Wednesday, March 28, 2012
वास्तू (५)
स्वयंपाकघरात चहा प्यायला फरशीवर आम्ही पाट घेऊन त्यावर बसायचो आणि बाहेरच्या खोलीमध्ये अभ्यासाला बसण्याकरता सतरंजी अंथरून बसायचो. अभ्यासाला वहीत लिहिण्यासाठीही आम्ही पाटाचा वापर करायचो. मांडीवर पाट ठेऊन त्यावर वही पुस्तके ठेऊन पुस्तकाच्या धड्याखालची प्रश्न उत्तरे लिहायचो. डायनिंग येण्याच्या आधी चहा घेण्याकरता किंवा जेवणाकरता पाटावर बसायचो. आई पहाटे उठून सगळ्यांचा चहा ठेवायची. त्यावेळी फरशीवरच गॅस होता. आई बसून चहा करायची. पांढऱ्या शुभ्र कप बशांमधून आई चहा ओतायची व आम्ही सगळे मिळून एकत्र चहा घ्यायचो. त्यावेळी चहा आधी बशीत ओतायचा आणि मगच तो प्यायचा. बशीतला चहा गरम असायचा. कधी तो थंड झाला नाही. २ बशा होतील इतपत चहा असायचा. आई थोडा जास्तीचा चहा करायची. पहिला चहा झाला की अजून कोणाला हवा असल्यास अजून द्यायची.
बाहेरच्या खोलीत सतरंजीवर अभ्यास करताना जेवायच्या वेळेला मात्र खूप भूक लागलेली असायची. सकाळी ८ ते १० अभ्यास करायचो. नंतर जेवायला बसायचो. पावसाळ्याच्या दिवसात पाऊस पडत असेल तर आणि अभ्यास झाला असेल तर बसल्या बसल्याच पावसाला बघायचो. थंडीत फरशी खूपच गार पडायची. मग दार लावून उरलेला अभ्यास करताना काही वेळा स्वेटर असला तरी गोधडी पांघरून घ्यायचो. जेवायला वेळ असेल तर त्या वेळात एखादा धडा वाचून व्हायचा. अधून मधून आईचा स्वयंपाक कुठवर आला आहे हे पाहण्याकरता पाणी प्यायच्या निमित्ताने स्वयंपाकघरात डोकावायचो. आई म्हणायची वेळ आहे अजून. आईने हाक दिली रे दिली की लगेच स्वयंपाकघरत जाऊन पाने घ्यायचो. आधी पाट मांडायचो. त्यापुढे मोठाली ताटे असायची. आमटीकरता वाटीही पानात ठेवायचो. दोन तांबे पाणी पिण्याकरता घेऊन वाढायच्या आधी आई म्हणायची. ताटे पुसलीत का? आईला ताटे स्वच्छ पुसलेली लागायची. मग आई गरम गरम आमटी व भाजी चे पातेले
फरशीवर ठेवायची व एकीकडे पोळ्या करायला घ्यायची. बाबा सकाळीच कामाला गेलेले असल्याने आम्ही दोघी व आजोबाच जेवायला असायचो. आई गरम पोळ्या वाढताना आमच्या तिघांमध्ये एका वेळी एकाला अर्धी पोळी व दुसऱ्या दोघांना चतकोर चतकोर अशा पोळ्या वाढायची. गरम पोळीवर आम्ही तूप घ्यायचो. मधूनच गरम आमटी प्यायचो. डावीकडे चटणी नाहीतर लोणचेही असायचे. शिवाय रोज कोणती ना कोणती कोशिंबीरही असायचीच. पोळी संपली की गरम आमटी भात खाऊन त्यावर एक दोन वाट्या ताजे ताक प्यायचो.
डायनिंग टेबल मी नोकरी लागल्यावर पहिल्या पगारात घेतले. मला डायनिंग खूप आवडते. डायनिंगच्या वर ताटाळे होते. त्या ताटाळ्यातच कपबशाळे पण होते. जेवायला बसताना पाने घेणे सोपे झाले. जेवणानंतर डायनिंग टेबलाची मी खूप काळजी घ्यायचे. नीट वेळच्यावेळी पुसून घ्यायचे. डायनिंग वर बसून आई आम्हाला एकीकडे अशाच गरम पोळ्या वाढायची पण मग त्यावेळेला कडप्पा आला होता. कडप्याचा काळा कुळकुळीत ओटा त्यावर गॅस व आई आम्हाला गरम पोळ्या डायनिंगवर बसल्यावर जेवायला वाढायची. उष्टी खरकटी काढणे पण सोपे झाले होते. या आधी खाली बसायचो तेव्हा उष्टी काढल्यावर नंतर फरशी तरटाने पुसावी लागे. डायनिंग आल्यावर पाटाचा उपयोग आमच्याकडे कुणी जास्तीचे पाहुणे आले की व्हायचा किंवा कुणाला केळवण व डोहाळेजेवण असले की मग आम्ही बाहेरच्या खोलीत पाने घ्यायचो. एकावेळी १०-१५ माणसे बसायची. केळवण असले की मग ताटाच्या खाली पण आम्ही पाट ठेवायचो. केळवण, डोहाळेजेवण असले की माझे बाबा प्रत्येक ताटाभोवती सुंदर महिरप काढायचे. जेवणे झाल्यावर मग उष्टी खरकटी काढताना आधी वेगळी रांगोळी एका जागी घेऊन मग ती केराच्या टोपलीत टाकून नंतर दोन वेळा तरटाने पुसून घेत असू.
