Sunday, January 19, 2014

१९ जानेवारी २०१४

आज बरेच बरेच दिवसांनी रोजनिशी लिहित आहे. आज लिहाविशी वाटली याचे कारण आजची संध्याकाळ खूप सुंदर गेली. थंडीचे दिवस असल्याने तसे बाहेर फिरणे किंवा चालणे कमीच झाले आहे. पण जरा कुठे थोडी थंडी कमी वाटली रे वाटली की लगेच आम्ही चालायला बाहेर पडतो. शनिवार रविवार पैकी एक दिवस आमचा चालण्याचा असतो. चालण्याची ठिकाणे दोनच ती म्हणजे नदी आणि तळे. या दोन्हीकडे आधी कारनेच जायला लागते. मग कार पार्क करून चालायला सुरवात करायची. उन्हाळ्याचे रोजचे चालणे म्हणजे राहत्या घरापासून बाजूचा असलेला रस्ता. अर्थात त्यावरून जास्त मजा येत नाही पण रोजच्या रोज चालायचेच असे ठरवले तर चांगला आहे. तसे तर पूर्वीसारखे भरपूर चालणे कमीच झाले आहे.






हल्ली मी रविवारी सकाळी संपूर्ण दिवसाचा पोळी भाजी , भात आमटी असाच स्वयंपाक करून ठेवते. काल खूपच थंडी असल्याने बाहेर पडलो नाही. त्यामुळे ग्रोसरी करायची पण राहून गेली होती. आज दुपारी चहा घेऊन कुठे जायचे हे ठरवत होतो. संध्याकाळ लवकर होत असल्याने तळ्याकाठी जायला तसे थोडे नको वाटते. तिथे खरे तर चालायला छान आहे पण शुकशुकाट असतो. तसा उन्हाळ्यात पण तिथे जास्त कोणी जात नाही. उन्हाळ्यात तर नदीवर खूप गर्दी असते. लहान मुलांना घेऊन नदीवरच्या पूलावरून सर्वजण चालत असतात. आज थोडे लवकर निघू म्हणजे सूर्यास्त पहिल्यापासून बघायला मिळेल आणि ग्रोसरी घेऊन घरी यायला पण जास्त रात्र होणार नाही असे मी  विनायकला म्हणाले. आम्ही दोघे चहा पिऊन लगेचच निघालो. खूप लवकर जातोय का आपण? असे मी म्हणाले,  पण जाऊदे, आता निघालोय ना.! नदीजवळच ग्रंथालय आहे तिथे पुस्तके परत केली आणि नदीवरून चालायला सुरवात केली. आकाश निरभ्र होते. आकाशात ढग असले की निरनिराळे रंग आकाशात तयार होतात. आज तसे काहीच झाले नाही. सूर्यास्ताला पण वेळ होता. चालण्याची फेरी पूर्ण केली आणि आईस्क्रीम खाल्ले. सूर्य हळूहळू खाली सरकत होता. अर्थातच सूर्यास्ताचे फोटो काढले. निळे आकाश त्याचे पाण्यावरचे निळे प्रतिबिंब आणि सूर्य अस्ताच जात आहे. अस्तास जात असताना त्याचे पाण्यातले प्रतिबिंब, त्याची सूर्यकिरणे असा एकूणच सूर्यास्ताचा फोटो खूप छान आला त्यामुळे आनंद झाला. ग्रोसरी केली. आणि आमच्या गावात असलेल्या एका दुकानात जिथे थोडे भारतीय किराणाही ठेवलेला असतो तिथे गेलो तर चक्क मला पाणी पुरीचे एक पाकिट दिसले. ९ वर्षात पहिल्याप्रथमच ! त्या पाकीटामध्ये ३० पुऱ्या आहेत त्यामुळे एकदा दही बटाटा पुरी करणार आहे.







आज त्या दुकानात जाऊन गुळाच्या छोट्या ढेपाही घ्यायच्या ठरवल्या होत्या. कारण की फेसबुकावर मी एक छान गुळाच्या पोळीचा फोटो पाहिला आणि मला आता जाम इच्छा झाली आहे गुळाच्या पोळ्या करून खाण्याची. बोअर काम आहे पण बघू कधी होतायत ते. काही वेळेला संध्याकाळ नाहीतर काही वेळेला पूर्णच्या पूर्ण दिवस इतका काही छान जातो की अगदी कायम लक्षात राहतो. तशीच आजची एक संध्याकाळ होती. आणि त्यामुळे आजच मला रोजनिशीची आठवण होऊन लगेच रोजनिशी लिहिली गेली.

2 comments: