उन्हाळा असल्याने गरम तर होतेच, शिवाय त्यातून ३-४ दिवस झाले नुसते ढग येतात आणि पावसाचे नाव नाही. तसा पडतो थोडाफार पण किती अगदी रस्ता भिजेल इतपतच शिंतोडून जातो नुसता. नंतर अजूनच गरम होते, गरम वारे वाहते.
आज उठले आणि चहापाणी झाल्यावर गॅलरीत उभे राहून तळ्यावर एक नजर टाकली तर तळ्याच्या पल्याड पिवळी छोटी बदकपिल्ले दिसली. लगेच कॅमेरा घेऊन खाली गेले तर ती रस्ता ओलांडून समोरच्या बंगल्याच्या हिरवळीवर गेली सुद्धा! पटापट थोडे फोटो घेतले आणि १-२ विडिओ क्लिप्स. कारण की नंतर घेऊ म्हणले की ती काही हाक मारल्यावर लगेच हजर होतील असे नाही ना! सारखी इकडून तिकडे फिरत असतात. पुढे बदकीण आणि मागे तिची १८ -२० पोरे! बदकीण थांबली की पिल्ले थांबतात. तिने चालायला सुरवात केली की लगेच ही पण तय्यार चालण्यासाठी.
कालच विचार करत होते की एका बदकीणीला झालेली पिल्ले आता मोठी झाली आहेत. परत दसरी छोटी पिल्ले दिसायला हवीत आणि लगेच आज दिसली! काय हा योगायोग! ही पिल्ले तर खूपच गोड आहेत! मोठ्या बदकांपेक्षा छोट्या पिल्लांना ब्रेड घालायला मजा येते. विनायक नेहमी मला म्हणतो तू नवीन पिल्ले दिसली की लगेच त्यांच्या मागे धावतेस. तळ्यावर सारख्या चकरा मारतेस आणि जुन्यांना विसरून जाते. मग मी ही म्हणजे नवीन झालेल्या छोट्या पिल्लांचेच जास्त कौतुक होते ना नेहमीच!
आज शनिवार असल्याने बाहेर जेवण असते. हल्ली मेक्सिकन फूड आवडायला लागले आहे. त्याचेही फोटो घेतले. आधी विचार केला की कशाला घ्यायचे फोटो? एक तर आपण नॉन व्हेज खात नाही त्यामुळे बाहेर खाण्याला मर्यादा असतात. पण नंतर विचार केला की जे ही व्हेज डिशेस आहेत त्या सर्वांचेच फोटो घेऊया म्हणजे मग नंतर ते कायमचे स्मरणात पण राहतील. आज लायब्ररीत पण वेगळीच पुस्तके घेतली. जरा चांगली वाटली. आज सबंध दिवस ढगाळ आभाळ आणि गरम हवा. कंटाळा येईल असे वातावरण. गारवा अजिबात नाही. पण तरीही आज पिल्लांमुळे मस्त दिवस गेला. संध्याकाळी काळ्या ढगांचेही फोटोज घेतले. रात्रीचा जेवणाचा असा काही खास बेत नव्हता. आदल्या दिवशीचा आमटी भात मला होता. विनायकला डाळींचे धिरडे जे नेहमीच रात्री असते. आणि म्हणले की जरा पालक भजी करू, बरेच दिवसात केली नाही.
पालक चिरला, धुतला आणि निथळत ठेवला. त्यात डाळीचे पीठ घालून भजी करणार होते तर डाळीचे पीठ थोडेच होते. मग त्यात अजून मैदा घातला. तिखट मीठ आणि थोडी हळद घातली. वेगळे पाणी न घालता पीठ भिजवले आणि चव घेतली तर थोडे जास्त तिखट पडले होते. आता परत पालक चिरून घालण्यापेक्षा मग त्यात कोबी बारीक चिरून घातला व थोडे डाळ वड्याचे पीठ घातले आणि भजी करणार होते. पण आज डोकेही दुखत होते. तेलकट भज्यांनि अजून डोके दुखायला लागेल म्हणून मग त्याचे थालिपीठ लावले. लावले म्हणजे काय तर चक्क हे सर्व भिजवलेले थालिपीठ लावून उरकून टाकावे म्हणून केले तर चक्क थालिपीठ खूप छान बनले. आपोआप एक वेगळी पाककृती बनून गेली.
Saturday, July 09, 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment