Wednesday, December 21, 2011

चित्रपटांची मौजमजा

पूर्वीचे चित्रपटांचे दिवस म्हणजे चित्रपट हा चित्रपटगृहात जाऊन पाहणे ही एक खूप छान करमणूक होती. तीन सहा नऊ बारा बरोबरच मॉर्निंग शोज आणि मॅटिनीज याची मजा काही निराळीच! चित्रपट म्हणजेच पिक्चर पाहणे. चल ना, आपण पिक्चर पहायचा का? असे एकमेकींना विचारत असू. पिक्चर पाहण्याबरोबर त्यासोबतची जी मजा येते ना त्याचा खरा आनंद असायचा. एखादा चित्रपट पाहिला गेला, तर तो कसा पाहिला, ठरले कसे या ना त्या अनेक आठवणी, मौजमजा व गमतीजमती या चित्रपटाच्या बरोबर असायच्या. आम्ही दोघी बहिणी व आमच्या मैत्रिणी यांना अमिताभ खूप आवडायचा, अजूनही आवडतो. आमच्या घरी एक मैत्रिण तर अगदी रोजच्या रोज यायची. एकदा मिनर्व्हा टॉकीजला अमिताभचा 'अदालत' लागला होता. ती म्हणाली जायचे का आपण? तीनचा शो होता म्हणून लवकरच निघालो. तिकीट काढून मंडईतच थोडा वेळ काढायचा व पिक्चर पहायचा असे ठरवले होते. बसस्टॉपवर गेलो तर एक बस नुकतीच गेली होती. दुसऱ्या बसची वाट पाहतोय तर आलीच नाही. मैत्रिण म्हणाली आपण चालायला लागू. पुढच्या स्टॉपवर गेलो तरीही बस अजून आलेली नव्हती. चालत चालत गेलो तर बसचा पत्ता नाहीच आणि चालता चालता गणेशखिंड रोड ते मिनर्व्हा टॉकीजपर्यंत चालत गेलो होतो! तिकीटे काढली आणि चित्रपट सुरू झाला. नंतर मात्र पाय प्रचंड दुखायला लागले. लहानपणी नुकतेच टीव्ही यायला सुरवात झाली होती. 

 

मैत्रिणीकडे पहिला टीव्ही आला. अमिताभचे इतके वेड आणि त्यातून रविवारी संध्यकाळचा चित्रपट होता 'अभिमान' अभिमान तर मी कितीही वेळा पाहू शकते इतका छान चित्रपट आहे. पहिलाच टीव्ही असल्याने तिच्याकडे खूप गर्दी झाली होती. गिचमिडीत बसलो. नंतर तिच्या आईने पूर्ण अंधार करून टाकला. एक तर तो टीव्ही शोकेसमध्ये आणि वर होता आणि अंधार असल्याने मिणमिणते डोळे करून छोट्या अमिताभ जयाला पाहत होतो. नंतर डोके व मान खूप दुखायला लागली. पनवेलला मामाकडे मामेबहीणीच्या लग्नाला जमलो होतो. सर्व भावंडे जमल्यावर तर आमचे पिक्चर पाहणे व्हायचेच. नेहमीप्रमाणे कोणता चित्रपट बघायचा यावर चर्चा सुरू झाली. पनवेलमध्ये गावाबाहेर एक चित्रपटगृह होते आणि म्हणे तिथे एक भूत होतो म्हणून तिथे जास्त कोणी जायचे नाही. तेह्वा खेलखेलमें लागला होता. मामी ओरडत होती त्या थिएटरमध्ये जाऊ नका, तिथे भूत आहे. आम्ही मामीला म्हणालो अगं मामी भूत वगैरे काहीही नसते गं आणि आम्ही १२-१५ जण आहोत. आम्हाला सर्वांना पाहून भूतच घाबरून जाईल. रात्री ९ ते १२ चा शो होता. खेलखेलमें मध्ये ३-४ खून आहेत. चित्रपट संपला आणि बाहेर पडलो तर काळाकूट्ट अंधार! त्यावेळेला बस वगैरे नव्हती. चाल्तच गेलो होतो. चित्रपटात नुकतेच खून पाहिले होते आणि मामीचे शब्द आठवले. तिथे जाऊ नका त्या चित्रपटगृहात भूत आहे आणि जाम टरकायला झाले. रस्त्यावरही म्युनिसिपाल्टीचे मिणमिणते पिवळे दिवे. ते सुद्धा जास्त नव्हते. अंधारच अंधार सगळीकडे. चालत पळत एकदाचे घर गाठले आणि सुटकेचा निश्वाः स टाकला. अमर आकबर अँथनी एकदा पाहिला. दुसऱ्यांना मैत्रिणीला कंपनी म्हणून पाहिला, त्यानंतर तिसऱ्यांनाही तोच! अमर अकबर ऍथनी पाहिल्यानंतर बरेच दिवसांनी मामेबहिणीकडे गेले होते. तिच्याकडे गेले तर तीच कुलूप लावून सर्व मंडळी बाहेर पडत होती. मला म्हणाली अगं बरे झाले तू आलीस. चल आता आम्च्याबरोबर अमर अकबरला. मी म्हणाले काय? अगं नको गं तो पिक्चर मी दोनदा पाहिला आहे. तर म्हणाली की आमच्याबरोबर तिसऱ्यांना पाहा. हीच कथा हम आपके है कौनची. असाच तिसऱ्यांना जबरदस्तीने पाहिला लागला. आम्ही सर्व भावंडे मिळून असेच लागोपाट २ पिक्चर पाहिले. रात्रीचा ९ ते १२ तेरे मेरे सपने पाहिला. आणि दुसऱ्या दिवशी मॅटीनी शो पाहिला तो होता 'बंबईला बाबू' हा चित्रपट आम्हाला खूप आवडला आणि बाहेर पडल्यावर एकच चर्चा. हे काय? देवानंद सुचित्रासेनचे लग्न दाखवाला हवे होते. सुचित्रा सेन व देवानंदची जोडी किती छान दिसत होती ना! आणि नाहीतर त्या दोघांना कळाले होतेच की आपण भावंडे नाहीत ते. मग काहीतरी करून त्या दोघांचेच लग्न लावायला पाहिजे होते. पूर्ण निराशा झाली. इतका छान चित्रपट आणि शेवट हा असा. दुसऱ्याशी लग्न. त्या नवऱ्यामुलाला कोणीतरी किडनॅप करायला हवे होते अशी आमची चर्चा! हिंदी चित्रपट व त्यातली गाणी हे जरी खूप आवडीचे असले तरीही पूर्वी चित्रपटगृहात जाऊन मूद्दामहून चित्रपट बघितले गेले नाही. एकत्र जमलो की पिक्चर पाहणे व्हायचे. कधीकधी मैत्रिणीबरोबर पण तरीही जास्त नाहीत. पूर्वी सार्वजनिक सत्यनारायण होत असत तेव्हा लाऊडस्पीकरवर चित्रपटांची गाणी लावली जायची ती ऐकू यायची त्यावरून काही चित्रपट पाहिले गेले. त्यापैकी बेताब, तेजाब, मैने प्यार किया या चित्रपटातील गाणी सारखी ऐकू यायची लाऊडस्पीकरवर. मग त्या गाण्यांकरता तो चित्रपट कसा आहे म्हणून बघितले गेले. लग्नानंतरही विनायक व मी असेच कोणाबरोबर पिक्चरला जायचो. कधीकधी त्याचे मित्र व आम्ही दोघे. कधी माझ्या मैत्रिणी व आम्ही दोघे. किंवा कधी नातेवाईक यांच्याबरोबर, पण तरीही चित्रपट बघण्याचा सपाटा लावला गेला ते घरी रंगीत ओनिडा आल्यावरच! टीव्हीवर कोणत्या ना कोणत्या चॅनलला पिक्चर हे लागलेले असायचे. त्यातूनही सोनी चॅनलवर खूपच चित्रपट पाहणे झाले. त्यानंतर अमेरिकेत आल्यावरही बरेच चित्रपट पाहणे झाले पण ते कसेटवरचे! पहिले डेंटनला आलो तेव्हा तिथे एका श्रीलंकन माणसाचे दुकान होते. तिथल्या कॅसेट आणून पहायचो. त्यात कैरी पाहिला. तेलगू मैत्रिणीना पहायला दिला. त्यांनाही तो आवडला. 

 

