बदल हा प्रत्येक गोष्टीत होतो. शहर बदलले की, देश बदलला की. माहेराहून सासरी आल्यावर सुद्धा ! आपण जिथे काम करतो ते ऑफिस बदलले की ! कितीतरी गोष्टी आहेत. तर हा बदल माझ्या बाबतीत कसा होत गेला त्याचे हे पुराण ! तुमचे पुराण पण वाचायला आवडेल की ! तर पहिल्याप्रथम मला विळीवर चिरायला खूपच आवडते. खाली फरशीवर बसून विळीवर कोणतीही भाजी मला बारीक चिरायला आवडते. अगदी धारदार विळी असली तरीही ! विळीकडे न बघता एकीकडे टीव्ही बघत बघत काकडी चोचवत असे. जेव्हा अमेरिकेला जायची वेळ आली तर तिथे कशी काय विळी न्यायची बुवा ! तर अंजली आली की धावत माझ्या मदतीला. अंजली चॉपरचा बॉक्सही होता. त्यासकट भरला की वो सामानात मी ! आन काय सांगू अंजलीच्या ल ई म्हंजी ल ई च प्रेमात पडले मी. एकदा मोठे कलिंगड कापताना अंजली चॉपर तुटला. १०/१२ वर्षाची साथ होती तिची नि माझी. मग काय आता सुरीने कापणे आले. सुरीची पण छान सवय झाली ती आजतागायत. सुऱ्या पण २ - ४ प्रकारच्या आणल्या. एक भाजी चिरायला, कलिंगड, टरबूज कापायला धारदार सुरी. ब्रेडचे सॅंडविच कापायला छोटी सुरी. दरम्यान एक फूड प्रोसेसर आणला भाज्या चिरायला. त्यात कांदा, बीन्स, सिमला मिरची असे काही कापून बघितले. त्यात कणिक पण मळता यायची. पण रोजच्या रोज कोण धुणार याला. कणिक तर इतकी काही म उ म उ व्हायची की त्याच्या पोळ्या कच्च्या व्हायच्या. आणि एक दिवस मोडला की वो ! त्यात इडलीसाठी पीठ बारीक करायला घेतले आणि संपल की वो सगळं. इतक काही बी वाईट वाटलं न्हाई मला.
मला दुध दुभतं जपायच भारी वेड होतं. वारणा - गोकुळ चे दूध. त्यावर येणारी जाड साय. घुसळलेलं ताक, पांढरे शुभ्र लोणी, आणि कणिदार तूप ! अमेरिकेत येताना मी रवि आणली होती बरोबर ताक घुसळायला. पहिल्यांदा कॅन मधले दूध पातेल्यात तापवलं. सायीचा पत्ताच नाही की वो ! इंडियन स्टोअर जवळ नाही देशी तूप आणायला. मग एका मैत्रिणीने इथल्या बटरचे तूप बनते असे सांगितले आणी तेव्हापासून तूप बनवण्याचा प्रश्न मिटला. आणि खरे सांगू का मी इंडियातल्या सारखे खाली रहाणाऱ्या एका तेलगू मैत्रिणीकडून विरजण लावायला दही आणले होते. ती माझ्या सारखीच. तिच्याकडे दही पाहिजे म्हणजे पाहिजेच. मी घरी विरजण लावून दही बनवायचे अगदी इंडिया सारखेच ! बरेच वर्ष असे घरचे दही लावले. नंतर मात्र विकत आणायला लागले. इथे दह्याचे बरेच प्रकार मिळतात. मला डॅननचे दही आवडले. आणि आता नॉन फॅट दही आणायला लागलो. मला दही खायला इतके काही आवडत नाही. कोशिंबीरीसाठी जास्त वापरते.
नंतर काही वर्षांनी मला दूध पचेनासे झाले आणि मी लॅक्टोज free दूध प्यायला लागले. चहाचेही तसेच झाले. आधी इंडियन स्टोअर जवळ नसल्याने डिप डिप चा चहा प्यायचो. नंतर त्यातली भुकटी काढून ती पाण्यात घालून चहा उकळायचे. इलेक्ट्रिक शेगडीवर चहा व्हायला खूपच वेळ लागायचा. एका मैत्रिणीने सांगितले की मायक्रोवेव्ह मध्ये चहा होतो. तेव्हापासून आजतागत मी मायक्रोवेव्ह मध्येच चहा बनवते. आधी डिप डिपचा आणि आता चहाची पूड घालून !
क्रमश : ...
...क्रमशः... नक्की पुढे वाचायला आवडेल! मजा आली. नेहमीप्रमाणे!! :-) 'गोकुळ'चं ही आता 'टोन्डमिल्क' आलंय. त्याला साय फारशी येत नाही. नेहमीच्याला उत्तम साय, मग त्याचं लोणी, तूप... - इति पत्नी मेघा. एकूणच मजा आली वाचतांना. धन्यवाद.
ReplyDeleteAnek dhanyawaad pratisadabaddal !! milind ji, tumhi majhe lekh vachta aani pratisad deta tyamule lihiycha utsah vadhto !! bhag 2 lihila aahe,, aata upload karte.
ReplyDelete