माझी जेव्हा कोल्स मध्ये नोकरी सुरू झाली तेव्हा मॅनेजर ने मला विचारले की कॅशिअरचे काम करशील का? मी तिला सांगितले की मी तितकी खुश नाही या कामात. ती म्हणाली तुला अनुभव आहे ना? मी म्हणाले हो पण जास्त नाही. तर म्हणाली ओके. तुला ओमनीत टाकते (८ ते ४) मी म्हणाले मला ते काम आवडेल. ओमनी (online fulfillment) नावाचा एक ऍप तयार केलाय. यामध्ये कस्टमरच्या ओर्डरी असतात. लोकेशन पण कळते. मला ट्रेनिंग देणारी माझ्या बरोबर होती. तिच्या पाठी पाठी मी जात होते. ती खूप जलद चालायची. तिच्या पाठी धावता धावता मला धाप लागायची. ओमनी ऍप तयार केले असले तरी त्यात घोड्यासारखे धावावे लागते ते कोणालाही कळले नसावे. म्हणजे असे की एक वस्तू एके ठिकाणाहून उचलायची असेल तर दुसरी वस्तू दुसऱ्या टोकाला असते. परत या टोकाला परत मधेच कुठेतरी. या ८ तासात ३ ब्रेक असतात. एक ब्रेक जेवणाची सुट्टी अर्धा तास आणि २ ब्रेक १५ मिनिटांचे. सोबत पाण्याची बाटली पाणी प्यायला ठेवतातच सगळे. स्केचर्स चे नवे घेतलेले बूट खरे तर मला परत करायचे होते पण कंटाळा केला. दुसऱ्या दिवशी जुने बूट घातले. परिस्थितीत काहीच फरक नाही ! पहिल्या दिवशी पळून पळून डोके, पाय, पाठ सर्व काही इतके प्रचंड दुखत होते की मला रात्री झोप येता येईना. शेवटी सूर्यनमस्कार (८) घातले. जोर बैठका, (प्रत्येकी २/२)आणि हाताचे व्यायाम, तरी जैसे थे परिस्थितीच होती. हा व्यायाम केल्यावर झोप लागली. मला हा व्यायाम पण आता जास्त होत नाही. आठवड्याला जेमतेम एकदाच होतो.
दुसऱ्या दिवशी कामावर रूजू झाले. मी म्हणाले मला कळाले आहे ओमनी काय असते ते ! मी करीन एकटी काम ! दुसऱ्या दिवशी परिस्थिती आणखी अवघड होऊन बसली. आदल्या दिवशीचा प्रचंड थकवा होताच ! माझ्या चालीने काम केले. लंबकासारखी इकडून तिकडे वस्तू घेण्यासाठी जात होते. यामध्ये ठराविक पिक अप झाले की त्याचे पॅकिंग व लेबलींग करून USPS, UPS पोत्यात त्या त्या वस्तू घालायच्या असतात आणि परत धावायला सुरू. पॅकिंग/लेबलिंग करायला स्टोअर रूम मध्ये जावे लागते. तिथे उंच ऊंच छताला टेकलेले रॅक असतात ! आणि प्रचंड सामान असते, ट्रोलीज असतात. तिथेच एका रॅकमध्ये जागा करून दिलेली असते. तिथे पॅकिंग करायचे. हे आवडले काम मला. प्लॅस्टिकची मोठाली पोती असतात. त्यावर USPS, UPS असे लिहिलेले असते. त्याप्रमाणे त्यात सर्व टाकायचे. या प्रकारात bopus (Pick up from store) हे पण एक ऍप आहे. यामध्ये जे order केलेले असते ते दुसऱ्या स्टोअर रूम मध्ये जाऊन ठेवावे लागते. इथे सुद्धा मोठाले रॅक असतात. या रॅक मध्ये बरेच छोटे छोटे कप्पे असतात. त्यापैकी ठराविक ठिकाणी ठेवायचे. सर्व काही बरेच वेळा स्कॅन करावे लागते. वस्तू शोधून झाल्यावर, पॅक करताना, ठेवताना.
वस्तूचे लोकेशन दिले असले तरी सापडायला वेळ लागतो. उदाहरणार्थ एखादा कपडा, त्याचा रंग, डिझाईन, साईज, ब्रॅंड हे सर्व चित्रात दिले असले तरी इतक्या सर्व कपड्यांमध्ये order केलेला नेमका कपडा शोधायला वेळ लागतोच. शिवाय डोळेही दुखायला लागतात ! बाईचा बूट order मध्ये असेल तर साईज, कलर, डिझाईन, ब्रॅंड सर्व शोधण्यासाठी डोळे किलकिले करून पहावे लागते. box वर साईज लिहिलेला, त्यात त्या त्या रंगाचे बूट आहेत का, असे सर्व काही ! मिळाला वेळ लागला की खूपच चिडचिड होते !
शोधण्यासाठी त्याच सेक्शन मध्ये इकडून तिकडे फिरावे लागते. मी ८ तासापैकी ७ तास चालत होते ! दुसऱ्या दिवशी आल्यावर मी आजारीच पडले. तिसऱ्या दिवशी फोन करून सांगितले की मी आज कामावर येऊ शकत नाही. ओमनी मुळे मला आजारपण आले आहे. मला नोकरी सोडून द्यावीशी वाटत होती. पुढच्या आठवड्याच्या वेळापत्रकाप्रमाणे गेले आणि मला सांगितले की तू Amazon Return section मध्ये काम कर. कामाला सुरवात केली म्हणजे तिथली बाई म्हणाली मी काम कसे करते ते बघ. तिथे एक अमेरिकन माणूस नव्यानेच लागला होता. काम बघत होते तितक्यात वेळापत्रक बनवणारी मॅनेजर आली आणि म्हणाली की तू ज्युनिअर सेक्शन मध्ये जा. इथे एक देशी बाई आणि दुसऱ्या देशातली बाई होती. Rohini Gore
No comments:
Post a Comment