आज सकाळी उठून चहा प्यायला आणि बाहेर गॅलरीत जाऊन पाहिले तर आहाहा! इतके छान सगळीकडे दिसत होते. हिरवेगार! आणि पाऊस पडून गेला होता खूपच आणि शिवाय आभाळही ढगांनी भरलेलेच होते. असे वाटले की लगेच बाहेर जावे आणि फेरफटका मारून यावे. काल रात्रीच खूप पाऊस पडला होता. तळे तुडुंव भरून वाहत होते ते दिसत होते. हिरव्या रंगाच्या कितीतरी छटा आज दिसत होत्या. वसंत ऋतू चालू झाल्याने झाडांना हिरवीगार पाने आली होती आणि त्यामुळेच तर सगळीकडे हिरवेगार झाले होते.
आज थोडेफार क्लिनिंग केले आणि थोड्यावेळ पडले तर एकदम झोपच लागली. उठून नेहमीप्रमाणे चहा घेतला आणि बाहेरच्या गॅलरीला लागून पायऱ्या आहेत तिथे बसले. सकाळी ठरवलेली चक्कर मारणार होते, पण जावेसे वाटत नव्हते. भूक लागली होती म्हणून काय करावे, करावे की नाही, की असेच पटकन उठून बाहेर जावे, असा नुसता विचारच करत बसले. आज विचार करण्याचा वार होता बहुतेक. प्रत्येक दिवसाचे वेगळे असे काहीतरी असतेच नाही का? सकाळी क्लिनिंग करावे की नाही यावर पण बराच विचार केला.
संध्याकाळी मग शेवटी पोहे करून खाल्ले. तेही मी पायरीवर बसून खाल्ले. आज आकाशात वेगवेगळे रंग निर्माण होत होते. एक छोटेसे इंद्रधनूही दिसले मला. बदकीणी जिन्याच्या आजुबाजूच्या हिरवळीवर गवत खात होत्या. त्यातली एक बदकीण मान वेळावून माझ्याकडे बघत होती. मनात विचार आला घालायचे का हिला पोहे खायला. आणि घातलेही. म्हणजे एक दोन पोहे बशीतले फेकत होते आणि ती ते वेचून खात होती. त्यांना कळत असेल का चव? म्हणजे गवताची चव, ब्रेडची आणि आज मी घातलेल्या फोडणीच्या पोह्यांची. हाहा. सूर्यास्ताचा आणि असे काही फोटोज घेतले. नंतर संध्याकाळी असाच विचार करत बसले की फोटोग्राफीचा एक वेगळा ब्लॉग काढावा का? पण तो विचारच राहिला. असे वाटले नको, स्मृती मध्येच सर्व जसे आहे तसेच राहू देत.
आज सकाळी युट्युबवर आशा भोसले यांचे एक गाणे ऐकले. पहिल्यांदाच ऐकले. खूपच छान होते. खूप वेगळे आणि छान शब्दही होते. खरे तर मी एका गाण्याचा शोध घेत होते. तो शोध घेताघेता ते गाणे मला सापडलेच नाही, पण आज हे वेगळे गाणे सापडले. जाहली रोमांचित ही तनू हे बोल आहेत गाण्याचे. वसंत ऋतू आला, आला वसंत ऋतू आला हे गाणे मला मिळाले नाही. पण जे नवीन गाणे सापडले जे पहिल्यांदाच ऐकले तेही वसंतावरतीच होते.
आज मी एकूणच बऱ्याच गोष्टींवर खूप विचार करत राहिले. आजचा दिवस तसा बरा गेला.
तुमची लिहिण्याची शैली सहज आणि ओघवती आहे. लिहित राहा, आम्ही वाचायला उत्सुक आहोत!
ReplyDeleteManasi ,, anek dhanyawaad !!
ReplyDelete