Tuesday, April 23, 2013

२३ एप्रिल २०१३

आजचा दिवस काही अगदी नाठ लावणारा नव्हता. नाठ म्हणजे काही करायला घेतले तर ते बिघडते, कोणत्यातरी गोष्टीसाठी विलंब होतो किंवा अडचणी येतात आणि त्यातून काहीही जर निष्पन्न झाले नाही तर नाठ लागला अगदी, असे आपण म्हणतो, तर तसे काही झाले नाही.






गेले २-४ दिवस सतत बदलत्या हवेमुळे प्रचंड डोके दुखत होते. आज सकाळी उठल्यावर गूगल मध्ये बरीच शोधाशोध केली. ठराविक माहिती मिळवण्यासाठी थोडी तर बाकीची अशीच काही. कालची रात्रीची भाजी बऱ्यापैकी उरल्याने आज भाजी करायची नव्हती. कणीकही भिजवली असल्याने फक्त पोळ्या लाटायच्या होत्या. आज गरम तर होत होते पण अधुनमधून थंडीही जाणवत होती. एकूण तब्येत विशेष चांगली नव्हती तरीही आज बाहेर जाण्याचे ठरवले. नवीन आणलेले बूट घातले. बसस्टॉपवर जाऊन बस पकडली आणि एका स्टॉपवर उतरले जेथून मला दुसरी बस बदलून जायचे होते वॉल मार्टला. जिथे उतरते तिथेच लगेच ती बस येते. पण आज पुढची बस येण्याची चिन्हे दिसेनात. बराच वेळ झाला तर एकाला विचारले की तुम्ही पण याच बसची वाट पाहत आहात का? तर तो म्हणाला नाही. आणि त्याने हेही सांगितले की वॉल मार्टला जाणारी बस आता या स्टॉपच्या समोरच्या स्टॉपवर येते. तुमची बस मिस झाली आहे. अरेरे, हे काय? तिथे तसे काही लिहिले नव्हते की बोर्डही बदलला नव्हता. मग समोर जाऊन उभी राहिले, यात माझा पाउण तास खर्ची झाला. पण आज जायचे असेच ठरवले होते. विनायक मला न्यायला येणार होता.






बसमध्ये बसले आणि काही मिनिटातच वॉल मार्ट आले. मला खूप हायसे वाटले. बस रूट बदलले आहेत हे माहीत होते. बदलले मार्ग चांगले आहेत. उगाचच फिरव फिरव फिरवत नाही आता ही बस. हा बदल छान वाटला. आणि मुख्य म्हणजे जे नवीन बूट घेतले होते ते खूपच छान होते. अजिबात पाय दुखले नाही. हे बदलून आणलेले बूट होते. आधीच्या बुटांनी खूपच त्रास दिला होता. त्यामुळे आज मला बसच्या बदललेल्या मार्गाचा आणि नवीन बुटाचा थोडा आनंद मिळाला. थोडा मूडही बदलला. वॉल मार्ट मध्ये काही खरेदी केली. नंतर विनायक मला न्यायला आला आणि आम्ही घरी आलो.






घरी आल्यावर खूपच डोके दुखत होते. भूक लागली होती. चहा घेतला तेव्हा थोडे डोके थांबले. दुपारच्या पोळ्या होत्या आणि पटकन होणारी फजिता मेक्सिकन स्टाईल भाजी बनवली. तीही छान बनली. म्हणजे मी वाफ देण्याकरता झाकण ठेवते ते ठेवले नाही. नुसती परतली. भाजी चिरली, फोडणी दिली आणि परतली तर काही मिनिटातच भाजी झाली. तसा काही गोष्टीनी मूड थोडाफार बदलला तेवढाच पण डोके अजूनही दुखत आहे. नवीन बुटाने मात्र छानच काम केले आहे. आता माझे चालणे वाढेल असे वाटते. कारण की हल्ली मी जास्त चालले तर माझे पाय खूप दुखतात आणि चालणे होत नाही. बघू या. खूप काही छान दिवस गेला नाहीच. पण तरी थोडा तरी बदल झाला हेच समाधान.




आज संध्याकाळी एक गाण्याचा कार्यक्रम बघितला दूरदर्शनवर तर त्यात ज्या दोन मुली गात होत्या त्या तर छान दिसत होत्याच पण त्यांनि एक स्पॅनिश गाणे पण छान गायले. अर्थ तर काहीच कळत नव्हता पण गाणे छान वाटले हाही जरा सुखद भाग आजच्या दिवसाचा !


2 comments: