Tuesday, August 30, 2011

आयरीन (Irene)

आयरीन नावाचे वादळ येणार आहे, म्हणता म्हणता येऊन थडकले की! हवामानाचा अंदाज सारखे सारखे वर्तविणारे दोन चॅनल्स पाहत होतो, एक म्हणजे १४ न्युज डॉट कॉम आणि वेदर डॉट कॉम. वादळाचा गोल गोल फिरणारा गोळा हळूहळू पुढे सरकत होता. साऊथ कॅरोलायनातून सरळ रेषेत cape hatteras, nc वर हे वादळ सरळ सरळ येऊन आदळणार होते. wilmington शहरात घुसणार नव्हते तरी खूप जवळून जाणार होते हे माहित होते पण तरीही.... त्याने अचानक दिशा बदलली तर ...?? म्हणजे थोडे जरी डावीकडे सरकले तर थेट आमच्याकडेच की! बातम्या त्याच त्याच असल्या तरी बघितल्या जात होत्या.




एक दोन वर्षापूर्वी एक वादळ थेट आमच्या शहरात घुसणार होते, ते सुद्धा मध्यरात्री! म्हणून आम्ही जागे होतो, ऐनवेळी त्याने दिशा बदलली आणि ते दुसरीकडे निघून गेले! माझा तर मूडच गेला. या wilmington शहरात ना कधीही काहीही होत नाही! अति वृष्टी नाही, हिमवृष्टी तर नाहीच नाही, पण गेल्यावर्षी ती अनुभवाला आली आणि त्याचा आनंद लुटला. अर्थात कोणतेही तीव्र हवामान नाही! हे चांगलेच, नाही का!?



आमच्या शहराच्या जवळून जाण्याचा वादळाचा दिवस व त्याच्या आदल्या दिवशीचे हवामानाचे वेळापत्रक सारखे बघून बघून तोंडपाठ झाले होते. चक्रासारखे फिरणारे गोल गोल व त्यामध्ये हिरवे पिवळे लाल पट्टे (वादळाची तीव्रता दर्शवणारे) सरकत सरकत नक्की वादळ कुठे पोहोचले आहे हे समजत होते. काय काळजी घ्या, काय करा, काय नको हे पण वारंवार सांगत होते.




शनिवारी पहाटे वादळ येणार तर शुक्रवार सकाळपासूनच आकाशात ढग जमले होते, वारा वाहत होता, पाऊस पडत होता. अधुनमधून सर्वजण थांबतही होते. शुक्रवार सकाळी फुकटची कामे बाजूला सारून महत्त्वाची कामे उरकाल्यला घेतली. कॅमेराची बॅटरी संपली होती ती चार्जिंगला लावली, वादळाचे फोटो काढण्याकरता! होते नव्हते ते कपडे धुवायला वॉशिंग मशीन सुरू केले. दुपारचा स्वयंपाक केला, त्यात भाजी जास्तीची करून ठेवली. वरणभाताचा कूकर लावला. परत थोड्या बातम्या बघितल्या. नेटवर इकडे तिकडे चकरा मारल्या. पाऊस व वारा वाढत होता. बातम्या बघून बघून डोके दुखायला लागले होते. सर्व काही टर्न ऑफ करून झोपले. ४ वाजता उठल्यावर फेसबुक पाहिले तर अवनीचा निरोप, अगं बातम्यांमध्ये wilmington red alert दाखवत आहे, काळजी घे गं!... अरेच्या, बघते गं परत बातम्या म्हणून परत बातम्या सुरू केल्या. वादळाचे गोल चक्र wilmington च्या जवळ येत चालले होते. जास्तीचा स्वयंपाक करायचा कंटाळा आला होता आणि उत्साह पण नव्हता. बातम्या बंद करून मेघनाशी फोनवर बोलले व परत एकदा कामाला लागले. पिण्याचे पाणी होतेच, फळेही होतीच, फक्त ब्रेड व थोडे अजून जास्तीचे पिण्याचे पाणी आणून ठेवावे का? असे ठरवून गेलो तर दुकान बंद! अर्थात अडीत काहीच नव्हते.




संध्याकाळी खायला भाजणीचे थालिपीठ केले होते त्यात अजून एक दोन थालिपीठे जास्तीची लावली. रात्री आमटी व पोळ्या केल्या. आमटी जरा जास्त उकळली. पाऊस व वारा वाढत होता. लाईट गेले तर टेबलावर काडेपेटी व मेणबत्ती काढून ठेवली होती. मेणबत्ती जाड व बुटकी म्हणजे ती सहज बसते कोणत्याही बेसवर. परत एकदा बातम्या बघून झोपलो. यावेळी मात्र गोल गोल चक्रातले हिरवे, पिवळे व लाल पट्टे wilmington शहर ओलांडून जात आहे असे दिसले. चला झोपा आता! आले वादळ! तयारी तर सर्व करून ठेवली आहे. झोपले तर खिडकीच्या बाहेरून घों घों असा आवाज, मधून पावसाचा आवाज. झोपायचे होते पण काही केल्या झोप येईना! एक दोन वेळा नेटवर चक्कर मारून परत पीसी टर्न ऑफ केला. मध्यरात्री नंतर साधारण २ ते ३ च्या सुमारास वाऱ्याचा गोंगाट खूपच वाढला. बाहेरची झाडे जोरजोरात हलत होती. खिडकीच्या काचेतून दिसतही होते. जाणवत होते वादळ अगदी जवळ आले आहे ते! प्रचंड प्रमाणात गरम होत होते! छातीवर दडपण आल्यासारखे वाटत होते. पीसी ऑन केला तर मैत्रिणीचा फेसबुक वर निरोप, काय गं वारापासून कसा आहे? तिला सांगितले, हो गं बराच वाढलाय! असा निरोप लिहिला आणि बाहेर एकदम काळाकुट्ट अंधार दिसला. लगेच कळाले की लाईट जाण्याच्या मार्गावर आहेत. पीसी बिघडायला नको म्हणून लगेच टर्न ऑफ केला आणि काही क्षणातच पूर्ण लाईट गेले.



काळाकुट्ट अंधार! वाऱ्याचा घों घों असा आवाज. काचेतून बघावे तरी काळाकुट्ट अंधार! खिडकीबाहेरचे झाड खूप खाली वाकत होते, परत वर येत होते. वाऱ्याने त्या झाडाला खूपच सतावून सोडले होते. आता थोड्याफार विजाही चमकत होत्या. ओट्यावर व बाथरूम मध्ये मेणबत्या लावून ठेवल्या. स्वयंपाकघरात आले तर तिथे पाणीच पाणी झाले होते. साधारण पाऊल भिजेल इतपत पाणी बंद दारातून शिरले होते. दारावरही कोणीतरी थडथड आवाज करत आहे हे जाणवत होते. खूप नाही तरी किंचित रडकुंडीला आल्यासारखे झाले. जोपर्यंत लाईट आहेत तोपर्यंत काही जाणवत नाही पण एकदा का लाईट गेले की सर्वकाही ठप्प!!! सर्व जगाशी संपर्क तुटतो आणि एकटेपणाची भावना वाढते. हा एकटेपणा दोन तीन तासच टिकला. जशी सकाळ झाली तसा सूर्य वर आला आणि पूर्ण ढगाळलेल्या आकाशातून सुद्धा सर्व काही दिसायला लागले. हॉलमध्ये येऊन पडदा बाजूला सारला. पाउस व वारा यांचा खेळ चालूच होता. दार अगदी थोडे उघडून पाहिले तर वाऱ्याचा प्रचंड जोर! इतका की बाहेरचा वारा आत येऊन तुम्हाला तुमच्याच घरात उताणे पाडेल इतका! जोर करून परत दार लावून घेतले. फडक्याने घरात आलेले थोडे पाणी पुसून घेतले व फडके पिळून टाकले. कॉटवर आडवे पडण्याशिवाय काहीही करता येत नव्हते. उठल्या उठल्या चहा लागतो. गरम चहा नाही! मग थोडीशी साखर खाल्ली. परत आडवे पडलो, डोळे मिटून शांत! आठ नऊ वाजता भूक लागल्यावर थोडी बिस्कीटे व सफरचंद खाल्ले. लाईट नाही तर चहा नाही, अंघोळ नाही. विनायक पुस्तक वाचत होता. मी तशीच कॉटवर आडवी पडून राहिले. रात्रभराच्या जागरणाने थोडीफार गुंगी येत होती. परत उठून काचेतून वाऱ्याला आणि पावसाला बघत होते. १ वाजता जेवणे केली व परत दार उघडले. वारे होतेच पण जोर बराच कमी झाला होता. जाकिट घालून व ब्रेड घेऊन खाली तळ्यावर एक चक्कर मारून आले. वारा बऱ्यापैकी जोराचा होता! काही बदके आली ब्रेड खायला. काही तळ्याच्या दुसऱ्या काठावर बसली होती. बदकांचे पाय चालताना सरकत होते, पंख उडत होते.



लाईटची वाट पाहता पाहता शेवटी संध्याकाळी ६ ला लाईट आले आणि अगदी जीव आल्यासारखा वाटला. पहिल्याप्रथम चहा करून घेतला. फेसबुकवर अपडेट लिहिले. माझी कॅनडात राहणारी मैत्रिण मोनिका हिचा फेसबुकवर निरोप आला होता की ताई मी तुला फोन करत होते पण फोन लागला नाही. सर्व काही ठीक आहे ना? तिलाही उत्तर पाठवले. अंघोळी उरकल्या. बाहेर चक्कर मारायला गेलो. बरेच ठिकाणी पाणी साचून राहिले होते. जिकडे तिकडे रस्यावर झाडाची बरीच पाने व फांद्याही पडल्या होत्या. आमच्या कारला पण बरीच झाडाची पाने चिकटली होती. कारमधून वालमार्टला जाऊन आलो. बंदकांसाठी ब्रेड घेतला व घरी आलो. रस्ते रिकामे होते. वादळवाऱ्याच्या खाणाखुणा दिसत होत्या पण जास्त नाही. संध्याकाळी वारापाऊस दोघेही थांबले होते. वाऱ्याच्या आवाजाने डोके भणभणायला लागले होते. संध्याकाळी बरीच शांतता होती. तळे तुडुंब भरून वाहत होते. बदकांना ब्रेड घालण्यासाठी तळ्यावर गेले तर नेहमीप्रमाणेच टणाटण उड्या मारत बदके व त्यांची पिल्ले ब्रेड खायला आली. त्यांना मनसोक्त ब्रेड खायला घातला. आकाशही सुंदर दिसत होते. काळ्यानिळ्या ढगांमध्ये बरेच रंगही विखुरले होते. आकाशातील रंगाचे प्रतिबिंब पाण्यावर उमटले होते. आज तळ्यातले पाणी मोरपंखी रंगाचे दिसत होते! रात्री ९ वाजता जेवणे केली व झोपलो ते सकाळी ६- ७ जाग आली. अतिशय शांत सुंदर झोप लागली. सकाळी उठून दार उघडले तर स्वच्छ सुंदर सकाळ उगवली होती!!!!

http://youtu.be/w8bjhftaHCU?list=UUhWLgGIetuZckJWX_fPofRw


6 comments:

Anonymous said...

Khupach chan lihile ahe tumhi Rohini tai! Aaj baryach diwasananter marathi blog vachala, chan vatle. Sundar varnan kele ahe tumhi.
--Meghana Ekbote

संजीव कुलकर्णी said...

चित्रदर्शी वर्णन. वादळात अडकल्यासारखेच वाटले.
अवांतर: तुमच्याकडे बदकांना काही खायला दिले तर (सरकारला) चालते का?

aativas said...

वादळाचा हा पहिला अनुभव का तुमचा?

rohinivinayak said...

Meghana, Sanjeev, Savita, Thanks for your comments! ho, badkanna khayla dile tar ithlya sarkarla chalte. savita, ho, vadalacha maza ha pahilach anubhav aahe :) Thanks to all!!

Nisha said...

Far chan lihilay Rohini tai :)

rohinivinayak said...

thank you Nisha!