मनात भरून राहिलेल्या लेखातील हा दुसरा भाग लिहीत आहे. काजुकतली हा
प्रकार सर्व मेवामिठाईंमध्ये मला खूप आवडतो. काजुकतली वर जो चांदीचा वर्ख
असतो तो तर माझ्या मनात नुसता भरून राहिला नाहीये तर रुतून बसलाय! आणि
त्यातुनही पूर्वी काजुकतली गुलाबी रंगाची मिळायची. त्यावर प्लॅस्टीकचे
कव्हर असायचे. एका वडीला एक कव्हर असायचे. हा गुलाबी रंग काय वर्णावा !
इतका सुरेख. चॉकलेट, गोळ्या, बिस्कीटे मध्ये श्रीखंडाच्या गोल गोळ्या,
रंगही श्रीखंडी ! मनात भरल्या आहेत अगदी.
माझ्या माहेरी बाग होती. जाईचा वेल होता. अनेक गुलाबांची झाडे
होती. त्यामुळे केसांमध्ये भरपूर फुले माळली आहेत. या फुले माळण्यामध्ये
डाव्या बाजुला गजरे किंवा फुले घालायचो आम्ही बहीणी. काहीतरी वेगळे नवीन
छान दिसायचे त्यावेळी. गजरे, फुले यामध्ये पूर्वी वेण्या नावाचा एक फुलांचा
प्रकार मिळायचा. या वेण्या सरळ असायच्या. भरगच्च फुलांनी बांधलेल्या व
जाड दोऱ्यांमधून विणलेल्या. त्यात मला शेवंतीची वेणी अशीच मनात भरून राहिली
आहे. काय दिसायही ही वेणी ! बघत बसावे अगदी. हा वेणी नामक प्रकार खूप मनात
भरून राहिला आहे. आज मी एक टॉप खरेदी केला. छान आहे. हा माझ्या मनात भरून
राहील आता. वेगळा रंग, वेगळी फॅशन, या टॉपवरून मी दहावीत असताना एक
अम्रेला कट फ्रॉक असाच आठवला. तोही साधारण आता घेतलेल्या रंगासारखाच होता.
खूप वेगळा. तो मी तेव्हा घेतला नाही. अंधुक आठवत आहे. हा फ्रॉक माझ्या
मनात त्यावेळी खूप भरून राहिला होता. या सर्व गोष्टींमध्ये काही गोष्टी
किती काठोकाठ भरून राहतात ना !
कॉलेजमध्ये असताना अनेक पिशव्या होत्या. त्यात शबनम
नावाची कापडी गळ्यात अडकवायची पिशवी होती ती तर आवडायचीच पण एक लोकरीच्या
धाग्याने विणलेले एक आयताकृती होते. लांब घागे विणले होते. त्यात चार वह्या
भरायचे. ती पर्स हातात धरता यायची नाही. ताणून जायची म्हणून मग मी त्यात
कॉलेज मधल्या चार वह्या घालून त्याची गुंडाळी करून डाव्या हातात धरायचे आणि
कॉलेजला जायचे्. हा प्रकार मला खूपच आवडला होता आणि खूप मनात भरून
राहिलेला आहे. हे लोकरीचे धागे आकाशी आणि राणी रंगाचे होते. हे रंगही मनात
भरले होते माझ्या !
गोदरेजचे निळे कपाट असेच मनात भरले आहे. ते अजूनही आमच्या भारताच्या
घरात आहे. आमच्या घरात तेव्हा काहीही नव्हते. संसाराला नुकती सुरवात झाली
होती. मी बाजारात जाताना गोदरेजच्या शोरूम वरून जायचे व मला अगदी सहज त्या
शोरूम मधले ते निळ्या रंगाचे कपाट दिसायचे. हा निळा रंग पण खूपच वेगळा
होता. त्याचे वर्णन कराता येणार नाही. कपाट घ्यायचे तर हेच घ्यायचे म्हणून
ठरवले आणि आमची संसाराची सुरवात या कपाटानेच झाली.
आईकडे जे कपाट होते ते एका कारखान्यातून बनवून घेतले होते. खूप दणकट
होते, अजूनही आहे. या कपाटात डावीकडे बांगड्या ठेवण्यासाठी एक जाड लाकडी
दांडा होता तो काढून त्यामध्ये विकत घेतलेल्या बांगड्या ठेवायचो. तो परत
दोन्हीकडून लावता यायचा. छान होता. बांगड्या ठेवण्यासाठी प्रत्येक
वेगवेगळ्या रंगाच्या बांगड्या त्यात ठेवल्या जायच्या. आईच्या काचेच्या
बांगड्या, आमच्या दोघींच्या कचकड्याच्या, खड्याच्या बांगड्या. प्लेन
बांगड्या, असे वेगवेगळे प्रकार या दांड्यावर खूप उठून दिसायचे. हा प्रकार
असाचा मनात भरला आहे.
पूर्वी आम्ही दोघी बहिणी नाकामध्ये चमकी घालायचो. चमकीमध्ये पांढऱ्या
खड्याची चमकीच आम्हाला दोघींना आवडायची. सगळ्या दागिन्यांमध्ये चमकी व
पायाच्या बोटात घालायची जोडवी अशीच मनात भरलेली आहे. खरे तर जोडवी लग्न
झाल्यावर घालायची असते पण मी कॉलेजमध्ये असताना पायाच्या मधल्या बोटात
घुंगरू असलेल्य्य जोडवी घालायचे. तुळशी बागेत घेतलेली ही जोडवी अशीच मनात
भरून राहिली आहे.
मनात भरून राहिलेले अजून संपलेले नाही, ते पुढच्या लेखात, असेच आठवले की लिहीन.
कसं नं, किती साध्या अन छोट्याछोट्या गोष्टीत आपला जीव गुंतलेला असतो.. राहतो. :)
ReplyDeleteho ga bhagyashri :) nakalat kenvhatari aaplyala purvichya goshtti aathvat rahatat aani tyatach aapale man ramte, nahi ka?
ReplyDeleteकाय अफलातून कल्पना आहे:
ReplyDeleteसगळ्यांचा कोणत्या ना कोणत्यातरी निर्जीव वस्तूमध्ये जीव गुंतला असतो:
कारण मालकी हक्कामुळे म्हणा किंवा सतत वापरल्याने निर्माण झालेल्या जवळीकीने
म्हणा
पण आपले त्यांच्यावरची प्रीत जडते:
thanks ninad ! satat vaparlyamule nahi tar mazya manat tya goshtin baddalchi sunderata manat bharun rahilyamule mala ya sarv goshtti aavadtat, mhanje ase ki ti ji goshtta mala aavdate ti khup uncommon aste, khup mojkya aani manat bharlelya goshtti
ReplyDelete