आम्ही त्यावेळेला तिघी जणी होतो. तिघी प्रत्येकी एकेक कॅसेट आणून बघायचो व कॅसेट अदलाबदली करून पहायचो. मग आमचे एका वेळी ३ पिक्चर पाहायले जायचे. डेंटनला युनिव्हरसिटीमध्ये इंडियन ऍसोसिएशनतर्फे एका हॉलमध्ये फूकट पिक्चर दाखवायचे. मी व माधवी मिळून असेच ३-४ चित्रपट पाहिले. लगान, चुपके चुपके, रंगीला, डीडीएलजे. खूप मजा आली होती. डिसेंबरच्या बर्फात कुडकुडत जाकीत मफलर घालून चित्रपट पहायला जायचो. भारतात असताना असाच आम्ही मैत्रिणींनी 'संगम' पाहिला होता. आयत्यावेळी ठरले. बस करून टॉकीजवर गेलो तर चित्रपट हाऊसफुल्ल होता. पहिल्या रांगेतली काही तिकिटे बाकी होती. विचार केला इतक्या लांबून आलो तर पाहू या. पहिल्या रांगेत बसून पिक्चर पाहणे म्हणजे किती त्रासदायक असते ते त्यावेळी कळाले. मान उंच करून पाहिला लागले. चित्रपटातिल चित्र तर अंगावर धावून आल्यासारखी वाटत होती, पण पिक्चर पहायची हौस केवढी! अजून एक चित्रपट 'प्यार का मौसम' पाहिला. असाचा आयत्यावेळी ठरला. बाहेरच गरम समोसे आणि बटाटेवडे खाले, मस्तपैकी एक चहा घेतला. मॉर्निंग शो होता. कॉलेजमधून परस्पर गेलो होतो. आणि चक्क त्यावेळी झिमझिम पाउसही पडत होता. छान वाटला होता त्यावेळी हा पिक्चर. नंतर घरी बसने आलो आणि जेवलो. लग्नानंतर बरेच वर्षांनी 'दिल तो पागल है' हा असाच बघितला गेला. खरे तर मला शाहरूख खान अजिबात आवडत नाही. पण एकांनी आग्रह केला ६ जण जोडीने गेलो होतो. त्यांनीच तिकिटे काढली. येताना जाताना रिक्शा आणि मध्यंतरातही काही खायला आणले होते. त्या पिक्चरला तर मी झोपले होते इतका बोअर पिक्चर. मधूनच थोडे डोळे उघडून काय चालले आहे ते बघायचे. बाकीचेही वैतागले होते. पण आता पिक्चरला आलेच आहोत म्हणल्यावर बघणे हे आलेच! अमेरिकेत आल्यावर सुरवातीला लगान पिक्चर असाच कॅसेट आणून पाहिला पण तो नवीन असल्याने कॅसेट लगेच परत करायची होती मग सर्वानी मिळून एकाच घरी पाहिला.

 

 तसाच देवदास हा चित्रपट. सीडी आणून पीसीवर पाहिला. तोही असाच लगेच द्यायचा होता. कॅसेटवरचे बरेच चित्रपट आम्ही सर्वांनी मिळून रेकॉर्ड केले होते. नंतर कधीही पाहता यावेत म्हणून. एकुणच जवळपास सर्व चित्रपट बघून झाले होते आणि तेही खूप वेळा. त्यामुळे मी क्लेम्सनला असताना चित्रपट पहायचे ते नेहमी कॅसेट मध्ये मध्ये थांबवून. थोडा चित्रपट पहायचा मग थोडे काम करायचे, मग परत थोडा पहायचा, मग जेवण व कामे उरकून परत थोडा. नंतर एखादी डुलकी काढून दुपारचा चहा घेताना बाकीचा उरलेला बघायचा. तोंडी लावल्यासारखे पिक्चर पहायचे. जेवताना आपण कसे तोंडी लावायचे पदार्थ अधुनमधून खातो ना जेवताना चव येण्यासाठी तसे पिक्चर पहायचे. आता मात्र ३ तासाचा सलग चित्रपट बघण्याचा खूपच कंटाळा येतो. पण तरीही अजूनही.... चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पहायला मग तो आधी पाहिलेला असला तरीही पहायला नक्कीच आवडेल.... सोबत मात्र मित्रमैत्रिणी हव्यात.... मग चित्रपट पाहायला जाताना एखादी साडी नेसली जाईल... एखादा ड्रेस घातला जाईल... पण कधी, कुठे आणि केव्हा?? ... पूर्वीचे दिवस राहिले नाहीत आता.... गर्दी सोसवेल का?... की घरीच छान वाटेल बघायला?.... एकूणच सगळ्यातली मजा आता गेली आहे हेच खरे.....आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जुने चित्रपट थिएटर मध्ये कुठे लागतात, मग काय उपयोग???

 




 

वरील सर्व फोटोज मला व्हॉटस ऍप फॉरवर्ड वरून आलेले आहेत विनायकचा मित्र हरीश कडून.

 

6 comments:

  1. रोहिणी....मस्त लिहिलयस ग! पूर्वीचे दिवस आठवले...
    तू इकडे आलीस न कि आपण जावूया सिनेमाला...छान साडी नेसून किंवा झकपक ड्रेस घालून..

    ReplyDelete
  2. hii swati!!!,,, agadi manatle bolalis ga,,, khare aahe,, ashi ekhadhi maitrin barobar asli ki cinema pahayla maja yete na? 2010 la mi natrang enjoy kela hota talkies madhe jaoon,,, mazi jaoo, putani aamhi doghe ase sarv jan gelo hoto,, maja aali hoti,,thanks swati

    ReplyDelete
  3. Anonymous9:30 AM

    Hi Rohini Tai, Chaan vatle ha lekh vachun. Amhaa doghana pan movies pahayla khup avadtat. Me Indiat astana itke nahi pahayche pan ithe alyapasun vicharu naka! :)

    Amhi Christmas break madhye ek divas 'movie marathon' karto...eka pathopat ek ase 4-5 movies pahun yeto...madhye madhye breaks gheto tehvha charcha va khane-pine hote. We look forward to this every year and have very good memories of it.

    ReplyDelete
  4. chan lihilay rohini tai :) aawadla

    ReplyDelete
  5. Nisha,, Thank you very much!

    ReplyDelete