मला विचित्र खोकला सुरू झाला, दम लागायला लागला आणि श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. २०२० साली जानेवारीत मला असेच झाले होते. मी निपचित पडून होते. अन्नावरची वासना गेली होती. खोकला, आणि श्वास घ्यायला त्रास. ८-१० दिवस घरगुती उपाय करून पाहिले. गरम पाणी, आलं घालून चहा, कफ सिरप, काही केल्या बरे वाटेना म्हणून मग डॉक्टर अर्चना जोशी कडे गेलो तिने मला न तपासतास सांगितले की तुला ब्रोंक्याटीस अस्थमा आहे. तिने मला ८ दिवसाच्या अंटिबायोटीक लिहून दिल्या. आणि एक औषध लिहून दिले ते तोंडाद्वारे नेब्युलाईझरने घ्यायचे. ते औषध फुफूसात जाते आणि लंग्ज साफ होतात. दिवसातून २ ते ३ वेळा किमान ५ दिवस तरी घे असे सांगितले. आणि हे औषध कायम १२ महिने घरात असू दे असेही सांगितले. मला खूपच छान फरक जाणवला. तसे तर मी आठवड्यातून १ मैल चालते. हिवाळा सोडला तर इतर महिने आमच्या घराच्या बाहेरच्या आवारात बाके आहेत तिथे किमान तासभर बसते. मोकळी हवा घेते. आठवड्यातून एकदा व्यायाम करते. खूप कामे मी केली आणि मला दमायला झाले तर ते औषध घेते आणि मला लगेचच आराम पडतो. श्वास अगदी छान घेता येतो आणि आवाजही सुधारतो. हे सगळे माहीत होते आणि घरात औषध पण होते. ते घ्यायला सुरवात केली. पण दिवसातून एकदाच. माहीत नव्हते किती वेळा घ्यायचे. डॉक्टरला विचारल्या शिवाय कसे घ्यायचे ना.
माझी अवस्था बिकट होत गेली. इंडियाच्या बॅगा तश्याच पडलेल्या. कफ सिरप घेत्ये, गरम पाणी पित्ये. काही केल्या फरक पडेना. रविवार असल्याने डॉक्टर कडे पण जाता येईना. विनायक म्हणाला मी सोमवारची अपाँटमेंट घेतो. रविवारी मी उठले तर मला चक्कर यायला लागली. माझे डोळे वरच्या छतावर गरागरा फिरलेले मला दिसले. उठून उभी राहिले आणि विनुला हाक दिली, म्हणाले माझा तोल जात आहे. लवकर ये. विनुच्या हाताला धरून मी बाथरूमला गेले, ब्रश केला आणि परत त्याच्या मदतीने कॉटवर येऊन पडले. चहा घेतला. चहाला चव लागलीच नाही. अन्नावरची वासना पूर्णपणे गेली होती. ताप होता. दुधाबरोबर आय-ब्रुफेन घेतली. ही गोळी क्रोसीन सारखीच असते. ताप जातो. अनुभव आहे. विनुने सर्व खोल्यांचा केर काढला. फरशी पुसून घेतली. इंडियाच्या बॅगा क्लोजेट मध्ये टाकल्या. मी डायनिंग वर बसून भाजी चिरली आणि मी सांगेन तशी विनुने भाजी केली. दम लागतच होता. श्वास घ्यायला प्रचंड त्रास होत होता. माझे घरगुती उपाय चालूच होते. सोमवारी सकाळी १० ची विडिओ अपॉइंटमेंट होती. मी उठले आणि विनुला म्हणाले की रात्री १० ची का घेतली. विनु म्हणाला बाहेर उजेड दिसतोय ना तुला. आता सकाळ आहे. रात्री पण मी अशीच काहीतरी असंबद्द बोलत होते. विनुला मी काय बोलतेय कळत नव्हते. घसा व ओठ कोरडे पडले होते. शक्ती पारच निघून गेली होती. २०२० साली मी ज्या डॉक्टर कडे गेले होते ती पण लांबच होती कारने जाण्याच्या. नंतर ब्लड वर्क साठी विनुच्या डॉक्टर कडे गेले होते २०२१ साली. ती पण कारने १ तासाच्या अंतरावर आहे. मला ताप असल्याने डॉक्टर म्हणाली की ऑनलाईन बोल विडिओवर. तिला काय होते ते सांगितले. तिने मला नेब्युलाईझरने जे औषध घेतात ते दिवसातून ३ ते ४ वेळा घे असे सांगितले आणि अंटिबायोटीकचे प्रिस्क्रिपशन फार्मसी कडे पाठवले.
अंटीबायोटिकने माझी अन्नावरची वासना परत आली. अगदी थोडे थोडे का होईना अन्न जाऊ लागले. चव लागतच नव्हती. कोव्हिड टेस्ट केली घरी असलेल्या किट ने. ती दोघांची निगेटिव आली. माझे इन्फ़ेक्शन विनायकला पण झाले. त्याला पण श्वासाला त्रास होऊ लागला. विचित्र खोकला येऊ लागला. त्याचा बॉस म्हणाला तू घरीच रहा. जसे बरे वाटेल तसे ये. काळजी करू नकोस. विनुने पण कफ सिरप, घेतले. त्यालाही ताप होताच. त्यामुळे आय-ब्रुफेन पण घेत होता. आम्ही दोघे उठत बसत जसे होईल तसे काम करत होतो. विनु भांडी घासायचा. मी विसळायचे. थोडे बाहेर जाऊन इडली सांबार, चपाती-सबजी, टोमॅटो सूप असे घेत होतो. जेणेकरून घशाला आराम पडावा असे खात होतो. बाहेर जेवायला गेले की भांडी घासायला कमी पडतात. तर कधी कधी मी उठत बसत पोळी भाजी करत होते. माझ्या प्रकृती मध्ये नाही म्हणायला तसूभर फरक पडला होता. मला रात्री शांत झोप लागत होती. दिवसातून एखाद पोळी जात होती. श्वास घ्यायला त्रास होतच होता. मी तोंडाने फुंकर मारून श्वास घेत होते. माझी फुफ्फुसे पूर्णपणे ब्लॉक झाली होती.
