Thursday, May 16, 2013

बाजारहाट.. (२)

लग्ना आधी आईकडे दोन भाजीवाल्या घरीच यायच्या. दोघींचे वेगवेगळे वार ठरलेले असायचे. भाजी ताजी असायची पण महाग असायची. त्या दोघीजणी भाजीच्या जड जड टोपल्या घेऊन यायच्या म्हणून आई त्यांच्याकडून भाजी घेत असे. आईकडे राहत असताना १५-२० दिवसांनी आमची चक्कर पुण्याच्या मंडईत होत असे. शनिपाराचा चौक आहे तिथून मंडईकडे जाणारा रस्ता आहे तिथे सुरवातीला बऱ्याच भाजीवाल्या बायका बसायच्या. ओळीने बसलेल्या असायच्या. त्यांच्या पुढ्यात छोट्या छोट्या टोपल्या, त्यात ठराविक दोन तीन भाज्या, वजन तोलण्यासाठी तराजू, वजने मापे असायची. त्यावेळी आम्ही तिघी म्हणजे आम्ही दोघी बहिणी व आई बसने मंडईत जायचो. भाज्या घेऊन मग ग्रीन बेकरीतले छोटे समोसे घेऊन रिक्शा करून घरी परतायचो.




मंडईतल्या भाजी खरेदीबरोबर इतर दुकानातील खरेहीही व्हायची. आमचे घर गावाबाहेर असल्याने बाकीच्या बऱ्याच गोष्टींसाठी आम्हाला गावात यायला लागायचे. तुळशीबाग, चितळे स्वीटमार्ट, लक्ष्मी रोड आणि नंतर सगळ्यात शेवटी मंडई ! तिथून सर्व भाजी घेतली की मग शनिपाराशी रिक्शा उभ्या असायच्या, त्यातल्या एका रिक्शेतून घरी परत. आमच्या तिघींच्या हातात ३-४ पिशव्या आणि रिक्शात बसताना सर्व पिशव्या, काही मांडीवर तर काही खाली ठेवायला लागायच्या. घरातून काय काय घ्यायचे आहे याची ही भली मोठी यादी ! मंडईत नारळवाला, कांदेबटाटेवाला ठरलेला होता ! कोथिंबीरीच्या गड्यांचे तर मोठे मोठे ढीग असायचे. मंडईत भाज्यांचे भाव ओरडून सांगत असत. नुसता कलकलाट ! मंडईत जिथे कांदे बटाटे विक्रीसाठी ठेवलेले असत तिथे नेहमीच खूप शांतता असायची. मेथीच्या किंवा कोथिंबीरीच्या गड्या की जे नाशिवंत आहेत त्या मालाचा खप पटापट झाला पाहिजे तिथे खूप गोंगाट. ३ ला २, ५ ला ४,, असे भाव ओरडून सांगायचे आणि माल हाहा म्हणता संपून जायचा. भाजी खरेदीमध्ये मला वाटे हा प्रकार खूप आवडायचा, अजूनही आवडतो. मिरच्यांचे वाटे, आल्याचे वाटे, चिंचेचे वाटे तर फुलांचेही वाटे त्यावेळी असायचे.








भाजी खरेदीमध्ये नारळ घ्यायचा असायचाच. एक नारळवाला होता तो प्रत्येक नारळावर त्याच्या बोटातल्या अंगठीने ठक ठक वाजवायचा. त्यांचे नाव बहुतेक पावगी होते. नारळ हलवून आत पाणी किती आहे याचा अंदाज घ्यायचा आणि मग त्यातला एक नारळ तो आम्हाला द्यायचा आणि सांगायचा. एकदम छान नारळ ! गणपती उत्सवात मोदकांसाठी निवडक नारळ बाजूला काढून ठेवत असे. तो नारळवाला एकदम छान नारळ, अजिबात खराब निघणार नाही असे निक्षून सांगायचा, तरीही आई त्याला परत विचारायची, नक्की चांगला निघेल ना? लगेच तो हो ताई, एकदम चांगला निघेल. तुम्ही किती वर्षे नारळ घेत आहात माझ्याकडून! बटाटे कांदे यांच्या जड पिशव्या आई त्यांच्याकडेच ठेवायची आणि त्यांना सांगायची की मी सर्व भाजी घेऊन येते तोवर या जड पिशव्या इथेच राहू देत. तो नारळवाला पण 'हो हो अगदी आरामात या. ' असे सांगून मग आम्ही तिघी फळभाज्या, पालेभाज्या, काकड्या, टोमॅटो असे सर्व खरेदी करायचो. व परत त्याच्याकडे यायचो.





सणवारांच्या दिवसात तर भाजी खरेदीसाठी नुसती धमाल यायची. आंब्याच्या सीझनमध्ये आंब्याच्या पेट्या, करंड्या, थंडीमध्ये १००/१०० लिंबू खरेदी, मे महिन्यात कैरी खरेदी म्हणजे १०/१० किलो कैऱ्या आणायचो. लिंबे आणली की त्यात गोड लोणचे, तिखटमीठाचे लोणचे, सरबते, खाऱ्यातल्या मिरच्या असे कितीतरी व्हायचे! कैरीच्या दिवसात पन्हे, ते सुद्धा कच्च्या कैरीचे, उकडून कैरीचे असे वेगवेगळे, शिवाय मेथांबा. थंडीमध्ये आवळे भरपूर यायचे. त्याचेही बरेच प्रकार आई करायची. आवळ्याचे लोणचे, मोरावळा, पाकातला मोरावळा, औषधी मोरावळा. मोरंबा आणि गुळांबा यामध्ये आम्हा दोघी बहिणींना गुळांबा जास्त आवडायचा!





मटार मंडईत यायला लागले की १०/१० किलो मटार घ्यायचो. घरी आल्यावर मटार वर्तमानपत्रावर पसरायचा आणि प्रत्येकजण छोटी मोठी रोळी घेऊन मटार सोलायला बसायचा. मटारचे सोललेले दाणे रोळीत जमा व्हायचे. आणि मग सगळ्यांच्या रोळ्यातून मटारचे दाणे आई एका भल्या मोठ्या पातेल्यात जमा करून ठेवायची. त्या दिवशी घरभर मटारची हिरवीगार साले सर्वत्र पसरलेली असायची. या इतक्या १०/१० किलो मटारात ओला नारळ घालून केलेली उसळ कितीतरी वेळा व्हायची. सामोसे करण्यासाठीही परत एकदा खास मटार आणला जायचा. सामोसे तर आई इतक्या प्रमाणात करायची की येता जाता दिवसभर सामोसे खाऊन तृप्त व्हायचो.





हरबऱ्याच्या गड्यांचे तर विचारूच नका ! मंडईतून हरबऱ्याच्या गड्या आल्या की दुपारच्या वेळात प्रत्येकाच्या हातात हरबरा गड्डी. कोणी पायरीवर बसून खातयं तर कोणी अंगणात बसून तर कोणी डायनिंग टेबल वर हरबरा गड्डी ठेवून खातय. हा मोठा पसारा! हरबरा खाऊन त्याची टरफले जमा व्हायचीच, शिवाय हरबरा संपलेल्या गड्ड्याही बऱ्याच जमलेल्या असायच्या. संपलेल्या हरबरा गड्यांनी केरसुणी फिरवून केर काढतो त्याप्रमाणे सर्व टरफले एकत्र करायचो.







जेव्हा आम्ही तिघी बसने निघायचो ती बस संध्याकाळी ४ ते ५ च्या दरम्यान असायची. निघताना आई जास्तीचे पैसे घेऊन ठेवायची. एकात एक बसणाऱ्या ७/८ पिशव्या घेत असू. फळभाजीसाठी एक, कांदेबटाटे व नारळासाठी एक, पालेभाजीसाठी एक, इतर काही घेतले आणि खायला घेतले तर त्यासाठी एक दोन पिशव्या असायच्या. भलीमोठी यादीही आठवणीने घेतली जायची. त्याकरता आई आम्हाला कितीतरी वेळा आठवण करून देत असे. आम्ही पण आईला अगं किती वेळा सांगतेस तेच तेच ! असे म्हणून चिडायचो. आई म्हणायची चिडू नका गं, आपले घर लांब आहे ना, मग काही राहिले तर परत चक्कर कशाला?






मंटईत एक 'आरस' नावाचे एक हॉटेल होते. हे हॉटेल काही अजबच होते. एक तर त्याचा प्रवेश बोळकांडीतून होता आणि हे हॉटेल चक्क मजल्यावर होते. तिथे बसले की खिडकीतून खालची रहदारी दिसायची. खरेदी सुरू होण्या आधी तिथे जाऊन मसाला डोसा, उत्ताप्पा आणि इडली सांबार, वर आयस्क्रीम असे खाऊन मग खरेदी सुरू ! प्रत्येक वेळी खरेदीचे वेगळेपण असायचे. कधी आरसमध्ये डोसा तर कधी पुष्करिणी भेळ तर कधी ग्रीन बेकरीतले छोटे समोसे व पॅटीस घेऊन ते घरी आल्यावर खायचो. खाऊन मग गरमागरम चहा !

क्रमश:...


8 comments:

महेंद्र said...

मस्त आठवणी आहेत. :) दिल ढुंढता है.. सारखं झालेले दिसते आहे!

rohinivinayak said...

ho :)ekunach mala bhaji kharedi khup aavadate,, yapudhe USA madhlya aathvani aani kharedi kartana kaay feel hote te yenar aahe,, ekunach bajarhaat cha aadhava aahe, deshatla aani pardeshatlahi :) thanks for comment!

Manasi said...

खूप मस्त वाटलं वाचून! लोणचे, मुरांबे वगैरे आजकाल घरी केले जात नाही...त्याच्या आठवणी वाचून छान वाटलं :) पुढचा भागही लवकरच यावा!

rohinivinayak said...

Thanks Manasi !!

Aditya Patil said...

सुरेख आठवणी! बाजाराच्या आठवणी तर मस्त आहेतच पण त्याहून अधिक आवडले ते ज्या सुंदर प्रकारे माय लेकींचे नाते ह्या लेखात परावर्तीत झाले आहे ते!

rohinivinayak said...

Aditya patil,, tumcha abhipray mala khupach aavadala !! utsah aala,, thanks a lot !!

manasi,, pudhil lekh lavkarch lihin!

thanks to all..

Anonymous said...

Khup Khup khup avdla ha lekh, athvaani bhar bharun alya. Tumchya athvaani vachun asa prashna padto ki aplya sarvaanche baalpan sarkhech aste ka? Itka chaan maala lihita alach nasta pan hey saagla agdi majhya maanatlech ahe. :) Pudhcha bhaagachi aturteni vaat paahin.

rohinivinayak said...

Thanks Anonymous ! thodyaphar pharkane kharach aaple sarvanche baalpan he sarkhech aste, next part lihin lavkarach : ) to ithla USA madhal asel,,