Sunday, April 22, 2012

तळे ... (३)

तळ्यावरची बदके म्हणजे अनुक्रमे उंच मानेची बदके, बसकी तपकिरी रंगाची बदके व कोंबड्यासारखी दिसणारी बदके आहेत. ही जी कोंबड्यासारखी दिसणारी बदके आहेत त्यांचे व त्यांच्या पिलांचे वर्णन मी आधी केले आहे. एक दिवस अचानक याच बदकांची अजून एक फौज मला दिसली. त्या बदकीणीची पिले पिवळ्या रंगाची होती. हिरवळीवर तर खूपच उठून दिसत होती! अजून एका बदकीणीची पिले बरीच काळ्या रंगाची व तपकिरी रंगाची होती. तीही अशीच अचानक दिसली. या बदकीणी आणि तिच्या मागोमाग चालत जाणारी ही छोटी पिले खूप छान दिसतात. बदकीण व तिच्या पिलांचे मागोमाग चालणे बघत बसावेसे वाटते. या प्रकारची बदके खूपच धीट असतात, याउलट कॅनेडीयन बसकी व तपकिरी रंगाची बदके एक नंबरची घाबरट पण तीही आता हळूहळू धीट होत चालली आहेत. या बदकांना सुरवातीला मी ब्रेड घालायला जायचे तर ती पटकन पुढे येऊन खायला धजावत नव्हती. हळूहळू त्यांना माझी सवय झाली आणि आता तर मी बाहेर पडल्या पडल्या हातात ब्रेड नसला तरी मागोमाग चालत येतात. सुरवातीला ही बदके ३५ ते ४० होती!








अगदी सुरवातीला तळ्यावर कॅनेडीयन बदकांचेच राज्य होते. त्यांना ब्रेड घालण्याकरता तळ्यावर गेले की ब्रेडचे छोटे छोटे तुकडे करून त्यांना खायला घालत असे. त्यात त्या बदकांची पिलेही असायची. पण ही पिले खूपच कमी. याउलट कोंबड्यासारखी दिसणाऱ्या बदकीणीची पिले किमान १५ ते २० तरी असतातच! एकदा अशीच दुपारच्या वेळेला तळ्यावर गेले होते तेव्हा थोडे ढगाळलेले वातावरण होते आणि वाराही होता. वारा सुखावणारा होता. हिरवळीवर तपकिरी रंगाची बदकीण व तिची पिले बसली होती. तळ्याच्या काठावरच होती. मीही तिथेच हिरवळीवर बसले आणि त्या पिलांचे निरीक्षण करत होते. गार वारा असल्याने ही पिले अधुनमधून पेंगत होती. एका बाजूला बदकीण तिचा पिसारा फुलवून पंख साफ करत होती. मी त्या बदकीणीच्या व तिच्या पिलांच्या खूप जवळ बसले होते तरीही त्यांना अजिबात माझी भीती वाटत नव्हती. एकदम अचानक दोन तीन बदके आली आणि त्या बदकीणीला हुसकावून लावले ते सर्व जण पाण्यात शिरले. लगेचच ती बदकीण परत काठावर आली जिथे तिची पिले होती. त्या बदकीणीचा माझ्यावर विश्वास असावा. त्या पिलांना तसेच ठेवून ती पाण्यात जाऊन पटकन परत आली. हे सर्व पाहण्यात त्या दिवशीची दुपार खूप छान गेली! संध्याकाळी ब्रेड घालण्याच्या व्यतिरिक्त मी बरेच वेळा कधी सकाळी तर कधी दुपारी तळ्यावर जाते. बदकांचे निरीक्षण करते. बदके पाण्यात पंख उडवून छानपैकी अंघोळ करत असतात. काही वेळा रणरणते ऊन असले की छोट्या झुडुपाखाली जी सावली असते तिथे निवांत बसलेली असतात. सकाळी व दुपारी ते सहसा ब्रेड खायला उत्सुक नसतात. त्यांची ब्रेड खाण्याची वेळ संध्याकाळची. एकदा अशीच दुपारच्या वेळेला गेले होते तेव्हा एक बदकीण आपल्या पिलांना घेऊन हिरवळीवर बसली होती. गार वारे सुटले होते. मी पण एका झाडाखाली बसले व त्या पेंगुळलेल्या बदकीणीकडे व तिच्या पिलांकडे पाहत होते.






 एकदा अशीच तळ्यावर गेले तर काही बदके अंघोळ करत होती. त्यात काहींची पिलेही होती. त्यांची पिले बदकीणीचे अनुकरण करताना दिसली. ही बदके अंघोळ करताना पंख खूप वेळा उडवतात. माना वेळावून चोचीने पंख साफ करतात. नंतर हिरवळीवर येतात. हिरवळीवर आल्यावरही त्यांचे पंख साफ करणे बराच वेळ चालू असते. पंख साफ करून झाले की पंख फुलवून झटकतात व हिरवळीवर चालत चालत परत त्यांचे खाणे चालू होते. कोण कुठे ब्रेड घेऊन येत आहेत का यावर सर्वच बदकांचे बारीक लक्ष असते. तळ्यावर कोणी ब्रेड द्यायला आले की लगेच कुठून कुठून धावत येतात. वर वर्णन केलेली सर्व प्रकारची बदके व त्यांची पिले आहेतच, शिवाय या तळ्यावर काय नाही? सर्वजण आहेत. सीगल्स, कासवे, बगळे, कावळे, साळुंक्या, वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी, मासे आणि या हिरवळीवर उगवलेली छोटी छोटी फुले तर खूपच सुंदर आहेत. या फुलांचे रंगही छान आहेत. लव्हेंडर, गडद जांभळी,पिवळी, पांढरी, नारिंगी अशी वेगवेगळ्या रंगाची फुले खूप नाजुक आणि सुंदर आहेत!


 क्रमशः

1 comment:

  1. paragraph vala lihit ja ho please - agadi vachanvar nahi kiti hi chan asala tari !!

    ReplyDelete