Thursday, March 24, 2022

कधीतरी केव्हातरी...

 

कधीतरी केव्हातरी पूर्वीच्या काही काही गोष्टी आठवतात आणि खूप हासू येते. काही गोष्टींमध्ये मन गुंतून रहाते. गेले काही दिवस मला काही गोष्टी खूप आठवत आहेत. आम्ही आयायटी सोडून डोंबिवलीला आमच्या घरी राहायला आलो तेव्हा काहीही नव्हते. आयायटी वसतिगृहात रहाताना घेतलेली गॅसची शेगडी, शिष्यवृत्ती वाढल्यावर केलेल्या दोन गाद्या, आमच्या दोघांच्या सूटकेसा ! इतकेच सामान होते. डोंबिवलीच्या घरात एक पलंग होता. विनु तिथे काही दिवस राहात असताना त्याने सनमायका लावलेला लाकडी पलंग करून घेतला होता. तिथे राहिलेल्या पेईंग गेस्ट लोकांनी आमचा प्लॅट खूप घाण करून ठेवला होता. तो आम्ही यायच्या आधी आम्ही दोघांनी मिळून साफ केला. कपडे ठेवायला बिग shopper पिशव्या होत्या. भांडी कुठे ठेवायची हा प्रश्न होता. आम्ही दोघांनी फडके रोड वरून एक मोठी ६ फुटी अल्युमिनियमची मांडणी आणली. (600 rupees) यामध्ये सर्व काही बसत होते इतकी ती छान होती. या मांडणीमध्ये ताटाळे. चमचाळे, कपबशाळे तर होतेच. शिवाय डबे व पातेली ठेवायला आडवे कप्पेही होते.
आमच्या लग्नाच्या अहेरात सर्वांनी काही ना काही दिले होते आणि ते सुद्धा सर्व स्टीलचे. त्या भांड्याचे पोते होते. आम्हाला काहीही घ्यायला लागले नव्हते. आईकडून आणलेला दगडी रगडा होता. हा जड रगडा आम्ही पुण्यावरून आयायटी मध्ये वाहून आणला होता! अर्थातच बिग shopper मोठी पिशवी विनुनेच धरली होती. हा दगडी रगडा आणण्याचा हट्ट माझाच होता. चटणी व थोडे काही वाटण्यासाठी मला हवा होता. मिक्सर नव्हताच. तर ती मांडणी, दगडी रगडा, बिग shopper पिशवी (ही पिशवी वेगळीच होती. दोन लाकडी दांड्या अडकवल्या होत्या या पिशवीमध्ये हातात धरायला) कारपेट या गोष्टी मला खूप आठवत आहेत गेले काही दिवस. जमिनीवर अंथरायला एक कारपेट आणले. कारपेट घ्यायचे मीच सुचवले होते. ते hall मध्ये अंथरले. हे पण इतके काही छान गुळगुळीत होते. फिकट पांढऱ्या रंगावर फिकट डिझाईन होते. कारपेट घातल्याने त्यावर नुसते बसता तर येतेच पण शिवाय त्यावर अंगत पंगत पण होते. 
 
 
या घरात विनुची पिएचडीची छोटी पार्टी झाली. त्यात आम्हाला कुंदा आत्याने व प्रतिभा काकूंनी मिळून हिंडालियमचे मोठे पातेले भेट म्हणून दिले. त्यात बासुंदी केली होती. बटाटेवडेही केले होते. जेव्हा आयायटीमध्ये विनुच्या मित्रांना घरी बोलावले होते तेव्हा काय करायचे हा माझ्यापुढे प्रश्न होता. आम्ही नुकतेच पुण्याला गेलो होतो आणि मी वहिनींना (सासूबाई)विचारले होते की मी काय करू? मला स्वयंपाक जुजबी येत होता. त्यांनी मला सांगितले की श्रीखंड आण म्हणजे गोड झाले. पुऱ्या कर. मी विचारले पुऱ्या किती करू? आणि अंदाज सांगा. त्या म्हणाल्या की १ वाटीत ४ पोळ्या होतात म्हणजे पुऱ्या ६ किंवा ८ होतील. बटाट्याची उकडून भाजी कर. आणि चटणी कर. ४ मित्र होते. लग्नानंतर पहिल्यांदाच ४ जणांना बोलावले होते. दगडी रगड्यामध्ये चटणी छान झाली. मित्रांनी मिळून आम्हाला टी सेट दिला होता. खूप छान आणि नाजूक होता. हा सेटही आम्ही बरेच वर्ष वापरला नव्हता. मला भिती होती की माझ्या हातून फुटला तर? किटली, दुध ठेवायचा भांडे पण खूप नाजूक होते. कपही वेगळ्या आकाराचे होते. डिझाईन म्हणजे नुसत्या रेषा होत्या आकाशी, पिवळ्या व गुलाबी. वर्णन करू शकत नाही. फोटोही नाही. पूर्वीच्या कितीतरी गोष्टी फोटो मध्ये असत्या तर किती छान झाले असते ना !असे काही आठवले की लिहीनच परत कधीतरी. Rohini Gore

2 comments: