साधारण संध्याकाळच्या सुमारास विल्मिंग्टनला येऊन पोहोचलो. एका मित्राच्या घरी राहिलो आणि तिथूनच सकाळी उठून आम्ही आमच्या अपार्टमेंटमध्ये आलो. आमचे सर्व सामान अपार्टमेंट कॉम्प्लेक्सच्या ऑफीस मध्ये आम्ही यायच्या आदल्या दिवशीच येऊन पडले होते. आम्ही तशी विनंती केली होती की प्लीज आमचे सामान ठेवून घ्या. आम्ही लगेचच येत आहोत. अपार्टमेंट वरच्या मजल्यावर होते. घरामध्ये जाण्याचा जिना बाहेरूनच होता. सर्व खोकी, बॅगा, डेस्क टॉप, (computer) टिव्ही, एकेक करत आमच्या अपार्टमेंटमध्ये विनायकने व त्याच्या मित्राने वाहून आणले. मी बाकीच्या छोट्या बॅगा आणल्या. सकाळी सकाळीच जिना चढण्या उतरण्याचा भरपूर व्यायाम झाला. सामान उचलून उचलून अंगदुखीमध्ये आणखी भर पडली. नंतर विनायकने जवळच असलेल्या दुकानातून दूध आणले. चहा साखर, डाळ तांदुळ, कणीक आम्ही आमच्याबरोबरच आणले होते. चहा प्यायल्यावर जरा थोडे बरे वाटले. हॉलमध्ये सर्व सामान होते. थोडावेळ जरा आडवे झालो आणि मग नंतर जवळच असलेल्या पिझ्झा हटमध्ये जेवण करून आलो. एकेक करून परत खोक्यांवर चिकटवलेल्या चिकटपट्या काढल्या आणि सामान काढले. स्वयंपाक घरातले सामान पटापट लावून घेतले. रिकाम्या जागेत परत एकदा नव्याने संसार मांडायला सुरवात झाली.
Wednesday, April 24, 2024
सुंदर माझं घर ..... (७)
या अपार्टमेंट मधले स्वयंपाकघर सी आकाराचे होते आणि मला खूपच आवडले होते. समोरासमोर ओटे आणि दोन ओट्यांच्या मधे इलेक्ट्रिक शेगड्या होत्या आणि त्याखाली ओव्हन. या ओव्हन मध्ये मी शेंगदाणे भाजायचे. एकदा नानकटाई व दोन प्रकारची बिस्किटे पण केली होती, प्रमाण माझे मीच ठरवले, समोरच्या ओट्याच्या कोपऱ्यात आम्ही आमचा मायक्रोवेव्ह ठेवला होता. स्वयंपाकघराला लागूनच हॉल होता आणि या दोघांमध्ये अर्धी भिंत होती. त्यामुळे मला भाजी चिरता चिरता समोर असलेला टिव्ही पहाता यायचा. या स्वयंपाकघराला एक छोटी खिडकी होती. स्वयंपाक करता करता सहजच खिडकीतून डोकावले जायचे. एखाद् दुसरी बाई स्ट्रोलरमध्ये बाळाला बसवून चालत जाताना दिसायची. हॉलला आणि स्वयंपाकघराला लागूनच डाव्या बाजूला दोन मोठ्या बेडरूम होत्या. हॉलच्या एका बाजूला काचेची सरकती दारे होती. ही काचेची दारे आणि प्रवेशाचे दार उघडे ठेवले की, हवा खूप खेळती राहायची आणि म्हणूनच आम्ही एक गुबगुबीत खुर्ची या जागेच्या आणि पर्यायाने खेळत्या हवेच्या मधोमध ठेवली होती. या खुर्चीवर खास हवा खाण्याकरिता म्हणून बसणे व्हायचे.