आमच्या घरी आई व बाबा दोघेही शिकवण्या घ्यायचे. आई पहिली ते सातवी घ्यायची व बाबा आठवी ते दहवी पर्यंतच्या मुलांना शिकवत. त्यामुळे आमची बाहेरची खोली सतत भरलेलीच असायची. आई सकाळी सर्व आवरून ८ वाजता शिकवायला बसायची ते १० पर्यंत. नंतर परत दुपारी ३ ते ५ शिकवण्या असायच्या. बाबा संध्याकाळी ऑफीसमधून आले की त्यांच्या शिकवण्या ६ ते ९ चालायच्या. आधी ४-५ सतरंज्या अंथरायचो. नंतर मोठा जाड सुतडा घेतला होता. त्यानंतर कारपेट आले. दर वेळेला शिकवण्यांची मुले गेली की संतरंज्या झटकून टाकायला लागायच्या. सुतडा जास्त दिवस टिकला नाही. कारण की तो धुवायला खूप अवजड होता. कारपेट आले तेव्हा त्यावर केरही काढता यायचा. शिवाय कोणी जेवायला बसले तरी पाने त्यावरच घेतली जायची. शिवाय शिकवण्यांच्या मुलांना बसायलाही छान वाटायचे. कारपेट सुद्धा सारखे पुसून घ्यायला लागायचे. कारण की बाहेरच्या खोलीत सारखी वरदळ असायची. शिकवण्यांची मुले, आलागेला बराच होता. नातेवाईक व आईबाबांचे मित्रमंडळ शनिवार रविवार यायचे.
क्रमश:
Rohini Taai, uttam lihilayt tumhi haa bhaag, khup sundar varnan kelay. Barech divasani post kelat tumhi, me khup miss karat hote, adhun madhun dokavun jaiche. Mag tumche kahi juney lekh va goshti vachlya ki khup chaan vataycha. Tumhi ashyach lihit raha...jasa lahanpanchya athvani alya ki vatta na apan lahanach rahilo asto tar...tasach vatta tumche hey vastu che bhaag vachun ki kadhich saampu naye.
ReplyDeleteCup-bashit bhurkey marun chaha pinyaat kaay veglich majja asaychi na :) maala chahat jeera butter budvun khaila khup avdayche.
- Priti
thanks priti !! malahi tuza khup chhan abhipray vachla ki utsah yeto! aamhi chahat khari budvun khaycho,, khari kiti chhan asaychi na?
ReplyDeletechaha asahi ek vegla lekh lihinar aahe... kap bashit chaha pinyachi maja khup mast hoti! samadhan vatayche, te samadhan mug madhe chaha pyaylyavar nahi hoat ..:)
ReplyDeleteHo ga, chahat budvun khaari mastach lagtat! :) 'Chaha' hya vishayavar tujha lekh vachayla maala khup avdel. Bara jhaala saangitlas, me haatat garam garam chahacha cup gheun basen vachayla...karan tujha varanan itka sundar asta ki chaha varcha lekh vachtana toh pyaavasa vatnarach! :D
ReplyDelete- Priti
Mast lihilay rohinitai :) Vastu che sarvach bhag uttam aahet :) Waiting for next part
ReplyDeletehi nisha,, thanks for complements! tula va priti la vastu aavdat aahe he vachun mala khup aanand hoat aahe. lihin lavkarach next part :) thanks so much!
ReplyDeletechan zala ahe g ha part pan. aajach wachla me. next part lavkar tak .
ReplyDelete-pallavi
thanks pallavi,, tula ha part aavadla he vachun chhan vatle.. next part lavkar takin.
ReplyDeleteमग आई गरम गरम आमटी व भाजी चे पातेले
ReplyDeleteफरशीवर ठेवायची व एकीकडे पोळ्या करायला घ्यायची. बाबा सकाळीच कामाला गेलेले असल्याने आम्ही दोघी व आजोबाच जेवायला असायचो. आई गरम पोळ्या वाढताना आमच्या तिघांमध्ये एका वेळी एकाला अर्धी पोळी व दुसऱ्या दोघांना चतकोर चतकोर अशा पोळ्या वाढायची. गरम पोळीवर आम्ही तूप घ्यायचो. मधूनच गरम आमटी प्यायचो. डावीकडे चटणी नाहीतर लोणचेही असायचे. शिवाय रोज कोणती ना कोणती कोशिंबीरही असायचीच. पोळी संपली की गरम आमटी भात खाऊन त्यावर एक दोन वाट्या ताजे ताक प्यायचो.
wooow.. me pan tumchya panktila basun jevle :)
-Pallavi
thanks pallavi,,, kharech lahanpanche divas kiti chhan hote na! pratyekache vegle aani tarihi sarkhe ! gele te din gele..
ReplyDelete