घरात आम्ही काही काही औषधे कायम ठेवतो. त्यात टेराफ्लुचे औषध होते. फ्ल्युवर ही पावडर एकदम रामबाण उपाय आहे. आम्हाला २००३ साली दोघांनाही फ्ल्यु झाला होता. तेव्हा पण अंटिबायोटिक सांगितले होते. त्याने काहीच फरक पडला नव्हता. तेव्हा एका ओळखीच्या इंडियन माणसाने हे औषध घ्या लगेच बरे वाटेल असे सांगितले होते. तेव्हा अगदी लगेचच एका पुडीत सर्व काही क्लिअर झाले होते आणि आम्ही दोघे ठणठणीत बरे झालो होतो. एक्सपायरी डेट १-२ महिने उलटून गेली होती तरी मी ती पावडर गरम पाण्यातून घेतली. त्याने बराच फरक पडला पण तरीही श्वास जैसे थे होता. या पावडरीने माझा आवाज गायब झाला. आवाजच फूटेना. विनुला पण सांगितले ही पावडर घे. विनुला पण डॉक्टर बाईने अंटीबायोटिक दिले आणि तो ठणठणीत बरा झाला. कामावर जायला लागला. १-२ आठवडे उलटून गेले होते. ग्रोसरी आणत होतो. विनुला पण चांगलीच धाप लागत होती. विनु म्हणाला की तू ४ सूर्यनमस्कार घालून बघ. मी म्हणाले अरे माझ्या अंगात ताकदच नाहीये. मी नाही घालणार. असे म्हणाले खरी पण नसलेले बळ एकवटून १ सूर्यनमस्कार घातला आणि मला श्वास थोडा का होईना सुधारला. धापा टाकत टाकत ४ सूर्यनमस्कार घातले. विनु म्हणाला की तू व्यायाम पूर्णपणे सोडला आहेस. मला तुझा खूप राग आला आहे. मी ९११ ला फोन करण्याच्या विचारात होतो. मी म्हणाले मग काय झाले असते. तो म्हणाला काही नाही तुला नेले असते इमर्जन्सी मध्ये आणि परत सोडले असते. अरे देवा ! असे झाले नाही तेच बरे झाले. आता मी मरेपर्यंत व्यायाम करणार. बाहेर तर मी १ मैल चालतेच आठवड्यातून एकदा. हिवाळा सोडला तर रोज बाहेर बाकावर बसून मोकळी हवा घेते. हिवाळ्यात पण मी आता तापमान पाहून बाहेर जाऊन बसणार आहे.
दरम्यान मला अगदी थोडे बरे वाटल्यावर मी ५-६ दिवसांनी डोक्यावरून अंघोळ केली. पराक्रमच केल्यासारखा वाटला मला. विनुला म्हणाले की मला चक्कर आली तर मी आवाज देते तुला. शॉवरचे पाणि पाठीसाठी गरम व तोंड धुताना कोमट असे ऍडजस्ट करून अंघोळ केली. केस धुतले ते पण कोमट पाण्याने. पटापट न डुंबता.
विनु कामावर जायला लागल्यावर मी हळुहळू करत सर्व फर्निचर पुसून घेतले. मला पूर्णपणे बरे वाटत नव्हते. डॉक्टर म्हणाली होती की मी दुसरे औषध देईन. परत एकदा डॉक्टरची विडिओ अपॉइंटमेंट घेतली आणि तिला सांगितले की मला अजूनही नीट श्वास घेता येत नाहीये. तर तिने प्रेडनिसोलन दिले. एका आठवड्याचा २० एमजी च्या रोज २ अश्या १० गोळ्या. त्यातल्या आता चारच शिल्लक आहेत. श्वास घ्यायला बरीच सुधारणा आहे. आणि म्हणूनच मी लिहीत आहे.
मागच्या आठवड्यात कमी थंडी होती तेव्हा मी बाहेरच्या बाकड्यावर तासभर बसले होते. बाहेर कुणीही नव्हते. काही बदके इकडून तिकडे चालत होती. मास्क लावला होता. कोरोना पासून मी थंडीत बाहेर जाताना मास्क लावते विंड चिल असेल तर. दुपारी बाकड्यावर बसल्यावर मला त्या नीरव शांततेत उर्जा मिळाली. विचार करण्याची पण ताकद आता उरली नाही. आता फक्त एकच ध्येय लवकरात लवकर पूर्ववत तब्येत आणायची आहे मला. माझे वजन १३२ पौंड होते ते आता १२२ झाले आहे. चालयची ताकद नाहीये. शांतपणे घरातली कामे जशी होतील तशी करत आहे.
माझी ऑक्सिजन लेव्हल ८८ होती, आज पाहिली तर ती ९६ आहे.
माझी ऑक्सिजन लेव्हल ८८ होती, आज पाहिली तर ती ९६ आहे.
क्रमश : ....
बापरे, पण तुम्ही सगळ्यातून सावरला आहात हे वाचून बरं वाटलं.
ReplyDeleteतुझा प्रतिसाद वाचून खूप छान वाटले गं ! खूपच बिघडली होती तब्येत. इतक्या ट्रीपा केल्या पण असे नव्हते कधीही झाले. पण आता माझी व विनायकची तब्येत सुधारली आहे. अनेक धन्यवाद गं !! :)
ReplyDelete