Friday, October 07, 2022

बदल, तुलना आणि बरच काही ..... (2)

 

अमेरिकेत येताना स्टीलचा देव्हारा, त्यावर छत्री असलेला घेऊन आले. सहाण खोड गंध उगाळायला आणले होते. सुरवातीला मी गंध उगाळत असे. पण आता फक्त हळदी कुंकू लावते. इथे सुवासिक फुले मिळत नाही. इंडियन स्टोअर मध्ये सर्व काही मिळते पण आम्हाला इंडियन स्टोअर खूपच दुरवर असल्याने काही गोष्टींसाठी इथल्या अमेरिकन स्टोअर मध्ये हिंडले. त्यात मला कापूस आणि काडेपेटी या गोष्टी Dollar General मध्ये मिळाल्या. कापूस वात करण्यासाठी व काडेपेटी निरांजन लावण्यासाठी. इंडियन स्टोअर दूरवर असल्याने काही गोष्टी आठवणीने आणायला लागायच्या. त्यात मी कुंकू आणले होते म्हणजे हळदी कुंकवातले कुंकू. इथे आल्यावर सुरवातीला मी डाळी ठेवायला जे डबे केले होते प्लॅस्टीकचे ते अजूनही आहेत. प्रोटीन पावडर आम्ही दोघे दुधातून घेतो. प्रोटीन पावडर संपली की तो प्लॅस्टीकचा डबा धुवून पुसून वाळवून त्यात मी चार प्रकारच्या डाळी ठेवायला लागले.


भारतात स्टीलचे तसेच हिंडालियमचे डबे होते. त्यात मी गहू, तांदूळ, डाळी ठेवायचे. महिन्यातून एकदा हे सर्व डबे धुवायचे. पालथे घालून वाळवायचे. अर्थात हे काम कामवाली बाईच करायची. मी तिला मदत करायचे. इथे आल्यावर चहा साखरेचे स्टीलचे डबे मी आणले नव्हते. फक्त मिसळणाचा डबा आणला होता. चहा साखर मी डॅननचे दही संपले की ते डबे घासून व वाळवून त्यात ठेवायचे. नंतर प्लॅस्टीकचे डबे आणले. एका मैत्रिणीने तिचे घर इतके काही छान सजवले होते. तिने काहीही प्लॅस्टीकचे विकत आणले नव्हते. इथे आईस्क्रिमच्या बादल्या मिळतात, त्या तिने धुवुन वाळवल्या व त्यात डाळी आणि पिठे ठेवली. इथे भाजके दाणे मिळतात मीठ लावलेले व न लावलेले. सुरवातीला मी इंडियन स्टोअर मधून दाणे आणले. ते भाजले, त्याची साले काढली व कूट केले इंडियन स्टाईल. नंतर मी भाजके दाणे आणून त्याचे कूट करायचे. त्या भाजलेल्या दाण्याच्या डब्यात मी लाल तिखट, हळद, व मीठ ठेवले होते सुरवातीच्या काळात.


तिकडे भारतात राहत असताना दळणाचे डबे असायचे. गहू, ज्वारी , बाजरी, तांदुळ, हरबरा डाळ, अंबोळी, थालिपीठाची भाजणी. ही सगळी पिठे मी ताजी ताजी दळून आणायचे. त्यामुळे थोडे थोडे जसे की १ किलो, बाकीचे सर्व आणि गहू पीठ ५ किलो. इथे आल्यावर सर्व पीठे तयार. ती कधी आणि किती दिवसाची असतील याबद्दल माहिती नाही. भाकरी करण्याचे प्रयोग केले. पण भाकरी थापायला गेले की तुटायची, तव्यावर टाकली तरी तुटायची. त्यामुळे फक्त आणि फक्त पोळ्या. इथे फ्रोजन फूड भरपूर मिळते पण सततचे चांगले नाही.


विल्मिंग्टनला असताना मी रोजच्या रोज दोन्ही वेळेला ताजा स्वयंपाक करायचे कारण की विनायकचे ऑफीस जवळ असल्याने तो दुपारी जेवायला येत असे. १० वर्षे बऱ्याच रेसिपी केल्याने भांडी खूपच पडायची. ब्लॉगवर लिहिण्याकरता मी आठवड्यातून २ वेळा वेगवेगळ्या रेसिपी करायचे. मी भारतात असताना काही वर्षे भांडी घासली. धुणे पण धुतले. पण नंतर कामवाली असल्याने साधा चमचाही विसळला नाही. इथे सर्वजण हातानेच भांडी घासतात डीश वॉशर असला तरीही. एक तर आपल्या स्वयंपाकात फोडणी असते. पोळ्यांनाही थोडे का होईना तेल लावतो. त्यामुळे भांडी नुसती विसळून ती डीश वॉशर मध्ये ठेवून चालत नाही. वास राहतो. आम्ही भांडी हाताने घासतो आणि डिश वॉशर मध्ये पटापट विसळून ठेवतो. वाळून पण निघतात. त्यामुळे डिश वॉशर वापर ताटाळ्यासारखा पण होतो.


दोघच्या दोघं असली तरी भांडी ही पडतातच. २ जणांकरताही भाजीसाठी कढई आणि ४ जणांकरताही. म्हणते ती घासावी तर लागतेच ना ! दिवसातून सकाळ, संध्याकाळ दोघांचा चहा म्हणजे ४ कप, कूकर लावला २ भांडी, सूप सार केले तर ते एक भांड. कणिक मळली, पोलपाट लाटणे. पाणी जरी प्यायचे म्हणले आणि ते भांडे जरी विसळते तरी दिवसातून एकदा घासावे तर लागतेच ना ! अगदी सुरवातीच्या दिवसात प्रत्यक्षातले मित्रमंडळ जमले होते तेव्हा जेवणावळी खूप व्हायच्या. तेव्हा तर खूप भांडी पडायची. तिकडे भारतात कसे दूध, पेपर, वाणसामान सर्व काही घरपोच. शिवाय तिथे धुणे भांडी करायच्या बायका येतात, वरकामाला बाई, स्वयंपाकाची बाई. केराची टोपली घराच्या बाहेर ठेवला की केरवाला येऊन जातो. इथे वन मॅन शो असतो. तुलना ही केली जाते. इकडची आणि तिकडची. गोळा बेरीज सारखीच. इथे आणि तिथे फायदे तोटे आहेतच. Rohini Gore
क्रमश : ...

No comments:

Post a Comment