मी त्यांना भांडी घासायचे काम दिले आणि नंतर धुणे केर-लादी पुसायचेही काम दिले. मी जेव्हा कामावर जायचे तेव्हा १-२ बायका सोडून गेल्यावर (न सांगता दांड्या मारायच्या) मी इंदुबाईंना ठेवले होते. त्या कधी कामावर दांड्या मारायच्या नाहीत. आम्ही आमची एक किल्ली खाली जोशीकाका रहायचे त्यांच्याकडे ठेवली होती. लॅच असल्याने लक्शात न राहून दाराच्या बाहेर गेले की दार पटकन लागायचे म्हणून आम्ही एक किल्ली नेहमी दुसऱ्यांकडे ठेवायचो. हा लॅचचा अनुभव जुना आहे. असे बरेच वेळा लॅच लागलेले आहे.
मी खाली पत्र आले का ते पहायला जायचे तेव्हा जोशी काका-काकू नेहमी माझ्याशी बोलायचे. जोशी काका म्हणाले की मला ५ मुली आहेत तु आमची ६ वी मुलगी. विनायकला नेहमी विनायकराव म्हणायचे. मला सांगायचे की विनायकरावांना सकाळच्या न्याहरीला कण्हेरी करून देत जा. सोपी आहे. पौष्टीक असते. काकूंनी मला रेसिपी पण सांगितली होती. पण मी केली नाही कारण की सकाळी वेळ नसायचा. पटकन दुध पिणे सोयीचे होते.आमच्या सोसायटीत पाण्याचा कधीही प्रॉब्लेम आला नाही. २४ तास पाणी होते. आम्ही कधीही जास्तीचे पाणी भरून ठेवले नाही. डोंबिवलीत फक्त आमच्या सोसायटीतच २४ तास पाणी असायचे. याचे कारण म्युनिसीपाल्टीचे पाणी खालच्या टाकीत ३ वेळा येत असे. वरच्या टाकीत पंपाच्या सहाय्याने जमा व्हायचे. जोशी काकांनी मला व विनायकला पंप कसा चालू करायचा आणि गरम पाणी यायला लागले की कसा बंद करायचा ते सांगितले. हे पंप करणे जरा किचकटच होते. २ वेळा तरी पंप करावा लागे आणि सोसायटीच्या प्रत्येक सदस्याने आळीपाळीने १ महिना चालवायचा असे होते. त्यात जोशी काका म्हणायचे की एकदा तरी वरची टाकी वाहिली पाहिजे. वरची टाकी वाहिली की त्यांचे समाधान होत असे. विनायकला त्यांचे म्हणणे पटले होते. कारण टाकी वाहीली की टाकी पूर्णपणे भरली आहे हे सिद्ध होते आणि म्हणूनच आपल्या सर्वांना २४ तास पाणी मिळते. वरची टाकी वाहिली की नाही याची सोसायटीत चर्चा होत असे. मग पंप चालवण्याची टर्न कुणाची आहे यावर चर्चा असायची. नळाला पाणी आले नाही की पंप नीट चालवत नाही वगैरेची चर्चा. मजा असायची. टाकी वाहिली नाही तर स्वत: जोशीकाका पंप सुरू करत.
डोंबिवलीत राहत असताना पालेभाज्यांमध्ये मी मुळा खूप वेळा आणला होता. मुळ्याच्या पाल्याची वेगळी भाजी परतून करायचे व मुळ्याची दह्यातली कोशिंबीर! हिवाळ्यात मेथी आली रे आली की लगेच माझे मेथीचे पराठे करणे सुरू व्हायचे. शिवाय ताजी मेथीची पाने चिरून त्यामध्ये थोडा कांदा, तिखट व मीठ असे जेवणाच्या ताटात डाव्या बाजूला ठरलेले असायचे. मेथीची भजीही अनेकवेळा करत असे. कडू मेथीची चव छानच लागते. तसेच जास्तीचे तेल घालून केलेली गोळा भाजी व पीठ पेरूनही ही भाजी व्हायची. आणि हो बटाटे उकडून त्याच्या फोडी किंवा बटाट्याच्या काचऱ्या चिरून त्याही मेथीबरोबर परतल्या जायच्या. बोरांमध्ये सुपारीएवढी बोरे मला खूप आवडायची. त्यावेळेला गाजरे लाल रंगाची मिळायची. ही गाजरे नुसती खायला चांगली असतात. कारण ही गोड लागायची. मला शेंदरी रंगाची गाजरे कधीच आवडली नाहीत. लाल किसलेल्या गाजरात लाल टोमॅटोच्या फोडी घालून कोशिंबीर छान लागते. त्यावर चिरलेली कोथिंबीर आणि वरून फोडणी. फोडणीमध्ये मिरच्यांचे तुकडे आणि लाल तिखटही! विळीवर भाजी चिरता चिरता गाजरे एकीकडे खात असे.