आमच्या आणि आमच्या शेजारच्या अपार्टमेंटला मिळून मोठी बाल्कनी होती आणि मधोमध जिना होता. काही वेळेला मी जिन्यात बसून चहा पीत रहायचे. उन्हाळ्यात वाळवणं केली, वाळवणं केली म्हणजे अगदी भाततुकलीच्या खेळामधली, 2 बटाट्याचे पापड, 1 वाटीचा गव्हाचा चीक करून त्याच्या कुरडया केल्या. 1 वाटी साबुदाण्याच्या चिकवड्या तर 2 वाट्या तांदळाच्या फेण्या करून वाळवल्या. फेण्या करण्याकरता जो स्टॅंड लागतो तो माझ्याकडे नाहीये म्हणून मी कूकरची भांडी उपडी करून तांदुळाच्या पिठाची पापडी गिरवली होती. या घरात आम्ही सर्व जरूरीपुरते लाकडी सामान विकत घेतले. हॉल मध्ये सोफासेट, त्याला लागूनच एक गुबगुबीत खुर्ची. सोफ्याच्या समोर एक छोटे कपाट की ज्यामध्ये वर मोठा टिव्ही ठेवला होता व त्याखालच्या कप्यात व्हीसीआर व त्या खालच्या कप्यात गाण्यांच्या व सिनेमांच्या कॅसेटी, जास्तीचे बल्ब व इस्त्री पण ठेवली होती. मास्टर बेडरून मध्ये मोठा बेड, एक कपाट ज्याला एक मोठा आरसा होता. दुसऱ्या बेडरूम मध्ये एक कॉट होती. कॉटच्या शेजारी चाक असलेले टेबल ज्यावर डेस्कटॉप होता आणि टेबलाच्या उजव्या बाजूला सीपीयु ठेवला होता. शिवाय डेस्कटोपच्या बाजूला एक प्रिंटरही ठेवला. हॉलमधल्या सोफ्याच्या मागे ६ जणांचे डायनिंग टेबल व ६ खुर्च्या होत्या. त्याला लागूनच एक ट्रेड मिल आणली होती. या घरात वॉशर ड्रायरचे कनेक्शन होते त्यामुळे वॉशर-ड्रायर धुणे धुण्याकरता विकत घेतले होते.
या घराच्या मास्टर बेडरूम मध्ये एक अडगळीची खोली होती. त्यात मी भारतावरून आणलेल्या ४ बॅगा ठेवल्या होत्या. त्यानंतर तिथे एकेक करत गोष्टी साठत गेल्या. त्यामध्ये वापरते असले तरी डिव्हिडी, वीसीअर, टिल्लू टिव्ही, बिघडलेला मिक्सर, फूड प्रोसेसर वगैरे. दुसऱ्या बेडरूम मध्ये जे भिंतीतले कपाट होते तिथल्या दांडीवर आमचे सर्व कपडे लटकवलेले असायचे. खाली एका खोक्यात मी बरेच प्लॅस्टीकचे डबे व बरण्या ठेवत असायचे. इथे सर्व प्लॅस्टीकच्या डब्यामध्ये मिळते त्यामुळे त्यातले काही संपले की तो डबा मी स्वच्छ करुन ठेवायचे. फेकवत नसे. आम्ही बाहेरगावी फिरायला गेलो की मधे वाटेत पोळी भाजी, लाडू चिवड्यासाठी या डब्यांचा मला खूप उपयोग व्हायचा. उन्हाळ्यात आम्ही ढोली कलिंगडे आणायचो. ती कापून ठेवण्याकरताही या डब्यांचा मला उपयोग होत असे.
घराच्या प्रत्येक खोलीत सीलिंग फॅन होते. सीलिंग फॅन आमच्या दोघांसाठी खूप महत्त्वाचे होते. ऐन थंडीत हिटर लावलेला असतानाही डोक्यावर फिरणारा पंखा आम्हाला हवाच असतो आणि म्हणूनच मला हे घर जास्त आवडले होते. घराच्या दोन्ही बाजूला बाल्कन्या आणि खेळती हवा ही तर अजूनच मोठी जमेची बाजू होती. स्वयंपाकघराला लागून जी बेडरूम होती ती पुढे पुढे माझीच होऊन गेली होती. तिथे बसून मी जे काही सुचेल ते लिहायचे. कधीकधी मध्यरात्री उठून या दुसर्या बेडरूममध्ये यायचे. कंप्युटर वर याहू मेसेंजर डाऊनलोड केला होता. मनोगत या संकेतस्थळावरून व ऑर्कुट वर झालेल्या मैत्रिणींशी भरपूर गप्पा व्हायच्या. या बेडरूमच्या बाहेर अनेक हिरवीगार झाडे होती. पहाटेच्या सुमारास या झाडांवरच्या पक्ष्यांंची किलबिल सुरू व्हायची. खिडकीतून बाहेर पाहिले, तर काही वेळेला आकाशात रंग जमा झालेले असायचे. मग लगेच मी कॅमेरा घेऊन बाल्कनीत उभे राहून सूर्योदय होण्याची वाट पाहत बसायचे. बाल्कनीत उभे राहिले की, उजव्या बाजूला सूर्योदय दिसायचा, तर डाव्या बाजूला सूर्यास्त. दुपारच्या वेळी हॉलमधल्या सोफ्यावर बसलेली असताना काही वेळा अंधारून यायचे आणि मुसळधार पावसाला सुरुवात व्हायची. सरकत्या काचेच्या दारातून मुसळधार पावसाला बघत राहायचे मी. या दोन्ही बाल्कन्यांच्या कठड्यावर अनेक पक्षी येऊन बसत. या घरातला हॉल इतका मोठा होता की, रात्रीच्या जेवणानंतर बाहेर जायचा कंटाळा आला की, हॉलमध्येच शतपावली घातली जायची.
याच घरात आमच्या लग्नाची २५ वर्षे पूर्ण झाली. त्यादिवशी मी पुरी, बटाट्याची भाजी, भजी, शेवयाची खीर आणि ओल्या नारळाची चटणी असा बेत केला होता. त्यादिवशी सकाळपासून रात्रीपर्यंत आमच्या दोघांच्या आवडीचा पाऊस झिमझिमत होता. एका वर्षी खूप हिमवृष्टी झाल्याने जिन्यात बराच बर्फ साठला होता. खाली उतरण्यासाठी कठड्याला धरून भुसभुशीत बर्फात पाय रोवून सावाकाशीने उतरले आणि जिन्याच्या एका बाजूला बर्फाची बाहुली, माणूस आणि बाई बनवली. पानगळीच्या सीझन मध्ये इथे काही झाडे पानांचा रंग बदलतात. एकदा एका झाडाखाली बरीच पाने पडलेली दिसली. खाली उतरून प्रत्येक रंगाचे एकेक पान घेऊन घरात आले आणि डिशमध्ये ठेवले. लगेचच एक कल्पना सुचली की हीच पाने दोऱ्यात ओवली तर ! पाने दोऱ्यात ओवली आणि ते पानांचे तोरण मी दाराला लावले. या घरात आलो तेव्हा मनोगत या नावाचे मराठी संकेतस्थळाचे आम्ही दोघे सदस्य झालो. या संकेतस्थळावर अनेक कविता, लेख, चर्चा येत. मनोगतावर रोजचे वाचणे सुरू झाले. मला आवडलेल्या लेखांवर, कवितेवर मी प्रतिसाद देत असे. नंतर तिथे पाककृती विभाग सुरू झाला आणि माझे रेसिपी लेखनही सुरू झाले. नंतर मी अमेरिकेत आलेले अनुभव व भारतातल्या आठवणी लिहायला सुरवात केली. त्यानंतर माझे दोन ब्लॉग सुरू करून तिथेही लिहायला लागले. याहू मेसेंजर वर मनोगतावरचे आणि ऑर्कुटवरचे मित्रमैत्रिणी जमा झाले. हे सर्व भारत,अमेरिका, जर्मनी, इंग्लड मधले होते. साधारण ७० ते ८० मराठी मंडळ जमा झाले होते.
सकाळी उठल्या उठल्या आम्ही जेव्हा कंप्युटर ऑन करायचो तेव्हापासून ते रात्री झोपेपर्यंत कोणी ना कोणी बोलत असायचे. त्यामुळे आम्हाला आम्ही एकटे आहोत असे अजिबात जाणवले नाही. विल्मिंग्टन मध्ये भारतीय अगदी क्वचित दिसायचे.
प्रत्यक्षातले मित्रमंडळ १० वर्षे झाली तरीही नव्हते. विनायकचे ऑफीस कारने मोजून ५ मिनिटांच्या अंतरावर होते त्यामुळे तो घरी जेवायला यायचा.
