आजचा दिवस इतर दिवसांपेक्षा खरच खूप वेगळा होता. ठप्प करणारा, गोठवणारा,
हुडहुडी भरणारा. तशी तर थंडीच्या दिवसामध्ये हुडहुडी ही भरतेच पण त्यातून
स्नो फॉल असेल आणि सूर्यप्रकाश नसेल तर शरीराच्या बरोबरीने मन ही अगदी पार
थिजून जाते, गोठून जाते. डोके बधीर होते. अर्थात आमच्या शहरात असे गोठवणारे
दिवस अगदी मोजूनच येतात ते एका अर्थी चांगलेच आहे म्हणा, नाहीतर माझे काय झाले असते कोण जाणे !
वेदर
चॅनलवर मंगळवार दुपारपासून ते बुधवार सकाळपर्यंत हळू हळू करत स्नो पडणार
होता हे वर्तविले होते. त्यामुळे खिडकीबाहेर सारखी बघत होते. आम्ही ज्या शहरात राहतो तिथे आम्हाला ९ वर्षे पूर्ण झाली. त्यामध्ये मोजून तीनदा बर्फ
वृष्टी झाली आहे. २००९, २०११ आणि आता हा आजचा २०१४ चा स्नो फॉल. यामध्ये
यावर्षीचे एक वैशिष्ट्य होते ते म्हणजे हवेतून कापसासारखा स्नो पडणार नव्हता.
आईस पडत होता. म्हणजे रिमझिम पाऊस कसा पडतो तसा पाऊस पडून तो खाली जमिनीवर
पडला की त्याचे बर्फात रूपांतर होत होते. आज बुधवारी सकाळी प्युअर स्नो
पडणार होता. तापमान मायनस १० दिवसभर. हिटर लावून सुद्धा भागत नव्हते. काल
रात्रीपासूनच दरवाजा उघडून आणि खिडकीतून डोकावत होते. खाली पडणारा बर्फ
साखरे सारखा दिसत होता. ग्रॅन्य्लेटेड शुगर सारखा.
हातात गोळा केला तेव्हा आणि वाटीत भरला असता तर कोणालाही वाटले
असते साखर
ठेवली आहे कि काय? रात्रभर अगदी थोडा थोडा पडत होता. मनात म्हणत होते एकदा
दणादणा पडू दे ना, हा काय अगदी स्लो लोकलसारखा डकाव डकाव करत पडत आहे.
अधूनमधून रात्रीही खिडकीतून बघत होते. नंतर थोड्यावेळाने झोप लागली आणि
सकाळी उठून पाहते तर सगळीकडे पांढरे शुभ्र झाले होते. ज्या शहरांमध्ये
सहसा कधी स्नो फॉल होत नाही त्या शहरात कधी नव्हे बर्फ पडला तर भंबेरी उडून
जाते. रस्ता साफ करणारी यंत्रणा नसते त्यामुळे सर्व काही बंद असते. आणि
त्यातून आजचा बर्फ तर घसरडा होता त्यामुळे कोणी बाहेर पडू नका. वरच्या
मजल्यावर राहत असाल तर जिन्याच्या कठड्याला धरून सावकाश उतरा असे सांगत
होते. मी बाहेर जायचा प्रयत्न केला पण भयानक थंडी होती. तरीही पोळी भाजी
करून मफलर जाकिट, जीन्स घालून कॅमेरा घेऊन खाली अगदी सावकाश उतरले. तळ्यावर
गेले. काही फोटो काढले. सारे काही ठप्प होते. एखादा चुकार माणूस
रस्त्यावरून जात होता. बदकेही बर्फाच्छादित जमिनीवर बसून डुलक्या घेत होती.
चिटपाखरू नव्हते. एखाद दुसऱ्या माझ्यासारख्या उस्ताहित बायका सर्व अंगभर
लपेटून बाहेर पडल्या होत्या.
खरे तर मला स्नोचे काही ना काही
बनवायचे होते पण स्नो नेहमीसारखा भुसभुशीत
नसल्याने बनवणे राहून गेले. चालताना जाणवत होते. जमिनीवरचा स्नो खूप कडक होऊन
बसला होता. आणि त्यामुळेच घसरण्याची शक्यता जास्त होती. आज दिवसभर तसे
कंटाळ्यासारखे झाले होते. कंटाळा घालवण्यासाठी काहीतरी चमचमीत खायला करू
असा विचार केला पण काय करायचे? पोटॅटो फ्राईड, बटाटा कीस की कांदा भजी.
शेवटी पोटॅटो फ्राईड केले. हल्ली मी तेलकट करणे बंद केले आहे. एक दोन
बटाट्याचे पोटॅटो फ्राईड केले पण ते चांगले झाले नाहीत. म्हणून लगेच आवरते
घेतले. नंतर त्याच तेलात नाचणीचे व ज्वारीचे पापड तळले. आणि तेलकट खाऊन
डोके दुखायला लागले. नंतर चहा केला आणि तो सुद्धा नेहमीसारखा मायक्रोवेव्ह
मध्ये केला नाही. पारंपारिक पद्धतीने चहा पावडर घालून, आले किसून , दूध
घालून चांगला उकळून केला. चहा मात्र छान झाला होता. आज दिवसभर बाहेर पांढरे
पांढरे पाहून डोके बधिर होऊन गेले आहे. उद्याही मायनस तापमानच आहे. पण
संध्याकाळ पर्यंत सर्व काही सुधारेल आणि मग परत थंडीच्या दिवसातही पुढच्या
आठवड्यात थोडे हवामान गरम राहील.
हा असा स्नो फॉल एक दोन दिवसच ठीक. मला तर त्या एक दोन दिवसातच नकोसे होऊन
जाते. बंद पेटीत राहून पेटी उघडून बाहेर काय चालू आहे ते बघायलाच फक्त पेटीचे दार उघडे करायचे . अगदी तसेच वाटते मला
या दोन दिवसात. बंद पेटीत, कडेकोट बंदोबस्तात राहिल्यासारखे. मला थंडीतले
मायनस तापमान आवडते अर्थात ते सुद्धा सेल्सिअस मध्ये पण स्नो! नको रे बाबा !
मायनस तापमान मी क्लेम्सनमध्ये असताना एंजॉय केले आहे. त्यावेळेला मला
पहिली नोकरी एका चर्चमध्ये लागली होती. सुरवातीला कार नव्हती. त्यामुळे मी
सकाळी ७ ला चालत चालत चर्चमध्ये जायचे. २० मिनिटे लागायची पोहोचायला. सर्व
जामानिमा करून चालत सुटायचे. खूपच मजा यायची. चालताना तोंडातून वाफा
यायच्या. आणि मायनस तापमानात कोवळी सूर्यप्रकाशाची किरणे आणि स्वच्छ सुंदर
हवा खूप सुखावून जायची.
No comments:
Post a Comment