त्यावेळेला आमच्या शेजारच्या पारखीवहिनींबरोबरही मी सकाळी बाजारात भाजी
घ्यायला जायचे. दोघी घरी आलो की चहाबरोबर खारी खायचो. त्यादिवशी आम्ही दोघी
एकत्रच जेवायचो. जेवण आमच्या घरीच व्हायचे. त्यांना माझ्या हातची
मुगाच्या डाळीची खिचडी खूप आवडायची. मुगाच्या डाळीच्या खिचडीबरोबर भाजलेला
पोह्याचा पापड, खिचडीवर साजूक तूप आणि चिरलेली कोथिंबीर व ओल्या नारळाचा
खव. शिवाय एका ताटलीत भरपूर गोल पातळ कांदा, टोमॅटो, काकडी, गाजर व
मुळ्याचे कापाही करून ठेवायचे. नंतर सायीचे दही व ताजे ताक. असा आमच्या
दोघीचा बाजारहाट खूप मजा देऊन जायचा.
काही महिन्यांनी पारखी वहिनी व माझ्या गप्पांमध्ये सुषमा सामील होऊ लागली. गोरे-नेर्लेकर-पारखी असे त्रिकुट छान जमून गेले. नवरात्रात सवाष्ण म्हणून सुषमाने मला फिक्स करून टाकले होते. बरेच वेळा नेर्लेकर मुगाच्या डाळीची खिचडी करायचे व आम्ही सर्व एकत्र जेवायला बसायचो. गप्पाटप्पा व्हायच्या. मी बरेच वेळेला पारखी काका काकूंना ओली भेळ, बटाटेवडे देत असे. पारखी काका मला १०० पैकी १०० मार्क देत असत. पारखी वहिनी हासून म्हणायच्या आता रोहिणीला तुम्ही किती मार्क देणार? मी त्यांना विचारले हे काय आहे? तर म्हणाल्या की अगं हे असेच मजा करतात. मी काही खायला केले की असेच पदार्थांना मार्क देतात. मग त्याही मजेने त्यांना म्हणायच्या आज साहेबांना काय हवे जेवायला? आजची काय आहे फर्माईश? आमच्या गप्पांमध्ये खूप मजा यायची. एकदा आम्ही त्रिकुट सिनेमा पाहायला गेलो. नेर्लेकरांनी आमच्या सर्वांची तिकीटे काढली. येता-जाता आम्हाला सर्वांना रिक्शाने नेले. तर तो सिनेमा होता दिल तो पागाल है. मी व सुषमा "काय बंडल पिक्चर आहे ना" काही कळत नाहीये. मी म्हणाले समोर काय दिसते ते फक्त बघत राहायचे. माधुरी-करिषमाचा डान्स छान आहे पण. नेर्लेकर म्हणले तुम्ही दोघी बडबड करू नका. समोर बघा काय चालले आहे ते. पारखी काकांकडे पाहिले तर ते चक्क झोपले होते. मी व सुषमा हासत होतो. पारखी वहिनी म्हणाल्या इतका काही वाईट नाहीये. सिनेमा सुटल्यावर पारखी काकांना विचारले कसा वाटला सिनेमा? तर म्हणाले छान होता.
क्रमश :....
थिएटर मध्ये झोपणारे पारखी काका ग्रेट म्हटले पाहिजेत !
ReplyDeleteबहुतेक चष्मा घरी विसरले होते.
kakana picture aavadala nhavta ! maze baba pan Khel Khel mein picture pahatana jhople hote :D thanks for comment.
ReplyDelete