ऑर्कुटवरच्या दोन ग्रुपवर होते ते डिपेंडंट विसा वर असणाऱ्या बायकांचे होते. या दोन्ही ग्रुपची मी सदस्य असल्याने तिथे जेव्हा काही पदार्थांच्या पाककृतींची विचारणा व्हायची तेव्हा मी माझ्या ब्लॉगवरच्या त्या पदार्थांची लिंक द्यायचे. तिथे मी पाककृती स्पर्धेत भाग घेत होते. एका ग्रुप मध्ये माझी इडली विजेती ठरली व इतर काही पदार्थ उपविजेते ठरले. अजून २ गाण्यांच्या ग्रुप मध्ये आम्ही दोघेही सदस्य होतो. तिथे रोजच्या रोज गाण्यांची थीम असायची. त्या थीमनुसार युट्युबवरच्या गाण्यांची लिंक द्यायचो. त्याकरता आमच्या दोघांची हजारोंनी गाणी युट्युबवर बघितली गेली.याच घरात छोटे वादळ आले होते आणि काही सेकंदाचा भुकंपही अनुभवला. या घरात टिव्ही खूप पाहिला गेला. डीश नेटवर्क घेतल्याने अमेरिकन्स चॅनल सोबत आम्ही भारतीय ३ चॅनल्स घेतले होते. सोनी, झी सिनेमा आणि सहारा वन. तिथल्या काही मालिका मला अजूनही आठवत आहेत. त्या अनुक्रमे "एक लडकी अंजानी सी" " हरे काँच की चुडियाँ" "वो रहनेवाली महलोंकी" "साँस बिना ससुराल" "वैदेही" शिवाय झी सिनेमावर हिंदी सिनेमे पाहण्यातही छान वेळ जायचा. या घरातल्या स्वयंपाकघरात सणासुदीच्या दिवशी साग्रसंगीत पदार्थ केले जायचे आणि नैवेद्याचे ताट वाढून मी फोटोकरिता हॉलमध्ये यायचे. हॉलमध्ये असलेल्या गुबगुबीत खुर्चीवर ताट ठेवून फोटो काढायचे. पदार्थांचे फोटो काढण्याकरिता हा स्पॉट जणू ठरूनच गेला होता. कालनिर्णय वर कोणता सण आहे ते बघायचे आणि त्यादिवशी आमच्या घरातले वातावरण सणमय होऊन जायचे. उठल्या उठल्या आवरून सणाच्या तयारीला लागायचे. त्यादिवशी मी सणासुदीला शोभतील असे पदार्थ करायचे. स्वैपाक करताना दोन्ही ओट्यांवर पसारा असायचा माझा. काकडी चोचवताना सोललेली सालं, एका ताटात उकडलेले बटाटे करून त्याच्या फोडी, मिक्सर वर केलेली चटणी. भज्यांची कढई, एका परातीत पुऱ्यांची कणीक, खीरीचे पातेले असे पसारा घालून नैवेद्याचे एका ताटात वाढून फोटो काढायला सज्ज असायचे. दुपारच्या जेवणाला विनायक घरी यायचा आणि म्हणायचा वाढ मला, जेवून लगेच निघायचे आहे. मी म्हणायचे एक दोनच मिनिटं, नैवेद्याच्या ताटाचा फोटो काढते आणि तेच ताट तू घे. जेवून लगेचच विनू ऑफीसला जायचा व माझेही जेवण होत आलेले असायचे. नैवेद्याच्या ताटाचा काढलेला फोटो आधी ओर्कुट व नंतर फेबूवर टाकायचे. नंतर थोडी पलंगावर पाठ टेकायचे. २ तास विश्रांती घेऊन मग ओट्यावरचा पसारा आवरून,ओटा घासून पुसून स्वच्छ करायचे व भांडी घासून डीश वॉशरला लावायचे. नंतर मायक्रोवेव्ह मधून बनवलेला चहाचा एकेक घोट घेतला की जरा तरतरी यायची. रात्रीच्या जेवणाला दुपारचे जे उरलेले असेल ते बघून थोडा भात लावायचे. आईला फोन करून काय काय केले तेही सांगायचे. तिलाही आनंद व्हायचा.
विल्मिंग्टन पासून भारतीय वाणसामानाचे दुकान खूपच दूरवर असल्याने मी २/३ महिने पुरेल असे सर्व सामान आणून ते ओट्याच्या वर असलेल्या कपाटांमध्ये भरून ठेवायचे. अगदी गोटा खोबऱ्यापासून ते चिंच गूळ, चुरमुरे, फरसाण सर्व काही. त्यामुळे मी घरच्या घरी सर्व काही करत असे. भेळपुरी, रगडा पॅटीस, इडली सांबार, मसाला डोसा, दिवाळीतले सर्व पदार्थही करत होते. पाणीपुरीच्या पुऱ्या करायची मात्र हिंम्मत झाली नाही. २००५ सालापासून ते २०११ पर्यंत मी एकेक करत सर्व पदार्थ केले. पदार्थाची कृती मनोगत व ब्लॉगवर लिहायचे व सोबत त्या पदार्थाचा फोटोही अपलोड करायचे. एकदा घरी चक्का पण केला होता. विरजण लावलेले दही कॉटनच्या कपड्यात ओतून ते कुठे लटकवायचे हे काही केल्या कळत नव्हते. शेवटी सुचले की इस्त्री करायचा बोर्ड होता त्याच्या खालच्या लोखंडी पट्यांवर ते टांगले आणि खाली पातेले ठेवले.खाण्याचे सर्वच्या सर्व पदार्थ माझ्या ब्लॉग वर तुम्हाला वाचायला मिळतील. या अपार्टमेंट कॉप्लेक्सच्या आवारातच एक तळे होते. त्या तळ्यावर माझी रोज एक चक्कर असायची. या तळ्यात अनेक बदके होती. कितीतरी बदकपिल्लांचे जन्म या तळ्यावर झाले. तळ्यावर बगळे, करकोचे व हिवाळ्यात सीगल्स पक्षी यायचे. हे सीगल्स खूपच दंगा करायचे. . या तळ्यात तीन चार मोठाली कासवे व छोटे मासेही होते. या घरात डिजिटल कॅमेराने फोटोग्राफी सुरू झाली आणि हजारोंनी फोटो काढले. सूर्योदय आणि सूर्यास्ताचे फोटो मी हवामानतज्ञ ली रिंगरला पाठवायचे. त्यातले काही फोटो त्याने वेदर शॉट ऑफ द डे मध्ये दाखवले.
याच घरात आमची नवी कोरी करकरीत दुसरी कारही आली. याच घरात विनायकने ग्रीन कार्डसाठी अर्ज केला आणि ६ महिन्यांच्या आत विनायकचे व माझे ग्रीन कार्ड घरी आले. विनायकला Extraordinary Ability या category मध्ये ग्रीन कार्ड मिळाले आणि मी त्याची बायको म्हणून मला. नंतर ५ वर्षानी अमेरिकेचे नागरीकत्वही मिळाले. सुरवातीची ५ वर्षे ऑनलाईन मित्रमंडळींशी गप्पा मारल्या. रेसिपी आणि इतर लेखनही केले. हळूहळू मित्रमंडळ पांगायला लागले. मनोगत या संकेतस्थळावर पूर्वीसारखी मजा उरली नाही. त्यानंतर ऑनलाईन कोर्सेस केले आणि घराच्या बाहेर पडले. पब्लिक लायब्ररीत ३ वर्षे voluntary काम केले. कॉलेज मध्ये जाऊन Paralegal Diploma च्या २ सेमेस्टर केल्या. या घरात अभ्यास करतानाचे दिवस अजूनही आठवतात. पण शिक्षण मध्येच सोडावे लागले. नंतर नशिबाची चक्रे बदलली आणि विनायकच्या दुसऱ्या नोकरीनिमित्ताने आम्ही हेंडरसनविल शहरात आलो. हे शहर उंच पर्वतावर होते. सर्व डोंगराळ प्रदेश होता. आम्हा दोघांना निसर्ग खूप आवडतो. त्यामुळे आम्ही या शहरात खूपच रमून गेलो होतो. डोंगरमाथ्यावरच्या घरातील आठवणी घेऊन येईनच. तोपर्यंत वाचत रहा. Copy Right - Rohini Gore
क्रमश : ...
No comments:
Post a Comment