एकदा वेळापत्रकात माझ्या नावापुढे स्पेशल प्रोजेक्ट असे लिहिले होते. मला कुतूहलता होती. कामावर आल्यावर मला एका मॅनेजरने बोलावले व ती मला स्टोअर रूम मध्ये घेऊन गेली. तिथे एका लोखंडी रॅक मध्ये ८ मोठाली खोकी होती. त्या रॅकला कप्पे नव्हते. तो रॅक मॅनेजरने बाहेर स्टोअर मध्ये आणला आणि मला म्हणाली की हे सर्व खोक्यामधले कपडे बाहेर काढायचे आणि त्या त्या डिपार्टमेंटला नेवून द्यायचे. त्या आधी मी वुमन्स, ज्युनिअर, किड्स सेक्शनला २ ते ३ दिवस काम केले होते आलेले कपडे परत त्या त्या जागेवर ब्रँडनुसार लावायचे. त्यामुळे कपडे कोणत्या डिपार्टमेंटला द्यायचे ते माहीत होते. अर्थात मेन सेक्शन, ब्युटी, ज्युवेलरी आणि होम हे सेक्शन मध्ये मला काम दिलेले नव्हते. त्या खोक्यात जास्त करून कपडेच खूप होते. हे कपडे हातात धरले तरी ते खूप जड असतात. मला हे काम खूपच आवडले.
मी माझ्या पद्धतीने ६ तासात सर्व ८ खोकी पालथी केली आणि सेक्शन नुसार देवून पण आले. मला खूप दमायला झाले होते. चालून चालून पाय पण दुखत होते. कार्ट्स पण शिल्लक नव्हत्या. सर्व कस्टमर लोकांनी घेतल्या होत्या. कपडे वेगवेगळे करायला जागाही नव्हती. सर्व स्टोअरभर फिरत होते पण तरीही मला हे काम आवडले. कस्टमर लोकांनी खरेदी केलेले कपडे/वस्तू की जे काही कारणास्तव परत करतात ते लावायला मला अजिबात आवडले नव्हते. एक तर ट्रेनिंग नाही. ब्रॅंड नुसार कपडे जरी वेगळे केले तरी सुद्धा ते परत जागेवर लावताना चुकीच्या जागेवर लावून चालत नाही. तसाच एखादा कपडा दिसला तर तो पटकन सापडतो. मग त्या लाईनीत कपडे लावता येतात. रंग, डिझाईन, फॅशन, या सर्व गोष्टी पहायला लागतात. त्यातही काही कपडे घडी करून ठेवायचे असतात. कपडे तरी किती ! खूपच ! वेगवेगळ्या फॅशनच्या जीन्स, स्वेटर, जाकिटे, आणि Topsचे प्रकार पण कितीतरी असतात. मला कपडे त्या सेक्शनला नेवून द्यायचे होते त्यामुळे हे काम मी खूप आवडीने केले. आणि त्यानंतर मला असेच काम दिले गेले. कस्टमर सर्विसच्या मागच्या बाजूला जी खोली होती तिथे रॅक मध्ये कपडे होते ते फक्त मला नेवून द्यायचे होते. इथल्या सणांच्या सीझन मध्ये परत आलेले कपडे/वस्तू इतके काही असतात की रॅक नुसते ओसंडून वहात नाहीत तर तिथल्या फरशीवर पण मोठाले ठीग जमा होतात !
मला दुसऱ्या देशाची बाई परत भेटली. ती आणि मी जाम वैतागलेल्या होतो. किती हे ढीग ! आम्ही फक्त हेच काम करत होतो. कपडे डिपार्टमेंट प्रमाणे नेवून देण्याचे काम ! तरीही कपडे कमी व्हायला तयार नव्हते. कस्टमर सर्विसच्या डेस्क वरचे कॅशियर पण जाम वैतागलेले होते. अजून मी एक पाहिले ते म्हणजे स्टोअर पिक अप असते ना तेव्हा ज्यांनी जे खरेदी केलेले असते ते पार्किंग मध्ये ज्या कार लावलेल्या असतात कस्टमर लोकांच्या तिथे त्यांना ते नेऊन द्यायचे. कस्टमर सर्विसच्या बाजूला एक मुलगी उभी होती. मनात म्हणले ही अशी नुसती उभी का आहे. नंतर कळाले की आतून ती वस्तू घेऊन बाहेर पार्किंग मध्ये बसलेल्या कस्टमर लोकांना नेवून देत होती. असे पण काम असते तर इथे ! बापरे!नंतर मला होम डिपार्टमेंट आले. मला जर बरे वाटले. कामात थोडी तरी विविधता. पण इथेही पहिल्यांदा डोके गरगरायला लागलेच. एके दिवशी मला परत आलेल्या वस्तू जागेवर नेवून ठेवायच्या होत्या. दुसऱ्या दिवशी तिथल्या एका रॅकमध्ये ठेवायच्या होत्या. हे काम मला आवडले. चालणे खूप कमी झाले त्यादिवशी. मी होम डिपार्टमेंटच्या गोष्टी एका रॅक मध्ये ठेवल्याने दुसऱ्या शिफ्टला जे येतील त्यांच्यासाठी हे काम कमी झाले होते. परत आलेल्या गोष्टी रूम मध्ये इतक्या असतात की आतल्यांना बाहेर येता येत नाही की बाहेरच्यांना आत जाता येत नाही. जीव दडपून जातो.
पुढील आठवड्याचे वेळापत्रक लागले नव्हते. असे कधी झाले नव्हते. २५ डिसेंबरच्या आधीचे वेळापत्रक होते. आम्ही दोघी म्हणालो म्हणजे आपली नोकरी संपली वाटते. बरे झाले संपली ते ! असे एकमेकींकडे हासून बोललो. २५ डिसेंबरच्या नंतरच्या एका आठवड्यात मला फोन आला की शुक्रवार, शनिवार, रविवार तू कामावर येऊ शकशील का? १० ते ४. मी हो सांगितले. तसे तर मी एकदम हो नाही सांगितले. मला वाटले नोकरी संपली. मॅनेजरचा फोन आला. मी तो घेतलाच नाही. कशाला आता परत? सुंठेवाचून खोकला गेला तर बरे होईल. परत दुसऱ्यांना फोन आला. विचार केला की ज्या अर्थी २ वेळा फोन आलाय त्या अर्थी खूप गरज उद्भवलेली दिसत आहे. तिला फोन केला आणि तिला सांगितले की मी तिनही दिवस येईन. तिने माझे अनेक वेळा आभार मानले.
या ३ दिवसात मला खूप मजा आली. कस्टमर सर्विसचा डेस्क पूर्ण पणे बंद होता. त्यांची जागा हालवली होती. मेन्स रजिस्टरच्या ठिकाणी ३ कॅशिअर होते. मला त्यांना मदत करायची होती. मदत पण खूप छान होती. २५ डिसेंबर नंतर जे लोक वस्तु/कपडे परत करतात ते या ३ कॅशिअरकडे करत होते. तशी पाटीच तिथे लावली होती. कस्टमर लोकांनी परत केलेले कपडे मला कॅशिअर कडून घेऊन वेगवेगळ्या खोक्यामध्ये ठेवायचे होते. ही खोकी डिपार्टमेंट प्रमाणे केली होती. तिथे चिनी मुलगा आणि एक म्हातारी अमेरिकन बाई कस्टमर सर्विसला काम करणारेच होते. ते मला ओळखत होते. ती बाई म्हणाली परवा तू असायला हवी होतीस. कुणीही मदतीला नव्हते. परत आलेल्या कपड्यांचा ढिगच्या ढीग साठला होता. मला टेबलावरून हालता येत नव्हते कारण कस्टमर लोकांची रांग होती. चिनी मुलगा आणि मी त्या बाईला म्हणालो की काल अशीच गर्दी होती. पण तिसऱ्या दिवशी गर्दी त्यामानाने खूपच कमी होती. आम्ही तिघे अधुन मधून गप्पा मारत होतो. ज्या खोक्यात मी परत आलेले कपडे डिपार्टमेंट प्रमाणे टाकत होते. ते सर्व कपडे परत स्टोअर रूम मध्ये न्यायला दोघे येत होती.
ही म्हातारी अमेरिकन बाई (वय ७५ वर नक्किच असेल) तिला १५ नातवंड होती. मी जेव्हा कामावर यायचे तेव्हा हाय करायची, हासायची, बोलायची. त्या दिवशी खूप गप्पा मारत होती. ती वर्जिनिया वरून न्यु जर्सीत आली होती. मी तिला सांगितले मी पण नार्थ कॅरोलायनातून आले. अगदी खेळीमेळीचे वातावरण होते. मी तिला माझा फोटो घ्यायला सांगितला. एक कोल्सची आठवण म्हणून.
सप्टेंबर ते जानेवारी अशी ४ महिन्यांची माझी सीझनल नोकरी संपली. तसे कोल्सचे मला पत्र आले. एक वेगळा अनुभव मिळाला. इंगल्स आणि कोल्स मी केलेल्या नोकऱ्यांची तुलना केली. मला बराच फरक जाणवला. इंगल्स मध्ये सर्वच जण एकमेकांकडे बघून स्मितहास्य करायचे. इथे सर्वांचे चौकोनी चेहरे ! काही अपवाद होते. इंगल्स मध्येही सर्वजण दमायचे की ! नंतर विचार केला की मी production सेक्शनला होते. आणि तिथे अनेक पदार्थ बनवण्याची विविधता होती त्यामुळे मला कधीच कंटाळा आला नाही जरी तिथे मांस घालून सॅंडविचेस बनवायचे तरीही ! मी कुकिंग मध्ये जास्त रमते. कपड्यांमध्ये नाही. इंगल्स मध्ये जर एकसुरी काम असते तरी सुद्धा मी सलग ४ वर्षे नोकरी केली नसती. तिथे ट्रेनिंग छान दिले मला कार्मेन ने. आणि अर्थातच इंगल्सची नोकरी कायम स्वरूपी होती आणि ही सीझनल होती ! या फरकामुळेच कदाचित सीझनल लोकांना जास्त मह्त्व दिले जात नसावे किंवा ट्रेनिंग पण देत नसावे. मी नंतर जेव्हा फेरफटका मारला तर मला तिथे जे कायम स्वरूपी काम करणारे होते तेच फक्त दिसले. वातावरण सूनसान होते. माझ्याबरोबर कामावर लागलेले काही चेहर मला तिथे दिसले नाहीत. कदाचित मी कोल्स मध्ये सीझनल नोकरी साठी परत अर्ज करीन. कारण जेव्हा मी अर्ज केला तेव्हा तिथे विचारले होते की तुम्ही या आधी कोल्स मध्ये नोकरी केली आहे का? Rohini Gore
No comments:
Post a Comment